महाराष्ट्र हा गड, किल्ले, कडे कपारी यांचा प्रदेश आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी तो संपूर्ण व्यापला आहे. म्हणूनच कवींनी या देशाला’ कणखर देशा’ असे म्हटलेले आहे. किल्ल्यांचा समृद्ध इतिहास महाराष्ट्राला आहे. शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली जेव्हा मराठ्यांचे राज्य महाराष्ट्रात प्रस्थापित झाले, तेव्हा मुख्य काम महाराजांनी किल्ले बांधणे आणि त्यांना बळकटी देणे हे केले. व या किल्ल्यांचा वापर करूनच त्यांनी मराठी राज्य सशक्त केले. या किल्ल्यांना अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत. हे किल्ले महाराष्ट्राच्या संस्कृतीचे पाईक आहेत. अनेक किल्ल्यांची अवस्था आता खूप बिकट आहे पण सरकारने प्रयत्न करून काही किल्ले वाचवलेले आहेत. हे सगळेच किल्ले शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचा त्याग आणि बलिदानाचे साक्षी आहेत. म्हणूनच प्रत्येक मराठी माणसाला या किल्ल्यांचा खूप अभिमान आहे. म्हणूनच मराठी माणसाने या किल्ल्यांविषयी जरूर जाणून घ्यायला हवे. काही किल्ले शिवाजी महाराजांच्या आधीपासूनच अस्तित्वात होते तर काही किल्ले त्यांच्या काळातील आहेत, तर काही त्यांच्या नंतरच्या काळातले सुद्धा आहेत. राज्यात जवळपास साडेतीनशे किल्ले आहेत. त्यातील १६० किल्ले शिवाजी महाराजांनी बांधले आहेत.
महाराष्ट्रात असलेल्या शिवाजी महाराजांच्या प्रमुख सहा किल्ल्यांची माहिती या लेखामध्ये आपण काही निवडक किल्ल्यांची माहिती व त्यांचा इतिहास बघू.
१) तोरणा स्थान– तोरणा किंवा प्रचंडगड हा महाराष्ट्रातला अतिशय मोठा गड आहे. हा गड वेल्हा तालुक्यात आहे. सह्याद्रीच्या रांगेमध्ये हा किल्ला पसरलेला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करत असताना सर्वप्रथम हा किल्ला जिंकला आहे. या किल्ल्याने त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून त्याचे नाव तोरणा ठेवले. इतिहास–हा किल्ला कधी व कोणी बांधला याचे फारसे पुरावे उपलब्ध नाहीत .पण अवशेषावरून शैव पंथीय किल्ला आहे. मधल्या काळात बहामनी राजवटीकडे हा किल्ला होता.
पूर्वी तो निजामशाहीकडे होता पण त्यानंतर शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. बराच काळ मराठी साम्राज्याकडे हा किल्ला होता. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मुघलांनी हा किल्ला जिंकला. त्यानंतर शंकराजी नारायण या सचिवाने परत आपल्या साम्राज्यात सामील करून घेतला. सन१७०४ मध्ये औरंगजेबाने हा किल्ला जिंकला. परत लढाईमध्ये मराठ्यांनी हा किल्ला आपल्या साम्राज्यात सामील केला व त्यानंतर तो मराठी साम्राज्याकडेच राहिला.
पाहण्यासारखी ठिकाणे–तोरंजाई देवी मंदिर, मेंगाई देवी मंदिर, झुंजार माची, बुधला माची, तोरणेश्वर मंदिर गडाकडे जाण्याचे मार्ग–गड चढण्यासाठी वेल्हे गावातून पायवाट आहे. दीड ते दोन तासात हा गड सर करता येतो. पुणे नसरापूर वेल्हे किंवा पुणे पानशेत वेल्हे अथवा पुणे खानापूर वेल्हे अशा मार्गाने गडाच्या पायथ्याशी जाता येते.
२) रायगड–स्थान–हा किल्ला महाराष्ट्रात सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये स्थित आहे.
समुद्रसपाटीपासून २७०० फूट उंचीवर आहे. मराठी साम्राज्यामध्ये या किल्ल्याला एक वेगळी अशी ओळख आहे. स्थापत्य शास्त्राचा एक अतिशय उत्तम नमुना म्हणजे रायगड किल्ला आहे.
