कोहिनूर हिऱ्याचा रोमांचक इतिहास आणि त्याचा उगम कसा झाला?
आपल्या सर्वांना कोहिनूर हिरा हा नावाने किंवा ऐकून माहिती असेलच परंतु त्याचा इतिहास काय आहे, त्याचा उगम कसा झाला हे तुम्हाला ठाऊक आहे का? तसेच या हिऱ्याला शापित का म्हटले जाते? कोहिनूर हिऱ्याच्या अशाच काही रंजक गोष्टी ज्या फार कोणाला माहित नाहीत. चला तर मग आजच्या या लेखातून आपण कोहिनूर हिऱ्याविषयी जाणून घेऊयात.
जगात अनेक मौल्यवान रत्ने आहेत परंतु जगात सर्वात प्रसिद्ध व पुरातन काळापासून चर्चेत असणारा हिरा म्हणजे कोहिनूर हिरा. इतर कोणत्याही रत्ना बरोबर याची तुलना होऊ शकत नाही.कोहिनूर हिऱ्याने अनेक शतकापासून संपूर्ण जगाला भुरळ घातली आहे. खालील मुद्द्यानुसार आपण याची सविस्तर माहिती घेऊ.
•कोहिनूर हे नाव कसे पडले?
कोहिनूर हा एक पर्शियन शब्द आहे.पहिल्यांदा हा हिरा पाहिल्यावर पर्शियाचा नादिरशहा याच्या तोंडून आश्चर्याने बाहेर पडलेले उद्गार म्हणजे“कोह- इ-नूर”म्हणजे “प्रकाशाचा पर्वत”तेव्हा पासून या हिऱ्याला कोहिनूर हे नाव प्रचलित झाले.
•काय आहे कोहिनूरचा हिऱ्याचा इतिहास?
कोहिनूर चा इतिहास हा लढाया, सत्ता आणि शोकांतिकाचा इतिहास आहे. ऐतिहासिक पुराव्यानुसार, कोहिनूर हिरा हा आंध्रप्रदेशातील गोलकोंडा येथील कुल्लूर खाणीत सापडल्याचे आढळते. कोहिनूर हिरा हा फार प्राचीन आहे. कोहिनूरचा पहिला उल्लेख 5000 वर्षांपूर्वी झाल्याचे आढळते. हे भगवान श्रीकृष्णाच्या कालखंडाशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. पुराणानुसार,स्वयंतक मणीलाच नंतर कोहिनूर म्हटले गेले. हे रत्न कर्णाला सूर्याकडून आणि नंतर अर्जुन आणि युधिष्ठिरला दिले गेले. त्यानंतर अशोक, हर्ष आणि चंद्रगुप्त यांना हे रत्न मिळाले. शतकानुशतके, कोहिनूर एका राजवंशातून दुसऱ्या राजावंशात गेला.
हे रत्न पहिल्यांदा 1306 मध्ये माळव्याचे महाराज रामदेव यांच्या ताब्यात दिसले होते. माळव्याच्या महाराजांचा पराभव करून सुलतान अलाउद्दीन खिलजीने मणी ताब्यात घेतला. त्यानंतर16 व्या शतकामध्ये पानिपतच्या युद्धात मुघल संस्थापक बाबरने आग्रा आणि दिल्लीचे किल्ले जिंकून हा हिरा ताब्यात घेतला. बाबर बादशहाचा इतिहास बाबरनामा यात या हिऱ्याचा उल्लेख आढळतो. हा अतुलनीय हिरा बाबरपासून शेवटचा मुघल सम्राट औरंगजेबापर्यंत पिढ्यानपिढ्या चालत.गेला.
1738 मध्ये नादिरशहाने मुघलांवर हल्ला केला आणि त्यांना पराभूत केले. आणि 13 व्या मुघल सम्राट अहमद शहा अब्दालीकडून हा हिरा हिसकावून प्रथमच भारताबाहेर नेला. नादिरशहाने मयूर सिंहासनही मुघलांकडून हिसकावून घेतले होते आणि असे मानले जाते की,नादीरशहाने हा हिरा मयूर सिंहासनात जडवला होता.त्याची चमकदार चमक पाहून नादीरशहाने त्याचे नाव कोहिनूर ठेवले. 1747 मध्ये नादिरशहाचे ह*त्या झाली आणि जनरल अहमदशहा दुर्रानी यांनी कोहिनूरचा ताबा घेतला. अहमदशहा दुर्रानीचे वंशज शाह शुजा दुर्रानी यांनी 1813 मध्ये कोहिनूर भारतात परत आणला. यानंतर शुजा दुर्रानी यांनी हा कोहिनूर शीख समाजाचे संस्थापक राजा रणजीत सिंग यांच्याकडे सुपूर्द केला.त्या बदल्यात राजा रणजीत सिंगने शाह शुजा दुर्रानीला अफगाणिस्तानशी लढून पुन्हा गादी मिळवण्यासाठी मदत केली.
