देवपूजेचे महत्व व पूजा कशी करावी? Importance of Pooja In Marathi

WhatsApp Group Join Now

भारतीय सनातन संस्कृतीत मूर्ती पूजेला खूप महत्त्व आहे. गणपती,आराध्य देवता, कुलदेवता, श्री दत्त, लक्ष्मी अशा अनेक देवतांच्या मूर्ती सगळ्यांच्याच देवघरात असतात. प्रत्येक दैवतेचे आपापल्या परीने वेगवेगळे महत्त्व त्यांच्या पूजेचे नियम सुद्धा वेगवेगळे आहेत.त्यांची पूजा रोज केली जाते. वैदिक काळापासून या देवपूजेचे महत्त्व सांगितले गेले आहे. तसेच त्याचे काही नियम आहेत. या नियमांचे अगदी काटेकोरपणे जरी पालन केले गेले नाही तरीही काही प्रमाणात त्याचे पालन केले गेलेच पाहिजे. तरच ती देवपूजा साध्य होते असे म्हटले जाते. प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार त्यामध्ये बदल करत असतात.

देवपूजेचे महत्त्व

१) देवघर घरात असले,व पूजा केली की खूप सकारात्मकता असते .त्या मुर्तीपासून सकारात्मक लहरी घरामध्ये

पसरत असतात.

२) देवपूजा करताना शंख घंटा यांच्यापासून जे सकारात्मक नाद निर्माण होतात, ते घरातील सगळ्यांच्या हृदयामध्ये अनेक प्रकारचे बदल घडवून आणत असतात.

३) देवपूजा केली की मन खूप शांत होतं.

४) देवपूजेने साधकाची एकाग्रता वाढते.

५) देवपूजा करताना स्तोत्र मंत्र म्हटल्यामुळे उच्चारण स्पष्ट होतं.

आपल्या सनातन धर्मा ची माहिती होते. वाणीला तेज येते.

६) मनुष्याच्या जीवनात सुख शांती आणि समाधान यावे याकरता देवपूजा हा एक उत्तम मार्ग आहे.

७) देवपूजा केल्यानंतर अंगांमध्ये एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह येतो. ताजेतवाने वाटते संपूर्ण दिवस घालवण्याकरता एक सकारात्मक ऊर्जा मिळते.

८) मूर्ती पूजे बरोबरच बरोबरच जप, देवदर्शन, मंत्र स्तोत्र, व्रत प्रार्थना हे वेगवेगळे उपासनेचे प्रकार आहेत. त्यामळे मन प्रसन्न

होऊन, मनोरथ पूर्ण होते.

९) देवपूजा केल्यानंतर श्रद्धा व भक्ती यांना बळकटी येते व या दोन गोष्टी आपल्याला जीवनामध्ये फार आवश्यक असतात. त्यामुळे जीवनाचा मार्ग सापडतो.

१०) देवासमोर लावलेल्या दिव्यामुळे घरामध्ये एक प्रकारची शांतता प्रस्थापित होते.

११) देवपूजा करताना आपण दोन्ही हात जोडतो. प्रार्थनेत  परमेश्वराकडून येणाऱे सकारात्मक स्पंदन दोन्ही हातांद्वारे शरीरामध्ये पोहोचवली जातात.

१२) पूजा करताना आपण पूजेची सामग्री एकत्र करतो ती करत असताना आपले व्यवस्थापन कौशल्य सुद्धा वाढतं. त्या सामग्रीची माहिती व पूजेसाठी असणारी आवश्यकता सुद्धा समजते.

१३) पूजेमुळे घरातील लहान मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार व्हायला मदत होते.

१४) देवपूजा केल्यामुळे घरातील ताण तणाव, संकट, दुःख यांचे हरण होते. फक्त याकरता संपूर्ण विश्वास  असणे फार गरजेचेआहे.

१५) देवपूजे नंतर आपण जो प्रसाद ग्रहण करतो त्याची अत्यंत चव अवीट असते. त्यामुळे मन आनंदी होते.

१६) दररोज श्रद्धेने देवपूजा केल्यामुळे कुठल्याही सकंटांमध्ये आपल्याला मार्ग सापडतो कारण ती निसर्गदत्त शक्ती आपल्याला मदत करत असते.

देवपूजा कशी करावी? Importance of Pooja and how to perform it? in Marathi

देवपूजा करण्याचे काही खालील नियम आहेत.

१) देवपूजा नेहमी स्वच्छ आंघोळ करून आणि शुध्द अंतःकरणाने केली पाहिजे.

२) देवघरा समोर लोकरीचे आसन टाकून त्यावर बसून पूजा केली पाहिजे. तसेच देवासमोर रांगोळी काढली गेली पाहिजे.

३) दैनंदिन  पूजा नेहमी ठराविक ठिकाणी आणि ठराविक वेळेसच केली गेली पाहिजे.

