जागतिक मैत्री दिवस | International Friendship Day

WhatsApp Group Join Now

मानव हा जगातील सर्वात नशीबवान प्राणी आहे असे म्हणता येईल. जन्मापासूनच तो अनेक प्रकारच्या नात्यांनी जोडला जातो. माणसाच्या आयुष्यातली प्रत्येक नाती मग ती रक्ताची असोत वा ओळखीची ती वेगवेगळा अनुभव देणारी तर असतातच. त्यातही प्रत्येकाच्या आयुष्यात असणारं खूप गोड आणि आयुष्यभर टिकणार असं एक नातं म्हणजे “मैत्री” “Friendship”. कुठल्याही संकटात एक व्यक्ती साऱ्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्यासोबत ठाम पणे उभी असते ती मैत्री. मैत्रीला ना वयाचं बंधन असतं ना कुठल्याही दर्जाचं. मैत्री ही केवळ मैत्री असते. ती पाण्यासारखी नितळ आणि तेवढीच निखळही असते. मैत्री, दोस्ती, यारी अशा वेगवेगळ्या नावानी नटलेलं हे नातं प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. चला  तर मग मैत्रीच्या नात्याला वंदन करणारा, मैत्रीचा सन्मान करणाऱ्या आजच्या जागतिक मैत्री दिनानिमित्त (International Friendship Day) काही गोष्टी जाणून घेऊ.

सर्वात आधी तुम्हा सर्वांना आमच्याकडून मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. (Happy Friendship Day)

मैत्री दिन कधी पासून सुरू झाला? मैत्री दिनाचा इतिहास – 

मैत्री दिवस (Friendship Day) इ.स. १९५८ मध्ये २० जुलै रोजी खऱ्या अर्थाने मैत्रीमुळे सुरू झाला. पॅराग्वे मध्रील प्यूर्टो पिनास्को येथे मित्रमंडळींसोबत जेवत असताना डॉ. रॅमन आर्टेमियो ब्राचो यांनी जागतिक मैत्री दिनाची संकल्पना सर्वप्रथम मांडली होती. ह्या भेटी दरम्यान, जागतिक मैत्री धर्मयुद्धाचा(World Friendship Crusade) जन्म झाला. वंश, रंग किंवा कुठल्याही जाती-धर्माचा विचार न करता सर्व मानवांमध्ये मैत्री आणि सहवास वाढवणारा वर्ल्ड फ्रेंडशिप क्रुसेड हा एक पाया आहे. त्यानंतर, दरवर्षी पॅराग्वे मध्ये 30 जुलै हा मैत्रीदिन Friendship Day म्हणून साजरा केला जातो आणि इतर अनेक देशही तो स्वीकारत गेले. 

असेही सांगितले जाते की, हॉलमार्क Hallmark ह्या शुभेच्छापत्र (ग्रीटिंग कार्ड Greeting Card) तयार करणाऱ्या जॉयस हॉल ह्यांनी हा दिवस साजरा केला जावा असा प्रस्ताव मांडला. त्यांनी ह्या दिवसासाठी प्रचार केला आणि कालांतराने साऱ्या जगाने ते स्वीकारले. 

१९९८ मध्ये नेन अन्नान Nane Annan ह्यांनी मैत्री दिवसाचा सन्मान करण्यासाठी विनी द पूह Winnie the Pooh यांना संयुक्त राष्ट्रसंघातील मैत्रीचे जागतिक राजदूत world’s Ambassador of Friendship म्हणून नियुक्त केले. 

कालांतराने २०११ मध्ये ३० जुलै हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघातर्फे आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस International Friendship Day म्हणून साजरा करण्याचे घोषित केले गेले.

मैत्री दिवस कधी साजरा करतात?

तुम्हाला हे माहीत आहे का ? जगभरात मैत्री दिवस वेगवेगळ्या महिन्यात साजरा केला जातो. 

उपलब्ध माहितीनुसार मेक्सिको, ग्वाटेमाला, फिनलँड, एस्टोनिया आणि डोमिनिकन रिपब्लिकमध्ये, फ्रेंडशिप डे व्हॅलेंटाईन डे च्या विरोधात १४ फेब्रुवारीला साजरा केला जातो. दक्षिण आफ्रिकेत १६ एप्रिल रोजी तर सिंगापूरमध्ये एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. तसेच, युक्रेन मध्ये ९ जुनला हा दिवस साजरा करतात. तर जुलै महिन्यात १४ जुलैला इक्वेडोर आणि व्हेनेझुएला मध्ये; २३ जुलैला बोलिव्हिया मध्ये; २० जुलैला अर्जेंटिना, ब्राझील, स्पेन आणि उरुग्वे मध्ये आणि ३० जुलैला नेपाळ मध्ये मैत्री दिवस Friendship Day साजरा केला जातो. 


