श्रावणातील जिवती पूजन: संपूर्ण माहिती
श्रावण महिना अनेक व्रतवैकल्यांचा तसेच उपवास, उपासना आणि सणावारांचा पवित्र महिना मानला जातो. चातुर्मासामध्ये हा सर्वश्रेष्ठ महिना मानला जातो. हिंदू रूढी आणि परंपरांप्रमाणे अनेक व्रते या महिन्यात आचरली जातात. श्रावणातील जिवती पूजन (Jivati Poojan) हे यापैकी एक महत्त्वाचे व्रत आहे. जिवतीचे चित्र देव्हाऱ्याजवळ भिंतीवर लावून संततीरक्षणासाठी मातृशक्तीकडून त्याची पूजा महाराष्ट्रात घरोघरी केली जाते. आजच्या या लेखातून आपण
- जिवती मातेची कथा
- हे व्रत कधी व कसे करावे?
- जिवतीच्या चित्रातील विविध प्रतिमांचा अर्थ
- भारतात विविध राज्यातील जिवतीपूजन:
- जिवती मातेची कहाणी
इत्यादी माहिती जाणून घेऊ.
जिवती मातेची कथा:
लहान मुलांना आरोग्य तसेच दीर्घायुष्य प्रदान करणारी देवता म्हणून जिवती माता मानली जाते. जिवती मातेच्या चित्राकडे पाहिल्यास त्यात मध्यभागी दोन देवता लहान बाळांचा पाळणा हलवत असलेल्या दिसतात. तसेच त्यांच्या आजूबाजूला बरीच लहान बालके खेळताना दिसतात. या दोन देवता म्हणजे ‘जरा’ आणि ‘जिवंतिका’ होत.
जरा व जिवंतिका या यक्ष गणातील देवता आहेत. या दोघींबद्दल स्कंद पुराणात एक कथा आहे. मगध देशाचा राजा बृह्द्रथ याला दोन राण्या होत्या. राज्यकारभार उत्तम चालू होता. प्रजाही सुखी-समाधानी होती. परंतु राजाला मुलबाळ नसल्यामुळे तो चिंताक्रांत होता. एकदा त्याची भेट ऋषी चंडकौशिक यांच्याशी झाली. त्या ज्ञानी ऋषींचे दर्शन घेऊन राजाने त्यांची आदराने पाद्यपूजा केली. त्यानंतर त्याने त्यांच्यासमोर आपली चिंता व्यक्त केली आणि पुत्रप्राप्तीसाठी आशीर्वाद मागितला. चंडकौशिक ऋषींनी राजाला प्रसाद म्हणून एक आंबा दिला आणि राणीला खायला देण्यास सांगितले. राजा आनंदाने आपल्या नगरीस परत आला. त्या आंब्याचे दोन समान भाग करून त्याने दोन्ही राण्यांना खाण्यास दिले. ऋषींचे आशीर्वाद फळाला आले आणि त्या दोन्ही राण्या गर्भवती झाल्या.
यथावकाश त्या दोघी प्रसूत झाल्या आणि त्यांना पुत्र झाला. पण एकाच आंबा वाटून खाल्ल्याचा परिणाम म्हणून त्या दोघींना केवळ अर्धा- अर्धा असा विचित्र पुत्र झाला. त्या अर्धवट अर्भकांना राजाने जंगलात नेऊन टाकण्यास सांगितले. त्या जंगलातून जरा नामक नरभक्षक राक्षसी आपल्या जिवंतिका नावाच्या सखीसह जात असतांना नरमांसाच्या वासाने तेथे आली. तिची नजर त्या अर्भकांच्या तुकड्यांवर पडली. तिची राक्षसी प्रवृत्ती नाहीशी झाली आणि मनातील मातृत्वभाव जागृत झाला. जरेला अवयव सांधण्याची कला अवगत होती. तिने त्या दोन्ही अर्भक तुकड्यांना हातात घेतले आणि आपल्या कलेने ती दोन्ही शकले सांधली. नंतर तिने ते सांधलेले अर्भक बृह्दरथ राजाला आणून दिले. राजा आनंदीत झाला.
