8. कालरात्री
या देवी सर्वभूतेषु !
मा कालरात्री रुपेण संस्थिता !
नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तसे नमो नमः !!
मंडळी , नवरात्री उत्सव हा अधर्मावर धर्माचा विजय , अंधकारावर तेजाचा विजय आणि असत्यावर सत्याचा विजय दर्शवतो. दुर्गादेवीने महिषासुरावर युद्धात मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून हे नऊ दिवस आपण उत्साहाने साजरे करतो. नवरात्रीत देवीच्या नऊ अवतारांची म्हणजेच नवदुर्गांची पूजा, अर्चना ,आराधना केली जाते. नवरात्रीतील प्रत्येक दिवस हा दुर्गादेवीच्या नऊ अवतारांमधील एका अवताराला समर्पित असतो.
आज या लेखामध्ये मी तुम्हाला , नवदुर्गांपैकी , देवीच्या ‘कालरात्री ‘ या अवतारा ची माहिती सांगणार आहे.
‘ कालरात्री’ स्वरूपाचा अर्थ –
मंडळी , ‘काल’ हा ‘ मृत्यू’ ला दर्शवितो, तर ‘रात्री ‘ म्हणजे ‘रात्र.’ म्हणूनच माता ‘कालरात्री’ ही ती आहे , जी दुष्ट शक्ती आणि अंधकारासोबत जोडलेल्या प्रत्येक नकारात्मक ऊर्जेचा अंत करते. नवरात्रात सातव्या दिवशी ‘कालरात्री’ स्वरूपात मातेची पूजा ,अर्चना ,आराधना केली जाते.
‘कालरात्री’ स्वरूपाची वैशिष्ट्ये _
भारतातील विविध प्रदेशात , माता ‘कालरात्री’ ही वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. उत्तर भारत किंवा बंगाल प्रांतात ती ‘ काली मॉ ‘ किंवा ‘ कालीमाता ‘ म्हणून ओळखली जाते , तर महाराष्ट्रात तिलाच आपण ‘कालिका’ असे म्हणतो.
‘कालिका” हा दुर्गा मातेचा सगळ्यात विराट व उग्र अवतार मानला जातो. निळसर काळा रंग, विस्कटलेले केस, उग्रविक्राळ चेहरा, मोठे लाल डोळे, उघडलेले तोंड व त्यातून बाहेर पडलेली लवलवणारी लालभडक जीव्हा. पांढरेशुभ्र विक्राळ दात, आभूषणे म्हणून गळ्यात हाडे आणि मुंडक्यांच्या माळा , तर कमरेला लिंबाच्या डहाळ्या असे तिचे स्वरूप असते.
‘कालरात्री’ अवताराची कथा –
मंडळी , जेव्हा माता दुर्गा आणि महिषासुराचे युद्ध सुरू झाले, तेव्हा युद्धभूमीवर ‘रक्तबीज’ नावाचा दैत्य सेनापती, देवीवर धावून आला. त्याला ब्रह्मदेवाकडून, असे वरदान प्राप्त होते की ,त्याचे रक्त जर भूमीवर सांडले तर रक्ताच्या प्रत्येक थेंबातून, त्याचेच रूप असलेला , एक नवीन राक्षस निर्माण होईल. या वरदानामुळेच त्याचे नाव रक्तबीज असे पडले होते. हे वरदान मिळवल्यामुळे रक्तबीज मातला होता. सगळ्यांचे जीवन त्याने दूर्धर केले होते. त्याचा वध करण्यासाठी देवीने सर्व शस्त्रास्त्रांसहित युद्ध आरंभले. पण तिने रक्तबीजावर खड्ग प्रहार करताच त्याचे रक्त जमिनीवर सांडून , त्यातून हजारो रक्तबीज निर्माण झाले. तिने विविध शस्त्रांनी जेवढे प्रहार रक्तबीजावर केले , तेवढेच लाखो रक्तबीज तयार झाले. रक्ताच्या प्रत्येक थेंबापासून त्याची नवीन सेना देवीसमोर उभी राहिली. हे बघून देवीने उग्र असे ‘कालीरूप’ धारण केले. तिने समोर असलेल्या राक्षसांची मुंडकी छाटून अष्टभुजऻमध्ये धरली व त्यातून गळणारे रक्त ती प्राशन करू लागली. त्यामुळे नवीन रक्तबीज निर्माण होणे थांबून तिने सर्व सेना संपवली . शेवटी खऱ्या रक्तबीजाचाही शिरच्छेद करून कालीने त्याचेही रक्त प्राशन केले.
अशाप्रकारे मातेच्या रक्तबीजा सोबतच्या युद्धाचा पूर्णविराम होऊन माता दुर्गेचे हे अक्राळ विक्राळ रूप ‘कालरात्री ‘ या नावाने प्रसिद्ध झाले.
कालरात्रीच्या पूजेचे महत्त्व –
नवरात्रीच्या सातव्या दिवशी माता ‘कालरात्री’ ची पूजा केली जाते. तिला लाल रंगाची फुले, लाल वस्त्र व कुंकू अर्पण केले जाते .
नैवेद्य म्हणून गुळाचा आणि विविध फळांचा प्रसाद , देवीला अर्पण केला जातो. जीवनातील दुष्ट शक्ती , नकारात्मक ऊर्जा व शत्रूंचा नाश होण्यासाठी कालरात्रीची धूपअर्चना करून पूजा केली जाते. तिला प्रसन्न करण्यासाठी रात्र जागवली जाते.
मंडळी, आपणा सर्वांवरही माता कालरात्रीची कृपा सदैव राहो.
आज ही माहिती तुम्हाला कशी वाटली , ते कमेंट करून नक्की सांगा .धन्यवाद !
लेखिका -प्रतिमा प्रमोद
छान माहिती आणि लेखन.