लक्ष्मी पूजनाची तयारी आणि विशेष पूजा विधी
नमस्कार, सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!! भारतामध्ये आणि देश विदेशामध्येही दिवाळी हा सण खूप उत्साहात साजरा केला जातो. .दिवाळीमध्ये घरामध्ये खूप आनंदी आणि उत्साही वातावरण असते. दिवाळी हा सण साधारणपणे पाच ते सहा दिवस साजरा केला जातो ,दिवाळीतील प्रत्येक दिवसाचे स्वतःचे एक महत्त्व आहे.त्यापैकी आज आपण लक्ष्मीपूजनाचे महत्त्व , संपूर्ण पूजा विधी याची माहिती घेणार आहोत. चॅनेलवर नवीन असाल, तर चॅनलला लाईक ,शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
यावर्षी लक्ष्मीपूजन १ नोव्हेंबरला आहे आणि लक्ष्मीपूजन करण्याचा मुहूर्त सायंकाळी ६.0४ ते रात्री ८.३५ पर्यंत आहे. लक्ष्मीपूजना दिवशी कधी कधी पुरोहिताकडून पूजा करून घेणे शक्य नसते आणि आपल्याला संस्कृत मंत्र उच्चार येत नाहीत अशा वेळेस घरच्या घरी आपण स्वतः ही पूजा कशी करावी हे आज मी सांगणार आहे.
लक्ष्मीपूजन का साजरे केले जाते:–
हिंदू संस्कृतीमध्ये लक्ष्मीपूजनाला खूप महत्त्व आहे. भागवत पुराणामधील समुद्र मंथन कथेनुसार ती समुद्रमंथनातून निघालेल्या रत्नांबरोबर सागरातून उत्पन्न झाली. समुद्र देव हे देवी लक्ष्मीचे वडील आणि आई तिरंगीनी आहे.पौराणिक कथेनुसार राक्षस कुळात जन्मलेल्या बळीराजाला तो दानशूर असल्याचा गर्व होता. तो उतरवण्यासाठी आणि त्याच्या बंदीवासात बंदिस्त असलेल्या देवतांना मुक्त करण्यासाठी भगवान विष्णूंनी वामन अवतार घेतला. अश्विन कृष्ण अमावस्येला बळीराजाकडे तीन पावलं जमिनीचा दान मागितले, वामनाच्या तीन पावलांनी तिन्ही त्रिलोक व्यापून टाकले. बळीराजाची सर्व मालमत्ता दानात गेली त्यामुळे त्याचा गर्व उतरला आणि तो पाताळात गेला. त्यावेळेस भगवान विष्णूंनी आपली प्रिय पत्नी लक्ष्मी आणि अन्य देवतांची बळीराजाच्या बंदीवासातून सुटका केली. त्यावेळेस लक्ष्मी मातेचे सर्वांनी स्वागत केले आणि भगवान विष्णूचे आभार मानले. तेव्हापासून त्या तिथीला लक्ष्मीपूजन केले जाऊ लागले.
लक्ष्मी देवी ही ऐश्वर्या ,समृद्धी, संपत्ती , शांती यांची अधिष्ठात्री देवी आहे. तिथीनुसार अश्विन महिन्यातील दर्श अमावस्येला( प्रदोष काळात) संध्याकाळी लक्ष्मी पूजन केले जाते. दिवाळीच्या अमावस्येला म्हणजेच लक्ष्मीपूजना दिवशी केरसुणीची पूजा केली जाते. घरातील दारिद्र्य,अलक्ष्मी घालवनारी केरसुनी ही त्यादिवशी देवी स्वरूप मानले जाते. लक्ष्मीपूजना दिवशी सूक्ष्म रूपाने लक्ष्मी घरामध्ये वास करते तिचे आशीर्वाद मिळण्यासाठी लक्ष्मी पूजन केले जाते.
लक्ष्मीपूजनाची पूर्वतयारी:–
लक्ष्मी पूजन करताना, देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ,केरसुणी, पैशाची नाणी/नोटा, लाल कपडा, कलश,पाच किंवा सात मातीचे बोळके/ सुगडे, ताम्हण,सुपारी, नारळ,नागवेलीचे पाने( खाऊचे पाने) किंवा आंब्याची पाने,देवांसाठी वस्त्र ,पाच फळे,पंचामृत, धने, बत्तासे, लाह्या, एक पानाचा विडा( दोन नागवेलीचे पाने, एक बदाम ,हळकुंड, सुपारी, खारीक,खोबरं) ,तांदूळ,गहू, मुग(कोणतेही धान्य किंवा कडधान्य घेऊ शकता), रांगोळी, हार, फुले, दिवा,समई, धुप, कापूर, हळदी कुंकू, पाणी,नैवेद्य ही सर्व पूर्वतयारी करावी .
