पाश्चात्य पद्धतीचं खाणं प्रकृतीला कसं हानिकारक आहे?

WhatsApp Group Join Now

पाश्चात्य पद्धतीचं खाणं (पद्धतीचा आहार) प्रकृतीला कसं (कसा) हानिकारक आहे?

                  निरामय आरोग्याचा पाया हा आपल्या आहारातूनच रचला जातो असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. भारतीय संस्कृतीमध्ये “आहार हेच औषध!!” असे मानले जाते. आपण जे अन्न खातो त्यातूनच शरीराला आवश्यक पोषण आणि ऊर्जा मिळते. दैनंदिन कार्य करण्यासाठी शक्ती प्राप्त होते. आपल्या भारतीय आहार पद्धतीमध्ये या गोष्टींचा प्रामुख्याने विचार केलेला दिसतो. पाश्चात्य देशातील आहार पद्धती तुलनेने थोडी वेगळी आहे.

पाश्चात्य आहारपद्धती :-

        पाश्चात्य आहारपद्धती ही एक आधुनिक आहार पद्धती आहे. ज्यामध्ये सामान्यतः प्रक्रिया केलेले अन्न, लाल मांस, अतिप्रमाणात साखर असलेली पेये, कॉर्न सिरप यांचा समावेश केला जातो. अन्नपदार्थांमध्ये कार्बोदकांचे प्रमाण जास्त असते. त्यामध्ये औद्योगिकरित्या उत्पादित केलेले, टिकवलेले प्राणीजन्य पदार्थ, प्रक्रिया केलेले मांस, उच्च चरबीयुक्त पदार्थ, सुक्रोज यांचा समावेश असतो. आहारात फळे भाज्या व फायबरयुक्त पदार्थ यांचा तुलनेने कमी प्रमाणात समावेश असल्याचे आढळते. कृत्रिमरीत्या गोड केलेले पदार्थ तसेच पदार्थ जास्त दिवस टिकवण्यासाठी मीठ (प्रीझर्वेटिव्हज्) यांचा वापर केलेला दिसतो. कॅफीनयुक्त पदार्थ, फ्लेवर्ड वॉटर आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स, तसेच वेगवेगळे सॉस या पदार्थांमुळे पाश्चात्य लोकांच्या आहारात साखरेचे प्रमाण गरजेपेक्षा अधिक असते. 

   रोगप्रतिबंधक व आरोग्य प्रचार कार्यालयाने नमूद केलेल्या मानांकनाच्या पेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात वनस्पती तेल, संपृक्त चरबी (सॅच्युक्युरेटेड फॅक्ट्स) व सोडियम यांचे अधीक प्रमाणात सेवन पाश्चिमात्य आहारात केले जाते. त्यामानाने विवीध प्रकारच्या भाज्या, व फायबरयुक्त अन्नपदार्थांचे कमी सेवन केले जाते. मुख्यतः बटाटे व टोमॅटो या भाज्यांचा वापर जास्त केला जातो. काही प्रमाणात सॅलड म्हणून कच्च्या भाज्यांचा समावेश आहारात केला जातो परंतु त्याचे प्रमाण कमी असते. ब्रेड, पेस्ट्रीज या सारख्या पदार्थांचे शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी, पदार्थ आकर्षक दिसण्यासाठी कृत्रिम रंग वापरले जातात. धान्यातील उपयुक्त असणारा कोंडा वगैरे उपयुक्त घटक काढून टाकले जातात. त्यामुळे त्या पदार्थाचे पौष्टिक मूल्य आणखीनच कमी होते.

     ‘विवेकी नमुना आहारा’च्या तुलनेत पाश्चात्य आहार पद्धतीचे विश्लेषण केले असता त्यामध्ये पोषक मूल्ये , फायबर्स, जीवनसत्वे व खनिजांचे प्रमाण कमी आढळते त्या ऐवजी कार्बोदके व चरबी,साखर अशा घटकांचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त आढळते. पाश्चात्य आहार पद्धतीचे थोडक्यात मूल्यमापन करायचे झाले तर मानवी शरीराला आवश्यक अशा गोष्टींचे प्रमाण अल्प व इतर गोष्टींचे अतिरिक्त प्रमाण असे करता येईल. पाश्चात्य आहार पद्धती पूर्णत: चुकीची आहे असे मानण्याचे कारण नाही. परंतु ही आहार पद्धतीमध्ये मानवी आरोग्याचा विचार करून योजली असल्याचे दिसून येत नाही.

