‘जुलै’ महिन्यात जन्मलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू

WhatsApp Group Join Now

जुलै’ महिन्यात जन्मलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू

‘जुलै’ महिन्यामध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या शिस्तबद्ध व सुनियंत्रित असल्याचे मानले जाते. चालू ‘जुलै’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया.

चंदू बोर्डे (२१-०७-१९३४) :- मधल्या फळीतील विश्वासार्ह फलंदाज आणि लेग स्पिन गोलंदाज असणारे ‘बोर्डे’ आपल्या अष्टपैलू खेळाने १९६० च्या दशकात भारताचे आधारस्तंभ बनले. क्षेत्ररक्षण आणि कप्तानीतही त्यांनी चुणूक दाखवली. १९६१-६२ मध्ये इंग्लंडविरुद्ध भारताला विजय मिळवून देण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला. १९६६-६७ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध दोन शतके झळकावून ते यशोशिखरावर गेले. बोर्डेनी ५५ कसोटीत ३,०६१ धावा केल्या आणि ५२ बळी मिळवले. निवृत्तीनंतर भारतीय संघाचे व्यवस्थापक आणि निवड समिती अध्यक्ष म्हणून त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले.      

सुनिल गावसकर (१०-०७-१९४९) :- भारतियांना विक्रमांची चटक लावणारा महान फलंदाज म्हणजे ‘गावसकर’. पहिल्याच कसोटी मालिकेत ७७४ धावा करणारे गावसकर, तेंडुलकरच्या उदयापर्यंत फलंदाजीतील असंख्य विक्रमांचे मानकरी होते. कसोटीत १०,००० धावा करणारे ते जगातील पहिले फलंदाज होते. सर्व विक्रमांवर कडी करणारी त्यांची कामगिरी म्हणजे – अतिवेगवान, प्रलयंकारी गोलंदाजांचा ताफा असणाऱ्या वेस्ट इंडिज संघाविरुद्ध त्यांनी १३ शतकांसह केलेल्या २,७४९ धावा.   त्यांनी १२५ कसोटीत ५१ च्या सरासरीने ३४ शतकांसह १०,१२२ धावा केल्या. १९८७ च्या वन-डे विश्वचषकात अंगात १०२ ताप असताना केलेले ८५ चेंडूतील वादळी शतक रसिकांच्या कायम स्मरणात आहे. १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या गावसकरांनी, १९८५ ला ऑस्ट्रेलियात मिनी-विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचे नेतृत्व केले. निवृत्तीनंतरही परखड स्तंभलेखन, अभ्यासू समालोचन आणि मिश्किल, हजरजबाबी स्वभावाने उच्चशिक्षित गावसकर क्रीडारसिकांच्या मनावर राज्य करत आहेत. यावर्षी आयुष्याचा ‘अमृतमहोत्सव’ पूर्ण करणाऱ्या या ‘विक्रमादित्या’ला अनेकानेक शुभेच्छा.     

सौरभ गांगुली (०८-०७-१९७२) :- आकर्षक डावखुरा फलंदाज ‘सौरभ’ने १९९६ साली इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटीत शतके झळकावीत धमाकेदार सुरुवात केली. मात्र पुढे कसोटीपेक्षा वन-डे क्रिकेटमध्ये त्याचा जास्त दरारा दिसला. गर्भश्रीमंत घराण्यातील सौरभची श्रीमंती त्याच्या शैलिदार फलंदाजीत आणि मैदानावरील वर्तणूकीत दिसून येई. दादा, प्रिन्स ऑफ कोलकाता अश्या नावांनी लोकप्रिय सौरभने ११३ कसोटीत ७,२१२ तर ३११ एकदिवसीय सामन्यात ११,३६३ धावा केल्या. शिवाय अनुक्रमे ३२ आणि १०० बळी घेतले. पण महत्त्वाचे म्हणजे २००० साली भारतीय क्रिकेटवर सामनानिश्चितीची अशुभ छाया पडली असता त्याने कर्णधारपदाची धुरा स्विकारून यशस्वी नेतृत्व केले आणि सारे मळभ दूर झाले. लॉर्डस मैदानावर शर्ट काढून आनंद साजरा करणाऱ्या आक्रमक सौरभने भारतीय खेळाडूंना अरे ला कारे करायला शिकवले आणि अनेक गुणी, युवा खेळाडूंच्या कारकिर्दीला आकार दिला. पाकिस्तानी, इंग्लिश आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंची मस्ती उतरवणारा सौरभ २००३ सालच्या एकदिवसीय विश्वचषकात अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार होता.    

