भाद्रपद महिन्यात येणाऱ्या ऋषीपंचमीचे महत्त्व

WhatsApp Group Join Now

भाद्रपद महिन्यात येणाऱ्या ऋषीपंचमीचे महत्त्व

भारतीय संस्कृतीची पाळेमुळे खूप खोलवर रुजलेली आहेत. आपली संस्कृती सनातन आहे. त्यामध्ये अनेक व्रत वैकल्य सण वार साजरे केले जातात. आपल्या संस्कृतीमध्ये अनेक ऋषी व मुनींनी खूप शोध लावलेले आहेत. जे पाश्चात्य संस्कृती आत्ता लावते आहे. त्यामुळे त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. भारतीय संस्कृती निसर्गाला खूप मानते. त्यामुळे निसर्गातील झाडे, पशु, पक्षी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायला एक दिवस संस्कृतीने नेमून दिला आहे. त्या दिवशी मानव त्यांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतो. 

  त्याचप्रमाणे ऋषीपंचमीच्या दिवशी ऋषींच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांची पूजा केली जाते व व्रत केले जाते. हे व्रत स्त्रियांद्वारे केले जाते.

भाद्रपद महिन्यात  साजऱ्या केल्या जाणाऱ्या ऋषीपंचमीचे महत्त्व importance of rishi panchami celebrated in the month of bhadrapad in marathi

ऋषीपंचमी कधी साजरी केली जाते?

   संपूर्ण वर्षात चातुर्मासाचा काळ म्हणजेच आषाढ ते कार्तिक महिना, या महिन्यात व्रतवैकल्य सण वार उत्साहाने साजरे केले जातात. 

 भाद्रपद महिना लागला की बाप्पाच्या आगमनाचे वेध लागतात. भाद्रपद  शुद्ध  चतुर्थीला बाप्पाचे आगमन होते. सगळीकडे उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असते. याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे भाद्रपद शुध्द पंचमीला ऋषीपंचमी साजरी केली जाते.

ऋषीपंचमी का साजरी केली जाते?

मनुष्य जातीचे उगमस्थान हे ऋषींच्या काळापासून सुरू झाले असे मानले जाते. कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम वशिष्ठ जमदग्नी आणि अत्री यांना सप्तर्षी म्हणजेच सात ऋषी  मानले  जाते. ऋषींनी मानवी संस्कृती साठी अनेक मार्ग खुले केले आहे त्यांनी अनेक शोध लावले व आपल्या जगा विषयी माहिती, सगळ्यांसमोर पुस्तकांद्वारे, ग्रंथांद्वारे सगळ्यांना दिली. त्यांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी फार मोठे योगदान  दिलेले आहे.म्हणूनच त्यांचे स्मरण करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ऋषीपंचमी साजरी केली जाते.

ऋषीपंचमी कशी साजरी केली जाते?

हे एक व्रत आहे. कुठल्याही व्रताचा जेव्हा विचार आणि आचार ठरवला जातो, तेंव्हा आजूबाजूची परिस्थिती भौगोलिक ठिकाण यांचा विचार केला जातो. ऋषीपंचमी  चातुर्मासामध्ये येते. ऋषीपंचमीच्या व्यतिरिक्त आघाड्याच्या काष्ठाने दंतघावन, पंचगव्य प्राशन, सुवासिनींना हरिद्रा स्नान, गंगा स्नान, महासंकल्प युक्त तीर्थस्थान, भस्मस्नान, अर्घ्य स्नान, मृतिका स्नान अशा अनेक विधींचा अंतर्भाव यामध्ये केला आहे.

यामध्ये ऋषींची पूजा, व्रत व उपवास या दिवशी केले जाते. सात ऋषी व तसेच वशिष्ठ ऋषींची पत्नी अरुंधती यांच्या आठ सुपाऱ्या पूजेत मांडल्या जातात. हे व्रत करणाऱ्या व्यक्तीने गंगेत स्नान करावे असे सांगितले आहे पण ते शक्य नसल्यास पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे. यानंतर शेणाची माती, तुळशीची माती, पिंपळाची माती, गंगेची माती यांनी हात धुतले जातात. त्यानंतर गोपीचंदन तीळ आवळा गोमूत्र गंगाजल एकत्र मिसळून त्याने हात धुतले जातात. मग परत स्नान केले जाते व गणेशाची पूजा केली जाते. यानंतर सप्तर्षींची पंचोपचारे  पूजा केली जाते. सप्तर्षींच्या मूर्ती मांडून त्यांना अभिषेक करून स्वच्छ स्नान घातले जाते गंध व फुले वाहिली जातात तसेच धूप व दीप दाखवून नैवेद्य दाखवला जातो व कथा वाचली जाते. त्यांना नैवेद्य दाखवून ब्राह्मणाला दान दिले जाते.

