फ्रिजमध्ये कुठले भारतीय पदार्थ साठवावे व कुठले पदार्थ साठवू नये ?l Indian food to be stored in the refrigerator

WhatsApp Group Join Now

    Indian food to be stored in the refrigerator : रेफ्रिजरेटर हे गृहिणीं करता  वरदानच ठरले आहे. जेव्हा रेफ्रिजरेटर चा शोध लागला नव्हता, तेव्हा गृहिणींना स्वयंपाक घरामध्ये काहीच वस्तू खूप वेगळ्या पद्धतीने टिकवून ठेवाव्या लागायच्या किंवा ताजे अन्नच खावे लागायचे. फ्रिज चा शोध लागल्यानंतर त्यांना वस्तू टिकवून ठेवणे खूप सोपे जाऊ लागले.. भाज्या, फळं दूध, दुधापासून बनवलेले पदार्थ, अन्न हे टिकवून ठेवणे, हे सोपे झाले.तसेच आदल्या दिवशीचे अन्न उरले असल्यास दुसऱ्या दिवशी सुद्धा ते वापरता येऊ लागले. विशेषतः नोकरी करणाऱ्या स्त्रियांना तर हे खूपच फायदेशीर ठरले.

तर या लेखामध्ये आपण फ्रिज मध्ये कुठले भारतीय पदार्थ साठवावे व कुठले पदार्थ साठवू नये, हे बघूया.

फ्रिजमध्ये ठेवता येणारे पदार्थ ( Indian food to be stored in the refrigerator)—

*१) भाज्या—-जवळपास सगळ्याच प्रकारच्या भाज्या आपल्याला फ्रीजमध्ये ठेवता येतात. यामध्ये भेंडी, भोपळा, (दोन्ही प्रकारचे पांढरा आणि लाल) लिंबू, गवार, बीन्स,  गाजर, सिमला मिरची यासारख्या अनेक भाज्या आपल्याला फ्रीजमध्ये ठेवता येतात आणि त्या तीन ते चार दिवसांपर्यंत ताज्या राहतात. फक्त काळजी घेतली गेली पाहिजे. पालेभाज्या साधारण मेथी पालक व कोथिंबीर व पुदिना यांना स्वच्छ निवडून एका डब्यामध्ये खालती टिशू पेपर घालून ठेवले तर त्या साधारण सहा ते सात दिवस ताज्या राहतात. लिंबू स्वच्छ धुऊन एका डब्यामध्ये ठेवले तर ते दहा ते बारा दिवस नक्कीच ताजे राहतात. )

मटर सोलून नीट झिप लॉक बॅग मध्ये जर फ्रीजरमध्ये नीट ठेवले तर सहा ते सात महिने ताजे राहतात. वापरण्याच्या वेळेस त्यांना बाहेर काढून खोलीच्या तापमानावर ठेवले तर त्याची चव ताज्या मटार सारखी असते. बीटरूट, ब्रोकोली, कोबी, शलगम, लेट्यूस, मक्याचे दाणे, सॅलरी या भाज्या फ्रीजमध्ये बराच काळ टिकतात. फ्रिजमध्ये कुठल्याही भाज्या सीलबंद करून ठेवल्यास उत्तम टिकतात. मशरूम  सुद्धा फ्रिजमध्ये छान टिकतात. अर्थात मशरूमला कालबाह्यता तारीख असते तीन ते चार दिवसांची. हिरवी मिरची व कढीपत्त्याची पाने फ्रिजमध्ये ताजे राहतात. मिरचीचे वाटण मीठ घालून ठेवले तर सात-आठ दिवस नक्कीच राहते.

२) दूध व दुधाचे पदार्थ  —–दुधाचे पाकीट अथवा दूध तापवून भांड्यामध्ये आपल्याला फ्रिजमध्ये ठेवता येते. दुधाची कालबाह्यता तारीख झाल्यावर मात्र ठेवता येत नाही. उकळलेले दूध सुद्धा दोन दिवस ठेवता येते. टेट्रा पॅक मध्ये असलेले दूध त्याच्या कालबाह्यता तारीखे पर्यंत ठेवता येते. शक्यतोवर फ्रिज चा वरचा भाग जास्त थंड असतो. तिथे दुधाचे पदार्थ ठेवावे. अजिबात खराब होत नाही. दही सुद्धा फ्रीजमध्ये खराब होत नाही व त्याला वास येत नाही घरी तयार केलेले दही तसेच डब्बा बंद दही सुद्धा फ्रीजमध्ये जवळपास आठवडाभर छान टिकते. पनीर व पनीर पासून बनवलेले पदार्थ सुद्धा फ्रीजमध्ये टिकतात.

