नव्या, आर्यन, जाई आणि जुई , विहान, मानस अशी सगळी बच्चे कंपनी आजोळी जमली होती. नुकत्याच उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या होत्या .ना अभ्यास,ना परीक्षा. नुसती धमाल चालली होती.
कोकणातल्या या आजोळी ही बच्चे कंपनी कैऱ्या, जांभूळा भोवती नुसती पिंगा घालत होती. इथे या मुलांची सगळ्यात आवडती गोष्ट काय असेल तर ती म्हणजे यांची लाडकी आजी आणि आजीच्या गोष्टी. रात्रीची जेवणं आटोपली की अंगणात आजोबांबरोबर शतपावली करुन ही सगळी मुले आजीच्या खोलीत जमायची आणि मग सुरू व्हायची गोष्टींची गंमत.
आताही सगळ्यांचा एकच गोंधळ चालू होता. आज सर्वांना ऐकायचा होत्या त्या केवळ जादूच्या गोष्टी . आजीनेही मग ठीक आहे म्हणत गोष्ट सांगायला सुरुवात केली.
” ऐका मुलांनो जादूची गोष्ट. फार फार वर्षांपूर्वी जलाई नावाची एक नदी होती. या नदीच्या एका काठावर वसले होते कमलेश्वर राजाचे राज्य कमलेश्वरपूर आणि दुसऱ्या काठावर वसले होते माहेश्वर राजाचे राज्य माहेश्वरपूर.
कमलेश्वर राजा फार दुष्ट होता. क्रुर होता. प्रजेला तो नेहमी फार त्रास देत असे. तिथली प्रजा फार कष्टात दिवस ढकलत होती. कमलेश्वर राजाला दूषणे देत होती आणि देवाकडे प्रार्थना करत होती की आम्हाला या जाचातून सोडव. आमचं रक्षण कर.
याउलट होता राजा माहेश्वरचा स्वभाव. राजा माहेश्वर आपल्या प्रजेवर मुलाप्रमाणे माया करायचा. खूप प्रेम होते त्याचे त्याच्या प्रजेवर . प्रजाही आपल्या या प्रेमळ आणि उदारमतवादी राजावर फार प्रेम करायची. राजाच्या सुरक्षेसाठी नेहमी प्रार्थना करायची.
असेच दिवसा मागून दिवस जात होते . कमलेश्वरपूरची प्रजा दु:खात होती तर माहेश्वरपूरची प्रजा सुखात होती पण ; त्यांना हे माहीत नव्हते की लौकरच त्यांच्या या सुखी राज्यावर राजा कमलेश्वरची वक्र दृष्टी पडणार आहे आणि एक दिवस राजा कमलेश्वर ज्या दिवसाची वाट पाहत होता तो दिवस उजाडला ” . सगळी मुले मन लावून आजीची गोष्ट ऐकत होती.
” महाराज, तुमच्या आदेशानुसार शेजारील राज्याला संदेश पाठवण्यात आला आहे. आपण त्यांच्या उत्तराची प्रतिक्षा करावी महाराज ” . सेनापती निर्मल अदबीने खाली मान घालून राजा कमलेश्वरची समजूत घालायचा प्रयत्न करत होता पण ; राजा कमलेश्वर मात्र काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
” सेनापती, आम्ही अजून वाट नाही पाहू शकत . तुम्ही सेना सज्ज ठेवा. आक्रमणाची तयारी करा. आम्हाला काहीही करून राजा माहेश्वरचे राज्य हवे आहे. कोणत्याही, अगदी कोणत्याही परिस्थितीत आम्ही माहेश्वरपूर राज्य हस्तगत करुनच राहू ” . एवढे बोलून राजा कमलेश्वर जोरजोरात हसू लागला. त्याचे ते विदारक हास्य पाहून सेनापती निर्मल सुद्धा एक क्षण घाबरला.
“सेनापती, आम्हाला माहेश्वरपूर का हवे आहे माहिती आहे तुम्हाला ? आम्हाला माहेश्वरपूर हवे आहे कारण तो आरसा . हा तो आरसा हवा आहे आम्हाला “. राजा कमलेश्वरच्या चेहऱ्यावर क्रुर भाव पसरले होते.
