ध्यानाचे महत्त्व, ध्यान कसे करावे? ध्यानाचे फायदे काय?

WhatsApp Group Join Now

Importance of Meditation in daily life

ध्येय वस्तु पे मन लगा, सिर्फ रहे बलवान।

ऐसा होता है अगर, कहलाता है ‘ध्यान’।।

-अख्तर अली शेख अर्थात अनंत.

ध्यान अष्टांग योग साधनेचा एक भाग आहे. मानवी शरीराला जशी निरोगी राहण्यासाठी व्यायामाची गरज असते तसेच मनाला शांततेची, एकाग्रातेची गरज असते. तीच शांतता आणि एकाग्रता मिळवण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे ध्यानधारणा हा होय. मनामध्ये सतत चालू असणाऱ्या विचारांना एक सुयोग्य दिशा देणे म्हणजे ध्यान करणे मानले जाते. आज आपण याच ध्यानविषयी सर्व काही जाणून घेऊया. 

ध्यान म्हणजे काय?

मनामधील सतत चालू असणाऱ्या विचारांना आपल्या नैसर्गिक श्वासा बरोबर नियंत्रित करून मनःशांती मिळवणे म्हणजे ध्यान होय. ध्यान मन प्रफुल्लित करते. विचारांना एक दिशा देते. ध्यानाचे मानसिक तसेच शारीरिक फायदे आहेत.

ध्यान केव्हा करावे?

ध्यान ही खरं तर एक निसर्गाशी एकरूप होण्याची प्रक्रिया आहे. ती तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकता. पण ध्यान करण्यासाठी पहाटेची किंवा सकाळी तुम्ही उठल्यानंतरची वेळ ही अत्यंत योग्य मानली जाते. यावेळी तुम्ही ताजेतवाने असता. तसेच यावेळी आजूबाजूचे वातावरण सुद्धा शांत असते त्यामुळे मन एकाग्र करणे सोपे जाते. आणि सकाळी ध्यान केल्याने दिवशभरासाठी ऊर्जा तयार होते. ब्रम्ह मुहूर्तावर म्हणजेच पहाटे 4 ते 6 या वेळेत ध्यान करणे सर्वोत्तम मानले जाते. 

ध्यान कसे करावे?

ध्यान करण्यासाठी प्रथम योग्य ठिकाण निवडावे. ती जागा शांत तसेच स्वच्छ असावी. आजूबाजूला शक्यतो कसलाही आवाज अथवा गोंगाट नसावा. आपण सैलसर कपडे घालून ध्यानस्थ होऊन बसावे. तुम्ही जेव्हा ध्यानाला सुरवात करत असाल तेव्हा प्रथम एकचित्त होऊन बसणे अवघड वाटेल पण दररोज नियमाने हे केल्यास हळूहळू ध्यान करणे जमेल. 

थोडा वेळ शांत बसावे. हळू हळू श्वास घेत राहावे. श्वासावर लक्ष केंद्रित करावे. कोणताही विचार मनात येऊ देऊ नये. 

एका क्षणी निर्विचार अवस्थेला तुम्ही पोहचाल. त्या अवस्थेमध्ये काही वेळ रहावे. ध्यान म्हणजे मनाला मनःशांती साठी दिलेले ट्रेनिंग असते. 

ध्यानाचे महत्त्व

ध्यान केल्याने विचारांच्या कक्षा रुंदावल्या जातात. मनःशांती आणि परम आनंद याची अनुभूती होते. आपले शारीरिक तसेच मानसिक आरोग्य सुधारते. भौतिक शरीर आणि मनाच्या मर्यादा ओलांडून क्षमतेपेक्षा जास्त कार्य करता येते. ध्यान ही फक्त धार्मिक क्रिया नाही ती एक वैश्विक गोष्ट आहे. 

ध्यानाचे फायदे काय आहेत?

आपल्या रोजच्या आयुष्यात आपण जीवन जगण्यासाठी अथक परिश्रम करत असतो. त्या परिश्रमाने जसे शरीर थकते तसेच मनही थकते. थकलेल्या शरीराला योग्य वेळेची झोप मिळाली की ते ताजेतवाने होते. अगदी त्याप्रमाणेच ध्यान केल्याने मन ताजेतवाने होते. 

