सूर्य संक्रमण , प्रकृती आणि संक्रांती
सर्वांना मकर संक्रांतीच्या स्नेहमय शुभेच्छा ! तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला !! अगदी लहानपणापासून संक्रांत आणि तीळगुळ हे समीकरण आपल्याला चांगले माहिती आहे. तिळ आणि गुळ घालून केलेले पौष्टिक लाडू तसेच पोळ्या सर्वांनाच आवडतात. तसेच मित्रांबरोबर खाल्लेली बोरे , उडवलेले पतंग , घरोघरी जाऊन वाटलेले लाडू हि सर्व मजा संक्रांतीला करता येते. इंग्रजी वर्षाचा पहिला सण संक्रांतने सुरु होतो त्यामुळे सगळीकडे उत्साह खूप असतो. २०२४ हे वर्ष लीप वर्ष असल्याने संक्रांतीची तारीख १५ जानेवरी आहे. त्यामुळे या वर्षी १४ ऐवजी १५ जानेवारी ला संक्रांत आली आहे. या लेखात आपण संक्रांत सण कुठे कसा साजरा केला जातो हे पाहणार आहोत. त्याच प्रमाणे संक्रांतीचा इतिहास आणि त्याचे शास्त्रीय तसेच अध्यात्मिक महत्व काय हे देखील पाहणार आहोत.
संक्रांत सण हा निश्चित पणाने ऋतू बदलाचा, कापणीच्या हंगामाचा सण आहे हे आपण सर्व जाणतोच . या काळात सर्व जगाला चालविणाऱ्या सूर्याचे च संक्रमण होत असते. सूर्याची गती, सूर्याचे आणि पृथ्वी मधील अंतर यात बदल होत असतो . ही काही साधी घटना नव्हे. दिवस लहानाचा मोठा होत जातो. थंडी कमी होऊन उन्हाचे मोहक उबदार अस्तित्व वातावरणात जाणवू लागते. वसंताची चाहूल लागणार असते. संक्रांतीला या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर अजून देखील अनेक पैलू आहेत.
सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक,ऐतिहासिक, भौतिक, आधी भौतिक इत्यादी असे अनेक वेगवगळे महत्व आहे . संक्रांत सणाची व्यापकता लक्षात यावी या साठी या सर्व पैलुंबद्दल इथे थोडक्यात विचार मांडले आहेत. हिंदू धर्मातील बरेचसे सण हे सूर्याच्या गतीशी, पर्यायाने ऋतू बदलाशीच निगडित आहेत. वाऱ्याची दिशा, वेग यात बदल होतात . सर्व ठिकाणी परमेश्वर पाहून , सर्वांप्रती स्नेह आणि जिव्हाळा वाढेल ही दृष्टी ठेवून देखील हिंदू सणांची रचना केली आहे.पृथ्वी, ग्रह, तारे, नक्षत्र यांचे प्रती देखील कृतज्ञता पाळणारी आपली भारतीय संस्कृती आहे.
सूर्य हा तर पंच महा भूतातील तेजाचे , संवर्धनाचे प्रतीक . म्हणून सूर्याला अधिक महत्व आहे. मकर संक्रांत ही सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा साजरी केली जाते.तसे तर जेव्हा जेव्हा सूर्य राशी परिवर्तन करतो, तेव्हा तेव्हा ती संक्रांत च असते .
मकर संक्रांत महत्वाची कारण दक्षिण दिशेकडून उत्तरेकडे सरकत जाणाऱ्या सूर्याच्या या प्रवासामुळे वार्षिक कालखंडाचे दक्षिणायन आणि उत्तरायण असे भाग पडतात.
भारतीय शास्त्र आणि अध्यात्म दोन्ही मध्ये सूर्य भौतिक म्हणजेच आपल्या पृथ्वीवरील जीवनाचा आत्मा मानला जातो . त्याच प्रमाणे सूक्ष्म किंवा अभौतिक घटकांचा देखील आत्मा मनाला जातो. ऋग्वेदा मध्ये सूर्याचा उल्लेख अचल आत्मा असा केला आहे. संक्रांतीला याच भावनेने सूर्य उपासना केली जाते .जीवन शक्ती आणि आरोग्य देणारी देवता म्हणून सूर्याचे पूजन केले जाते.सूर्यनमस्कार संकल्प याच मुहूर्तावर केले जातात.स्थूल शरीर आणि सुक्ष मन या दोन्हींवर सूर्याचा परिणाम होत असतो.