चीज व चीज पासून तयार केलेले पदार्थ फ्रिजमध्ये टिकतात.अर्थात चीज ला सुद्धा कालबाह्यता तारीख असते ती बघूनच ठेवावे.

दुधाचे अनेक पदार्थ जे विकत मिळतात जसे बासुंदी, रसमलाई, वेगवेगळी मिठाई हे दोन दिवसांच्या वर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवता येत नाही. दुधापासून बनवलेले वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम, पुडिंग,बटर हे सुद्धा फ्रीजमध्ये छान टिकते. अशा गोष्टी फ्रीजरमध्ये ठेवल्यास कमी तपमानात खूप छान टिकतात.

३) फळे—-पिकलेले फळचं शक्यतोवर फ्रीजमध्ये ठेवावे., अननस, चेरी, स्ट्रॉबेरी ही फळे फ्रिजमध्ये ठेवता येतात. तसेच टरबूज कापून, खरबूज, नाशपती, प्लम सुद्धा ठेवता येतात. पण शक्यतोवर फार दिवस न ठेवता ताजी फळे खाणे कधीही चांगलेच असते.

४) वेगवेगळ्या प्रकारची पिठे—भारतीय स्वयंपाक घरामध्ये अनेक पिठांचा उपयोग होतो. ते जर बाहेरच राहिले तर खराब होण्याची शक्यता असते. म्हणून फ्रीजरमध्ये जर ठेवले तर ते छान टिकतात. पण अर्थात त्यांची कालबाह्यता तारीख झाल्यावर त्यांना न वापरणे योग्यच आहे.

तांदळाचे पीठ, नाचणीचे पीठ, मक्याचे पीठ, भाजणीचे पीठ, मैदा, रवा, शिंगाड्याचे पीठ ही पीठे फ्रिजमध्ये अनेक महिने अतिशय छान टिकतात. त्यात अळ्या होत नाहीत व जाळी लागत नाहीत. झिप लॉक च्या बॅग मध्ये ते छान टिकतात

५) रोजचे शिजवलेले अन्न—रोज आपण जे अन्न शिजवतो, त्यातील वरण, भात, भाजी,कढी, कोशिंबीर यासारखे पदार्थ दुपारी जेवल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवता येतात. ते संध्याकाळपर्यंत ताजे राहतात. अर्थात दुसऱ्या दिवशी पर्यंत आपण ते खाऊ शकतो पण दोन दिवसानंतर ते खायला नको कारण त्यात बॅक्टेरियाची वाढ व्हायला सुरुवात होते. छोले, राजमा, वेगवेगळे प्रकारच्या शिजलेल्या डाळी, तसेच डोशाचे पीठ सुद्धा दोन दिवस टिकते.

नॉ*न*व्हे*ज पदार्थांध्ये तयार असलेले चिकन, मण काही दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकतो. रेडी टू इट असे काही पदार्थ असतात ते फ्रिजर मध्ये ठेवून नंतर वापरता येतात.अंडे बाहेर तसेच फ्रीजमध्ये टिकतात. साधारण आठवडाभर टिकतात.रोज आपण जेवताना वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड्स तयार करतो ते सुद्धा ठेवता येतात. पण सकाळी ठेवले तर त्याचा वापर संध्याकाळपर्यंत व्हायला हवा.

६) काही डाळी व कडधान्ये —आपल्या रोजच्या वापरात असलेल्या डाळी तूर डाळ, मसूर डाळ, हरभरा डाळ, उडद डाळ, मूग डाळ या डाळी आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो .तिथे ठेवले की त्या टिकतात. पण त्या खूप प्रमाणात आपल्या घरी असतील तर त्यांना वेगळ्या प्रकाराने खोलीच्या तपमानावरच साठवले जाते. तसेच कडधान्य मटकी, चवळी, छोले, राजमा, काळे चणे हे कडधान्य तर फ्रिजरमध्ये ठेवल्यास उत्तम टिकतात. व हवे तेव्हा काढून त्यांना भिजवून त्याचा पदार्थ तयार करता येतो.

