आपण दरवर्षी विविध दिवस, सप्ताह, वर्ष आणि दशके साजरे करतो आहोत. वेगवेगळ्या देशात वेगवेगळे दिवस साजरे केले जातात. जसे की स्वातंत्र दिवस, प्रजासत्ताक दिन किंवा वन्यजीव सप्ताह, पक्षी सप्ताह, मराठी भाषा सप्ताह इत्यादी. नित्याचा प्रत्येक दिवस साजरा करण्याजोगे नसला तरी त्याचे स्मरण करणे विशिष्ठ समाजाला, समाजातील एखादा वर्ग किंवा देशाला अगदी जवळच असते. याला एक अनन्य साधारण महत्व असल्याने यांच्या तारखा आणि वेळा विषयानुसार ठरलेल्या असतात. संस्कृतीचे किंवा प्रथेचे समर्थन करण्यासाठी, समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अपेक्षित व मानवहित कृतीसाठी शक्तिशाली साधन म्हणून याकडे पाहता येईल.
जागतिक स्थरावर संघराज्य हे अधिकाधिक देशाचे प्रातिनिधित्व करते. संयुक्त राष्ट्र संघ जगभरातल्या १९३ देशांनी मिळून बनलेली आहे. दरवर्षी त्यांची सभा भरते. ही सभा तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि वैज्ञानिक जडणघडणीनुसार एक विशिष्ट तारीख आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित करते. महासभेचे सदस्य संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत अशा दिवसाबद्दल प्रस्तावित केले जातात. एखादा ठराविक दिवस किंवा सप्ताहची स्थापना करायची की नाही याचा निर्धार सर्वसाधारण सभेत सर्व राष्ट्रांच्या संमतीने ठरवले जाते.

आंतरराष्ट्रीय दिवसांचा विषय संयुक्त राष्ट्रांच्या कृतीच्या मुख्य क्षेत्रांशी जोडले जातात, म्हणजेच आंतरराष्ट्रीय शांतता जपणे, सुरक्षितता राखणे, शाश्वत विकासाचा प्रचार व प्रसार करणे, मानवी हक्कांचे संरक्षण करणे, आंतरराष्ट्रीय कायदा व सुव्यवस्था राखणे आणि मानवतावादी कारवाईची हमी देणे याशी निघडीत विषय चर्चिले जातात. सर्वसाधारण सभेने आंतरराष्ट्रीय दिवसाची घोषणा करण्यास कशामुळे प्रवृत्त केले हे त्या ठरावांमध्ये स्पष्ट केले जाते. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे २३ जून हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून २०११ पासून घोषित करण्यात आले. ज्यामध्ये महासभेने असे म्हटले की “लाखो विधवांच्या मुलांना अडचणींचा सामना करावा लागतो याविषयी अत्यंत चिंतेची बाब आहे. आरोग्य सेवा, पाणी आणि स्वच्छता, जनमानसात याचे गांभीर्य उमटावे या हेतूने हा ठराव झाला.
संयुक्त राष्ट्रांच्या विशेष एजन्सीद्वारे आरोग्य, विमान वाहतूक, बौद्धिक संपदा इत्यादीसारख्या विषयांकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी काही ठराव केले. उदाहरणार्थ, जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन, जो ३ मे रोजी साजरा केला जातो, पॅरिस स्थित संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) द्वारे घोषित करण्यात आला आणि नंतर महासभेने तो स्वीकारला.
जागरुकता वाढवण्यासोबतच, संयुक्त राष्ट्रसंघ अशा दिवसांच्या माध्यमातून राज्यांना कृतींबाबत सल्ला देते. २२ मे रोजी साजरा करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय जैविक विविधतेच्या दिनाबाबतचा ठराव याचे उदाहरण आहे. ज्यामध्ये संघटना आपल्या सदस्य राष्ट्रांना जैविक विविधतेच्या संरक्षणावरील कार्टेजेना ठरवावर स्वाक्षरी करण्यासाठी आणि त्याला मान्यता देण्यासाठी आमंत्रित केले होते. भारताने सदर जैविक विविधता संवर्धन व जैवसुरक्षेवरील प्रोटोकॉलवर २३ जानेवारी २००३ रोजी स्वाक्षरी केली आणि हे पारित झाले.