व खालील मंत्र म्हटला जातो 

कश्यपोत्रिर्भरद्वाजो विश्वामित्रोय गौतम:।

जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैते ऋषय: स्मृता:।

गृह्णन्त्वर्ध्य मया दत्तं तुष्टा भवत मे सदा।।

या व्रताचा आहार काय असतो?—हे व्रत करणाऱ्या व्यक्तीने दिवसातून एकदाच जेवायचे असते. या दिवशी बैलांनी नांगरून आलेल्या पिकांचे अन्न व कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. पुरातन काळात ऋषींनी स्वकष्टार्चित अन्नाला नेहमी महत्त्व दिले आहे. म्हणूनच असेच अन्न या दिवशी खाल्ले जाते. या दिवशी एक विशिष्ट प्रकारची भाजी तयार केली जाते. त्याला ऋषींची भाजी असे म्हटले जाते. आळूची पाने, सुरण, वाल, लाल भोपळा, मटर, भेंडी, पडवळ, शिराळं, मक्याचे कणीस, काकडी आणि कोवळा माठ हे सगळे एकत्र करून याची भाजी केली जाते. साधे आणि पौष्टिक अन्न खाल्ले जाते की जेणेकरून मनुष्याचा सत्वगुण वाढीस लागेल..  ऋषी मुनी तप आणि साधना करत असत ते स्वतः कंद मुळांवर जगत असत. त्यामुळे त्यांच्यातील सत्वगुण नेहमीच वाढीस लागत असे. ही भाजी सुद्धा मातीच्या भांड्यात शिजवली जाते. या दिवशी दूध, दही, ताक, तूप या पदार्थांचा वापर केला जात नाही कारण हे सर्व पदार्थ गाय व बैलांपासून मिळवलेले असतात.

व्रताचे उद्यापन–हे व्रत सात वर्ष करून आठव्या वर्षी सात ऋषींच्या सोन्याच्या प्रतिमा आपल्या श्रद्धेनुसार करून किंवा सप्त गोदान ब्राह्मणांना देऊन विसर्जन केले जाते.

ऋषीपंचमीची पौराणिक कथा—ब्रह्मपुराणानुसार राजा सिताश्व ने ब्रह्मदेवांना कुठले व्रत सगळ्यात जास्ती फलदायी आहे, लवकर फळ देणारे आहे हे विचारलं तेव्हा ब्रह्मदेवांनी खालील गोष्ट सांगितली.पुराण कथेनुसार उत्तक नावाचा ब्राह्मण आपली पत्नी सुशीला हिच्यासह राहत होता. त्यांना एक मुलगा आणि मुलगी होते. दोघेही विवाह योग्य झाले होते. मुलीचे लग्न त्याने करून दिले. पण लवकरच तिचा नवरा वारला .ती विधवा झाली. काही दिवसांनी ती त्याच्या घरी राहायला आली. तेव्हा तिच्या आईच्या लक्षात आले की तिच्या अंगावर किडे झालेले आहेत. ती घाबरली आणि तिने आपल्या पतीला बोलवून दाखवले. ब्राह्मणाने ध्यान लावून पाहिल्यावर त्याला कळले, की मागच्या जन्मी मासिक पाळीच्या दरम्यान तिच्या हातून चूक झाली होती.तिने पूजेसाठी लागणाऱ्या भांड्यांना हात लावला होता व तिने ऋषीपंचमीचे व्रतही केले नव्हते. वडिलांच्या सांगण्यानुसार तिने ऋषीपंचमीचे व्रतही केले आणि ती बरी झाली.

ब्रह्मपुराणानुसार चारही वर्णातील स्त्रिया हे व्रत करू शकतात. तसेच मासिक पाळीच्या दरम्यान जर हातून पूजा व्रत घडले असतील तर ऋषीपंचमीचे व्रत केल्याने ते पाप नाहीसे होते.

ऋषी पंचमीचे व्रत केल्याने होणारे फायदे–

१) स्त्रियांना याचा विशेष फायदा होतो ज्या स्त्रियांनी रजो निवृत्तीच्या काळामध्ये पूजा किंवा काही व्रत केले असतील तर त्यांचे पापनाशन होते. 

२) विद्यार्थ्यांना श्रवण आणि संस्कार याकरता या व्रताचा फायदा होतो. 

३) सर्व वर्णातील स्त्री-पुरुषांच्या नित्य आचरणातील त्रुटी दूर करण्यासाठी या व्रताचा फायदा होतो. 

४) या व्रतामुळे पुरुषांना आचार प्रणालीची ओळख होते.

५) स्त्री-पुरुष लहान मुले तरुण मुले या सगळ्यांना स्वकष्टार्जित या शब्दाचा अर्थ कळतो.

६) आपल्या ऋषीमुनींनी वैदिक काळापासून आपल्याला जे संस्कार शिकवलेले आहेत तसेच आपल्या जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी जे ज्ञान दिले आहे त्याचे वाचन  करून आपले जीवन अधिकाधिक संपन्न करावे याची जाणीव आपल्याला ऋषीपंचमी करून देते.

७) प्राचीन काळापासून ऋषीमुनींनी जे अभ्यास श्रवण मनन चिंतन इत्यादी गोष्टींचे संस्कार मानवी जीवनावर करण्याचा प्रयत्न केला त्यांना आपल्या जीवन मूल्यांमध्ये अनुसरण करण्याचा प्रयत्न या व्रता द्वारे सगळ्यांनी केला पाहिजे.

या दिवशी दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन केले जाते.

तसेच हा दिवस महाराष्ट्र राज्यात गजानन महाराजांचा समाधी दिन म्हणून साजरा केला जातो.

तर, भाद्रपद महिन्यात येणाऱ्या ऋषीपंचमीचे महत्त्व importance of rishi panchmi celebrated in the month of bhadrapad in marathi हा लेख आपल्याला कसा वाटला हे आमच्या लेखक मित्र या वेबसाईटला भेट देऊन नक्की वाचा व प्रतिक्रिया द्या तसेच आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा व असेच नवनवीन लेख वाचण्यासाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला पण जॉईन करा. 

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top