इतिहास–या किल्ल्याचे पूर्वेचे नाव रायरी असे होते इंग्रज या किल्ल्याला पूर्वेचे जिब्राल्टर असे म्हणत. रायगड हा अतिशय अजिंक्य आणि दुर्गम असा किल्ला आहे. पाचशे वर्षांपूर्वी त्याला गडाचे स्वरूप नव्हते. तेव्हा तो नुसताच एका डोंगराच्या स्वरूपात होता त्याला रासिवट किंवा तणच या नावाने ओळखले जायचे. निजामशहाच्या काळामध्ये या डोंगरावर कैद्यांना फक्त बांधून ठेवल्या जायचे. शिवाजी महाराजांनी ६ एप्रिल १६५६ ला या रायरीला वेढा घातला. त्यावेळी मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव होता. महाराजांना घाबरून रायगडावर पळून आला होता. मे महिन्यामध्ये शिवाजी महाराजांनी रायरी ताब्यात घेतला. त्यावेळी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराची लूट करून तो खजिना गडावर आणला व रायगडाची डागडुजी करण्यासाठी वापरला.
महाराजांना रायगड हा किल्ला त्यांची राजधानी बनवण्यास अत्यंत सोयीचा वाटला. शत्रूला जिंकायला तो किल्ला अतिशय अवघड होता तसेच सागरी दळणवळण करता सुद्धा मार्ग तिथून सोपा होता म्हणूनच महाराजांनी या किल्ल्याची निवड केली. १९ मे १६७४ रोजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला. अतिशय भव्य दिव्य सोहळा रायगडाने बघितला. पाहण्यासारखी ठिकाणे–पाचाडचा जिजाबाईंचा वाडा, नाना दरवाजा, महादरवाजा, चोर दिंडी, हत्ती तलाव, गंगासागर तलाव, स्तंभ, पालखी दरवाजा, राज भवन रत्नशाळा ही अनेक बघण्यासारखी ठिकाणे आहेत. आता काही ठिकाणांचा ऱ्हास झालेला आहे तर काही ठिकाणांची डागडुजी केली आहे महाराजांची समाधी तर अतिशय बघण्यासारखी आहे. प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान या ठिकाणी जागा होतो.
किल्ल्याकडे जाण्याचे मार्ग–पुण्याहून रायगडला जाण्यासाठी थेट बस सेवा आहे. चढण्यासाठी येथे रोपवे आहे किंवा गड चढूनही जाता येतो. रायगडावर 3 एप्रिल १६८० रोजी महाराजांचे निधन झाले. या गडाने अनेक राजकारणाचे खेळ बघितले आहेत.
गडावर राहण्याची आणि खाण्यापिण्याची सुद्धा सोय आहे.
३) सिंहगड–.
स्थान—सिंहगड सुद्धा पुणे जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचा किल्ला आहे. पुण्यापासून 25 किलोमीटरवर आहे. समुद्रसपाटीपासून ४२०० फूट आहे. सह्याद्रीच्या पूर्व भागाला भुलेश्वराच्या रांगेमध्ये हा किल्ला आहे.
इतिहास –या किल्ल्याचे आधीचे नाव कोंढाणा असे होते. आख्यायिकेनुसार ऋषी कौंडण्य यांनी इथे तपश्चर्य केली म्हणून त्याचे नाव कोंढाणा असे पडले. पूर्वीपासून हा किल्ला महादेव कोळी यांच्या ताब्यात होता. सन १३६०ला तुघलकाने दक्षिणेकडे आक्रमण केले. तेव्हा कोळी लोकांनी या किल्ल्यामध्ये आश्रय घेतला होता. व वर्षभर हा किल्ला लढवला. पुढे निजामशाही पर्यंत हा किल्ला महादेव कोळी सामंत यांच्याकडे होता. पुढे हा किल्ला आदिलशहाकडे होता. दादोजी कोंडदेव जेव्हा आदिलशहाचे सुभेदार होते तेव्हा हा किल्ला लष्करी केंद्र म्हणून प्रस्थापित झाला. इसवी सन १६८९ मध्ये शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी आदिलशहाला हा किल्ला परत दिला.
शिवाजी महाराजांचे मावळे तानाजी मालुसरे यांनी हा गड जेव्हा जिंकला, तेव्हा गड आला पण सिंह गेला असे महाराजांनी म्हंटले होते. 4 फेब्रुवारी १६७०ला हे युद्ध झाले.
