लेखक :- प्रज्योत प्रशांत झाडे ( राम ), सोलापूर
मिस्टर बिनधास्त
‘ लेमन गोळ्या ऽऽ , काकडी घ्या.. मसाला काकडीऽऽ , बिस्लरी – बिस्लरी ‘ असे अनेक निरनिराळे आवाज कानावर पडत होते. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांच्या सूचना माईक वरून दिल्या जात होत्या. खूप कोलाहल होता. इतक्या गर्दीतही एका माणसाने माझं लक्ष वेधून घेतलं. इन शर्ट केलेला, टापटीप असा माणूस काकड्यांची पाटी डोक्यावर घेऊन, चेहऱ्यावर एक मोठं स्मितहास्य ठेवत “ गरम गरम काकडीऽऽ “ असं ओरडत जात होता. त्याच्या मागे मागे एक मुलगा चालत होता. बराच वेळाने माझ्या लक्षात आलं की त्या मागे मागे फिरणाऱ्या मुलाची पाटी असून हा माणूस काकडी विकून त्याच्याकडे पैसे देत आहे. मनोमन प्रश्न पडला, कोण असेल हा अवली माणूस ? इतक्यात तो मोठ्या उत्साहाने ओरडला “ कोल्हापूर गाडी आली रे ऽऽ “ असं म्हणून पाटी त्या मुलाकडे देऊन गाडीकडे धावत गेला. मी ही घाईने धावलो. कदाचित त्याने सीट पकडली असेल असं वाटलं पण गाडीत सर्वात आधी चढलेला तो माणूस इतर वयस्कर माणसांना त्याच्या पिशव्या उचलून ठेवायला मदत करीत होता. “ निवांत चढा, सगळ्यांना जागा मिळेल. “ असं म्हणत होता
आता गाडीत जागा उरली नव्हती, दोघांच्या सीटवर तिघे तिघे बसले होते. तो एकटाच ड्रायव्हरच्या केबिन जवळ उभा होता. कंडक्टर सोबत काहीतरी बोलून, सर्वांसमोर उभारला. साऱ्या प्रवाश्यांवरून त्याने नजर टाकली आणि एसटीची बेल जोरजोरात वाजवायला सुरू केली. आता साऱ्यांचंच लक्ष त्याच्याकडे गेलं. माझीही उत्सुकता वाढली होती.
तो म्हणाला “ नमस्कार, मी काही विकायला वगैरे आलेलो नाहीये. मला आधी सांगा, सगळे चढले का गाडीत ? कोणाचं नातेवाईक खाली राहिलंय का? “
कोणाकडून स्पष्ट उत्तर आलं नाही, काहींनी नुसत्या मना हलविल्या. त्याने हसुन बेल मारली, आणि मोठ्याने म्हणाला “ जाऊद्या गाडी ड्रायव्हर साहेब. “
तो पुढे बोलू लागला “ नमस्कार, मी… माझं नाव नाही सांगत, निर्लज्जम् सदासुखी या उक्तिवर जगणारा मी. जनाची बाळगतो, पण मनाची लाज सोडली आहे. त्यामुळे आयुष्य बिनधास्त जगतोय. इतकाच माझा परिचय. “
“ मी इथे एकच उद्देश घेऊन उभा आहे, की तुमचा प्रवास आनंदी आणि आठवणीत राहण्यासारखा घडविणे. आजकाल बघतो तर बरेचजण शेजारी बसलेल्या माणसाला सुद्धा बोलत नाहीत, जरा कंटाळा आला की काढला मोबाईल अन् बसला रिल बघत. “
“ ते बघा “असं म्हणत त्याने एका मुलाकडे हात केला , तो खरंच इयरफोन लावून मोबाईल मध्ये काहीतरी बघत होता. त्याच्या शेजारी बसलेल्या काकाने त्याला जागं केलं. त्याच्याकडे बघून तो अवली माणूस म्हणाला “ अरे बाबा, इकडे लक्ष दे. काय ठेवलंय त्या मोबाईल मध्ये ? तर, मंडळी आपल्यातले काहीजण असे असतील ज्यांनी पत्रांचा काळ अनुभवला आहे. त्यांना माहिती आहे की एखाद्या लांबच्या माणसाशी बोलायचं असेल तर किती दिवस लागायचे. एखाद्या दुर्घटनेची बातमी किती उशिरा पोहचायची. पण त्या पत्रात बऱ्याच भावना उतरल्या जायच्या. आता आलंय ते डबडं फोन, नुसतं जीवावर आल्यासारखं बोलायचं अन् ठेवायचं. “ तो सांगतच होता इतक्यात माझा फोन वाजला. गाडीत हशा पिकला. हास्य आणि भीती यांचा संगम माझ्या चेहऱ्यावर उमटला असेल. तो माझ्याकडे बघून म्हणाला “ उचल उचल “
सर्वांचं लक्ष माझ्याकडे आहे हे बघूनच मी हसत म्हणालो “ कंपनीचा कॉल आहे. “ मी खोटं बोललो हे त्याला कळलं असेल, पण तो काहीच बोलला नाही.