लक्ष्मीपूजन पूजा विधि :–
लक्ष्मीपूजन करताना संध्याकाळी सर्वप्रथम घराच्या दारासमोर रांगोळी काढावी .उंबऱ्याच्या जवळ गोपद्म व लक्ष्मीची पावले काढावीत. दाराच्या चौकटीला तोरण लावावे. तुळशीजवळ एक दिवा लावावा. जिथे पूजा मांडणार आहे तेथील जागा स्वच्छ करून घ्यावी. लक्ष्मीपूजनाला सुरुवात करण्यापूर्वी स्वतःला गंध लावून घ्यावा आणि संपूर्ण पूजा होईपर्यंत ॐ लक्ष्मी नमो नमः मंत्र किंवा मनात देवीचे नामस्मरण करावे. एक दिवा प्रज्वलित करून त्याला फुल ,अक्षता, हळदी कुंकू अर्पण करून, दीप पूजन करून प्रार्थना करावी की “हे आग्निदेवता माझी पूजा होईपर्यंत अखंड प्रज्वलित रहा”.त्यानंतर पाट किंवा चौरंग मांडून त्यावरती लाल कलरचा कपडा अंथरावा. लाल कलर देवीच्या पूजेमध्ये शुभ मानले जाते.चौरंगावरती मध्यभागी तांदळाचे स्वस्तिक काढावे.लक्ष्मी पूजन करताना सुरुवातीला गणपती पूजन केले जाते. एका सुपारीवर गणपतीची भावना करून ताम्हणात घेऊन गणपतीला पंचामृत आणि पाण्याने अभिषेक करून लक्ष्मीच्या मूर्ती समोर तांदूळ ठेवून त्यावरती गणपतीला स्थानापन्न करावे .
गणपतीला हळदी कुंकू,फुल, अक्षता,वस्त्र अर्पण करावे,नंतर ताम्हणामध्ये लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा फोटो घेऊन तीन वेळा पंचामृत नंतर तीन वेळा पाण्याने देवीचा अभिषेक करावा.( मूर्ती जर मातीची असेल तर फक्त पाणी शिंपडावे). मूर्तीला स्वच्छ कपड्याने पुसून तांदळाच्या स्वस्तिका वरती स्थानापन्न करावे. देवी लक्ष्मीला हळदी कुंकू,हार,वस्त्र, पानाचा विडा अर्पण करावे. अजून एका सुपारी वरती कुलदेवता,कुलदेवी, ग्रामदेवता, स्थानदेवता यांना स्मरून पंचामृत आणि पाण्याने स्नान घालावे. गणपती शेजारी तांदूळ ठेवून त्यावरती स्थानापन्न करावे आणि हळदी ,कुंकू ,अक्षता, फुल, वस्त्र अर्पण करावे. एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये अक्षता, एक रुपयाचं नाणं, सुपारी, फुल अर्पण करावे.
त्या कलशावरती स्वस्तिक काढून त्यावरती आंब्याची पाने किंवा नागवेलीची पाच पाने ठेवावी व त्याच्यावरती नारळ ठेवावा. देवीच्या उजव्या बाजूला तांदळाचे अष्टदल कमळ किंवा स्वस्तिक काढून त्याच्यावर कलश ठेवावा. नारळावरती हळदीकुंकू वाहून हार घालावा. डाव्या बाजूला केरसुनी ठेवून त्यावरती पाणी शिंपडावे नंतर हळदीकुंकू ,फुल अर्पण करावे. बाजूला पाच फळे मांडावीत. दोन्ही बाजूला समई लावून घ्यावी. पूजन केलेला दिवा देवी समोर ठेवावा. धूप लावावे. जर सोन्याचे दागिने असतील तर त्यांचीही पूजा करावी. सात सुगाडांमध्ये अनुक्रमे लाह्या बत्तासे गहू धने,मूग ,तांदूळ ,पैशांची नाणी भरून बाजूला ठेवावी. घरात केलेले फराळाचे पदार्थ देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करावे. त्याच्यानंतर देवीची आरती करावी. अशाप्रकारे लक्ष्मीपूजन मनोभावे करून ही सेवा देवीच्या चरणी अर्पण करावी.
देवी लक्ष्मीची कृपादृष्टी रहावी म्हणून श्री सुक्त आणि लक्ष्मी अष्टक यांचे ११,२१,५१ .. आवर्तने केली जातात. लक्ष्मी पूजन करताना कळत नकळत काही राहून गेले असेल तरी काळजी करू नये, कारण सरते शेवटी आपल्या मनातला भाव देवीला जास्त प्रिय आहे. या मंगलसमयी मी एकच प्रार्थना करेन ‘लक्ष्मी देवीची सर्वांवर कृपा व्हावी,सुख,समृद्धी, ऐश्वर्य प्राप्त होवो’. तुम्हाला माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर , सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात नवीन माहितीसह!!
पूनम सोनावले