कोकणातील पारंपारिक गौरी गणपती

WhatsApp Group Join Now

कोकणातील पारंपारिक गौरी गणपती

श्रावण महिना संपल्यानंतर चाहूल लागते ती भाद्रपदातील गौरी गणपतीची. महाराष्ट्रात गणपती उत्सव खूप मोठ्या भक्ति भावाने साजरा केला जातो. जी धामधूम दिवाळीसाठी असते तेवढीच ओढ गणपतीसाठी असलेली बघायला मिळते. मुंबई पुणा या सारख्या मोठ्या शहरात सार्वजनिक गणपती आणले जातात. त्यासाठी सार्वजनिक जागेवर मोठ मोठे मंडप (पंडाल) बांधले जातात. ज्यांच्याकडे गणपती आणण्याची  प्रथा नाही, किंवा ज्यांना आपल्या गावी जाता येत नाही असे हौशे नवशे गवसे या गणपती मध्ये बघायला मिळतात. पण साधारणतः कोकणात मात्र घरगुती गणपतीची प्रथा अजूनही टिकून आहे. चाकरमानी आपल्या वर्षभराच्या सुट्ट्या या गणपतीसाठी राखून ठेवतात, आणि आपल्या गणपतीसाठी कोकणातील गावी जातात.

गणेश म्हणजे गणांचा ईश असा अर्थ आहे. शिव म्हणजे शंकर आणि पार्वती यांचे सेवक म्हणजे “गण” आणि गणांचा अधिपति म्हणून “गणपती” असेही नाव या देवतेस आहे.

गणपतीची विविध रुपे :-

गणपतीची देहविशेष दर्शविणारी नावे म्हणजे वक्रतुंड, एकदंत, महोदर, गजानन, विकट आणि लंबोदर अशी आहेत. गणपतीला इतरही सहस्त्र नावे आहेत. पण त्याच्या वक्रतुंड या नावाचा अर्थ, म्हणजे “ज्याचे तुण्ड (तोंड) वक्र वा वाकडे आहे तो”. गणपतीची सोंड वाकडीच असते म्हणून त्याचा चेहरा थोडासा वक्र दिसतो त्यामुळे हे नाव. एकदंत म्हणजे ज्याला एक दात आहे तो. गणपतीस एक दात असण्याच्या अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. प्रथम कथेनुसार, परशुरामाने एका युद्धात गणपतीचा एक दात छाटला. दुसऱ्या कथेनुसार गणपतीने रावणाला कैलास पर्वतावर जाण्यापासून रोखले म्हणून रावणाने गणपतीचा एक सुळा मोडला. आणखी एका कथेनुसार कार्तिकेय आणि गणपती खेळत असताना कार्तिकेयाने गणपतीचा एक दात तोडला.

भाद्रपदातील गणपती आगमनाचे महत्व :-

विविध रूपानी आणि नावांनी गणपती ही देवता प्रसिद्ध आहे. भाद्रपदात गणपतीचे आगमन होते याला सुद्धा पुराणात अनेक संदर्भ दिलेले आहेत. पण एक महाभारतातील संदर्भ म्हणजे कौरव पांडवांच्या युद्धानंतर ते मृत पावल्या नंतर, व्यास मुनींना सगळ्या घटना आठवू लागल्या, यासगळ्या घटना लिहून काढण्यासाठी त्यांना एका लेखनिकाची गरज होती. ब्रम्हदेवांच्या सल्ल्यानुसार गणपतीने ते काम स्वीकारले. तो दिवस म्हणजे भाद्रपद गणेश चतुर्थी. या दिवशी गणपतीचे आगमन घराघरांमध्ये होते. विशेषतः कोकणात याचे खूप मोठे प्रस्थ आहे.

गणेशाचे आगमन होण्याआधी घराची साफसफाई, रंगरंगोटी केली जाते. गणपती बसविण्याची जागा मात्र ठरलेली असते. तिथे गणपतीसाठी मखर केले जाते. आरास केली जाते, तोरणे बांधली जातात, माटी सजविली जाते (गणपतीच्या बैठकीच्यावर एक लाकडी छत असते ती म्हणजे माटी त्याला नैसर्गिक पानफुलांनी सजविले जाते.). आताच्या  काळात लाईटचे महत्व वाढले आहे. त्यामुळे लाइटचे मखर आणि आरास केली जाते. गणपतीसाठी दूर्वा, फुले मुख्यतः जास्वंदीची फुले, शमी पत्रे जमवून ठेवली जातात. ही सगळी तयारी आदल्या दिवशी करून ठेवली जाते. गणेश चतुर्थीला गणपतीचे आगमन होते. आणि घरात एक वेगळ्याच प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. सकाळ संध्याकाळ ढोल, मृदुंग आणि टाळांच्या गजरात आरती केली जाते. एकूणच घरातील वातावरण भारल्यासारखे भासते. 

