निसर्गप्रेमींसाठी काजव्याची जीवनशैली :काजवा महोत्सव  

WhatsApp Group Join Now

काजव्याची जीवनशैली :

जून महिन्याच्या पहिल्या पंधरवडयात आणि मे महिन्याच्या शेवटी शेवटी जेव्हा पावसाच्या हलक्या सरी सुरू होतात त्यावेळी आपल्याला काजव्यांचे अस्तित्व जाणवायला लागते. यांचे आयुष्य अगदीच थोडे  असते म्हणजे काही दिवसांचे असते. आपण नेहमी ऐकतो की काजवा हा स्वयंप्रकाशित असतो. खूप ठिकाणी काजवा महोत्सव सुरू होणार आहे. भंडारदरा मात्र या महोत्सवासाठी सज्ज झालेला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का हा काजवा म्हणजे काय? तुम्ही कधी बघितला आहे का? आज आपण काजव्याची माहिती घेऊ.

काजवा म्हणजे काय?

जून महिन्याच्या सुरूवातीला अगदी पावसाच्या आगमनावेळी हा काजवा (एक छोटा कीटक) आपल्याला झाडावर, झाडाच्या पानांवर दिसतो. तो रात्रीच्या वेळी दिसतो आणि तो स्वयंप्रकाशित असतो. दिवसा सूर्यप्रकाशात त्याचा मंद प्रकाश दिसत नाही. किंवा तो कुणाच्या लक्षातही येत नाही. म्हणून रात्री अंधारात तो दिसतो. काजवा हा भुंग्याच्या प्रजातीतील एक कीटक आहे. काजवा निशाचर भुंगा आहे. काजव्याच्या जवळजवळ दोन हजार जाती आहेत. हा कीटक जगातील सर्व खंडावर आढळतो फक्त अंटार्टीका या खंडात आढळत नाही. या प्रजातीमध्ये काही काजव्यांच्या प्रजाती बाबतीत अंडी, अळी, कोश व प्रौढ या विकासाच्या सर्व अवस्थांत प्रकाशाची उत्पत्ती होते,परंतु काही काजवे  फक्त अळी व प्रौढावस्थेत स्वयंप्रकाशी असतात.

काजव्यांची उत्पत्ती:

काजव्यांची उत्पत्ती कशी होते ती पहा हा. एखाद्या मादीला एखाद्या नराचा प्रकाश आवडला तर त्यांचे मनोमीलन होते. त्यांचे मिलन झाल्यावर समागमा नंतर नर काही दिवसात मरतो. त्यानंतर मादी आपली अंडी झाडांच्या एखाद्या बेचक्यात घालते. तीही अंडी घातल्यानंतर मरते. साधारण वीस एकवीस दिवसांनंतर काजवे हे अंड्यातून बाहेर येतात. एक ते दोन वर्षात अळ्यांची वाढ पूर्ण होते. त्यानंतर अळी ही परत कोशात जाते. एक ते अडीच आठवड्यात पूर्ण विकसित होऊन काजवा तयार होतो. काजव्यांची प्रौढ अवस्था ५ ते ३० दिवसांची असते.

प्रौढ काजव्याला त्याचे सगळे लक्ष्य पुनरुत्पादनाकडे द्यावे लागते. म्हणून अन्न शोधण्यात त्याचा वेळ आणि शक्ति वाया जावू नये म्हणून अळी रूपातील काजवा खूप अन्न म्हणजेच गोगलगाई खाऊन शरीरात चरबी जमा करून ठेवतो. त्याचा उपयोग त्याला प्रौढावस्थेमध्ये होतो.    

काजव्यातील नरांना पंख असतात,तर माद्यांना मात्र पंख नसतात आणि त्या मंद हालचाल करतात. माद्यांचे डोळे हे कमी विकसित झालेले असतात. तर नारांचे डोळे मात्र पूर्ण विकसित असतात. नरांचे प्रकाश देणारे अवयव हे नर काजव्याच्या उदराच्या खालील सहाव्या व सातव्या खंडाच्या आत असतात. तर मादीचे त्याही मागच्या खंडात असतात.

