लता मंगेशकर, म्हणजे स्वरसम्राज्ञी लता दीदी, लता या नावातच सर्व काही आहे. नवे काही सांगायची गरजच नाही. कोण ओळखत नाही या व्यक्तिमत्वाला? वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी घराची आणि सर्व भावंडांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पडली. ती त्यांनी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत पेलली. आज त्यांना जाऊन २ वर्षे उलटली पण अजूनही त्यांच्या आठवणी कायम आपल्या सोबत आहेत. आजही त्यांच्या आवाजाची मोहिनी फक्त भारतात नाही तर जगभरात रसिकांना भुरळ पाडते. त्यांचे गाणे कुठेही ऐकले तरी श्रोता मंत्रमुग्ध होऊन जातो. लहान असो मोठे असो लता मंगेशकर यांचे गाणे ऐकल्याशिवाय दिवस उजाडत नाही. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आज त्यांच्या आठवणी आपण जाग्या करत आहोत. अशी माणसे ही लाखात एक असतात. आज आपण त्यांच्या जीवनपटाविषयी जाणून घेऊ.
लता दिदींचा जन्म :-
दीनानाथ मंगेशकरांची पहिली पत्नी नर्मदा हिच्या निधनानंतर त्यांनी नर्मदा यांच्या छोट्या बहिणीशी म्हणजेच शेवंती यांच्याशी विवाह केला. त्या गुजराती होत्या. वडील पंडित दीनानाथ मंगेशकर आणि आई माई मंगेशकर यांची ही थोरली कन्या. यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ साली मध्यप्रदेश मधील इंदूर या शहरात झाला. त्यांचे पाळण्यातील नाव हेमा हे होत. त्यांना तीन बहिणी अनुक्रमे आशा, उषा,मीना आणि एक भाऊ हृदयनाथ मंगेशकर. सर्व भावंडाना परमेश्वराने सढळ हस्ते गळा दान केलेला आहे. मंगेशकर कुटुंब मुळचे गोव्याचे. त्यांचे आडनाव हर्डीकर असे होते पण गोव्यातील मंगेशी हे त्याचे कुलदैवत म्हणून त्यांचे नाव मंगेशकर असे त्यांनी बदलून घेतले.
आपण आता यांचा लतादीदी या नावानेच त्यांचा उल्लेख करू. लतादीदींचे वडील हे संगीतकार होते त्यामुळे संगीताचे शिक्षण त्यांनी त्यांच्या वडिलांकडून सुरू केले. अवघ्या पाचव्या वर्षी लता दीदींनी त्यांच्या वडिलांच्या संगीत नाटकात बाल कलाकाराची भूमिका केली होती.
त्यांचे बालपण हे सांगली जिल्ह्यात गेले. अस बोलल जात की त्या एकच दिवस शाळेत गेल्या. याची कारण बर्याच ठिकाणी वेगवेगळी पहायला मिळतात. कुणी म्हणत की त्यांना त्यांच्या छोट्या बहिणीला शाळेत घेऊन जायचं होत पण शाळेने ती परवानगी नाकारली. कुणी म्हणत यांच्याकडे शाळेची फी भरण्याचे पैसे त्यावेळी नव्हते, किंवा त्यांच्यावर संपूर्ण घराची जबाबदारी पडलेली असल्यामुळे त्यांना शिक्षणपेक्षा पैसा कमावणे महत्वाचे होते.
वयाच्या १३ व्या वर्षीच कुटुंबाचा भार पेलला:-
लतादीदींच्या वडिलांचे निधन १९४२ साली झाले त्यावेळी लतादीदी फक्त १३ वर्षांच्या होत्या. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. तेव्हा त्यांचे एक नातेवाईक म्हणजेच नवयुग चित्रपट कंपनीचे मालक मास्टर विनायक यांनी मंगेशकर परिवाराची काळजी घेतली. मास्टर विनायक यांनीच लतादीदींची एक गायक आणि अभिनेत्री म्हणून ओळख करून दिली. १९४५ साली मास्टर विनायक यांचे कार्यालय मुंबई मध्ये स्थलांतरित झाले त्यांच्या बरोबर मंगेशकर कुटुंबिय सुद्धा मुंबईत आले. त्यावेळी लतादीदी उस्ताद अमानत आली खान (भेंडीबाजारवाले) यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेऊ लागल्या. पण भारत पाकिस्तान फाळणी नंतर उस्ताद अमानत खान पाकिस्तानात परत गेले. तसेच तुलसीदास शर्मा आणि देवासच्या रजबअली घराण्याचे अमानतखाँ हे लता मंगेशकर यांचे शास्त्रीय संगीतातील प्रमुख गुरू होत.