भारतामध्ये (India) ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी  मैत्री दिवस साजरा केला जातो. Friendship day celebrates on the first Sunday of August in India भारतात १९९० च्या दशकाच्या सुरुवातीस बॉलीवूड चित्रपटांच्या प्राभावाने किशोर आणि तरुण वर्गात हा उत्सव मोठ्या प्रमाणावर पसरला. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच जण आपापल्या पद्धतीने हा दिवस विशेष साजरा करताना दिसतात. भारतासोबत मलेशिया, बांगलादेश, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि संयुक्त अरब अमिराती हे देशही ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिवस साजरा करतात.

मैत्री दिवस रविवारी का साजरा करतात?

असे सांगतात की, १९३५ साली अमेरिकेमध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी एका व्यक्तीची हत्या केली गेली. ज्याची हत्या झाली त्याच्या जवळच्या मित्राला ही घटना समजताच त्याने निराश होऊन आत्महत्या केली. मित्रांमधील हे सख्य आणि प्रेम पाहून ऑगस्टच्या पहिल्या रविवारी मैत्री दिवस साजरा करण्याचा निर्णय अमेरिकन सरकारकडून घेण्यात आला होता. तेव्हापासून अनेक देशांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा होऊ लागला. हळूहळू ह्याची प्रसिध्दी वाढत गेली आणि हा जागतिक स्तरावर अनेक देशांत साजरा होऊ लागला. समाजात शांतता, एकोपा राहण्यासाठी माणसा-माणसातील जिव्हाळा वाढवण्यासाठी, आपल्यातली मैत्री हक्काने आपल्या जवळच्या मित्रांसमोर व्यक्त करण्यासाठी मैत्री दिवस साजरा केला जावा हा मैत्री दिवसाचा उद्देश आहे.

मैत्री दिवस कसा साजरा करतात?

मैत्री दिवस साजरा करण्याच्या अनेक पद्धती जगभरात आहेत. शुभेच्छा पत्र देऊन हा दिवस साजरा केला जावा,; जेणेकरून ह्या मित्रमंडळी आपल्या मनातल्या भावना एकमेकांसोबत हक्काने आणि तेवढ्याच सहजतेने व्यक्त करू शकतील. हा त्या मागचा हेतू होता. कालांतराने वेगवेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा होऊ लागला. मैत्रीचा बंध आणखी घट्ट जोडण्यासाठी एकमेकांना फ्रेंडशिप बँड (रिबीन) बांधून आपली भावना व्यक्त केली जाते. महाविद्यालयातील तरुण वर्ग त्या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे घालून जातात आणि एकमेकांच्या कपड्यांवर किंवा एकमेकांच्या हातावर शुभेच्छा संदेश लिहून असा वेगळ्या प्रकारे हा दिवस साजरा होताना दिसतो. आवर्जून एकत्र जमून जेवणाचा बेत करतात तर काही फक्त एकमेकांना शुभेच्छा देऊनही हा दिवस साजरा करताना दिसतात. अनेक समाज माध्यम किंवा व्यावसायिक क्षेत्रातील अनेक कंपन्या ग्राहकांना वेगवेगळ्या सवलती देऊन किंवा कार्यक्रम आयोजित करतानाही दिसतात. सर्वांचाच हेतू मैत्री सारख्या मौल्यवान नात्याचा सन्मान करणं हा असतो. 

मनोरंजन क्षेत्राने मैत्रीसाठी केलेले काम –मनोरंजन क्षेत्रात चित्रपट Movies, मालिका Serials, जाहिराती(TVC), शॉर्टफिल्म्स, काही कथाबाह्य कार्यक्रम, हल्लीच्या काळात वेबसिरीज सारख्या माध्यमांनीही मैत्रीचा संदेश देताना दिसतात. मराठी, हिंदी, इंग्रजीच काय तर वेगवेगळ्या भाषांत अनेक चित्रपट हे मैत्रीच्या कथानकावर आधारित आहेत. त्यातील मराठी चित्रपटसृष्टीने अनेक असे चित्रपट रसिकांसमोर आणले. मैत्रीची वेगवेगळी रूपं आपल्याला “सावरखेड एक गाव”, “दुनियादारी”, “क्लासमेट्स” अशा अनेक चित्रपटांतून पाहायला मिळते. मराठी चित्रपटातला सर्वांचाच आवडता आणि अजूनही रसिकांच्या मनात गाजत असलेला “अशी ही बनवाबनवी” मधली चार मित्रांची मैत्री आणि त्यांचे धमाल किस्से आजही आनंद देणारे आहे. 