” क्षमा असावी महाराज, पण ; एक आरसा हवा आहे म्हणून हा युद्धाचा खटाटोप कशाला मांडायचा ? माहेश्वरपूर मध्ये जसा आरसा आहे अगदी तस्साच आरसा इथे आपल्या राज्यात म्हणजेच कमलेश्वरपूर मध्ये मिळेल महाराज. तुमची आज्ञा असेल तर त्वरीत हजर करु असा आरसा ” . सेनापती राजा कमलेश्वरला युद्धापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत होता. राजा कमलेश्वरने आपले ऐकावे असे त्याला मनापासून वाटत होते कारण माहेश्वरपूर वरती चाल करुन जाणे आणि राजा माहेश्वर सोबत युद्ध सोपे नव्हते. पण ; राजा कमलेश्वर स्वतःच्या मतांवर ठाम होता.
” सेनापती , तो आरसा काही साधारण आरसा नाही जो सहज मिळेल. तो एक दिव्य जादूई आरसा आहे. जादूई आरसा. म्हणूनच हवा आहे आम्हाला तो आरसा. खूप किमया ऐकली आहे आम्ही त्या आरशाची . हजारो वर्षांपासून हा खजिना एका गुप्त ठिकाणी लपवून ठेवण्यात आला होता. खूप लोकांनी प्रयत्न केला तो आरसा शोधायचा पण ; त्यांच्या हाती अपयश आले. काही लोकांना हा अनमोल खजिना सापडला देखील पण ; दुर्दैव त्यांनाही आरसा हाती लागलाच नाही ” . राजा कमलेश्वर डोक्याला हात लावून सिंहासनावर बसला होता.
” महाराज क्षमा असावी पण ; आम्हाला अजूनही समजत नाही की जर लोकं त्या आरश्यापर्यंत पोहोचली होती तर तो आरसा हस्तगत का नाही करु शकले ? ” सेनापती अजूनही संभ्रमात होता.
” सेनापती आम्ही म्हणालो ना की तो आरसा साधारण आरसा नाही. तो जादूई आरसा आहे . फार पूर्वी एका साधूने त्याच्या सर्वात हुशार शिष्याला हा आरसा सुपूर्द केला होता. तो शिष्य केवळ हुशारच नाही तर स्वभावाने अतिशय उदार आणि मायाळू होता. साधूने त्याला सांगितले की हा आरसा केवळ भल्या व्यक्तीकडेच राहील. कोणत्याही वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या हातात जर हा आरसा लागला तर त्याचा दुरुपयोग होईल म्हणून प्राणापेक्षाही या आरश्याला जपून ठेव ‘ . राजा कमलेश्वर भल्या मोठ्या खिडकी जवळ उभा राहून दूरवर पाहत बोलत होता.
” सेनापती निर्मल , शिष्याने साधूला विचारले की अशी काय किमया करतो हा आरसा ? तेव्हा साधूने उत्तर दिले की ज्या व्यक्तीच्या हातात हा आरसा येईल त्या व्यक्तीने आपले प्रतिबिंब आरश्यात पाहून जे त्या आरश्याकडे मागेल ते त्याला मिळेल म्हणून हा आरसा जपून ठेव. शिष्याने तो आरसा जंगलाच्या पलीकडे टेकडीवर असणाऱ्या एका गुहेत व्यवस्थित ठेवला पण ; त्याच्या सोबत असणाऱ्या दुसऱ्या शिष्याने सगळे ऐकले होते आणि पाहीलेही होते की तो आरसा कुठे लपवून ठेवण्यात आला आहे. पहिला शिष्य तिथून निघून जातात दुसरा शिष्य त्या गुहेत पोहोचला पण ; तिथे पोहोचताच त्याला कळले की पहिल्या शिष्याने आपल्या विद्येचा वापर करुन आरसा सुरक्षित केला आहे. खूप प्रयत्न केले पण आरसा काही हाती लागला नाही ” . हताश होऊन राजा कमलेश्वरने एक सुस्कारा सोडला.