४) देवघर बहुतके घराच्या ईशान्य दिशेला हवे. किंवा पूजा करताना आपले तोंड पूर्वेला किंवा उत्तरेला असावे.

५) देव नेहमी आपल्यापेक्षा उंच आसनावर हवे.

६) आपल्या उजव्या व डाव्या बाजूला पूजेचे साहित्य व पाण्याचा तांब्या अनक्रमे हवा. या करता तांबे किंवा चांदीचा कलश वापरला पाहिजे.

७) देवांच्या समोर तेल आणि तुपाचा दिवा लावायला हवा.

८) देवघरात देवांचे पंचायतन खालील प्रमाणेअसावे.

)देवघरामध्ये पूजा  करणाऱ्याच्या शंख उजव्या बाजूला व घंटा डाव्या बाजूला असावी.

ब) देवघरात देवांची मांडणी शंकूच्या आकारात असावी. क)मध्यभागी गणपतीची मूर्ती असावी. पूजा करणाऱ्याच्या

उजव्या बाजूला स्त्री देवतांची मूर्ती असावी त्यात आधी कुलदेवी व त्यानंतर तिची उपरूपे असावी.

ड) डाव्या बाजूला पुरुष देवता असाव्या. त्यात आधी कुलदेवता व त्यानंतर त्यांची उपरूपे असावी.

इ) देवांसमोर एका छोट्या कलशात झाकून पाणी ठेवलेले असावे.

इ) गणपती मध्यभागी असल्याने गणपतीला आपली नाद भाषा समजू शकते गणपती नादाचे प्रकाशात व प्रकाशाचे नादात रूपांतर करणारी देवता आहे. गणपती इच्छा लहरींशी संबंधित  असल्यामुळे त्या लहरी तो कुलदेवता व कुलदेवी पर्यंत पोहोचवतो व तसेच आपल्याला आशीर्वाद मिळतात.

ई) देवघरांमध्ये कमीत कमी फोटो असावेत.

उ) कुलदेवतचे  टाक सुद्धा देवघरात असावे.

९) सुरुवातीला तेलाचा दिवा प्रज्वलित करून “शुभं करोति कल्याणम” हा मंत्र म्हटला गेला पाहिजे.

१०) पूजा दोन प्रकारच्या असतात पंचोपचार आणि षोडशोपचार.

षोडशोपचार पूजा खालील प्रमाणे करावी.

सर्वप्रथम पूजा करणाऱ्यांनी आपल्या कपाळाला गंध लावावे. धूत वस्त्र अथवा सोवळे नेसावे. मन एकाग्र असावे व पूजा करताना मधूनच उठू नये.

प्रथम आचमन करावे व त्यानंतर शंख आणि घंटेचे पूजन करावे. दीप पूजन करावे. पूजेसाठी घेतलेल्या कलशाचे पूजन करावे. हे सगळे करत असताना आपण त्या त्या देवतेचे स्मरण अथवा मंत्र म्हणावा. पूजन झालेल्या म्हणजेच शंख आणि कलशांमधील पाण्याने सगळीकडे प्रोक्शण करावे. म्हणजेच सगळीकडे शिंपडावे.

हा विधी झाला की थोडा वेळ ध्यान करावे. देवतांचे स्मरण करावे. रोज पूजा करताना आपल्या कुलदेवतचे स्मरण

जरूर करावे.

१) आवाहन–देवाचे नाव घेऊन परमेश्वराला आवाहन करावे.

२) आसन–यामध्ये देवाला आसन द्यावे.

३) पाद्य–यामध्ये देवाचे पाय धुवावे.

४) अर्ध्य–गंध फुल एकत्र करून पाण्याबरोबर देवाला वाहणे.

५) आचमन–पळी पळी ने देवावर पाणी सोडणे

६) स्नान—यामध्ये देवाला पाण्याने स्नान घालावे.

यानंतर पंचामृताने स्नान घालावे. यामध्ये दूध दही तूप मध व साखर यांनी देवाला वेगवेगळे स्नान घालावे .प्रत्येक स्नाना नंतर पाण्याने देव स्वच्छ धुवून घ्यावे. आणि गंध फुल अक्षता वहाव्या.

गंधोदक स्नान–यामध्ये देवाला थोडे गंध व पाण्याने स्नान घालावे व नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे. नमस्कार करावा. उदबत्ती व दिवा ओवाळावा. त्यानंतर पंचामृत अथवा दूधसाखरेचा नैवैद्य दाखवावा. संपूर्ण जेवणाचा महानैवेद्य असतो  सणावाराला जरूर दाखवावा.ज्या देवांना आपण अभिषेक करतो आहे त्या देवांचे मंत्र किंवा स्तोत्र तोंडाने म्हणत असावे. अभिषेक झाल्यावर देवांना अत्तर वहावे.