जगभरातील लोकांच्या जीवनात उंटांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने २०२४ हे उंटाचे आंतरराष्ट्रीय वर्ष घोषित केले आहे. आंतरराष्ट्रीय कॅमेलिड्स (उंट) वर्ष २०२४ हे उंटांच्या अगम्य क्षमतेबद्दल जागरुकता निर्माण करणे, त्याचे अधिक संशोधन करणे, त्यांच्या क्षेत्राची क्षमता विकासीत करणे, त्यामध्ये नाविन्यपूर्ण पद्धतीचा अंतर्भूत करणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी समर्थन देऊ करणे तसेच उंट पशुधन क्षेत्रात वाढीव गुंतवणूकीची मागणी करणे असे उद्देश आहेत. संयुक्त राष्ट्रांनी परिकल्पित केलेल्या शाश्वत विकास उद्दिष्टे (Sustainable Development Goals) पूर्ण करण्यात उंटांचा सिंहाचा वाटा आहे असे म्हणल्यास अतिशयोक्ति ठरणार नाही. त्यांची भूमिका मानवी समाजाला खूप महत्त्वाची ठरली आहे.
उंटांचे महत्व (International Year of Camelids 2024)
मानवाने त्यांच्या गरजांसाठी पाळलेल्या सस्तन प्राण्यांमध्ये उंटाला एक विलक्षण स्थान आहे. वाळवंटाच्या विचित्र आणि विशिष्ट परिसंस्थेशी अत्यंत अनुकूल झालेला हा प्राणी. उत्पादनासाठी वापरला जाणारा बहुउद्देशीय प्राणी म्हणून याची ख्याती आहे. प्रामुख्याने चार भागात याचा उपयोग पाहता येईल.
1. अन्न आणि व्यापार – उंटाच्या सर्वाधिक वापर दूध, मांस, लोकर, त्वचा आणि खताच्या वापरासाठी केला जातो.
2. शेतकऱ्यांचा मित्र – पर्जन्य छायेच्या प्रदेशात जमीन कसणे, शेती करणे खूप कठीण होते. तेव्हा मात्र उंटाला जुंपून नांगरणी करणे, शेतीची इतर कामे करण्यास उंटपेक्षा उत्तम प्राणी दूसरा कोणताही नाही.
3. करमणूक – उंटाच्या धावाच्या शर्यती, त्यावर बसून खेळ पोलो सारखे खेळ खेळणे, वालुकामय प्रदेशात पर्यटन करण्यासाठी, कुत्र्यांच्या सौंदर्य स्पर्धा प्रमाणे उंटांची फॅशन शो करणे व सांप्रदायिक रित्या सजावट करून उत्सव साजरा केला जातो.
4. वाहतूक – आपण केव्हा तरी उंटाची सवारी केले असेलच एखाद्या जत्रेत किंवा बाहेर गावी गेल्यावर. पण वाळवंटात उंटगाडी बनून माणसासह लगेज वाहून नेण्यासाठी वापर होतो.
उंटांची विविधता
आज जगात तीन उंटांच्या प्रजाती अस्तित्वात आहेत. मुळात पृथ्वीवर त्यांच्या आठ मुख्य प्रजाती असल्याच प्राणी शास्त्रज्ञानी सांगितले. त्यामध्ये ड्रॉमेडरी (Dromedary), ब्याकटेरीयन उंट (Bactrian Camel), रानटी उंट (Wild Camel) हे केवळ तीन प्रजाती आज अस्तित्वात असून क्यामेलोपस (Camelops), मेगा क्यामेलस (Megacamelus), एपीक्यामेलस (Aepycamelus), प्रोक्यामेलस (Procamelus), पोईब्रोथेरीयम (Poebrotherium) या पाच प्रजाती लुप्त झाल्या आहेत.
• ड्रॉमेडरी (Dromedary) – ड्रॉमेडरी उंटाची शारीरिक रचना विशेष आहे. त्याच्या वाळवंटी निवासस्थानासाठी अनुरूप बनली आहे. कमी पाण्याच्या प्रदेशात राहून शरीराचे तापमान नियंत्रित ठेऊ शकते. दाट भुवया आणि पापण्यांच्या दुहेरी पंक्ती वाळवंटात येणाऱ्या जोरदार वादळामध्ये डोळ्याना वाचवते. कडक सूर्यप्रकाशापासून त्यांचे संरक्षण करतात. ड्रोमेडरी आपल्या नाकपुड्या स्वेच्छेने बंद करण्यास सक्षम आहे यामुळे त्यांना खूप तहान लागत नाही. पाण्याशिवाय किमान ७२ तास जगू शकतात.