तो पुन्हा सर्वांवर नजर टाकीत म्हणाला “ तर मी काय म्हणत होतो ? हा. मोबाईल. मोबाईल मुळे जग जवळ येऊन सुद्धा नकळत दुरावा वाढलाय. आधी प्रवासात लोकं गप्पा मारत , गाणी म्हणत जायची. आणलेली शिदोरी वाटून, मिळून मिसळून खायची. पण आता? आता गाणी ऐकणे , पिक्चर बघणे असल्या गोष्टी होतेत. हीच गोष्ट बदलायचा आज मी छोटासा प्रयत्न करत आहे. तुमचा प्रवास आठवणीत राहण्यासारखा करणे हा एकच उद्देश. “
एक खोल श्वास घेऊन त्याने पुन्हा एकवार आपली नजर फिरवली, कदाचित त्याला हवे तितके लोकं अजून गुंतले नसावेत. तो म्हणाला “ आज चौदा तारीख , म्हणजे बालदिन. तर आज आपण आपल्यातल्याच एका छोट्या मैत्रिणीला शुभेच्छा देण्यासाठी बोलावूया. “ असं म्हणत त्याने आई बाबांच्या मध्ये बसलेल्या एका छोट्या मुलीकडे हात केला. जेमतेम दहा वर्षाची असेल ती. ती पुढे यायला लाजत, घाबरत होती. शेवटी आईनेच तिला हाताला धरून समोर आणलं. आता एसटी म्हणजे जणू कार्यक्रमाचा मंच झाला होता, प्रवासी प्रेक्षकांची भूमिका पार पाडत होते. ती मुलीला एक लेमन गोळ्यांचं पाकीट दिलं आणि विचारलं. “ बाळा तुझं नाव काय ? “
ती मान खाली ठेवूनच म्हणाली “ तन्वी “
“ अरे वाह ! छान नाव आहे की. तन्वी मला सांग तुला काय करायला आवडत ? चित्र काढायला आवडतं ? कागदांची खेळणी बनवायला की अजून…”
इतक्यात ती उत्तरली “ श्लोक म्हणायला आवडतं “
माझ्यासारखा तो सुद्धा चकित झाला. “ सगळ्यांना म्हणून दाखवशील? मोठ्या आवाजात ? “
ती ‘ हो ‘ म्हणाली. मी मागे नजर टाकली तेव्हा मागच्या सीट वरचे लोक उभारले होते. तन्वी दिसत नसल्यामुळे उभारले असावेत. तिने आधी दोन तीनदा ‘ ह्म ह्म ‘ करत सुर लावला, आणि सरस्वतीचा ‘ या कुन्देन्दुतुषारहारधवला….. ‘ हा श्लोक तिच्या मधाळ आवाजात गायला. मला शास्त्रीय संगीतात रस असल्यामुळे थोडीशी चिकित्सक वृत्ती मला चुका शोधण्यास भाग पाडत होती. पण तन्वीने मला ती संधी दिली नाही. ती तिच्या सुरांवरून, आणि पट्टीतून जराही एकडे तिकडे घसरली नाही की उच्चारात चुकली नाही. तिच्या वयाची, आणि प्रतिभेची सांगड घालता तिने केलेला रियाज आणि आई वडिलांची गायन शिकविण्याची असलेली तीव्र ईच्छा यांची जाणीव झाली. मी अस्तित्वात आलो तो टाळ्यांच्या कडकडाटाने. तिने नम्रपणे सर्वांना हात जोडले आणि काकांना हातवारे करून जाऊ का विचारले. त्याने ही मानेनेच होकार दिला.
तो पुढे काहीतरी बोलणार इतक्यात काहीतरी आठवलं मोठ्याने म्हणाला “ ओ कंडक्टर, तिकटं काढायचेती की न्हाई? “
कंडक्टर हसत हसत उठला “ काढायचे की, पोरीच्या गाण्याच्या नादात ध्यानातच न्हाई राहिलं. चला पाहिला मान तुमचा, बोला कुठं जायचं? “
तो म्हणाला “ पंढरपूर. “ त्याच्या उत्तरा बरोबर मी थोडा निराश झालो.