हरभजन सिंग (०३-०७-१९८०) :- भज्जी, टर्बनेटर अश्या टोपणनावांनी प्रसिद्ध असणाऱ्या ‘हरभजन’ने १९९८ साली अवघ्या सतराव्या वर्षी भारतीय कसोटी संघात पदार्पण केले. पुढे १८ वर्षे या गुणी ऑफ स्पिन गोलंदाजाने भारताला अनेक विजय मिळवून दिले. विशेषत: २००१ च्या अजेय वाटणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध त्याने एकहाती मालिका जिंकून दिली. २००७ च्या टी-२० आणि २०११ च्या एकदिवसीय विश्वविजेत्या भारतीय संघाचा तो प्रमुख घटक होता. त्याने १०३ कसोटीत ४१७ बळी मिळवले, शिवाय दोन शतकेही ठोकली. तसेच २३६ वन-डे सामन्यांत २६९ बळी मिळवले. गोलंदाजीची संशयास्पद शैली आणि भडक स्वभावामुळे तो काही वेळा अडचणीत सापडला. पॉंटिंग, सायमंडस आणि श्रीसांत यांच्याबरोबरचे त्याचे वाद विशेष गाजले. सध्या तो ‘आप’ पक्षाद्वारे राज्यसभेचा खासदार आहे.             

महेंद्रसिंग धोनी (०७-०७-१९८१) :- रांचीच्या रेल्वे स्थानकावरचा तिकीट तपासनीस ‘माही’ ते भारताचा सर्वात यशस्वी कप्तान व यष्टीरक्षक हा ‘धोनी’चा प्रवास अद्भुत राहिला आहे. ‘कॅप्टन कूल’ हे बिरुद सार्थ ठरवणारा हा अतिशय गुणी, चाणाक्ष कर्णधार अत्यंत थंड डोक्याने मैदानावर योजना  आखून अमलात आणत असे. आक्रमक फलंदाजी करतानाही हाच शांतपणा त्याला यशस्वी बनवी. वायुवेगाने यष्टीचीत करण्यात त्याचा हात कोणीही धरू शकणार नाही. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात भारताला अनेक विजय मिळवून देणाऱ्या धोनीच्या कारकिर्दीत २००७ टी-२० विश्वचषक विजेतेपद, २०११ वन-डे विश्वचषक जेतेपद, २०१३ ची चॅम्पिअन्स ट्रॉफीची मिळकत, २००९ साली भारताचे प्रथमच कसोटी क्रमवारीत अग्रस्थान, हे खास गौरवास्पद क्षण राहिले आहेत. धोनीने ९० कसोटीत ४,८७६ धावा करताना यष्टीमागे २९४ बळी टिपले. तर ३५० वन-डे मध्ये ५० च्या सरासरीने धडाकेबाज १०,७७३ धावा ठोकताना यष्टीमागे ४४४ बळी टिपले. त्याशिवाय ९८ टी-२० सामन्यात जलद १,६१७ धावा करताना यष्टीमागे ९१ जणांना टिपले. २०१९ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनीने निवृत्ती घेतली असली तरी IPL मध्ये ‘चेन्नई सुपरकिंग्स’साठी अजूनही तो कर्णधार, यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून करिश्मा दाखवताना दिसतो.             