आता आपण पाहूया ध्यानाचे प्रमुख फायदे. 

  • शारीरिक फायदे.

नियमित ध्यान केल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते. ध्यानामुळे रक्तातील लॅक्टिक ॲसिडची मात्रा कमी होते त्यामुळे चिंता, सतत वाटणारी भीती, मनाची अशांती कमी होते. डोकेदुखी हळूहळू कमी होत जाते. तसेच ध्यानामुळे रोगप्रतिारकशक्ती सुद्धा वाढते. 

  • तणावमुक्त जीवनशैली.

आजच्या धकाधकीच्या जीवनात stress म्हणजेच तणाव जगण्याचा एक भाग झाला आहे. पण या तणावामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर खूप गंभीर परिणाम होत असतात. त्यामुळे सकाळी उठल्यानतर आपल्या दिवसाची सुरवात जर ध्यानाने केली तर तणावमुक्त जीवनशैली तयार होते. 

  • नवनिर्मितीचा आनंद.

ध्यानामुळे आपण मनाला एक प्रकारचे प्रशिक्षण देत असतो. ज्यामुळे मनातील अनावश्यक विचार बाजूला होतात. आणि सृजनशीलता वाढते. मन प्रफुल्लित असेल तर निखळ मनाने आपण नवनिर्मितीचा आनंद घेऊ शकतो. 

  • आत्म-जागरूकता वाढीस लागते.

एक चांगले व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी मनुष्याला आत्म जागरूकता असणे खूप महत्त्वाचे ठरते. ध्यानामुळे आपण मनाला एका विशिष्ठ अवस्थे पर्यंत घेऊन जातो त्यामुळे आपल्यामधील आत्म जागरूकता निर्माण होते. त्यामुळे आपले व्यक्तिमत्व विकसन होते. 

  • व्यसनमुक्तीसाठी ध्यान.

आपण जर एखाद्या व्यसनाच्या आहारी गेले असाल तर ध्यानाच्या नियमित सरावाने त्यातून बाहेर पडू शकता. ध्यानामुळे निर्णयक्षमता सुधारते. तसेच आपण स्वतःसाठी काय योग्य काय अयोग्य याचा ठामपणे विचार करायला शिकतो. त्यामुळे व्यसनाधीनता आपल्यापासून लांब राहते. 

  • शांत झोपेसाठी ध्यान.

आपले शरीर एका मशीन प्रमाणे कार्य करत असते. त्याला योग्य वेळ विश्रांती दिली की दुसऱ्या दिवशी पुन्हा काम करण्यासाठी सज्ज होते. त्यासाठी रात्रीची 7 ते 8 तासांची शांत झोप होणे गरजेचे असते. ध्यानामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. निद्रानाशाचा त्रास असेल तर कमी होतो. 

  • विद्यार्थी दशेतील ध्यान.

विद्यार्थी दशेमध्ये आपल्यात एक शिस्त असणे खूप महत्त्वाचे असते. ध्यानामुळे रोज विशिष्ठ वेळी एक सराव करण्याची सवय लागते. मन नवीन संकल्पना ग्रहण करण्यास नेहमी उस्तुक राहते. त्यामुळे अभ्यास चांगला होतो. 

ध्यान म्हणजे शरीर आणि मनाच्या पलीकडे नेणारे एक सर्वोत्तम माध्यम आहे. ध्यान एक कौशल्य आहे. सरावाने ध्यानाचे महत्त्व आपल्या लक्षात येते. आज ध्यान केले आणि उद्या त्याचे फायदे दिसून आले असे होत नाही. त्यामुळे या क्रियेमध्ये सातत्य खूप महत्त्वाचे आहे. ध्यान एक वैज्ञानिक आधार असलेली क्रिया आहे. 

ध्यानस्थ होऊन स्वतःला शोधणे आपल्या व्यक्तिमत्त्व जडणघडणीचा अविभाज्य भाग आहे. 

ध्यानाबद्दल आजचा लेख आपल्याला कसा वाटला? आम्हाला जरूर कळवा. असेच माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. 

धन्यवाद.

1 thought on “ध्यानाचे महत्त्व, ध्यान कसे करावे? ध्यानाचे फायदे काय?”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top