जरेने सांधलेल्या या बालकाचे नाव राजाने ‘जरासंध’ असे ठेवले. जरा यक्षिणीच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बृह्द्रथ राजाने आपल्या नगरात तिचे देऊळ बांधले आणि तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान दिला, तसेच दरवर्षी जरा-जिवंतिका देवतांचा वार्षिक महोत्सव सुरु केला. पुढे जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश ‘जिवती’ असा झाला. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून जरा-जिवंतिकेचे पूजन करण्याची प्रथा तेव्हापासून सुरु झाली. तेव्हा पासून जिवंतिका ही ‘दीर्घायू प्रदान करणारी’ देवता म्हणून ओळखली जाते.
हे व्रत कधी व कसे करावे?
हे व्रत श्रावण महिन्यात करतात. श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी जिवतीचे पूजन केले जाते. जिवती माता ही लहान मुलांच्या आरोग्याची देवता मानली जाते. आपल्या मुलांना आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे म्हणून जिवतीचे पूजन केले जाते. पूजा करण्यासाठी श्रावणाच्या सुरुवातीला देवघरातील भिंतीवर गंधाने जिवतीचे चित्र काढले जाते किंवा जिवतीच्या चित्राचा छापील कागद लावला जातो. अनेक ठिकाणी आषाढ अमावस्येला म्हणजे दीप पूजनाच्या दिवशी जिवती पूजन करुन मग पुढे श्रावण महिनाभर तिचे पूजन केले जाते. वंश वृद्धीचे प्रतिक असलेल्या दिव्याच्या पुजेसोबत बालकांना दीर्घायुष्य आणि आरोग्य प्रदान करणारी देवता म्हणून या दिवशी जिवती पूजन करण्याची प्रथा सुरु झाली असावी. या व्रताचा विधी अगदी साधा-सोपा आहे.
- जिवतीला गंध, हळद-कुंकू, अक्षता वाहाव्या.
- फुले, आघाडा व दुर्वा ह्यांची एकत्र करून केलेली माळ जिवतीला घालावी, तसेच हळद-कुंकू लावलेले १६ मण्यांचे कापसाचे गेजवस्त्र देवीला अर्पण करावे.
- जिवतीला दुध-साखरेचा आणि गुळासह चणे-फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा.
- पुरणा-वरणाचा नैवेद्य जिवतीला अर्पण करावा.
- जिवतीचे पुरणाच्या पाच दिव्यांनी औक्षण करून आरती करावी. पुराणाचे दिवे करणे शक्य नसेल तर गुळ-तूप अथवा साखर-तुपाचे दिवे करावे. जिवतीची पूजा करताना हा श्लोक म्हणावा:
जरे जीवन्तिके देवि बालयुक्ते प्रमोदिनी।
रक्षाव्रते महाशक्ति पूर्णकामे नमोस्तुते।।
अर्थ: बालयुक्त, आनंददायिनी, बालकांचे रक्षण करणारी, महाशक्तिरूपिणी आणि सर्व इच्छा तृप्त करणारी अशा जरा-जिवन्तिका देवी, आपल्याला नमस्कार असो.
- नंतर त्याच दिव्यांनी घरातील मुलांचे औक्षण करावे. मुले जर परगावी असतील, तर चारही दिशांना औक्षण करून अक्षता टाकाव्यात. (म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्यासारखे होते.)
- जिवतीपाशी मुलांच्या कल्याणासाठी आणि आयुरारोग्यासाठी प्रार्थना करावी.
- महिन्यातील कोणत्याही एका शुक्रवारी देवी स्वरूपात सवाष्ण जेवायला बोलावून तिला दक्षिणा द्यावी व तिची खणा नारळाने ओटी भरावी.