सर्व सजीवांचा चालक आणि पालक असलेल्या सूर्याचा हृदय, रक्ताभिसरण, डोळे, मेंदू , दात, हाडांचे आरोग्य, नखे, यांवर विशेष प्रभाव पडतो.सण वार साजरे करताना आपण आपल्या पृथ्वी मातेचा सुधा जास्त स्नेहपूर्वक विचार केला पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आजकाल D3 ची कमतरता हा आजार बळावत जाण्याचे मुख्य कारण प्रदूषणामुळे सूर्य किरण पृथ्वी पर्यंत पोहोचताना किरणांना येणारा अडथळा हाच आहे.
सूर्य आणि पृथ्वी हेच आपले मूळ पालक आहेत हे हिंदू संस्कृती शिकवते . आणि ते सत्य देखील आहे.या आपल्या मात्या पित्याच्या ठायी कृतज्ञता व्यक्त करण्याचे औचित्य म्हणजे मकर संक्रांती होय . हिवाळ्यात विपुल प्रमाणात मिळणाऱ्या विविध भाज्या, फळे भारतासारख्या शेती प्रधान देशाला संपन्नता देतात. आपल्याला मिळणारे थोडे इतरांना देणे ही हिंदू संस्कृती आहे.
महाराष्ट्रात संक्रांती कशी साजरी करतात ?
महाराष्ट्रात संक्रांतीला म्हणूनच पौष्टिकता देणारे तीळ, गूळ थोर मंडळी सानांना देतात . गाजर , हरभरा, गहू लोंब्या, हुरडा, ऊस, बोरे इत्यादी चे वाण स्त्रिया देवाला दाखवतात आणि एकमेकींना देखील सौभाग्य वाण म्हणून देतात.
या दिवसात पश्चिमी वारे चांगले वाहत असतात त्या मुळे बऱ्याच प्रदेशात मुले आणि पुरुष लोक पतंग उडवण्याचा खेळ खेळतात. हार, जित, पतंग काटणे असे गुण्या गोविंदाने स्वीकारले जात आनंद लुटला जातो. अशा रीतीने सर्व जण या आनंदी सणाचा आस्वाद घेतात.
आधीचे सारे भांडण तंटे, रुसवे फुगवे, मत भेद, गैरसमज, दुरावा मिटवण्यास संक्रांती सारखा दुसरा सण नाही.
” तीळ गुळ घ्या गोड बोला ” म्हंटले की त्यात सारे येते. क्षमा करणे, क्षमा मागणे, आदर दाखवणे, स्नेह व्यक्त करणे, एकमेकांशी तीळ गुळासारखे बांधून (कनेक्ट ) राहणे सगळे संदेश ज्याचे त्याला या एका वाक्यात समजतात.
देशातील विविध भागात संक्रात हा सण कसे साजरा केला जातो?
मकरसंक्रांतीच्या दिवशी
– कलकत्ता शहराजवळ गंगासागर नावाच्या ठिकाणी गंगासागर यात्रा आयोजित केली जाते.- हिमालयातील किर्तीनगर , देवप्रयाग, व्यासघाट या ठिकाणी मेळे भारतात.
– केरळ मध्ये शबरीमला डोंगरावर ‘मकरज्योतीचे’ दर्शन घेण्यास अनेक भाविकांची गर्दी होते.-
आसाम येथे माघ बिहू , पंजाब मध्ये माघी , हिमाचल प्रदेश मध्ये माघी साजी, जम्मू मध्ये माघी संग्रांध, हरियाणात सक्रत, राजस्थान येथे सक्रत , तामिळनाडू मध्ये पोंगल ,पश्चिम बंगाल मध्ये मोकोर सोन क्रांती, उत्तराखंड येथे घुघुटी , बिहार मध्ये दहीचुरा अशा प्रकारे विविध ठिकाणी विविध नावांनी हा सण आपापल्या पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो .
यात एकमेकांच्या घरी भेटी देणे, भेट वस्तू देणे, तिळगुळ देणे, नृत्य करणे , पतंग उडवणे, मेळे भरवणे, शेकोटी पेटवून त्या भोवती गप्पा गोष्टी, नृत्य असे रंजक कार्यक्रम करणे इत्यादीचा समावेश असतो.
– भारताबाहेर देखील नेपाळ मध्ये देखील माघे संक्रांती , थायलंड मध्ये सोंगक्रान , म्यानमार येथे थिंगयान , कंबोडिया येथे मोहन सोंगक्रान नावाने हा दिवस साजरा केला जातो.
– पौराणिक कथे प्रमाणे संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दिवशी संकारसूर या राक्षसाचा वध केला आणि सामान्य जीवन संरक्षित आणि सुखी केले अशी कथा आहे.