त्यानंतर कोमट पाण्याने देव स्वच्छ धुवून व स्वच्छ कापडाने पुसून त्यांना आसनावर ठेवावे.

७) वस्त्र–देवांना कापसाचे वस्त्र वहावे.

८) यज्ञोपवित–देवांना जानवे घालावे व एक पळीभर पाणी ताम्हणात सोडावे.

९) चंदन–देवांना अनामिकेने चंदन लावावे. व अलंकार घालावे. व परिमल द्रव्य म्हणजेच हळद शेंदूर अबीर वहावे.

१०) पुष्प–देवाला सुगंधी फुले ,हार, गजरे, दुर्वा आणि बेलपत्र अर्पण करावे.

११) धूप –देवाला उदबत्ती ओवाळावी 

१२)दीप–देवाला शुद्ध तुपाचे निरंजन ओवाळावे.

१३) नैवेद्य–चौकोनी मंडल करून नैवैद्य दाखवावा. शक्यतोवर नैवैद्य केळीच्या पानावर दाखवावा. तीन वेळेला ताम्हणात पाणी सोडून देवाला विडा अर्पण करावा व त्यानंतर आरती करावी. आरतीनंतर मंत्रपुष्पांजली म्हणावी.

१४) प्रदक्षिणा–आरती झाली की प्रदक्षिणा करावी देवा भोवती जागा नसेल तर स्वतःभोवती तीन वेळेला फिरावे.

१५) साष्टांग नमस्कार–व सगळ्यात शेवटी साष्टांग नमस्कार घालावा.

परमेश्वराला क्षमा याचना खालील मंत्राद्वारे करावी.

आवाहनं न जानामि न जानामि विसर्जनम्।

पूजां चैव न जानामि क्षमस्व परमेश्वर॥

मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं जनार्दन।

यत्पूजितं मया देव! परिपूर्ण तदस्तु मे॥

षोडशोपचार पूजा करणे वेळेअभावी जमत नसलं तर पंचोपचार पूजा करता येते.

त्यामध्ये

१) गंध – यामध्ये देवाला गंध लावावे

२) पुष्प–देवाला फुल अर्पण करावे

३) धूप –देवासमोर समोर उदबत्ती ओवाळावी

४) दीप–देवाला शुद्ध तूपाच्या निरांजनाने ओवाळावे

५) नैवेद्य–देवाला शेवटी नैवेद्य दाखवावा.

वेळे अभावी जर रोज पूजा करणे जमत नसेल तर देवांवरील निर्माल्य रोज काढून त्यांना स्वच्छ करून, नवीन फुले व बेलपत्र आणि तुळस अर्पण करावी. उदबत्ती ओवाळून दुधाचा किंवा खडीसाखरेचा दाखवून नैवेद्य करावा आणि मनोभावे नमस्कार करावा. व आठवड्यातून एकदा तरी व्यवस्थित पूजा करावी. आरती मात्र नक्की करावी कारण आरती नंतरची स्पंदने घरातील सकारात्मकता वाढवण्यास उपयोगी पडतात.देवाच्या आजूबाजूचा परिसर व देवघर स्वच्छ आहे ना?याची काळजी नक्कीच घेतली गेली पाहिजे कारण जिथे स्वच्छता असते तिथेच देवाचा वास असतो.

शक्यतोवर देवघर स्वच्छ करून देवासमोर उदबत्ती व दिवा नक्कीच लावावा त्याचे स्मरण करावे. स्मरण अत्यंत आवश्यक आहे कारण त्या  सर्वोच्च निसर्ग दत्त शक्तीमुळेच

आपली चेतना जागृत होत असते व जीवन विषयक मार्ग सापडत असतो.

मानस पूजा–मानसपूजा म्हणजे परमेश्वराची मनातून केलेली पूजा. या पूजे करता भक्ती भाव खूप आवश्यक आहे. आपण शांत बसून आणि डोळे मिटून परमेश्वराची षोडशोपचारे पूजा केली की ती पावते असे म्हटले जाते.

देवपूजेचे महत्त्व व पूजा कशी करावी? Importance of Pooja and how to perform it? in Marathi हा लेख आपल्याला कसा वाटला हे नक्की सांगा व प्रतिक्रिया द्या. त्याकरता आमच्या लेखक मित्र या वेबसाईटला नक्की भेट द्या. त्यावरील नवनवीन लेख आणि कथा नक्की वाचा व आमचा व्हाट्सअप चॅनल पण नक्की जॉईन करा .

धन्यवाद! 

11 thoughts on “देवपूजेचे महत्व व पूजा कशी करावी? Importance of Pooja In Marathi”

  1. Kshitija Suhas Kapre

    खूप छान. अगदी इत्यंभूत माहिती दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top