डब्ल्यू.जी.ग्रेस (इंग्लंड : १८-०७-१८४८) :- डॉक्टर असणाऱ्या ‘ग्रेस’ यांना इंग्लंडचे क्रिकेटमहर्षी म्हणून ओळखले जाते.  त्यांच्या नावे अनेक दंतकथा प्रसृत असून, या सगळ्यांचा आढावा घ्यायचा म्हटले तर एक पुस्तकच लिहावे लागेल. १८८० ते १८९९ या काळात ते २२ कसोटी खेळले ज्यात १,०९८ धावा केल्या आणि ९ बळी घेतले. १८६५ ते १९०८ अशी तब्बल ४३ वर्षे ते प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले ज्यात ५४,२११ धावा केल्या, २८०९ बळी घेतले आणि ८८१ झेल/यष्टीचीत टिपले. कसोटी पदार्पणात शतक करणारे ग्रेस, ५० व्या वर्षीही कसोटी खेळले आणि तेव्हा नेतृत्व करणारे सर्वात वयस्कर खेळाडू ठरले. क्रिकेटशिवाय अॅथलेटिक्स, गोल्फ, फुटबॉल, बोलिंग या खेळांतही ते पारंगत होते.        

गॅरी सोबर्स (वेस्ट इंडिज : २८-०७-१९३६) :- ब्रॅडमन यांच्यानंतरचे सर्वात महान खेळाडू म्हणून ‘सोबर्स’ यांचे नाव घेतले जाते. कुठच्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकणारे आक्रमक डावखुरे फलंदाज, कुशल डावखुरे मध्यमगती आणि फिरकी गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि प्रेरणादायी कप्तान, अश्या प्रकारचे ते ‘जिनियस’ अष्टपैलू खेळाडू होते. त्यांचे पहिलेच कसोटी शतक हे १९५८ साली पाकिस्तानविरुद्धचे त्रिशतक (३६५*) होते. १९६८ साली त्यांनी इंग्लंडमधील एका प्रथमश्रेणी सामन्यात एका षटकात सलग ६ षटकार ठोकले. त्यांनी ९३ कसोटीत ५७ च्या सरासरीने ८,०३२ धावा केल्या. त्याशिवाय २३५ बळी घेत १०९ झेल टिपले.                

झहीर अब्बास (पाकिस्तान : २४-०७-१९४७) :- पाकिस्तानच्या सर्वकालिन महान फलंदाजांपैकी एक ‘झहीर’, मोजक्या चष्मिस क्रिकेटपटूंपैकी एक होते. १९७० च्या दशकात त्यांच्या सातत्यपूर्ण, वर्चस्व गाजवणाऱ्या फलंदाजीमुळे त्यांना ‘एशियन ब्रॅडमन’ असे संबोधले जाई. त्यांनी ७८ कसोटींमध्ये ५,०६२ धावा तर ६२ एकदिवसीय सामन्यांमध्ये २,५७२ धावा केल्या. १९८२-८३ मध्ये त्यांनी सलग ३ वन-डे शतके तसेच सलग ५ आंतरराष्ट्रीय शतके झळकावली. १९८८ साली ‘रिटा लुथरा’शी दूसरा विवाह करून ते भारताचे जावई झाले.

डेनिस लिली (ऑस्ट्रेलिया : १८-०७-१९४९) :- ऑस्ट्रेलियाच्या महान वेगवान गोलंदाजांच्या परंपरेतील भेदक, द्रुतगती गोलंदाज म्हणजे ‘लिली. गोलंदाजीबरोबरच आपल्या आक्रमक स्वभाव (स्लेजिंग) व देहबोलीने ते फलंदाजांना घाबरवण्याचा प्रयत्न करीत. ‘मियांदाद’बरोबरची मारामारी, इंग्लंडमध्ये सामना खेळत असताना सट्टा लावणे, कसोटीत अॅल्युमिनिअमची बॅट वापरणे, अश्या अनेक वेळी ते वादग्रस्त ठरले. मात्र निवृत्तीनंतर भारतात ‘MRF पेस फाऊंडेशन’द्वारे अनेक उदयोन्मुख वेगवान गोलंदाजांना त्यांनी घडवले. लिली यांनी ७० कसोटीत ३५५ तर ६३ वन-डेत १०३ बळी मिळवले.          