राजा रणजीत सिंग यांच्या इच्छापत्रात निधनानंतर हा हिरा जगन्नाथ पुरीच्या मंदिराला दिला जाईल असे नमूद केले होते. परंतु ईस्ट इंडिया कंपनीने यांचा स्वीकार केला नाही.29 मार्च 1849 रोजी दुसऱ्या अँग्लो शिख युद्धात ब्रिटिश सैन्याने राजा रणजीत सिंग यांचा पराभव करून त्यांची सर्व संपत्ती आणि राज्य ताब्यात घेतले. त्यानंतर ब्रिटिश सरकारने लाहोरचा करार लागू केला आणि कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरिया यांना देण्यात आला.
कोहिनूर हिऱ्याच्या शापाची अख्यायिका लक्षात घेऊन सावधगिरी म्हणून पुढे हा हिरा ब्रिटिश राजघराण्यातील फक्त महिलांनी परिधान केला आहे, डेन्मार्कची राणी अलेक्झांड्रा, टेकची राणी मेरी आणि दिवंगत राणी एलिझाबेथ यांचा यात समावेश आहे.
•कोहिनूर हिऱ्यामध्ये विशेष असे काय आहे?
कोहिनूर हिरा जगातील सर्वात प्रसिद्ध हिऱ्यांपैकी आहे. हा एक चमकदार अंडाकृती नैसर्गिक हिरा आहे जो त्याच्या लांबलचक आकाराचा आणि आदर्श संरचनात्मक रचनेसह आहे. कोहिनूरची चमकदार कटिंग शैली आणि 105.6 कॅरेट वजन यामुळे जगातील सर्वात महागडा हिरा आहे.कोहिनूर हिरा हा 3.6 सेमी (1.4 इंच) लांब, 3.2 सेमी(1.3 इंच) रुंद आणि 1.3 सेमी (0.5 इंच) खोल आहे. सामान्यतः ब्रिलियंट- कट प्रकाराच्या हिऱ्यांना 58 पैलू असतात परंतु कोहीनूरमध्ये क्युलेटभोवती 8 अतिरिक्त “स्टार” पैलू असल्यामुळे कोहिनूर हिऱ्याला एकूण 66 पैलू आहेत.
•कोहिनूर हिऱ्याला शापित का म्हटले जाते?
इतिहासानुसार, कोहिनूर हिरा हा एका राजवंशातून दुसऱ्या राजवंशात हस्तांतरित केला गेला आहे त्यामुळे विविध शासकांच्या मालकीचा असल्याचा दावा केला जातो. यामध्ये हिंदू,पर्शियन, मुघल,अफगाण आणि शीख हे शासक आहेत.परंतु यात एक गोष्ट सामान्य असल्याची असे मानले जाते की,ज्या राजा किंवा राजपुत्राकडे हा हिरा होता त्यांनी आपली सत्ता, शक्ती आणि जीवन गमावले. मग ते तुघलक साम्राज्य असो किंवा पर्शियन साम्राज्य, खिलजी साम्राज्य, मुघल साम्राज्य, दुर्रानी साम्राज्य, शीख साम्राज्य असो काही काळ कोहिनूरच्या मालकीनंतर या सगळ्यांचा शेवट झाला. एकूण असे म्हणतात की,कोहिनूर हिरा हा पुरुषांना लाभत नाही. हा हिरा केवळ देव आणि स्त्रीच निर्दोषपणे परिधान करू शकतात.
•कोहिनूर हिऱ्याचा उगम कसा झाला?
