अश्विन महिन्यात व शरद ऋतूत येणाऱ्या पौर्णिमेला ‘कोजागिरी पौर्णिमा’ असे म्हणतात. शारदीय नवरात्र संपल्यानंतर दसरा येतो. दसऱ्यानंतर जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला आपण ‘कोजागिरी पौर्णिमा’ म्हणतात. दरवर्षी साधारण सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात ही कोजागिरी पौर्णिमा येते.
श्लोक :-
“ या निशां सर्व भूतांना तस्याम जागर्ती संयमी |
यस्याम जाग्रती भूतानि सा निशा पश्यतो मुने: ||”
अर्थ :- ऐहिक, गोष्टींच्या प्राप्तीकरता सर्वचजण जागरण करत असतात. त्यावेळी इतर संयमी,विवेकी लोक निद्रिस्त असतात ; परंतु अध्यात्मिक प्राप्तीसाठी जो विवेकी, संयमी लक्ष्मी येण्याच्या वेळी खऱ्या अर्थाने जागा असतो ; त्यालाच लक्ष्मी प्राप्त होते. अशा वेळी इतर सर्वसामान्य लोक निद्राधीन झालेले असतात. कोजागिरीच्या रात्री देवी घरोघरी जाऊन “को जागरती?” म्हणून विचारणा करते आणि जो खऱ्या अर्थाने ‘जागृत’ असेल; त्यालाच इच्छित फलप्राप्ती होईल असा वर देते.
हिंदू संस्कृती नुसार या दिवशी साक्षात देवी लक्ष्मी चंद्रमंडलातून पृथ्वीवर अवतरते आणि मध्यरात्री घरोघरी जाऊन “को जागरती? को जागरती??” म्हणजेच ‘कोण जागे आहे?’ अशी विचारणा करते. पृथ्वीतलावर लक्ष्मी येण्याच्या वेळी जो मनुष्य सावध, जागृत असेल त्याला लक्ष्मी प्रसन्न होते. या पौर्णिमेच्या निमित्ताने देवी लक्ष्मी पृथ्वीतलावर आपला कोण भक्त सावध आहे? कोण ज्ञान मिळवण्यासाठी आतुर आहे ? याचे अवलोकन करते.
पौराणिक कथा :-
या दिवशी ऐरावतावर बसलेल्या इंद्राची तसेच देवी लक्ष्मीची, बळीराजाची पूजा केली जाते. या दिवशी काहीजण उपवास करतात. लक्ष्मीदेवीचे पूजन आणि जागरण या गोष्टींना महत्त्व आहे. विविध मंदिरांमध्ये देवी लक्ष्मीची पूजाअर्चा व विशेष उपासना केली जाते. समुद्रमंथनातून ज्या दिवशी माता लक्ष्मी उत्पन्न झाली तो दिवस ‘कोजागिरी पौर्णिमेचा’ होता असेही मानले जाते. तसेच या दिवशी श्रीकृष्णाने गोपिकांबरोबर ‘रासलीला’ रचली होती अशी वृंदावनवासीयांची धारणा आहे. त्यामुळे वृंदावनात या दिवशी वैष्णव संप्रदायाचे लोक रासलीला खेळतात. श्रीकृष्ण व राधेची आराधना करतात.
या दिवशी आकाशातील चंद्राच्या पूजनाचे अत्यंत महत्त्व आहे. कोजागिरीच्या दिवशी चंद्र आपल्या सर्वच्या सर्व १६ कलांनी युक्त असतो असे मानले जाते. अश्विन (शरद) पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असल्यामुळे, चंद्रबिंब अतिशय तेजस्वी व अतीव प्रकाशमान असते. त्यामुळे चंद्राचे किरण पृथ्वीपर्यंत लवकर व जास्त प्रमाणात पोहोचू शकतात.
या दिवशी सर्व मंदिरे, विशेषतः मंदिरातील दीपमाळा, उद्याने, सर्वत्र दिवे, पणत्या लावून झगमगाट केला जातो. एकप्रकारे लगेचच पुढे येवू घातलेल्या दिवळीची चाहूल लागल्याची जाणीव होते. लक्ष्मीचे आगमन होणार असल्यामुळे तिचे स्वागत करण्यासाठी अशा प्रकारे चराचर उजळून तेजोमय, लख्ख केले जाते.