पाहण्यासारखी ठिकाणे–दारूचे कोठार, टिळक बंगला, कोंडणेश्वर, अमृतेश्वर भैरव मंदिर, देव टाके, कल्याण दरवाजा, झुंजार बुरुज तानाजी कडा, राजाराम महाराज स्मारक तानाजींचे स्मारक इत्यादी.
गडावर जाण्याच्या वाटा–पुण्यातील स्वारगेट पासून गडाच्या पायथ्याशी बसेस जातात. कारनीही जाता येते. इथून मग गड चढायला पायऱ्या आहेत किंवा पायवाटेने पण गड चढता येतो.
४) लोहगड–
स्थान–हा किल्ला सुद्धा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आहे. लोणावळ्या जवळ दोन दुर्ग एकमेकांच्या जवळच उभे आहेत. त्यातील लोहगड आणि विसापूर असे त्यांना नावं आहेत. पवना धरण जवळच आहे.
इतिहास–इसवी सन पूर्व२००० पूर्वी या किल्ल्याची निर्मिती झाल्याचे लक्षात येते. सातवाहन चालुक्य यादव इत्यादी अनेक राजवटीच्या काळात हा किल्ला होता. निजामशाहीने जेव्हा अनेक किल्ले जिंकले तेव्हा त्यात हा किल्ला जिंकला होता. १६५६ मध्ये जेव्हा शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी हा परिसर जिंकला तेव्हा किल्ला आपल्या साम्राज्यात सामील करून घेतला. १६६५ मध्ये तहा मध्ये परत मुघलांना तो किल्ला द्यावा लागला. पण नंतर महाराजांनी हा किल्ला परत जिंकला.
पाहण्यासारखी ठिकाणे–गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा, महादरवाजा, विंचू कडा
गडाकडे जाण्याचे मार्ग—पुण्यावरून अथवा मुंबईवरून रेल्वेने मळवली स्टेशन पर्यंत येता येते. तिथून एक्सप्रेस वे वरून लोहगडला जाता येते. लोणावळ्या वरून टू व्हीलर अथवा फोर व्हीलर ने लोहगडापर्यंत सरळ जाता येते. पवना धरणावरून लोहगडावर ट्रेक पण करता येतो.
५) शिवनेरी–
स्थान—महाराष्ट्रातील जुन्नर जवळ , पुण्यापासून १०५ किलोमीटरवर हा किल्ला आहे. नाणेघाट डोंगर रांगांमध्ये हा किल्ला वसलेला आहे.
हा किल्ला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून सरकारने घोषित केला आहे.
इतिहास–या किल्ल्याला पूर्वी जीर्ण नगर असे म्हणत असत. हा किल्ला म्हणजे शक राजा नहपाना याची राजधानी होती. सातवाहन राजाने शकांचा नायनाट केला आणि या पूर्ण भागावर आपल्या वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन कालापासून व्यापारी मार्ग आहे. या मार्गावर नजर ठेवण्यासाठी आजूबाजूला अनेक किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली यातीलच शिवनेरी हा किल्ला एक आहे. सातवाहनानंतर चालुक्य आणि राष्ट्रकुल या राज्यांनी सुद्धा या शिवनेरीवर राज्य केले. ११७० ते १३०८ दरम्यान यादवांनी या किल्ल्यावर राज्य केलं. मधल्या अनेक घडामोडीनंतर १५९५ मध्ये जुन्नर प्रांत मालोजीराव भोसले यांच्याकडे आला. जिजाबाईंच्या वडिलांच्या मृत्यूनंतर शहाजीराजांनी त्यांना शिवनेरीवर ठेवले तेव्हा त्या गरोदर होत्या. त्यावेळी त्या नवस बोलल्या होत्या की पुत्र झाला तर मी त्या गडाचे नाव ठेवीन. तेव्हा या गडावरूनच शिवाजी महाराजांचे शिवा हे नाव ठेवले .सन १६३७ मध्ये गड मुघलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर अनेक काळाने पेशव्यांनी हा किल्ला जिंकला.
पाहण्यासारखी ठिकाणे–सात दरवाजे, शिवाई देवीचे मंदिर, अंबरखाना, शिवकुंज, शिवाजी महाराजांचे जन्मस्थान, कडेलोट कडा, बदामी तलाव इत्यादी.