७) बेकरी पदार्थ —-केक, पेस्ट्री, चीज पासून बनवलेले पदार्थ पनीर पासून बनवलेले पदार्थ फ्रिजमध्ये छान टिकतात. ज्या मध्ये जि*ले*टी*न आहे अशी मिठाई, कप केक्स इत्यादी बेकरी पदार्थ फ्रीजमध्ये ठेवता येतात.

८)इतर पदार्थ–इतर पदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॉस, जे पाश्चिमात्य पदार्थांमध्ये लागतात ते, सॉय सॉस,चिली सॉस,,आले लसूण पेस्ट, कोल्ड्रिंक्स, मैयोनिज, वेगवेगळ्या प्रकारचे हेल्थ पेय,

फ्रिजमध्ये ठेवता येतात. रोजच्या स्वयंपाकाला लागणारे सुके खोबरे जर किसून हवाबंद डब्यात फ्रिजमध्ये ठेवले तर बरेच दिवस ताजे राहते. ओले नारळ खोवून सुद्धा ठेवले तर त्याला दोन-तीन दिवस वास लागत नाही.

भारतीय स्वयंपाक मसाल्यांवर आधारित असतो. आपल्याकडे मसाल्यांचे लहान लहान पाकीट मिळतात, उदाहरणार्थ पावभाजी मसाला, छोले मसाला, राजमा मसाला, आमचूर पावडर, बिर्याणी मसाला, किचन किंग मसाला, कसुरी मेथी यांसारखे मसाले जर आपण फ्रीजमध्ये साठवून ठेवले तर, बरेच दिवस टिकतात. त्यांना पण कालबाह्यता तारीख असते.

फ्रिज मध्ये न ठेवता येणारे भारतीय पदार्थ (Indian food to be stored in the refrigerator) —

१)भाज्या —कांदा, बटाटा, रताळं , लसूण यासारख्या भाज्या फ्रिजमध्ये ठेवता येत नाही.टमाटे फ्रीजच्या बाहेरच ठेवावे, नाहीतर लवकर खराब होतात. काकडी पण फ्रिज च्या बाहेर ठेवावी नाहीतर त्याला सुरकुत्या पडतात व शक्यतोवर ताजीच खावी. बेल मिरची म्हणजे लाल व पिवळ्या रंगाची सिमला मिरची बाहेर छान राहते. वांगी पण फ्रिज च्या बाहेरच टिकतात.खोलीच्या तापमानावर छान टिकतात. कापलेला कांदा तसेच सोललेला लसूण सुद्धा फ्रीजमध्ये ठेवू नये व आलं किसूनही ठेवू नये. त्यामुळे त्यांच्यामध्ये बॅक्टेरियाची वाढ होते. शक्यतोवर आलं व लसूण ताजेच खावे.

२)फळे —-सफरचंद ,केळी, संत्रे,आंबे यासारखे फळं फ्रिजमध्ये ठेवता येत नाही नाहीतर खराब होतात. न कापलेले टरबूज बाहेर ठेवणे चांगले असते. पपई सुद्धा फ्रीजच्या बाहेर छान टिकते. सगळ्या प्रकारच्या बेरी सुद्धा फ्रिजच्या बाहेर टिकतात. हिरवे आणि काळे द्राक्ष सुद्धा फ्रिजच्या बाहेरच ठेवावे.

३)रोजचे शिजवलेले अन्न—-यामध्ये पोळ्या, सगळ्या प्रकारच्या भाकरी, तयार दोसे, इत्यादी गोष्टी फ्रीजमध्ये ठेवू नये. तयार इडली ठेवली तर तिचा मऊपणा निघून जातो.

४) बेकरी पदार्थ—यामध्ये बिस्किट, खारी, कुकीज यासारख्या गोष्टी शक्यतोवर फ्रीजमध्ये ठेवू नये. ब्रेड पण बाहेर छान राहते

५) वेगवेगळ्या प्रकारची पीठे–कणिक, ज्वारीचे पीठ, बाजरीचे पीठ फ्रीजमध्ये ठेवू नये कारण त्यापासून तयार होणाऱ्या पोळ्या आणि भाकऱ्या नीट तयार होत नाहीत.