दुसऱ्या दिवशी तिने किंकरासुरा नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले तो किंक्रांत दिवस समजला जातो.
– प्रत्येक वर्षी मकर संक्रांतीचे वाहन हे बदलत असते.या वर्षी घोडा हे मकर संक्रांतीचे असणार आहे तर उपवाहन हे सिंहीण आहे. या बाबतीत स्पष्टता देणारे शास्त्रीय अथवा अध्यात्मिक प्रकाश पाडणारे साहित्य अजून उपलब्ध नाही.
– ऐतिहासिक हिंदू महाकाव्य महाभारतात देखील मघा मेळ्याचा उल्लेख आहे.
त्या काळात पवित्र नद्या किंवा तलावांवर जाऊन सूर्याला कृतज्ञतेने अर्घ्य देऊन त्याचा कृपा वर्षाव असाच साऱ्या सृष्टीवर राहू दे या साठी प्रार्थना करत असत.
– आजही भारतात दर बारा वर्षांनी कुंभमेळ्या सह मकर संक्रांत साजरी करतात – जगातील मोठ्या संख्येने , लक्षावधी हिंदू या कार्यक्रमाला उपस्थित राहतात.
प्रयागराज संगमावर, जेथे गंगा आणि यमुना नद्या मिळतात तेथे स्नान आणि सूर्य पूजा करण्याची प्रथा आहे. ही परंपरा चालवण्याचे कार्य प्रस्थापित शंकराचार्यांना दिले जाते.
– इच्छा मरणाचे वरदान लाभलेल्या पितामह भीष्मांनी सुधा उत्तरायण लागल्यावर च आपले प्राण पंच तत्वात विलीन केले. भारतीय परंपरे प्रमाणे उत्तरायणाचा काळ दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ म्हणून !
– दानाच्या दृष्टीने देखील या सणाचे मोठे महत्व आहे. संक्रांतीच्या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे हे सांगणाराश्लोक देवीपुराणात आढळतो
संक्रांतौ यानि दत्तानि दव्यकव्यानि मानवै:।
तानि नित्यं ददात्यर्कः पुनर्जन्मनि जन्मनि।।
याचा शाब्दिक अर्थ असा ,
की या दिवशी जर कृतज्ञता पूर्वक दान केले तर सूर्य प्रत्येक जन्मात ते दान अनेक पटीने तेच दान कर्त्याला देत राहतो.
आणि याचा मतितार्थ असा , की संचय करण्याचा मोह न ठेवता, जे जास्तीचे मिळते ते समाजातील गरजूंना देऊन त्यांना देखील संतुष्ट ठेवले तर आपसूक च सगळीकडे धन धान्य, समृद्धी येऊन प्रकृतीचा समतोल राखला जाईल .खरे तर आत्ताच्या घडीला या दान यादीत रक्त दान , अन्नदान, श्रम दान, विद्यादान, नेत्रदान याही गोष्टींचा समावेश व्हायला हवा.
अशा तऱ्हेने संक्रांत हा धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, ऋतु चक्राचा, स्नेहवर्धनाचा पूर्वापार चालत आलेला असा निसर्ग उत्सव आहे असे मानल्यास योग्य ठरेल.
ही संक्रांत आपल्या सर्वांना सुख समृद्धी घेवून येवो आणि पृथ्वीवर सुयोग्य संतुलन देणारे हे संक्रमण होवो ही प्रार्थना !
सौ.ज्योती आनंद एकबोटे,पुणे
अतिशय सुंदर नाविन्यपूर्ण माहिती दिली आहे …खूप छान …अभिनंदन.!!
मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏🏼🌹
खूप छान, अगदी माहितीपूर्ण लिहिलं आहे.👍🏻👏🏻धन्यवाद.
मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏🏼🌹
खूप माहिती पूर्ण लेख.धन्यवाद.
मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏🏼🌹
माहितीपूर्ण लेख 👍
मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏🏼🌹
छान लिहिले आहे , ज्योती
व्यवस्थित धांडोळा घेतला आहे
मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏🏼🌹
अतिशय सखोल, माहितीपूर्ण लेख.
मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏🏼🌹
खूप छान माहितीपूर्ण लेख.
फार सुंदर माहिती.. अतिशय उपयुक्त असा लेख..
मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏🏼🌹
सुंदर लेख
मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏🏼🌹
खूप छान लेख
मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏🏼🌹
माहितीपूर्ण लेख. संक्रांती चा धार्मिक आणि सामाजिक अर्थ याची वीण सुरेख वाटली. खूप खूप शुभेच्छा.
मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏🏼🌹
Nice and informative article!