जिवतीच्या चित्रातील विविध प्रतिमांचा अर्थ:
जिवतीच्या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या प्रतिमा असतात. त्यात
प्रथम डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात नरसिंह असतात तर उजव्या कोपऱ्यात कालियामर्दन करणारा कृष्ण असतो. मध्यभागी लहान मुलांना खेळवणाऱ्या जरा- जिवंतिका यांच्या प्रतिमा असतात. सर्वात खाली बुध व बृहस्पती (गुरु) यांच्या प्रतिमा असतात. वरवर पाहता या चार देवता एकमेकांशी संबंधित वाटत नाहीत. पण जिवती पूजनाचा उद्देश लक्षात घेतला तर त्यांच्या प्रतिमांचा समावेश या चित्रात करण्यामागील हेतू लक्षात येतो.
१) भगवान नरसिंह: आपला लहान भक्त प्रल्हाद यांच्या रक्षणासाठी भगवान विष्णू नरसिंह स्वरूपात खांबातून प्रगट झाले ही कथा सर्वांना माहीत आहे. भक्त बाळ प्रल्हादाचा त्याच्या वडिलांनी म्हणजे दैत्यराज हिरण्यकश्यपू याने खूप छळ केला. त्याच्यापासून बाळ प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी देव वेळोवेळी धावून आले आणि शेवटी नरसिंह रुपात प्रगटले. अशा रीतीने बालकांचा रक्षक म्हणून तसेच बाल भक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पुजले जातात. ‘ज्याप्रमाणे भगवान नरसिंहांनी बाळ प्रल्हादाचे आगीपासून, उंच पर्वतावरील कडेलोटपासून तसेच विषबाधेपासून रक्षण केले तसेच ते आपल्याही बाळांचे रक्षण करोत’ असा उद्देश नरसिंहंच्या प्रतिमेचा अंतर्भाव जिवतीच्या चित्रात करण्यामागे असावा.
२) कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण- गोकुळातील छोटा कृष्ण आपल्या सवंगड्यांसह यमुनेच्या तीरावर खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला. तो परत आणण्यासाठी कृष्णाने डोहात उडी मारली आणि डोहात वास्तव्य करुन राहिलेल्या कालिया या भयंकर विषारी सर्पाशी युद्ध करून त्याचा पराभव केला. यमुनेचे पाणी विषारी करणाऱ्या कलियापासून भगवान श्रीकृष्णांनी सर्व गोकुळवासीयांची आणि आपल्या बालमित्रांची सुटका केली. ‘ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने कालिया सर्पापासून आपल्या बाल सवंगड्यांची सुटका केली, त्याचप्रमाणे तो आपल्याही बालकांचे सर्व सरपटणाऱ्या प्राण्यांपासून रक्षण करो’ तसेच ‘लहान मुले खेळताना त्यांच्यावर येणाऱ्या आपत्ती, पाणी यांच्यापासून आपल्या बाळांचे रक्षण होवो’ या भावनेने कालियामर्दन रूपात पुजल्या जाणाऱ्या कृष्णाच्या चित्राचा अंतर्भाव येथे केला असावा.
३) जरा व जिवंतिका – मध्यभागी असलेल्या या देवता लहान मुलांच्या आरोग्याच्या देवता मानल्या जातात. त्यासंबंधी कथा वर सांगितली गेली आहेच. आपल्या मुलांचे कल्याण व्हावे, त्यांना दीर्घ आयुष्य व आरोग्य लाभावे तसेच सर्व प्रकारच्या संकटांपासून त्यांचे रक्षण व्हावे म्हणून या देवतांचे पूजन केले जाते.