रिचर्ड हॅडली (न्यूझीलंड : ०३-०७-१९५१) :- अष्टपैलू ‘हॅडली’ हा न्यूझीलंडचा आतापर्यंतचा सर्वात महान गोलंदाज आहे असे म्हणता येईल. त्याने ८६ कसोटीत ४३१ बळी घेतले असून त्यात डावात ५ बळी ३६ वेळा तर सामन्यात १० बळी ९ वेळा घेतले आहेत. कसोटीत ४०० बळी घेणारा तो पहिला गोलंदाज होता. आक्रमक डावखुरा फलंदाज असणाऱ्या हॅडलीने कसोटीत ३,१२४ धावा केल्यात. त्याशिवाय ११५ एकदिवसीय सांमन्यांमधून १५८ बळी घेताना १,७५१ धावा केल्यात. वन-डे क्रिकेटमध्ये १,००० धावा आणि १०० बळी, अशी दुहेरी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू होता. रिचर्डशिवाय त्याचे वडिल, दोन भाऊ आणि पत्नी, हे देखील न्यूझीलंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेत.            

ग्रॅहॅम गूच (इंग्लंड : २३-०७-१९५३) :- सलामीचा फलंदाज ‘गूच’ १९७५ ते १९९५ अशी तब्बल दोन दशके इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. याकाळात त्याने ११८ कसोटीत ८,९०० तर १२५ एकदिवसीय सामन्यांत ४,२९० धावा ठोकल्या. २७ वर्षांच्या प्रथमश्रेणी कारकिर्दीत ४५ हजार धावा करताना १२८ शतके ठोकली. दक्षिण आफ्रिकेवर जागतिक बहिष्कार असताना तेथे केलेल्या दौऱ्यामुळे त्याच्यावर बंदी येऊन ३ वर्षे फुकट गेली. १९७९, १९८७ व १९९२ अश्या तीन वन-डे विश्वचषकात उपविजेता ठरलेल्या इंग्लिश संघाचा तो सदस्य होता. १९९० साली लॉर्डसवर भारताविरुद्ध त्रिशतक (३३३) करण्याचा पराक्रम त्याने केला.         

अॅलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया : २७-०७-१९५५) :- डावरा फलंदाज ‘बॉर्डर’ हा आकर्षक नसला तरी चिवट आणि निश्चयी होता. दिग्गज खेळाडू निवृत्त झाल्यावर त्याने कर्णधारपद स्वीकारले आणि १९८७ च्या वन-डे विश्वचषक, तसेच १९८९ व ९३ च्या अॅशेस मालिका विजयांसह अनेक विजयश्री नोंदवत आपल्या संघाला ताकदवान बनवले. १५० कसोटी खेळणारा व ११,००० कसोटी धावा करणारा तो पहिला खेळाडू होता. तब्बल ९३ कसोटीत त्याने यशस्वी नेतृत्व केले. १५६ कसोटीत त्याने ५० च्या सरासरीने ११,१७४ धावा केल्या. कामचलाऊ डावरा फिरकी गोलंदाज असणाऱ्या बॉर्डरने वेस्ट इंडिजविरुद्ध ११ बळी मिळवत सामना जिंकून दिला होता. २७३ एकदिवसीय सामन्यांत त्याने ६,५२४ धावा केल्या तर ७३ बळी मिळवले.              

जॉन्टी ऱ्होडस् (दक्षिण आफ्रिका : २६-०७-१९६९) :- क्रिकेट इतिहासातील बहुधा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणजे ‘जॉन्टी’. त्याचे उड्या मारून झेल पकडणे, चेंडूमागे मैदानावर कुठूनही कुठेही धावत जाणे, चेंडू अडवण्यासाठी हवेत सूर मारणे, यष्टींवर अचूक चेंडू फेकणे ही सारे काही अचंबित करणारे असे. आपल्या कौशल्याने त्याने अनेक अस्तित्वात नसलेले झेल, धावबाद घडवून आणले आणि अगणित धावा वाचवल्या. जॉन्टीने ५२ कसोटीत २,५३२ धावा केल्या तर २४५ एकदिवसीय सामन्यांत ५,९३५ काढल्या. जॉन्टीने हॉकीमध्येही आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले. पुढे IPLच्या निमित्ताने भारताशी त्याचा स्नेहबंध वाढला आणि २०१५ मध्ये मुंबईत जन्मलेल्या आपल्या मुलीचे नाव ‘इंडिया’ असे ठेवले.