गडाकडे जाण्याचे मार्ग–.
मुंबईहून माळशेज मार्केट गडावर चढाई करता येते तसेच पुण्याहून नारायणगावला येऊन पुढे शिवनेरी किल्ल्यावर चढता येते. जुन्नर शहरातून किल्ल्याकडे जाण्यासाठी एक साखळी वाट आहे. या वाटेने किल्ल्यावर जायला पाऊण तास लागतो.
तिथूनच अजून एक सात दरवाजांची वाट आहे. गडावर चढताना सात दरवाजे लागतात.
६) पुरंदर–
स्थान—हा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये तो वसला आहे. या डोंगर रांगांमध्ये पूर्वेकडे काही फाटे आहेत. त्याच ठिकाणी पुरंदर हा किल्ला वसला आहे. हा किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेला आहे. आणि सासवडच्या जवळ आहे. या किल्ल्यावर संभाजी महाराजांचा जन्म झाला आहे.
इतिहास–पुराणातील या डोंगराचे नाव इंद्रनील पर्वत आहे. हनुमंत जेव्हा द्रोणागिरी पर्वत उचलून नेत होता तेंव्हा त्याचा काही भाग येथे पडला. त्यालाच पुरंदर म्हणतात. पुरंदर म्हणजेच इंद्र. बिदर चे सरदार चंद्रसंपत देशपांडे यांनी बहामनी शासनाच्या वतीने तो किल्ला त्यांच्याकडून काबीज केला होता. व त्याच्या पुनर्निर्माणाचे काम हाती घेतले. महादजी नीलकंठ यांनी हे काम पूर्ण केले. यानंतर निजामशाही सरदार मलिक अहमद यांनी हा किल्ला जिंकला. नंतर तो आदिलशाहीत आला. आदिलशहाने शहाजी महाराजांना कैदेत टाकले होते. त्याच वेळेस आदिलशहाने शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी फत्तेखानाला पाठवले होते. यावेळी शिवाजी महाराजांनी पुरंदर वरूनच लढण्याचे निश्चित केले पण गड त्यांच्या ताब्यात नव्हता त्यावेळी महादजी नीलकंठ यांच्या ताब्यात तो किल्ला होता. शिवाजी महाराजांनी भावाभावांच्या भांडणाचा फायदा घेऊन पुरंदर किल्ल्यातून फत्तेखानाला झुंज दिली व किल्ला जिंकला त्यानंतर इथेच संभाजी महाराजांचा जन्म झाला.
पुरंदरचा तह–मोगल सरदार जयसिंह यांनी पुरंदरला वेढा घातला होता. मुरारबाजी प्रभू यांनी किल्ला लढवला दिलेरखान सारखा पठाण तिथे लढायला होता. बऱ्याच लोकांचा त्यात मृत्यू झाला. दिलेरखानाने हा किल्ला जिंकला शिवाजी महाराजांनी जयसिंहांशी तहाचे बोलणे सुरू केले. हाच तो इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह. त्यात २३ किल्ले महाराजांना मोघलांना द्यावे लागले.
पाहण्यासारखी ठिकाणे–बिनी दरवाजा, पुरंदरेश्वर मंदिर, रामेश्वर मंदिर, दिल्ली दरवाजा, खंदकडा, पद्मावती तळे, शेंद्रा बुरुज, केदारेश्वर, पुरंदर माची, भैरवगड आणि वीर मुरारबाजी.
गडाकडे जाण्याचे मार्ग–गडावर चढण्यासाठी पुण्यावरून सासवडला यावे लागते. सासवड हून नारायणपूरच्या जवळ असलेल्या पुरंदर पायथ्याशी येऊन गड चढता येतो.गडावर चढायला दोन तास लागतात.
तर महाराष्ट्रात असलेल्या शिवाजी महाराजांच्या सहा प्रमुख किल्ल्यांची माहिती information of six main forts of shivaji maharaj in maharashtra in marathi हा लेख आपल्याला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा.याकरता आमच्या लेखक मित्र या वेबसाईटला नक्की भेट द्या व इतर लेख व कथा नक्की वाचा आणि प्रतिक्रिया द्या. तसेच आमच्या व्हाट्सअप चॅनललाही जॉईन करा. आणि मित्र-मैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा. धन्यवाद!
लेखिका– वैशाली देव (पुणे )