शास्त्रीयदृष्टया महत्व :-
कोजागिरीच्या दिवशी केशर ,वेलदोडे, चारोळी घालून तयार केलेल्या सुवासिक अटीव दुधाचा नैवेद्य प्रथम लक्ष्मीला व आकाशातील पूर्ण चंद्राला दाखवला जातो. घरातील ज्येष्ठ आपत्याला औक्षण करून त्याची त्याचे आर्युआरोग्याचे रक्षण करण्याची प्रार्थना देवाकडे केली जाते. अशी पारंपारिक प्रथा जरी असली तरी आपल्या घरात जेवढी आपत्ये तसेच इतरजण असतील त्या सर्वांचे औक्षण आपण कोजागिरीच्या दिवशी करतो. त्यानंतर आटवलेल्या पौष्टिक दुधाचा प्रसाद म्हणून घरातील मंडळींना प्यायला दिला जातो. या प्रथेला घरातील मुलांची ‘अश्विनी ’ केली असेही म्हटले जाते. चंद्राची प्रतिबिंबित प्रकाशकिरणे पडलेले केशरयुक्त दूध गुणाने पित्तशामक असल्यामुळे शरीरातील पित्तदोष कमी होऊन येणारा ऋतूबदल शरीराला सहजपणे स्वीकारता यावा हे यामागचे खरे कारण आहे.
याच दिवशी वैदिक परंपरेतील अश्विनी कुमारांची म्हणजेच देवांचे वैद्य यांची पूजा करून सर्वांच्या विशेषतः लहान मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी त्यांच्याकडे प्रार्थना केली जाते.
या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र अतिशय तेजस्वी असतो. चंद्राचा प्रकाश, त्याची किरणे अतिशय ‘अमृतमय’ व मानवाच्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी झालेली असतात. अशी चंद्रकिरणे दुधात पडल्यामुळे त्या दुधाचे शास्त्रीय दृष्ट्या महत्त्व वाढते. याचा लाभ मिळवून आपले आरोग्य सुधारावे ही यामागची खरी संकल्पना आहे. असे चंद्रप्रकाशमय दूध आपण सेवन केल्याने आपली शारीरिक शक्ती वाढते. शरीरात शीतलता निर्माण होते. पुढे येणाऱ्या ऋतूंसाठी शारीरिक तंदुरुस्ती यातून प्राप्त होते. शरद ऋतुतील चांदणे अतिशय शांत, शीतल, अल्हाददायक असते त्याप्रमाणेच हा अश्विनपौर्णिमेचा चंद्रप्रकाश देखील परमशीतल, अमृतमय झालेला असतो. त्याचा लाभ आपल्याला मिळावा म्हणून आपल्या संस्कृतीत ‘कोजागिरी पौर्णिमा’ साजरी करण्याची परंपरा आहे. हल्ली बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक स्वरूपात बागा, उद्याने तसेच मोठी मैदाने अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात सार्वजनिकरीत्या कोजागिरी साजरी केली जाते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सांगीतिक कार्यक्रमांची सुरेल मेजवानीदेखील आयोजित केली जाते. केशरयुक्त दुधाबरोबर अशा संगिताचाही आस्वाद घेवून रात्र जागविली जाते.
या दिवशी ‘नवान्न पौर्णिमा’ देखील साजरी केली जाते. भारत कृषीप्रधान देश असल्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात कृषी संस्कृती जपली जाते. त्यामुळे शरद पौर्णिमेच्या दिवशी नवीन धान्यांच्या लोंब्या, झेंडूची फुले वगैरे बाजारातून विकत आणली जातात. दारासमोर सुबक रांगोळ्या रेखल्या जातात. तसेच नवीन धान्याच्या लोंब्या व आंब्याची पाने, झेंडूची, कुरडूची फुले मिळून सुंदर अशी तोरणे तयार करून ती घराच्या दरावर बांधली जातात. या दिवशी नवीन तांदळाचा भात, खीर अशी पक्वान्ने केली जातात. तांदळाच्या पिठाचे पातोळे देखील केले जातात.
अशा या ‘कोजागिरी पौर्णिमेला’ आपल्या हिंदू संस्कृतीत अनेक प्रकारे महत्त्व आहे. ही पौर्णिमा पारंपारिक, पौराणिक, शास्त्रीय व मानवी आरोग्य दृष्ट्यादेखील अत्यंत महत्त्वाची आहे.
आज असणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेच्या आपणां सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!
शुभं भवतू!!
लेखिका :- माधुरी इनामदार, पुणे.
Nice