शॉन पोलॉक (दक्षिण आफ्रिका : १६-०७-१९७३) :- आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू ‘पीटर पोलॉक’ यांचा मुलगा ‘शॉन’ यानेही आपल्या अष्टपैलू कामगिरीने जागतिक क्रिकेटवर ठसा उमटवला. वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक निर्धाव षटके (३१३) टाकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. तसेच ४०० कसोटी बळी घेणारा तो पहिला आफ्रिकन गोलंदाज होता. त्याने १०८ कसोटीत ४२१ बळी घेतले आणि २ शतकांसह ३,७८१ धावा केल्या. त्याचप्रमाणे ३०३ एकदिवसीय सामन्यांत ३९३ बळी घेताना, एका शतकासह ३,५१९ धावाही केल्या.         

जेम्स अॅंडरसन** (इंग्लंड : ३०-०७-१९८२) :- गेली २१ वर्षे खेळणारा ४२ वर्षीय उत्कृष्ट मध्यमगती स्विंग गोलंदाज ‘अॅंडरसन’ हा ‘फिटनेस वंडर’ म्हणावा लागेल. ७०० कसोटी बळी मिळवणारा तो पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. हा टप्पा त्याने याच वर्षी भारताविरुद्ध १८७ व्या कसोटीत गाठला. त्याने सामन्यात १० बळी ३ वेळा तर डावात ५ बळी ३२ वेळा मिळवले आहेत. त्याशिवाय १९४ वन-डेत २६९ तर १९ टी-२० सामन्यात १८ बळी घेतले आहेत. २०१४ साली भारताविरुद्ध १० व्या गड्यासाठी ‘रूट’बरोबर केलेली १९८ धावांची विश्वविक्रमी भागीदारी अजूनही अबाधित आहे. २०१० साली ब्रिटनमधील एका ‘गे’ नियतकालिकासाठी त्याने केलेले नग्न छायाचित्रण वादळी ठरले.         

à ईतर काही प्रमुख खेळाडू ::

[अ] परदेशी खेळाडू —   

स्टॅन मॅकेब (ऑस्ट्रेलिया : १६-०७-१९१०) :- फलंदाज. ब्रॅडमननेही गौरवलेला महान खेळाडू. ३९ कसोटी (२७४८ धावा).

अॅलेक बेडसर (इंग्लंड : ०४-०७-१९१८) :- वेगवान गोलंदाज. इंग्लंडच्या महान गोलंदाजांच्या परंपरेतील प्रमुख. ५१ कसोटी (२३६ बळी).

टोनी लॉक (इंग्लंड : ०५-०७-१९२९) :- डावखुरा फिरकी गोलंदाज. ४९ कसोटी (१७४ बळी).

बॉब टेलर (इंग्लंड : १७-०७-१९४१) :- यष्टीरक्षक. ५७ कसोटी (१७४ झेल+यष्टीचीत, ११५६ धावा), २७ वन-डे (३२ झेल+यष्टीचीत).

इवेन चॅटफील्ड (न्यूझीलंड : ०३-०७-१९५०) :- मध्यमगती गोलंदाज. ४३ कसोटी (१२३ बळी), ११४ वन-डे (१४० बळी). कसोटी पदार्पणातच डोक्याला चेंडू लागल्याने हृदयक्रिया बंद पडून खेळपट्टीवर बेशुद्ध पडला. सुदैवाने इंग्लंडच्या फिजिओथेरपिस्टने तोंडाद्वारे कृत्रिम श्वासोच्छवास दिल्याने प्राण वाचले.     

वासिम राजा (पाकिस्तान : ०३-०७-१९५२) :- डावखुरा फलंदाज व लेग-ब्रेक गोलंदाज. ५७ कसोटी (२८२१ धावा, ५१ बळी), ५४ वन-डे (७८२ धावा, २१ बळी).   

लॅरी गोम्स (वेस्ट इंडिज : १३-०७-१९५३) :- डावखुरा फलंदाज (पोर्तुगीज वंशीय). ६० कसोटी (३१७१ धावा), ८३ वन-डे (१४१५ धावा).   

जॉन राईट (न्यूझीलंड : ०५-०७-१९५४) :- डावखुरा सलामी फलंदाज. ८२ कसोटी (५३३४ धावा), १४९ वन-डे (३८९१ धावा). २००१ नंतर ५ वर्षं भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी.