त्यावेळचे बहुतेक संगीत रचनाकार हे मुस्लिम होते. त्यामुळे त्यांच्या रचनांचा लहेजा हा उर्दू होता. पण लतादीदी मराठी असल्याने त्यांना ते शब्द उच्चारणे जड जात होते. एकदा तर दिलीप कुमार यांनी त्यांच्या मराठी मिश्रित उच्चारावरून त्यांची चेष्टा केली होती. तेव्हा दिदींनी शफ़ी नावाच्या मौलवींकडून उर्दू उच्चारांचे धडे घेतले होते.
लता मंगेशकर यांची गाण्याची कारकीर्द :-
१९४८ मध्ये त्यांना गुलाम हैदर यांनी त्यांच्या मजबूर या चित्रपटात त्यांना गाण्याची संधी दिली, लतादीदींनी या संधीचे सोने केले. त्यानंतरचे त्यांचे चार चित्रपट म्हणजे “महल” दुलारी, बरसात आणि अंदाज या चारही चित्रपटांची गाणी लोकप्रियतेच्या विलक्षण उंचीवर पोहोचली. त्यांच्या गायनाने पार्श्वगायनाचा चेहरा मोहरच बदलून टाकला.
त्यांनी स्वतःची अशी एक विशिष्ट शैली विकसित केली होती. लतादीदींची लहान बहीण, आशा भोसले, या देखील १९५० च्या उत्तरार्धात पुढे आल्या आणि त्या दोघी १९९० च्या दशकापर्यंत भारतीय पार्श्वगायनाच्या राणी होत्या. लतादीदींच्या आवाजात एक विशेष अष्टपैलू गुणवत्ता होती, संगीतकार सी. रामचंद्र आणि मदन मोहन यांनी तिच्या आवाजाला एक एक पैलू पाडले. त्या वेगवेगळ्या दिग्दर्शकांसाठी वेगवेगळ्या शैली मध्ये गायल्या. त्यांनी दिल अपना और प्रीत परायी (१९६०) या चित्रपटासाठी ‘अजीब दास्तान हैं ये’ या सारखी पाश्चात्य शैली मधील गाणी तसेच सन १९६१ साली आलेला ‘हम दोनो’ या चित्रपटासाठी अल्लाह तेरो नाम सारखी भजने गायली. त्या काळातील सर्वात ग्लॅमरस हिरोईनसाठी लतादीदींनी आवाज दिला होता.
१९५० ते १९७० ही दशके भारतीय चित्रपट संगीतातली सुवर्ण वर्षे मानली गेली त्यावेळी एका पेक्षा एक चांगले गायक, संगीतकार, तसेच दिग्दर्शक होते. सगळ्यांनी मिळून जे काही संगीत निर्माण केले त्याला लतादीदींच्या स्वरात स्वर बद्ध केले गेले. त्यामुळे आपल्याला चांगल्या संगीताचा आनंद घेता आला.
१९७८ मध्ये राज कपूर दिग्दर्शित ब्लॉक बुस्टर चित्रपट “ सत्यम शिवम सुंदरम “ यातील मुख्य गाणे हे लता दिदींनी गायले होते. त्या वर्षातल्या सर्वात टॉप गाण्यांमधले ते एक गाणे होते. या चित्रपटची थीम खरी अशी होती की एक सर्वसाधारण दिसणारी गोड गळ्याची मुलगी, तिच्या प्रेमात आकंठ बुडालेला एक पुरुष. आणि ती सर्वसाधारण मुलगी म्हणजे लता मंगेशकर. याचा उल्लेख राज कपूर यांची कन्या रितू नंदा यांच्या पुस्तकात केला आहे.