बर कुणाला माहिती आहे का? की हा गणपती फक्त भाद्रपदात आपल्याकडे येतो, बाकी त्याला यायला वेळ नसतो का? किंवा मग तो काही दिवसच का राहतो?

तर अस नाही आहे, गणपती ही बुद्धीची देवता आहे. ती सतत आपल्या देव्हार्‍यात असते, आपल्या मनात असते. पण भाद्रपदात जे गणपती येतात ते आपल्या मामाकडे येतात. आपण कसे आपल्या आजोळी काही दिवस आपल्या मामाकडे बागडायला जातो. तसा गणपतीही काही दिवसांची रजा घेऊन कोकणात आपल्या मामाकडे येतो. आणि मोदक लाडू खाऊन हा खुश होतो. याला परत घेऊन जायला गौरी येतात. आता प्रत्येकाकडे या प्रथा वेगवेगळ्या असू शकतात. पण कोकणात मात्र गौरी म्हणजे पार्वती म्हणजे गणपतीची आई असा अर्थबोध होतो.

गौरी आगमन आणि विधी :-

गणपती आगमनांनंतर तिसर्‍या दिवशी या गौरींचे आगमन होते. गौरीला माहेरवाशिण असे संबोधले जाते. कारण ती दीड दिवसांचीच पाहुणी असते. भगवान शंकरांनी तिला माहेरी जाण्यासाठी तेवढ्याच दिवसांची मुभा दिलेली असते. म्हणून काही ठिकाणच्या प्रथांप्रमाणे गौरी आवाहन करताना कुमारिका किंवा एखाद्या  माहेर वाशिणीला हा मान दिला जातो. गौरी ह्या वाहत्या पाण्यात जाऊन आणाव्या लागतात. जिथे अशी सोय नसेल तर विहिरी वरुन आणल्या जातात. पाच बायका किंवा त्यापेक्षा जास्त बाका असल्या तरी चालतात. विहीरीचे ताजे पाणी एका पंचपात्रीमध्ये घ्यायचे त्यात तिथलेच पाच खडे धुवून पंचपात्रीमध्ये ठेवायचे. विहीरीच्या बाजूला शेणाने सरवून घेऊन पुजा करायची. त्यानंतर जिच्याकडे ही पंचपात्री असेल तिने न बोलता, पाठीमागे न बघता घरची वाट धरायची. तिच्या पुढे घंटानाद करीत एखादी स्त्री असते. पाठीमागे रोवळीत दिवा असतो. तिथलीच पिवळ्या रंगाची फुले आणि थोडे त्या फुलाचे रान घेऊन घरी यायचे. घरी एखादी सावाष्ण स्त्री ही शेणाने सारवून तिथे लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढून ठेवते. या लक्ष्मीच्या पावलांनी गौरी आपल्या घरी येतात. आणि हे आवाहन तिन्हिसांजेच्या आत करायचे असते. गणपतीच्या बाजूला या पंचपात्रीचा मान असतो.

ज्यांच्याकडे गौरीचा मुखवटा असतो, तिथे गौरीला साडी नेसविली जाते, मंगळसूत्र आणि सगळे दागदागिने घालून तिला सजविली जाते. साडी नेसविताना तिच्या पदरचा एक शेव हा गणपतीच्या खांद्यावर ठेवला जातो. गणपती आणि पार्वती यांच्यामध्ये भगवान शंकराचा मान असतो. तिथे शंकर म्हणून एक नारळ ठेवला जातो आणि त्याला पांढर्‍या कलरचा फेटा बांधला जातो. तिच्या साडीवर भेंडणीच्या फुलांची आरास केली जाते. आणि तिला नैवेद्य म्हणून भाकरी आणि एखादी रानभाजी केली जाते.

काही ठिकाणी मात्र गौरी या गणपती दिवशीच विराजमान होतात. आणि एका कळशीत किंवा एका ग्लासमध्ये पाणी भरून त्याला गौरीचे चित्र असलेला कागद लावला जातो त्यात हळदीचे रोप असते. त्यालाच एक ओटी गुंडाळली जाते. व गणपतीच्या मातीचेच मंगळसूत्रही घातले जाते. 

(ओवसा) गौरीची पुजा:-

दुसर्‍या दिवशी मात्र ओवसा असतो. म्हणजे गौरीची पूजा केली जाते. घरातील सवाष्णी या गौरीला ओवसतात. गौरी पूर्वा नक्षत्रात आल्या तरच नव्या नवरीचा ओवसा सुरू होतो. जोपर्यंत त्या नव्या नवरीचा ओवसा होत नाही तो पर्यन्त तिने दुसरे कुठलेच सण साजरे करायचे नसतात म्हणजे हळदीकुंकू वगैरे. आणि गम्मत म्हणजे या पूर्वा नक्षत्रातील गौरी तीन वर्षातून एकदा येतात.