हशान तिलकरत्ने (श्रीलंका : १४-०७-१९६७) :- डावखुरा फलंदाज, यष्टीरक्षक. ८३ कसोटी (४५४५ धावा, १२४ झेल+यष्टीचीत), २०० वन-डे (३७८९ धावा, ९५ झेल+यष्टीचीत). १९९६ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य.  

स्कॉट स्टायरीस (न्यूझीलंड : १०-०७-१९७५) :- मध्यमगती गोलंदाज व फलंदाज. ऑस्ट्रेलियात ब्रिस्बेन येथे जन्म. २९ कसोटी (१५८६ धावा, २० बळी), १८८ वन-डे (४४८३ धावा, १३७ बळी), ३१ टी-२० (५७८ धावा, १८ बळी).

हेन्री ओलोंगा (झिंबाब्वे : ०३-०७-१९७६) :- वेगवान गोलंदाज. ३० कसोटी (६८ बळी), ५० वन-डे (५८ बळी). झांबिया देशात जन्मलेला ‘ओलोंगा’ झिंबाब्वेसाठी खेळणारा पहिला कृष्णवर्णीय क्रिकेटपटू होता. २००३ च्या विश्वचषकापूर्वी आपल्या देशातील सत्ताधाऱ्यांच्या राजकीय भूमिकेविरुद्ध बंड पुकारल्यामुळे, तो पुन्हा क्रिकेट खेळू शकला नाही.   

गेरान्ट जोन्स (इंग्लंड : १४-०७-१९७६) :- यष्टीरक्षक. ३४ कसोटी (११७२ धावा, १३३ झेल+यष्टीचीत), ५१ वन-डे (८६२ धावा, ७२ झेल+यष्टीचीत). ‘पापुआ न्यु गिनी’मध्ये जन्मलेला हा खेळाडू पुढे त्या देशासाठीही २ वन-डे खेळला.    

मखाया एनटिनी (दक्षिण आफ्रिका : ०६-०७-१९७७) :- वेगवान गोलंदाज. दक्षिण आफ्रिकेसाठी खेळणारा पहिला कृष्णवर्णीय क्रिकेटपटू. १०१ कसोटी (३९० बळी), १७३ वन-डे (२६६ बळी), १० टी-२०. 

आंद्रे नेल (दक्षिण आफ्रिका : १५-०७-१९७७) :- वेगवान गोलंदाज. ३६ कसोटी (१२३ बळी), ७९ वन-डे (१०६ बळी). रागीट स्वभावामुळे काही वेळा दंडित झाला.

जेकब ओराम (न्यूझीलंड : २८-०७-१९७८) :- डावखुरा फलंदाज व मध्यमगती गोलंदाज. साडेसहा फूट ऊंची असूनही अतिशय चपळ क्षेत्ररक्षक. ३३ कसोटी (१७८० धावा, ६० बळी), १६० वन-डे (२४३४ धावा, १७३ बळी), ३६ टी-२० (४७४ धावा, १९ बळी).

दिलरुवान परेरा (श्रीलंका : २२-०७-१९८२) :- ऑफ स्पिनर, उपयुक्त फलंदाज. ४३ कसोटी (१६१ बळी, १३०३ धावा), १३ वन-डे, ३ टी-२०.  

शॉन मार्श (ऑस्ट्रेलिया : ०९-०७-१९८३) :- डावखुरा फलंदाज. ३८ कसोटी (२२६५ धावा), ७३ वन-डे (२७७३ धावा), १५ टी-२०. कसोटी पदार्पणात शतक.

मोहम्मद अश्रफुल (बांगलादेश : ०७-०७-१९८४) :- फलंदाज, कप्तान. ६१ कसोटी (२७३७ धावा), १७७ वन-डे (३४६८ धावा). कसोटीत शतक करणारा सर्वात लहान वयाचा क्रिकेटपटू. स्पॉट फिक्सिंग, मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे बंदी आली.  

फॅफ डयू प्लेसिस (दक्षिण आफ्रिका : १३-०७-१९८४) :- फलंदाज, कप्तान व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. ६९ कसोटी (४१६३ धावा), १४३ वन-डे (५५०७ धावा), ५० टी-२० (१५२८ धावा). ऑस्ट्रेलियाला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात हरवणारा पहिला कर्णधार.   