” सेनापती , तो पहिला शिष्य राजा माहेश्वरचा पूर्वज होता तर दुसरा शिष्य आमचा पूर्वज होता. जादूई आरश्याची सत्यता आम्हाला काही दिवसांपूर्वी आमच्या मरणासन्न अवस्थेत असणाऱ्या आजीकडून कळाली जेव्हा त्या आजोबांच्या तसबिरी कडे पाहून बोलत होत्या. आम्ही अवाक झालो पण ; आता काहीही करुन आम्हाला तो जादूई आरसा हवा आहे “.
इकडे माहेश्वरपूरमध्ये वेगाने हालचाली वाढल्या होत्या . राजा माहेश्वरला कळून चुकले होते की हा हमला कशासाठी होतोय. युद्ध सुरू झाले. घनघोर लढाई झाली आणि राजा कमलेश्वरने राजा माहेश्वरला कैद केले.
राजा माहेश्वरला आता त्या गुहेत नेण्यात आले आणि तो आरसा तिथून हस्तगत करुन राजा कमलेश्वरला सुपुर्द करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे आता जादूई आरसा राजा कमलेश्वरच्या हातात होता.
राजा कमलेश्वर जादूच्या आरश्यात पाहत होता. त्याचे प्रतिबिंब आरश्यात दिसताच त्याने आरश्याला वरदान मागितले ,
हे जादूई आरश्या , बनव मला सर्व शक्तिशाली ,
मीच एकमेव असेन या पृथ्वीचा अधिकारी. कमलेश्वर च्या या मागणीवर आरश्यातून आवाज आला,
मागणी त्याचीच पूर्ण होईल,
जो माझ्या तीन प्रश्नांचे उत्तर देईल.
राजा कमलेश्वर विचारात पडला आणि थोड्या वेळाने त्याने आरश्याच्या प्रश्नांची उत्तरे द्यायचे मान्य केले.
हे जादूई आरश्या , देईन मी सारी उत्तरे बरोबर ,
करशील तू मला सर्व शक्तीशाली खरोखर ?
त्यावर आरसा म्हणाला ,
शंका कुशंका नाही ज्याची मजवर ,
इच्छा पूर्ण करतो मी त्याच्या तत्पर ,
पण ; ऐक हे राजन , चुकले जर उत्तर ,
आव्हान मग होईल तुझे खडतर ,
प्रत्येक चुकीच्या उत्तरावर ,
शक्ती हीन होत जाशील हळुवार ,
प्रत्येक उत्तर हवे चिंतनपर ,
नाही तर शत्रू होईल बलवत्तर .
” शत्रू बलवत्तर होईल म्हणजे काय जादुई आरश्या ?आम्ही समजलो नाही “. राजा कमलेश्वर संशयाने म्हणाला.
” हे राजन , प्रश्न विचारण्यासाठी माझ्या अटींचे पालन करावे लागेल. मी यापूर्वी ज्याच्या अधिकारात होतो आणि मी आता ज्याच्या अधिकारात आहे त्या दोन्हीही व्यक्तींना मी एका वेळी प्रश्न विचारेन. ज्याचे उत्तर बरोबर त्याला मिळेल माझी ताकद. आणि जो हारेल तो कायमस्वरुपी माझ्या मध्ये लुप्त होऊन जाईल ” .
आरश्याच्या या स्पष्टीकरणावर राजा कमलेश्वर विचारात पडला. त्याला वाटले ही चांगली संधी आहे राजा माहेश्वरला संपवण्याची. म्हणून राजा माहेश्वरला आरश्या समोर हजर करण्यात आले. राजा माहेश्वरच्या चेहऱ्यावर स्मितहास्य खुलले. चालून आलेली संधी आता दवडून चालणार नव्हती. दोन्ही राजांना समोर पाहून आरश्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली.
” राजन माझा पहिला प्रश्न ,
आदित्य माझे नाव , नाही माझा थांग ,
उगवतो कोणत्या दिशेला मी सांग .