कोहिनूर हिऱ्याबद्दल अनेक कथा आहेत. या हिऱ्याच्या उत्पत्ती बाबत अनेक वेळा प्रश्न उपस्थित केले गेले. 1600 ते 1800 च्या दरम्यान हे हिरे दक्षिण भारतात सापडल्याचा दावा केला जातो. नंतर ते ब्रिटन आणि इतर देशांमध्ये नेण्यात आले. आता शास्त्रज्ञांनी प्रथमच त्यांच्या उत्पत्तीचे रहस्य उलगडल्याचा दावा केला आहे. शास्त्रज्ञांच्या मते असे हिरे सहसा नदीकाठच्या गाळात खोदलेल्या खड्ड्यांमध्ये आढळतात. पण ज्वालामुखीचा उद्रेक झाला की ते बाहेर येतात. या भागाला किंम्बरलाईट फिल्ड म्हणतात.
अलीकडे जर्नल ऑफ अर्थ सिस्टीम सायन्स मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, कोहिनूर सह जगातील सर्वात प्रसिद्ध हिरे भारतातील आंध्र प्रदेशातील वजराकरुर किंम्बरलाईट फिल्ड पासून तीनशे किलोमीटर अंतरावर सापडले आहेत. जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठात हिऱ्यांचा अभ्यास करणारे भू-रसायनशास्त्रज्ञ याकोव्ह वेइस यांच्या मतानुसार,वजराकरूर येथील जमीन हिऱ्यांसाठी मजबूत व पूरक अशी आहे. येथील मातीचा अभ्यास केला तेव्हा असे आढळून आले की, असे हिरे लिथोस्फियर म्हणजे कठीण थर आणि वरच्या आवरणात ठेवल्याचा पुरेसा पुरावा आहे.हे हिरे आवरणात खोलवर तयार होतात. बहुधा हे पृथ्वीच्या केंद्राभोवती तयार झाले असावेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे भूवैज्ञानिक हिरो कालरा, आशिष डोंगरे आणि स्वप्निल व्यास यांनी हे संशोधन केले. त्यांच्या मते, मोठे हिरे पृथ्वीच्या खोलातून येत आहेत वजरा करूर प्रदेशातील किंम्बरलाईट खडक बहुदा हिऱ्यांचे उत्खनन केलेल्या खोलीतून आले आहेत. रिमोट सेन्सिंग डेटावरून असे दिसून आले की, येथे एक प्राचीन नदी होती जी कृष्णा नदी आणि तिच्या उपनद्यांमध्ये हिरे घेऊन जात असे.ते म्हणतात की, हे खोल हिरे पृथ्वीच्या पृष्ठभागावर कसे पोहोचले हे कोणालाही माहिती नाही. पण जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा ते पृथ्वीच्या गर्भातून बाहेर येतात आणि वरच्या पृष्ठभागाच्या आवरणात अडकतात. पण जेव्हा किंम्बर लाईटचा उद्रेक होतो तेव्हा ते पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतात.कोहिनूर आणि इतर हिरे ही याच पद्धतीने पृथ्वीतून बाहेर आले असावेत.
•कोहिनूर हिऱ्याची किंमत काय आहे?
एका माहितीनुसार,हिऱ्याचा प्रचंड आकार आणि वजन यामुळे तो जगातील सर्वात महागडा हिरा मानला जातो. याची सध्या किंमत USD 20 अब्ज आहे, ज्याची किंमत R 1.64 लाख कोटी आहे. ही किंमत अनेक राष्ट्रांच्या GDP पेक्षा जास्त आहे.
•कोहिनूर हिरा सध्या कुठे आहे?
आज हा हिरा टॉवर ऑफ लंडन येथील ज्वेल हाऊस मध्ये सार्वजनिक प्रदर्शनात पहावयास मिळतो. भारत, इराण, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या सर्वांनी कोहीनूरच्या मालकीचा दावा केला आहे. विविध मुद्द्यांवर युकेकडून परत करण्याची मागणी केल्यामुळे कोहिनूर हिरा दीर्घकाळ राजनैतिक वादाचा विषय बनला आहे.
वरील कोहिनूर हिऱ्याविषयी माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा.तसेच आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशीच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’या वेबसाईटला नक्की भेट द्या तसेच व्हाट्सअप ग्रुप ही जॉईन करा.
धन्यवाद!
आकांक्षा निरळकर,मुंबई
✍माहिती छान आहे 👏
Khup chhan information…
Good information