कंडक्टर “ आं ? गाडी अजून कोल्हापूर पर्यंत जायची अन् तुम्ही लगी अर्ध्या तासात उतरणार व्हय ? “ असं म्हणत तिकीट त्याच्या हातात दिलं, पैसे चुकते केले. त्यांचा तो संवाद गाडीतील प्रत्येक माणूस ऐकत होता, जादूची छडी फिरविल्या प्रमाणे इथे आपुलकीचं वातावरण निर्माण झालं होतं.
तो म्हणाला “ अर्धा तास आपण धमाल करू की. “
पुन्हा तो सर्वांकडे बघून मोठ्याने म्हणाला “ बघा, ही मूर्ती लहान पण कीर्ती महान असल्यासारखी तन्वी सारखे अजून किती कलाकार आपल्या गाडीत आहे, हे माहिती नसतं. तरीही आपण साधी शेजारी बसलेल्या माणसाची सुद्धा ओळख काढत नाही. हेच दुर्दैव. असो, तन्वीने गायनाने सुरुवात केली आहेच तर आज आपण सगळे मिळून भजन म्हणुया. चालेल ? “
वर्गात असल्या प्रमाणे सगळ्यांनी एका सुरात उत्तर दिले “ हो “ त्यांनतर त्याने विठ्ठलाचे अभंग म्हणायला चालू केला, बऱ्याच लोकांनी त्याच्या सुरात सुर मिसळला, काहींच्या टाळ्यांनी त्याला साथ दिली. मी सुद्धा नकळत गाऊ लागलो. ड्रायव्हर सुद्धा मान डोलवत होता. अगदी घरचा कार्यक्रम असल्यासारखं वाटत होतं. मध्येच गाडी थांबली तेव्हा एक आज्जी काठी टेकत वर चढल्या, त्याने पिशवी उचलून वर ठेवली आणि हाताला धरून त्यांना वर घेऊन आला. गाडीत बसायला जागा नव्हती. त्याने तिथूनच मोठ्याने विचारलं. “ आज्जीला बसायला जागा कोण देणार ? “ साताठ जण उभे राहिले, त्यांच्यात मी ही होतो. एकाच्या सीट वर आज्जीला बसवून तो म्हणाला “ बघा, माणुसकी अजूनही जिवंत आहे. फक्त कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे, माणुसकीला जागवायाला. “ मला त्याची ही गोष्ट मनोमन पटली. जर तो नसताच तर आज्जी खालीच बसल्या असत्या, किंवा कंडक्टर च्या सांगण्याने कोणतरी नाखुशिने जागा दिली असती. पण आता स्वेच्छेने जागा द्यायला तयार झाले आहेत. भजन , अभंग चालूच होते. तो टाळ्या वाजवत फिरायचा. एक उत्साहित वातावरण निर्माण झालं होतं. जसं जसं पंढरपूर जवळ येत होतं तस तसा मी अस्वस्थ होत होतो. गाडी पुलावर आली, तसा तो मोठ्याने म्हणाला “ बोला पुंडलिक वरदेव… “ सगळ्यांनी साथ दिली “ हरी विठ्ठल “
कोणीतरी म्हणलं “ श्री ज्ञानदेव “
“ तुकाराम “
“ पंढरीनाथ महाराज की “
“ जय “
त्यानंतर शांतता पसरली. त्याने पुन्हा सर्वांकडे बघत म्हणाला. “ चला मी उतरतोय, पण अभंग थांबायला नाही पाहिजेत. कंडक्टर साहेब मला सांगा कोल्हापूर पर्यंत अभंग चालू राहतात की नाही ते. “
गाडी स्टँड वर आली, त्याने सगळ्यांचा निरोप घेतला अन् खाली उतरला. ड्रायव्हर कंडक्टर दोघेही त्याला निरोप द्यायला गेले. ड्रायव्हरचे पुसटसे शब्द माझ्या कानावर पडले. “ गेली चौदा वर्ष गाडी चालवतोय, पण असा आनंद पहिल्यांदाच मिळाला. “ गाडी पुढे निघाली, त्याची माझी नजरानजर झाली तेव्हा एक मोठे स्मित त्यांच्या चेहऱ्यावर झळकले आणि आपसूक माझ्याही.
तो गेल्यानंतर जेमतेम दहा मिनिटे गाडीत अभंग म्हणण्याचा प्रयत्न झाला, त्यानंतर सारा उत्साह ओसरला.
आजही कधी एसटी मध्ये बसल्यावर वाटत, आपण उठून उभा राहावं त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करावा पण धीर होत नाही. त्यांच्यासारखं मिस्टर बिनधास्त होणं जमत नाही.
लेखक :- प्रज्योत प्रशांत झाडे ( राम ), सोलापूर
(कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहे, परवानगी शिवाय कुठेही वापरू नये)