या पौराणिक अर्थाव्यतिरिक्त या चित्राचा अध्यात्मिक अर्थही सांगितला जातो. जिवतीच्या चित्रात असलेली सात बाळे म्हणजे माणसाच्या ‘अर्भक, शिशु, बाल, कुमार, तरुण, प्रौढ आणि वृद्ध’ या सात अवस्थांचे प्रतिनिधित्व करतात. जरा आणि जिवंतिका या नावांच्या अर्थानुसार सुद्धा त्यांचे वैशिष्ट्य काही जण मानतात. जरा म्हणजे वृद्धत्व आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी. यानुसार, जरा-जिवंतिका देवतांच्या कृपेने मनुष्याला वृद्ध होईपर्यंत दीर्घायुष्य प्राप्त होते अशी ही कल्पना आहे.
काही ठिकाणी जरा-जिवंतिकेला मातृकांपैकी दोन मातृका मानले जाते, तर काही अभ्यासकांच्या मते त्या देवांचे वैद्य अश्विनिकुमारांच्या पत्नी आहेत.
४) बुध व बृहस्पती – ज्योतिष शास्त्रानुसार मनुष्याला बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व, वाक्पटुत्व इत्यादी गुण बुध ग्रहाच्या प्रभावामुळे प्राप्त होतात असे मानले जाते. मनुष्यामध्ये हे गुण असणे जितके आवश्यक आहे तितकेच आवश्यक आहे या गुणांमुळे येऊ शकणाऱ्या उन्मत्ततेवर अंकुश ठेवणे. उन्मत्ततेचे प्रतीक असलेला हत्ती आणि त्यावर अंकुश हातात घेऊन बसलेला बुध याचेच द्योतक आहे.
बृहस्पति हे देवांचे गुरु होत. ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पतीच्या प्रभावाने मनुष्याची शैक्षणिक प्रगती व अध्यात्मिक उन्नती होते. विवेकशक्ती जागृत ठेवण्याचे काम बृहस्पती करतात. परंतु या गुणांच्या बरोबर मानवी मनाला अहंकारही चिकटतो. अहंकाराचे प्रतिक असलेल्या वाघावर आरूढ झालेला बृहस्पति विवेकशक्तीच्या तसेच ज्ञानाच्या चाबकाने या अहंकारापासून आपल्या मुलांचे रक्षण करो अशी भावना ही प्रतिमा या चित्रात अंतर्भूत करण्यामागे असावी.
म्हणजे, आपली मुले गुणी व्हावीत अशी प्रार्थना जिवतीपाशी करताना ती उन्मत्त किंवा अहंकारी होऊ नयेत यासाठीही प्रार्थना केली जाते.
अशा प्रकारे लहान मुलांचे रक्षण करणाऱ्या देवता, त्यांना दीर्घायुष्य व आरोग्य प्रदान करणाऱ्या देवता आणि त्याची बुद्धी, प्रगती, उन्नती, व्यक्तिमत्त्व यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या व त्यांना उन्मत्त-अहंकारी होण्यापासून रोखणाऱ्या (ग्रह)देवता यांचा समावेश या जिवतीच्या चित्रात केला गेला आहे.
भारतात विविध राज्यातील जिवतीपूजन:
महाराष्ट्राव्यतिरिक्त भारतात गुजरात येथे तसेच उत्तर भारतातील काही राज्यांत जिवतीपूजन केले जाते. गुजरात मधील राजकोट येथे जिवंतिका मातेचे खाजगी मालकीचे मंदिर आहे. तेथे श्रावण महिन्यातील जरा-जिवंतिका पुजनाच्या दिवशी यज्ञ केला जातो. हे केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील एकमेव जिवंतिका मंदिर आहे. या व्रताचा विधी या राज्यांमध्ये थोडासा वेगळा आहे. परंतु मूळ उद्देश मात्र एकच आहे आणि तो म्हणजे आपल्या अपत्याच्या निरोगी आणि सुदृढ आरोग्यासाठी जिवती मातेपाशी केलेली प्रार्थना.