अनिल विश्वास, शंकर जयकिसन, सचिन देव बर्मन, नौशाद, हुसनलाल भगतराम, सी रामचंद्र, सलिल चौधरी, सज्जाद हुसेन, वसंत देसाई, मदन मोहन, खय्याम, क्ल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, राहुल देव बर्मन यांच्यासारख्या दिग्गज संगीतकारांची पहिली पसंती या लतादीदीच होत्या. काही चित्रपट तर फक्त लता दिदींच्या गाण्यांमुळे प्रसिद्धीस आले. त्यांचा सरळ स्वभाव आणि त्यांची मेहनत ही त्यांच्या गाण्यांमधून दिसते होती.
१९९० नंतर त्यांनी कामाचा व्याप थोडा कमी केला तरीही डर, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, मोहब्बते, १९४२ लव्ह स्टोरी, रंग दे बसंती यासारख्या चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी आपला आवाजाचा जलवा दाखविला आहे.
आणखी एक गोष्ट लता दिदींच्या बाबतीतली, अभिमान चे निर्देशक हृषीकेश मुखर्जी यांचे आणि लता दिदींचे संबंध असे होते की, लता दिदिनी मुखर्जींच्या कामासाठी कधीही एक पैसही घेतलेला नाही. कधी त्यांच्याकडून फी ची विचारणा झाली तर लता दीदी त्यांना म्हणायच्या, की ते त्यांच्या भावासारखे आहेत. तर त्यांच्याकडून कसे काय पैसे घ्यायचे.
त्यांचा स्वभाव सरळ असला तरीही त्यांचे काही अपवादात्मक वाद खूप चर्चेत राहिले आहेत. जसे की त्यांचा एकदा सचिन देव बर्मन यांच्या बरोबर वाद झाला होता त्यावेळी त्या जवळ जवळ पाच वर्षे त्यांच्या बरोबर काम करीत नव्हत्या. तसेच एकदा गाण्यांच्या रोयलटी वरून मोहम्मद रफी त्यांच्यावर नाराज होते. त्यावेळीही त्या त्यांच्या बरोबर गात नव्हत्या. पण त्यानंतर त्यांचा वाद शमला आणि त्यांचे संबंध सुधारले.
लता दिदीनी स्वतःसाठी कधी वेळच नाही दिला. त्यांचे संपूर्ण जीवन त्यांच्या कुटुंबासाठीच अर्पण केले होते. म्हणून त्यांनी लग्न सुद्धा केले नाही.
लता मंगेशकर यांना मिळालेले पुरस्कार:
लता मंगेशकर यांनी खूप पुरस्कार मिळविले यात २००१ साली भारत रत्न, १९६९ साली भारतातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार पद्म भूषण, १९९९ मध्ये पद्म विभूषण, १९९७ साली महाराष्ट्र भूषण पुरस्कार. २००९ साली फ्रांस चा फ्रेंच लीजन ऑफ ऑनर हा पुरस्कार दिला गेला.
असे अगणित, कित्येक पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत.
खासदार लतादीदी:-
१९९९ ते २००५ मध्ये लतादीदी राज्यसभेच्या खासदार होत्या पण नैतिकतेला धरून त्यांनी कधी पगार घेतला नाही किंवा त्यांनी कधी सरकारी निवस्थान वापरले नाही. त्या संसदेच्या अधिवेशनाला उपस्थित न राहिल्याने त्यांना टीकेला सामोरे जावे लागले होते.
लतादीदींचे निधन:
अशा लता दिदींना वयाच्या ९२ व्या वर्षी कोविड सारख्या भयंकर आजाराला सामोरे जावे लागले आणि त्यांनी ६ फेब्रुवारी २०२२ रोजी अखेरचा श्वास घेतला.
एआय तंत्रज्ञानने लता दिदींचा आवाज
आता एआयच्या तंत्राने एका यूट्यूबरने लता दिदींच्या आवाजात राम आएंगे हे गाणे रेकॉर्ड करून दिदींना आदरांजली वाहिली आहे. पण त्या युट्यूबरने हा व्डिडीओ फक्त गायक संगीतकार यांचा आदर ठेवूनच सादर केला आहे आणि त्याचा कुठलाही पैसे कमवण्याचा हेतू नाही हे स्पष्ट केले आहे.
तुम्हाला ही माहिती (Lata Mangeshkar Information in Marathi) कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.
धन्यवाद !
लेखिका सपना कद्रेकर, मुंबई
Khup Sunder mahiti
Thank you