६) धान्य —गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी यासारखे धान्य फ्रीजमध्ये ठेवता येत नाही. 

७) इतर पदार्थ—-यामध्ये चहा, कॉफी, टोमॅटो सॉस, चिंचेची चटणी,मध, साखर गूळ, हळद, तिखट ,चिंच, मीठ, तसेच स्वयंपाकाला उपयोगी पडणारे रोजचे मसाले गोडा मसाला काळा मसाला हे पदार्थ बाहेर टिकतात. वेगवेगळ्या प्रकारचे पापड, दाणे, साबुदाणा या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवणे योग्य नाही. कधी कधी गरज म्हणून आपण या वस्तू फ्रिजमध्ये ठेवतो पण त्यामुळे त्यांचे पोषणमूल्य कमी होऊ शकते. तसेच सगळ्या प्रकारचे लोणचे बाहेरच छान टिकतात कारण त्यामध्ये आवश्यक प्रमाणात मीठ टाकलेले असते. तसेच अनेक प्रकारचे सरबते बाजारात मिळतात ती सुद्धा फ्रिजच्या बाहेरच ठेवावे त्यामध्ये सुद्धा वस्तू टिकेल असे प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात.सगळ्या प्रकारचे खाण्याचे तेल, ऑलिव्ह ऑइल, व्हि*ने*ग*र खोलीच्या तापमानावरच ठेवावे. पीनट बटर हे तीन महिन्यापर्यंत बाहेरच ठेवावे. त्यानंतर रेफ्रिजरेशन ची गरज पडते. ब्रेडला लावायला जे स्प्रेड मिळतात जसे चॉकलेट स्प्रेड, हेझलनट स्प्रेड हे सुद्धा  खोलीच्या तापमानावर चांगले टिकतात. खजूर पण हवाबंद डब्यात छान राहतात.

८))सुका मेवा —बदाम, काजू, किसमिस, अंजीर, काळ्या मनुका यासारखे पदार्थ हवा बंद डब्यात छान टिकतात.

९) गोड पदार्थ–भारतीय स्वयंपाक घरामध्ये अनेक प्रकारचे लाडू तयार केले जातात यामध्ये रव्याचे लाडू ,डिंकाचे लाडू, बेसनाचे लाडू, तसेच नारळाची बर्फी, ड्रायफ्रूट्स चे लाडू यासारखी मिठाई बाहेरच दहा ते पंधरा दिवस टिकते.

   अशाप्रकारे रेफ्रिजरेटर चा वापर करून आपण अन्न वाया घालवणे टाळू शकतो. रेफ्रिजरेटर मुळे सगळ्यांच्याच जीवनमानामध्ये सुधारणा झाली आहे. पण तो वापर कसा करावा हे आपल्या हातात आहे. हॉटेल व्यवसायिकांकरता तर रेफ्रिजरेटर चा उपयोग फार मोठ्या प्रमाणात आहे. नोकरी करणाऱ्या गृहिणी, तसेच एकटे राहत असलेले युवक, युवती, वयस्क व्यक्ती यांनासुद्धा रेफ्रिजरेटर चा खूप उपयोग होतो.कारण तयार करून ठेवलेले अन्न त्यामध्ये टिकते व ते परत तयार करण्यात त्यांचा वेळ जात नाही. म्हणून तंत्रज्ञानाला सगळ्यांनी धन्यवाद द्यायला हवे.   

तर हा लेख, फ्रीजमध्ये कुठले भारतीय पदार्थ साठवावे व कुठले साठवू नये (Indian food to be stored in the refrigerator) कसा वाटला?  वाचण्यासाठी आमच्या लेखक मित्र या वेबसाईटला नक्की भेट द्या. असे नवनवीन लेख आणि कथा आपल्याला नक्कीच वाचायला मिळतील. नक्की शेअर करा.आणि प्रतिक्रिया द्या.आपल्या मित्र परिवारामध्ये सुद्धा शेअर करा आणि आमचे व्हाट्सअप चॅनेल पण  जॉईन करा.

धन्यवाद!

10 thoughts on “फ्रिजमध्ये कुठले भारतीय पदार्थ साठवावे व कुठले पदार्थ साठवू नये ?l Indian food to be stored in the refrigerator”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top