जिवती मातेची कहाणी:
चातुर्मासातील, तसेच वर्षातील इतरही व्रतांच्या कहाण्या (कथा) आहेत आणि व्रत करताना त्या भक्तिभावाने वाचल्या जातात. जिवती-व्रताचीही एक कहाणी आहे. ‘एका ब्राह्मणीच्या नवजात अर्भकाला त्या राज्याची राणी गुपचूप पळवून नेते आणि त्या जागी एक वरवंटा कुंचा बांधून ठेवते. याबाबत अनभिज्ञ असलेले ब्राह्मणी जिवतीचे व्रत करते. शेवटी जिवती मातेच्या कृपेने राजपुत्राला आपले खरे आई-वडील भेटतात तसेच त्याच्यावरील मृत्यूचे संकटही टळते.’ अशा आशयाची ती कहाणी आहे.
या कहाणीतील भाबडी गोष्ट आपल्या चिकित्सक बुद्धीला पटणार नाही. (उदाहरणार्थ ‘ती ब्राह्मणी औक्षण करून तांदूळ उडवते, तेव्हा ते राजपुत्राच्या डोक्यावर जाऊन पडतात.’) पण मला वाटते, या कहाणीमागील रूपक लक्षात घेणे आवश्यक आहे. आजची एकविसाव्या शतकातील आई सुद्धा मुलाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, त्याला निरोगी आणि सुदृढ बनवण्यासाठी तितकीच तत्पर असते. परदेशी किंवा परगावी असलेल्या मुलाच्या काळजीने ती तशीच भावुक होते आणि त्याचे मंगल व्हावे म्हणून परमेश्वरपाशी प्रार्थना करते. आई आणि मुलाच्या नात्यांचे बंध शतकानुशतके कायम आहेत. त्यामुळे काळ बदलला तरी भावना, विचार आणि श्रद्धा अढळ राहतात.
लहान मुले म्हणजे समाजाचे आणि देशाचे भविष्य असतात. त्यांना निरामय आयुष्य लाभावे म्हणून अनेक व्रते आपल्या संस्कृतीत केली जातात. श्रावणातील जिवती पूजनाचे व्रत त्यापैकीच एक आहे. मातृत्वाच्या कोमल भावना राक्षसी वृत्तीच्या जरा-जिवंतिकेलाही देवत्वाकडे नेतात हे या व्रत-कथेतून अधोरेखित होते. स्त्रीत्वाचा, मातृत्वाचा आणि वात्सल्याचा गौरव करणारे आणि अनेक आशयांनी समृद्ध असलेले हे सोपे व्रत सर्वांनाच करता येऊ शकते. आपली मुले निरोगी, सुदृढ, दीर्घायुषी व्हावीत, ती ज्ञानसंपन्न, गुणवान व्हावीत, त्याचबरोबर ती अहंकारी किंवा उन्मत्त होऊ नये म्हणून सर्व माता झटत असतात.
त्यासाठी प्रयत्न करण्याचे शारीरिक,मानसिक बळ या व्रतातून मातेला मिळते. आपल्यासाठी काहीही न मागता, आपल्या मुलासाठी मंगल कामना करणारी आधुनिक ‘जिवत्या’ आजही घराघरांत आहेत. म्हणूनच आधुनिक काळातही हे व्रत करणे संयुक्तिक आहे. या व्रताच्या आचरणाने मनाची प्रसन्नता वाढीस लागते तसेच घरातील वातावरण मंगलमय होते. आपल्या संस्कृतीचा हा वसा आपण जपू यात आणि पुढील पिढीलाही सांगू यात.
तुम्हाला श्रावणातील जिवती पूजनाविषयीची (Jivati Poojan) ही माहिती कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुपही जॉईन करा.
धन्यवाद !
क्षितिजा कापरे
Informative article (as usual)
खरं आहे…या दिवशी घरातलं वातावरण मंगलमय भासतं…. खूप छान, सविस्तर आणि तर्कशुद्ध पद्धतीने लिहिलं आहे…