काजव्यांचे अन्न/पोषण :-

काजव्यांच्या अळ्या या मांसाहारी असतात. पण प्रौढवस्थेमध्ये मात्र काजवा हा शाकाहारी असतो. काजव्यांच्या अळ्या यांचे मुख्य अन्न गोगलगाई व स्लग या जमीनीवरील मृदुकाय प्राण्यांवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. पण हे काजवे मात्र पक्षी, सरडे, बेडूक, कोळी यांचे भक्ष्य असतात. प्रौढ अवस्थेमध्ये मात्र यांना कमी अन्न लागते. कारण त्याना अन्न खाऊन जगणे हे त्यांच्या जीवनाचे उद्दीष्ट नसते. ते आपण पुढे वाचू. काजव्यांच्या जीवनाचे उद्दीष्ट काय आहे?

काजव्यांची प्रकाश निर्मितीची रचना :-

काजव्यांचा प्रकाश हा पांढरा, पिवळा, नारिंगी, हिरवा, निळा, आणि तांबडा असतो. त्यांच्या उदराच्या भागाचे आवरण हे पातळ आणि पारदर्शक असते. उदराच्या आतील बाजूस प्रकाशपेशींचा जड स्तर असतो. या प्रकाशपेशी ल्युसिफेरीन नावाच्या रसायनाने बनलेल्या असतात. या रसायनाचा विकराच्या सान्निध्यात ऑक्सीजन बरोबर संयोग होऊन प्रकाश निर्मिती होते. अशी काजव्यांची प्रकाश निर्मितीची रचना असते.  

काजव्याला स्वतःला त्या प्रकाशाचा काही उपयोग नसला तरी मादीला आकर्षित करण्यासाठी त्याला या प्रकाशाचा उपयोग होतो. काजव्याची प्रकाशात कोणतीही ऊर्जा उत्सर्जित होत नाही त्यामुळे त्यात उष्णता आणि उब नसते. फक्त थंड प्रकाश असतो.

काजव्यांचा अधिवास धोक्यात :-

काजव्याचा मुक्काम हा सहसा झाडवरच असतो. बहुतेकदा काजवे हे हिरडा, बेहडा,सादडा,जांभूळ, आंबा, उंबर या झाडांवर वास्तव्य करताना दिसून येतात. गेल्या काही वर्षात वृक्ष तोडीमुळे आणि जंगलात मानवाच्या अतिरिक्त हस्तक्षेपामुळे काजव्यांचा अस्तित्व धोक्यात येत आहे. आपण आता पाहत आहोत ठिकठिकाणी काजवा महोत्सव खूप उत्साहात साजरा केला जातो. पण येणारे पर्यटक हे नेहमीच निसर्ग प्रेमीच असतात असे नाही. काही पर्यटक हे जंगलात राजरोसपणे जायला मिळणार म्हणून दारू पार्ट्यांचे आयोजन करतात. काही पर्यटक हे आपल्या मोठ मोठ्या मोटारी घेऊन जंगलात प्रवेश करतात. काही तर फोटो काढण्यासाठी हेवी लाइट्स काजव्यांवर टाकून फोटो काढतात. या सगळ्याचा परिणाम म्हणून त्या काजव्यांचे काही दिवसांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पर्यटकांनी निसर्गाच्या सान्निध्यात कसे वागावे या साठी वन विभागातर्फे प्रयत्न सुरू आहेत. काजवा महोत्सवासाठी येणार्‍या पर्यटकांसाठी वन विभागाने काही नियमावली तयार केली आहे.

आपणही काजव्यांच्या सान्निध्यात काही वेळ खर्ची घालणार असाल तर वनविभागला सहकार्य करा.

मैत्रिणींनो तुम्हाला काजव्यांची ही माहिती कशी वाटली? तुम्हाला ही माहिती आवडली का? तर हा लेख वाचून तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. तेही कमेंट बॉक्स मध्ये कळवाआपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र‘ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.  

1 thought on “निसर्गप्रेमींसाठी काजव्याची जीवनशैली :काजवा महोत्सव  ”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top