• ब्याकटेरीयन उंट (Bactrian Camel) – या उंटाच्या पाठीवर दोन-कुबड असल्यामुळे हे प्रचिलीत आहे. हे उंट स्थलांतर करतात. ते केवळ वळवंटातच नव्हे तर डोंगर-दऱ्यां, खडकाळ भूप्रदेश, पर्वतीय भागांपासून ते मैदानापर्यंत वास्तव्य करतात. अश्या विविध प्रदेशांची परीवरणीय परिस्थिती आगळी वेगळी आणि अत्यंत कठोर असते. खायच्या वनस्पती अगदी विरळ असतात, पाण्याचे स्त्रोत मर्यादित असतात आणि तापमानात कमालीचा फरक असतो. ब्याकटेरीयन उंटाचे शरीर -३० अंश सेल्सीयस ते ५० अंश सेल्सीयस पर्यंतचे तापमान सहन करू शकतो.
हे प्रामुख्याने शाकाहारी आहेत. काट्यांसारख्या तीक्ष्ण वस्तूंना तोंड देऊ शकणाऱ्या कठीण तोंडाने काटेरी किंवा कडू वनस्पती खाण्यास सक्षम आहेत. जवळजवळ कोणत्याही प्रकारची वनस्पती पचवू शकतात. जेव्हा इतर पोषक स्रोत उपलब्ध नसतात तेव्हा हे उंट हाडे, त्वचा किंवा विविध प्रकारचे मांस खाऊ शकतात.
• रानटी उंट (Wild Camel) – रानटी उंट हे पश्चिम चीन आणि दक्षिण मंगोलियाच्या काही भागांमध्ये राहणाऱ्या उंटांची एक अत्यंत धोकादायक प्रजाती आहे. यांची संख्या खूप कमी झाली आहे. मोठे दुहेरी कुबड असलेले, एक समान पंजे असलेले हे उंट मूळचे अशीया खंडातते. रानटी उंट हे पाळीव ब्याकटेरीयन उंटांपासून उत्क्रांत झाले असावे, कालांतराने ते जंगलात सोडल्यानंतर जंगली बनले असे मानले जात होते. शास्त्रज्ञानी सांगितले की ती एक वेगळी प्रजाती आहे जी सुमारे एक दशलक्ष वर्षांपूर्वीच ब्याकटेरीयन उंटापासून वेगळी झाली होती. सध्या, केवळ १००० रानटी उंट जंगलात राहतात.
लुप्त झालेल्या उंटांना आपण आता पाहू शकणार नाही परंतु त्यांची थोडक्यात माहिती घेऊ.
• क्यामेलोपस (Camelops) – क्यामेलोपस उंटांची नामशेष प्रजाती आहे जी उत्तर अमेरिका आणि अलास्का मध्ये आढळत होती. ते उत्तर अमेरिका खंडातील उबदार आणि थंड दोन्ही प्रदेशांमध्ये राहत होते. यांचे जीवन आजच्या उंटाप्रमानेच होते.
• मेगाक्यामेलस (Megacamelus) – मेगाकॅमेलस ही यांच कुटुंबातील स्थळीय राहणारी शाकाहारी प्रजाती होती. ती उत्तर अमेरिकेत सुमारे ५.४ दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात होते.
• एपीक्यामेलस (Aepycamelus) – एपीक्यामेलसला पूर्वी अल्टिकॅमलस या नावानेदेखील ओळखल जायचे. ओरेगॉनमधे सापडलेल्या जीवाश्ममध्ये याचे पुरावे मिळतात.
• प्रोक्यामेलस (Procamelus) – प्रोक्यामेलस ही उत्तर अमेरिकेतील उंटाची स्थानिकप्रजाती होती. अंदाजे ११ दशलक्ष वर्षे हे अस्तित्वात होते. हे उंट आजच्या उंटांपेक्षा वेगळे होते. मान सरळ होती. त्याचे पाय लांब असल्यामुळे तो धावण्यात उत्तम होता. त्याच्या वरच्या जबड्यात लहान दातांची जोडी होती. उरलेले दात मोठे आणि कठीण वनस्पती खाण्यासाठी अनुकूल होते. पायाच्या बोटांच्या आकारा आखूड होते, सपाट मऊ पाऊल, यामुळे त्याला वालुकामय जमिनीवरून चालण्यास मदत झाली.