“ही दोस्ती तुटायची नाय…” गाण्याप्रमाणेच लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, महेश कोठारे ह्यांनी केलेल्या अनेक चित्रपटात वेगवेगळ्या मैत्रीची रुपं पाहायला मिळतात. त्यांच्या चित्रपटातली मैत्री ही आजही लोकांना आवडते. “किल्ला”, “सैराट”, “आम्ही दोघी”, “झिम्मा” हे चित्रपटही मैत्रीच्या अनेक रंगानी सजलेले आहे. 
 तर जुन्या काळातील 

हिंदी  मधील चित्रपट “दोस्ती”Dosti, आनंद Anand, हाथी मेरे साथी, शोले Sholay असे दर्जेदार चित्रपट आजही लक्षात राहतात. त्यानंतरच्या काळातही आणि ९० च्या दशकापासून आत्तापर्यंत अनेक उत्तमोत्तम चित्रपट हे मैत्री वर आधारित आहेत. जो जीता वही सिकंदर, अंदाज अपना अपना सारखे मजेदार चित्रपट, विशेष उल्लेख करायचा तर भारतात मैत्री दिवस आणि फ्रेंडशिप बँड (Friendship & Friendship Band) ज्या हिंदी चित्रपटामुळे आणखी प्रसिद्ध झाला तो १९९८ साली गाजलेला “कुच कुच होता है” (Kuch Kuch Hota Hai), त्यानंतर आलेले ” दिल चाहता है”, मुन्नाभाई एम.बी.बी.एस., (मुन्नाभाई आणि सर्किटची मैत्री ही सर्वांना आवडली), कल हो ना हो, कोई मिल गया, “रंग दे बसंती”, जाने तू या जाने ना, ३ इडियट्स, जिंदगी ना मिलेगी दोबारा, काय पो चे अशा अनेक हिंदी चित्रपटांनी मैत्रीमधले अनेक वेगवेगळे पैलू मांडले. चित्रपटांप्रमाणेच “

दिल-दोस्ती-दुनियादारी”, “लगोरी”, “फ्रेशर्स” ह्या आणि अशा अनेक मराठी टीव्ही मालिकांमध्येही मैत्री खुलताना पाहायला मिळाली आहे. मैत्री ही  माणसाला अनेक रंगानी समृद्ध करते हे ह्या सर्वांमधून दिसते. 

चित्रपट आणि मालिकांप्रमाणेच अनेक  गाण्यांमधूनही मैत्रीचे सूर उमटले आहेत. अगदी जुन्या काळातील “यारी हे इमान मेरा यार मेरी जिंदगी”, “चल चल चल मेरे हाथी, ओ मेरे साथी”, “तेरे जैसा यार कहा”, पासून “ही दोस्ती तुटायची नाय”, “‘तेरी मेरी यारीया…. ” आणि सर्वांचीच  आवडती गाणी  म्हणजे – “यारो, दोस्ती बड़ी ही हसीन है…” आणि  “पल, याद आयेंगे ये पल…. ” अशी अनेक गाणी मैत्रीला सलाम करणारी आहेत. 

डिजिटल माध्यमांतून शुभेच्छा – 

आजही अनेक ठिकाणी फ्रेंडशिप बँड बांधून हा दिवस साजरा केला जात असला तरी आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या आणि डिजिटल युगात सोशल मीडिया, व्हिडीओ कॉल, रील्सच्या माध्यमातून जगभरात सगळे एकमेकांना शुभेच्छा देतात. डिजिटल माध्यमांमुळे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून आपल्या मैत्रीची वीण घट्ट करायला मदत होते म्हणून ही माध्यमंही आपल्या मित्रांसारखीच आहेत. 

रुसवे फुगवे, भांडणं, अबोला, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा अशा अनेक पैलूंनी बांधून ठेवणारं “मैत्री” हे गोड नातं प्रत्येकाच्याच आयुष्यात खूप महत्त्वाचे असते. मैत्रीमध्ये सर्व काही माफ असतं; असं असलं तरी मैत्रीला कायम जोडणारा दुवा म्हणजे “विश्वास”. हाच विश्वास कायम टिकून राहिला त्यापेक्षा प्रत्येकानेच टिकवून ठेवला तर अशी मैत्री अनंत काळ टिकणारी असते ह्यात शंकाच नाही. तेव्हा कितीही राग रुसवा असला तरी आज न विसरता आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना शुभेच्छा द्या आणि तुमच्यातल्या मैत्रीचा सन्मान करा. 

तर वाचकमित्रहो, तुमच्या ह्या लेखकमित्राने तुमच्यासाठी आणलेला आजचा जागतिक मैत्री दिवस International Friendship Day हा लेख तुम्हाला कसा वाटला? आणि तुम्ही तुमचा मैत्री दिवस कसा साजरा करता?, तुमच्या मैत्रीचे काही छान किस्से किंवा आठवणी असतील आणि तुम्ही मैत्री दिवस (Friendship Day) कसा साजरा करता ? आणि मैत्रीवरचे तुमचे आवडते गाणे कोणते ? हे सर्व खाली कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला जरूर कळवा. आपल्यातली मैत्री ही कायम अशीच वाढत राहो. अशा अनेकविध विषयांवर सविस्तर माहितीपर लेखांसाठी, बातम्यांसाठी, नवनवीन कथांसाठी आपल्या ‘लेखकमित्र’ वेबसाईटला नेहमी नक्की भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप चॅनल ही फॉलो करा.

वाचक मित्रहो, खूप खूप धन्यवाद.  

शब्दसंख्या – १२८८

plagiarism checker result : १००% Unique

1 thought on “जागतिक मैत्री दिवस | International Friendship Day”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top