ओवसा कसा भरला जातो? 

ओवासा म्हणजे गौरीला ओवाळणे. नवी नवरी ही आपल्या सासरची आणि माहेरची अशी सूप भरून गौरीला ओवसते. ही सुपे बांबूपासून बनविलेली असतात, काही ठिकाणी पाच तर काही ठिकाणी दहा सुपे भरण्याची पद्धत आहे.  या सूपाना दोर्‍याने गुंडाळून हळदीकुंकू लावले जाते. या सुपांमध्ये पाच प्रकारची फळे, रान भाज्या, सुकामेवा, मिठाई, धान्य असे सर्व पदार्थ भरून या सुपानी नवी नवरी ही गौरीला ओवसते. त्यानंतर ही सूप नव्या नवरीच्या माहेरी आणि सासरी वाटली जातात. ज्यांच्याकडे ही सूप येतात त्यांच्याकडून नववधूला एखादा दागिना, पैसे, साडी किंवा एखादी भेटवस्तू दिली जाते. अशा प्रकारे नववधूचा मानसन्मान केला जाते. यानंतर मात्र दरवर्षी घरातच गौरीला ओवसले जाते.

कोकणात ओवसा भरण्याचे महत्व:-

जे सूप ही नववधू भरते, त्या सूपाला घरातील सुबत्तेचे प्रतिक मानले जाते, तसेच भरलेले सूप हे ऐश्वर्याचे आणि मांगल्याचे प्रतिक मानले जाते. आणि गौरी ही आदिशक्तीचे रूप आहे, म्हणून तिची पूजा करून मुलींना आणि सुनाना तिच्यासारखे सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून ही पूजा अशा प्रकारे साजरी केली जाते.    

या दिवशी घरातील सूना आणि माहेरवाशीण आपल्या कुटुंबासह एकत्र आलेल्या असतात. म्हणून या दिवशी मांसाहाराचा बेत सुद्धा असतो. कारण जावईबापूंची खातीरदारी हा भाबडा उद्देश. परंतु काही ठिकाणी गौरीला सुद्धा मांसाहाराचा नैवेद्यही दाखविला जातो. प्रत्येक गावच्या प्रथा वेगवेगळ्या. आणि तिसर्‍या दिवशी या गौरींची पाठवणी करायची असते. काही ठिकाणी गणपतीचेही याच दिवशी विसर्जन केले जाते.

विसर्जनाच्या दिवशी गणपतीसाठी मोदकांचा नैवेद्य केला जातो आणि जाताना त्याची टाळ मृदुंगाच्या गजरात आरती केली जाते आणि त्याच्या पाटाशेजारी भोपळ्याच्या पानात बांधून त्याला मोदकाची शिदोरी दिली जाते. म्हणजे जाताना त्याच्या प्रवासात त्याला तहान लाडू, भूक लाडू दिले जातात. विसर्जन झाल्यानंतर सगळ्यांना फळे, खोबरे आणि पेढ्यांची खिरापत करून वाटली जाते. काही ठिकाणी फळे आणि भाताचे लाहया वाटण्याची पद्धत आहे.  

सध्या या सगळ्याचे स्वरूप बदलत आहे. पूर्वी गणपती हा शाडू माती म्हणजेच चिकणमातीचा बनविला जात होता. आता मात्र आपल्याला वजनाला हलका आणि आपल्या पोझीशनाला शोभणारा मोठा गणपती हवा असतो. म्हणून प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर केला जातो. पण या सगळ्या कौतुकामुळे या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. आणि पर्यावरणाचा नाश होतो. हारतुरे ही प्लास्टिकमध्ये वापरले जातात. आणि हे सर्व गणपती बरोबर पाण्यात सोडले जाते. त्यामुळे पाण्याचा दर्जा खालावतो. हे कुठेतरी थांबले पाहिजे. आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचा पाठिंबा गरजेचा आहे. चला या वर्षी आपण शाडू मातीच्या गणपतीची आस धरू आणि गणपती साजरा करू.

II गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया II

मैत्रिणींनो तुम्हाला या “कोकणातील गौरी गणपती” आणि त्याची माहिती कशी वाटली? असे माहितीपर लेख आपणाला वाचायचे असल्यास कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करा. ही माहिती कशी वाटलीतुम्हाला ही माहिती आवडली कातर हा लेख वाचून तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. तेही कमेंट बॉक्स मध्ये कळवाआपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र‘ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.

4 thoughts on “कोकणातील पारंपारिक गौरी गणपती”

  1. खूप छान माहिती आहे,, अगदी बारीक सारीक गोष्टी सुद्धा लेखात वर्णन केल्या आहेत,, खूपचं छान,, गणपती बाप्पा मोरया

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top