बी.जे.वॉटलिंग (न्यूझीलंड : ०९-०७-१९८५) :- यष्टीरक्षक. दक्षिण आफ्रिकेत जन्म. ७५ कसोटी (३७९० धावा, २७५ झेल+यष्टीचित), २८ वन-डे (५७३ धावा, २० झेल). 

ट्रेंट बोल्ट** (न्यूझीलंड : २२-०७-१९८९) :- डावखुरा वेगवान गोलंदाज. ७८ कसोटी (३१७ बळी), ११४ वन-डे (२११ बळी), ६१ टी-२० (८३ बळी).               

[ब] भारतीय खेळाडू —  

हेमू अधिकारी (३१-०७-१९१९) :- फलंदाज. २१ कसोटी (८७२ धावा). लष्करात ‘कर्नल’ असल्याने अतिशय शिस्तप्रिय म्हणून लौकिक. व्यवस्थापक आणि प्रशिक्षक म्हणूनही प्रभावी कारकीर्द. 

जी.एस.रामचंद (२६-०७-१९२७) :- मध्यमगती गोलंदाज व उपयुक्त फलंदाज. ३३ कसोटी (४१ बळी, ११८० धावा). ऑस्ट्रेलियावरील पहिल्या कसोटी विजयावेळी भारताचे कर्णधार. सलग चार रणजी चषकांच्या अंतिम फेरीत शतके.

वसंत रांजणे (२३-०७-१९३७) :- मध्यमगती गोलंदाज. ७ कसोटी (१९ बळी).

चेतन चौहान (२१-०७-१९४७) :- सलामी फलंदाज. ४० कसोटी (२०८४ धावा). पुढे अनेक वर्षे खासदार म्हणून कार्यरत.

रॉजर बिन्नी (१९-०७-१९५५) :- मध्यमगती गोलंदाज व उपयुक्त फलंदाज. कर्नाटकचा अँग्लो-इंडियन खेळाडू. २७ कसोटी (४७ बळी, ८३० धावा), ७२ वन-डे (७७ बळी, ६२९ धावा). १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघात सर्वाधिक १८ बळी घेऊन प्रमुख वाटा.  

संजय मांजरेकर (१२-०७-१९६५) :- मधल्या फळीतील फलंदाज. ३७ कसोटी, ७४ वन-डे. वडिल ‘विजय’ यांच्याप्रमाणेच गुणवत्तेला मैदानावरील कामगिरीत परावर्तित करण्यात व पूर्ण न्याय देण्यात अपयश. 

अभिजीत काळे (०३-०७-१९७३) :- फलंदाज. १ वन-डे. २००३ साली भारतीय संघात निवड होण्यासाठी निवड समिती सदस्यांना लाच देऊ केल्याच्या आरोपाने काही वर्षे बंदी आली.   

युजवेंद्र चहल** (२३-०७-१९९०) :- लेग स्पिन गोलंदाज. ७२ वन-डे (१२१ बळी), ८० टी-२० (९६ बळी). बुद्धिबळातील कौशल्य, किरकोळ शरीरयष्टी आणि विनोदी स्वभाव यांसाठी प्रसिद्ध.         

 ** खेळाडू म्हणून अजून कारकीर्द चालू )

फलंदाज नाबाद )

( ++ सारी आकडेवारी ३०-०६-२०२४ पर्यंतची )

मित्रहो, ‘जुलै’ मध्ये जन्मलेल्या या प्रमुख आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडले असेल. आपल्या काही प्रतिक्रिया, सूचना असतील तर जरूर कळवा तसेच हा लेख आपल्या क्रिकेटप्रेमी मित्रपरिवारासोबत सामायिक करायला विसरू नका. असेच नवनवीन माहितीपूर्ण, मनोरंजक लेख, बातम्या, कथा आम्ही आपल्यापर्यंत आणत असतो. त्यासाठी आमच्या ‘लेखकमित्र’ या संकेतस्थळाला भेट देत रहा आणि आमच्या ‘व्हॉटसअॅप’ व ‘टेलिग्राम ग्रुप’शी जोडले जा.

धन्यवाद !

1 thought on “‘जुलै’ महिन्यात जन्मलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top