• पोईब्रोथेरीयम (Poebrotherium) पोईब्रोथेरीयम हा उंटाचा एक विलुप्त वंश आहे जे उत्तर अमेरिकेत स्थानिक होते. जीवाश्म पुराव्यावरून असे दिसून आले आहे की पोईब्रोथेरीयम हे त्यातकालिन शिकारी प्राण्यांच्या आवडीचे भक्ष असावेत. कारण त्यांच्या हाडांच्या अवशेषांमद्धे शिकरांच्या दातांचे व्रण दिसले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सापडलेल्या अवशेषांपैकी फक्त तीन पोईब्रोथेरीयम दातांचे नमुने होते.
संवर्धन
आज उंटांना विविध धोक्यांचा सामना करावा लागतो ज्यात शिकार, हवामान बदल, अधिवास नष्ट होणे आणि मानवी अतिक्रमण यांचा समावेश होतो. मानवासाठी उंटाकडून अनेक असूनही जगात उंटाची संख्या कमी होत आहे. मंगोलियापासून भारतापर्यंत भटक्या-विमुक्तांनी उंटाना फार गांभीर्याने जपले आणि त्यांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले. उंटांची स्थिती एका देशातून दुसऱ्या देशात बदलत असली तरी जागतिक स्तरावर उंटांची संख्या काहीप्रमाणात स्थिरावली आहे.
शुष्क आणि अर्ध-शुष्क क्षेत्रांच्या सामाजिक-आर्थिक विकासात उंटाचे महत्त्व लक्षात घेऊन, भारत सरकारने भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) अंतर्गत ५ जुलै १९८४ रोजी बिकानेर येथे उंटावर प्रकल्प संचालनालयाची स्थापना केली. २० सप्टेंबर १९९५ रोजी नॅशनल रिसर्च सेंटर ऑन कॅमल (NRCC) मध्ये परिवर्तीत करण्यात आले. भारतीय कृषी संशोधन परिषद आणि नॅशनल रिसर्च सेंटर ऑन कॅमल, बिकानेर, हे भारतीय कृषी संशोधन परिषदेचे एक प्रमुख संशोधन केंद्र आहे जे भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या कृषी संशोधन आणि शिक्षण विभागांतर्गत एक स्वायत्त संस्था आहे. ही संस्था उंटांच्या संवर्धनाचे काम देशपातळीवर करत आहे.
उंट हा वाळवंट पर्यावरणातील महत्त्वाचा प्राणी घटक आहे. त्याच्या अद्वितीय जैव-शारीरिक वैशिष्ट्यांसह, शुष्क प्रदेशात राहण्याच्या आव्हानात्मक पद्धतींशी जुळवून घेण्याचे प्रतीक बनले आहे. वाळवंटातील लौकिक जहाजाने वाळवंटात वाहतुकीचे साधन व शक्ती म्हणून नाव मिळवले. परंतु त्याचे जीवन सतत सामाजिक आणि आर्थिक बदलांच्या अधीन जाते. प्राचीन काळापासून आजतागायत नागरी कायदा आणि सुव्यवस्था, संरक्षण आणि युद्धांमध्ये उंटाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
पूर्वीच्या बिकानेर राज्यातील जगप्रसिद्ध गंगा-रिसाला इम्पीरियल सर्व्हिस ग्रुप म्हणून स्वीकारण्यात आले आणि त्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला. राजस्थानच्या पश्चिम भागात इंदिरा गांधी कालव्याचे बांधकाम करताना उंटाने अभियंत्यांना मदत केली. सध्या, कॅमल कॉर्प्स हे भारतीय पॅरा-मिलिटरी सर्व्हिसेसच्या सीमा सुरक्षा दलाची एक महत्त्वाची शाखा आहे.
तरी उंट हा प्राणी केवळ वाळवंटातील जहाज नसून निसर्गाकडून मानवाला मिळालेले भेटरूपी वरदान आहे. आपण सारे मिळून त्याचे स्मरण करू आणि त्यांच्या संवर्धनाच्या कामास आपल्या क्षमतेने हातभार लाऊया.
तुम्ही उंट केव्हा पाहिला? तुम्ही केलेल्या उंटाच्या सवारीचा अनुभव कमेन्ट मध्ये आम्हाला जरूर कळवा.
तुम्हाला ही माहिती (International Year of Camelids 2024) कशी वाटली, ते comment मध्ये नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या.
लेखक – राघवेंद्र वंजारी