राजा कमलेश्वर मोठमोठ्याने हसू लागला. ” इतका सोपा प्रश्न जादूई आरश्या ? ठीक आहे. उत्तर याचे पूर्व दिशा “. कमलेश्वर आपल्या ऐटीत म्हणाला.
” तू चुकीचे उत्तर दिले राजन ” . आरसा शांतपणे म्हणाला आणि राजा कमलेश्वरला धक्का बसला.
” हे जादूई आरश्या , माझे तुला नमन आहे. तुझ्या प्रश्नाचे उत्तर असे आहे , आदित्य म्हणजे सूर्य . जो ना कधी उगवतो , ना कधी मावळतो. आपण पृथ्वीवर राहतो आणि पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असते म्हणून दिवस आणि रात्र असे चक्र अविरत चालू राहते “. राजा माहेश्वरने उत्तर दिले आणि इकडे राजा कमलेश्वरला अंगातील ताकद नाहीशी होत असल्याचे जाणवले.
” हे राजन , आता माझा दुसरा प्रश्न ,
” अविरत होतो मजवरि जल शिडकावा ,
तरीही अतृप्ततेचा श्राप मज मिळावा .
राजा कमलेश्वरने याही वेळी घाईने उत्तर दिले , ” तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहे धरती ” .
” तुझे उत्तर चुकले राजन ” . संधी आता राजा माहेश्वर कडे चालून गेली.
” हे जादूई आरश्या , तू महान आहेस. तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहे सागर किनारा जो समोर अथांग पसरलेला समुद्र असूनही तहानलेला राहतो ” . राजा माहेश्वरने उत्तर देताच राजा कमलेश्वरला आपण अजून अशक्त झालो आहे याची जाणीव होते.
“हे राजन , आता माझा तिसरा प्रश्न ,
सार आहे सत्याचा सारा , सांग कोण असे शासक खरा ? “
” ज्याच्या कडे संपत्ती आहे , ज्याच्या कडे सत्ता आहे , ज्याच्या कडे शक्ती आहे तोच खरा शासक “. कमलेश्वरने क्षीण आवाजात उत्तर दिले आणि पुन्हा आरसा म्हणाला उत्तर चुकले.
” हे जादूई आरश्या , प्रजेची काळजी घेणारा , प्रजेला सुरक्षित ठेवणारा , प्रजेला सुखी ठेवणारा , प्रजेच्या सुखदुःखाला आपले सुख दु:ख मानणारा असतो खरा शासक ” . राजा माहेश्वरने उत्तर देताच राजा कमलेश्वर जादूच्या आरश्यात खेचला गेला आणि कायमस्वरूपी लुप्त झाला. राजा माहेश्वरने कमलेश्वरपूर वरती आपली सत्ता प्रस्थापित केली. जादूच्या आरश्याने राजा माहेश्वरला सर्व शक्तीशाली बनवले आणि राजा माहेश्वरच्या छत्रछायेखाली माहेश्वरपूरची आणि कमलेश्वरपूरची प्रजा सुखी समाधानी राहू लागली “.
” तर आपण या कथेमधून काय शिकलो बाळांनो ? ” आजीने प्रश्न विचारताच आर्यन म्हणाला , ” चांगुलपणा शिकलो आपण आजी ” .
“बरोबर , माणसाकडे माणुसकी आणि चांगुलपणा हे दोन गुण असले की त्याच्या सोबत इतरांचे आयुष्य देखील
सुखकर होते “. आजीने सर्व मुलांना सांगितले आणि सगळी मुले एकसाथ ओरडली , ” हो आजी ” .
समाप्त :
कथा कशी वाटली आपला बहुमूल्य अभिप्राय देऊन जरुर कळवा आणि कथा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी लेखक मित्र या वेबसाईटला भेट द्या. आमचे what’s up चॅनेल फाॅलो करा. धन्यवाद.
सौ. मनिषा उदयसिंह पाटील , पुणे.
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
मस्त
धन्यवाद
खूप छान
धन्यवाद
लहानपणीच्या गोष्टींची आठवण झाली.👌
धन्यवाद