भारतीय आहार पद्धती : —

          भारतीय आहार पद्धती ही एक परिपूर्ण आहार पद्धती आहे. ती खूप प्राचीन व पूर्णतः आरोग्याच्या दृष्टीने विचार करून अमलात आणली गेलेली आहे. भारतीय आहार पद्धतीमध्ये षड्-रसांचा विचार केलेला दिसतो. आहारातील प्रत्येक पदार्थ, त्यातील प्रत्येक घटक व त्या पदार्थाचे आहारातील कमी-जास्त प्रमाण; या गोष्टींचा अतिशय सूक्ष्म पद्धतीने विचार केलेला आहे. तसेच अन्न शिजवताना अग्नीचा वापर करून ते गरम करून, वाफवून, भाजून, तळून किंवा कच्चे कोणत्या पद्धतीने बनवायचे, कोणत्या घटकाचा, जिन्नसाचा किती प्रमाणात वापर करायचा याची सविस्तर प्रक्रिया ठरलेली आहे. ही पद्धत आज देखील वापरली जाते. मुळातच भारतीय आहार पद्धतीमध्ये … “उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञ कर्म” या उक्तीप्रमाणे अन्न हे केवळ पोट भरण्यासाठी खायचे नसून ते एक पवित्र यज्ञकर्म आहे असे सांगितले आहे. जठरातील अग्नीत आहुती देण्यासाठी मानवी शरीराला, अन्नाची गरज आहे असा विचार यामागे दिसतो. मानवी शरीराला कार्य करण्यासाठी जी ऊर्जा लागते ती ऊर्जा अन्नसेवनामुळे मिळते. तसेच जमिनीवर बसून व्यवस्थित भोजन करण्याची पद्धत ही देखील आरोग्यासाठी उपयुक्त आहे. 

पाश्चात्य आहारपद्धतीचे अनुकरण व त्याचे परिणाम : –

        औद्योगीक क्रांती झाल्यामुळे जसजशी आर्थिक संपन्नता वाढीस लागली तसतशी आधुनिक आहार पद्धतीचा वापर वाढू लागला. दरडोई उत्पन्न वाढू लागले तसतसे आधुनिक पाश्चात्य पद्धतीच्या आहाराचे संक्रमण जवळजवळ सर्वच विकसनशील देशांमध्ये झाले. कालांतराने त्याचे परिणामही दिसू लागले. अन्नधान्य उगवण्याच्या पारंपारिक पद्धतींमध्ये देखील हळूहळू बदल होऊन पाश्चिमात्य पद्धतींचा वापर करण्यास सुरुवात झाली. हरितगृहांमध्ये अन्नधान्याची निर्मिती होऊ लागली. मानवी आरोग्यावर याचा परिणाम होऊ लागला. हरितगृहातील वायूंच्या उत्सर्जनामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला.

                ‘विवेकी नमुना आहारा’च्या तुलनेत पाश्चात्य आहार पद्धती व आधुनिक जीवनशैलीमुळे आरोग्याच्या काही समस्या दिसून येतात. फास्ट फूड, घरबसल्या जेवण ऑर्डर करणे, रेडी टू इट पदार्थ खाणे या प्रवृत्तीतून स्थूलतेचे प्रमाण वाढते आहे. जेवढ्या प्रमाणात दैनंदिन कामासाठी ऊर्जा आवश्यक असते त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने कार्बोदके सेवन केल्यामुळे अतिरिक्त उष्मांक सेवन केले जातात. ते शरीरात साठल्यामुळे सर्वच वयोगटातील लोकांमध्ये स्थूलतेचे प्रमाण वाढते आहे. याशिवाय इतरही अनेक समस्या दिसतात. त्या पुढीलप्रमाणे—

१. रक्तवाहिन्यांशी संबंधीत आजार.

२. हृदयासंबंधीचे विकार.

३. लठ्ठपणाच्या जोखमीची वाढ झालेली दिसून येते. 

४. कर्करोग व इतर गुंतागुंतीचे आजार.

५. स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्या.

६. लहान मुलांमधील चिडचिडेपणा, चंचलता अभ्यासातील एकाग्रतेचा अभाव इत्यादी समस्या.

७. मोठ्या प्रमाणात चयापचयाचे विकार. (मेटॅबोलिक सिंड्रोम) देखील वाढल्याचे दिसून येते. 

८. भावनिक विकार, नैराश्य, मानसिक आरोग्याच्या तक्रारी.

९. मेंदूमध्ये होणारे संरचनात्मक बदल.

१०. जनुकीय बदल.

     आधुनिक आहार पद्धतीमुळे पाश्चात्य देशांमध्ये या व अशा अनेक प्रकारच्या विकारांची वाढ होऊ लागलेली दिसून येते. पाश्चात्य आहाराचे अनुकरण केल्यामुळे भारतासारख्या अनेक विकसनशील देशांमध्ये देखील त्याचे दुष्परिणाम लक्षात येऊ लागले आहेत. आधुनिक आहार पद्धतीचे धोके लक्षात आल्यानंतर पश्चिमात्य देशांमध्ये देखील आहार, व्यायामाच्या पद्धतीमध्ये अलीकडे बदल करावयास सुरुवात केली आहे. ही निश्चित सकारात्मक बाब आहे.

शुभं भवतू!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top