पांढरे भूत
शहरातील कामे आटोपून गावी परतायला आज रंगाला जरा उशीरच झाला होता. बस मधून उतरताच दाटलेला अंधार पाहून त्याने झपाझप पावले टाकायला सुरुवात केली. गावात पोहोचताना आधी गावचे शेती क्षेत्र पार करावे लागायचे. रस्ता तसा चांगला होता पण ; दुतर्फा ऊसाची पसरलेली शेती पाहून रंगाच्या काळजात धस्स झाले. त्याने एकदा मागे वळून पाहीले आणि गडद अंधार पाहून त्याने आपला वेग अजूनच वाढवला.
गेल्या काही दिवसांपासून गावामध्ये एकच विषय होता आणि तो म्हणजे पांढरे भूत. काही दिवसांपासून गावात या पांढऱ्या भूताने दह*शत माजवली होती. आधी गावची शेती आणि नंतर गाव लागत असल्याने गावातील लोकांचा दिवसा उजेडी गावात पोहोचण्याकडे कल असायचा पण ; आता लोकं रात्री अपरात्री बाहेर पडतच नव्हते आणि जर बाहेर गावी जावे लागले आणि परतायला उशीर झाला तर जिथे आहे तिथेच मुक्काम केला जायचा.
रंगाला आई आणि बायकोचे शब्द आठवू लागले. दोघीही त्याला आज शहरात जाण्यापासून अडवत होत्या कारण आज भर अमावास्या होती. आज तर पांढरे भूत जास्तच शक्तीशाली असणार. आता उशीर झालेला पाहून रंगाला आपण आई आणि बायकोचे ऐकायला हवे होते असे वाटून गेले.
रंगा वेगाने चालत होता. रस्त्याला चिटपाखरुही नव्हते. अमावास्येच्या रात्री घराबाहेर कोण पडणार ? पण ; रंगाने आज हे धाडस केले होते आणि आता हेच धाडस त्याच्या अंगाशी येते की काय असे त्याला वाटू लागले. अचानक चालता चालता रंगा थांबला.
” कुणी तर हाक मारल्यावाणी का वाटलं मला ? खरंच कुणी हाक मारली का मलाच भास झाला ? पर आता तर काय आवाज इना झालाय ” . रंगाने मागे न पाहता चालणे सुरुच ठेवले .
थोडा वेळ गेला असेल की रंगाला परत आवाज आला जसे कोणीतरी त्याला हाक मारत होते. रंगाने चालण्याचा वेग अजूनच वाढवला. गावातल्या पारावर रंगणाऱ्या पांढऱ्या भूताच्या गप्पा रंगाला तीव्रतेने आठवू लागल्या.
रंगाला आता रडू कोसळण्याच्या बेतात होते. रंगा घाबरला होता आणि त्यामुळे त्याला पायाची थरथर जाणवत होती. तरीही पाय ओढत आणि मागे जराही वळून न पाहता रंगा पुढे पुढे जातच होता. इतक्यात रंगाच्या खांद्यावर हात पडला आणि आधीच घाबरलेल्या रंगाने पाठीमागे वळून न पाहताच मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात केली.
गेले तीन दिवस रंगा तापाने फणफणत होता. असंबद्ध बडबड करत होता. पांढरे भूत, वडाचे झाड अशी काहीशी बडबड सतत करत होता. गावच्या वेशीवर बेशुद्धावस्थेत आढळलेल्या रंगाला तुका आणि केरबाने उचलून घरी आणले होते. रंगाची बायको आणि आई रडून रडून बेजार झाल्या होत्या. रंगाची अवस्था पाहून त्याची दोन्ही मुले चिंगी आणि पिंट्या बावरुन एका कोपऱ्यात बसली होती. गावातील जाणत्या स्त्रिया येऊन रंगाच्या बायकोची समजूत घालत होत्या. गावात एकच चर्चा चालू होती की रंगाला पांढऱ्या भूताने झपाटले आहे.
” काय रं केरबा , कुटं गावला म्हणायचा रंग्या तुला आणि तुक्याला ? बेसुद कसा झाला आसल रं ? ” महीपतने दोन्ही हात एकमेकांत गुंफवून हनुवटीला टेकवले.
“आरं म्या आन आपला तुक्या बैलगाडीतनं रानात जात हुतो तर त्यो रंग्या कमानी जवळच्या कट्ट्याजवळ बेसुद पडला हुता. आमास्नी तर काय कळनाच करायचं काय आता ? मग उचलून बैलगाडीत ठेवलं आन् त्येज्या घरला सोडून आलो “. केरबा स्पष्टीकरण देत म्हणाला.
गावातील वृद्ध , अनुभवी लोकं देवळात जमले होते. रंगाला खरंच पांढऱ्या भूताने झपा*टले की त्याच्या सोबत आणखी काही घडले हे कळायला मार्ग नव्हता. प्रत्येक जण आपले मत मांडत होता. रंगा लौकरात लौकर बरा होऊ दे म्हणून देवाकडे प्रार्थना करत होता.
देवळाच्या बाहेर उभे राहून गण्या , पश्या , गौऱ्या आणि चैत्या सर्व मोठ्या लोकांचे म्हणणे ऐकत होते. गावाच्या दृष्टीने वाया गेलेली मुले म्हणूनच सगळ्या गावात प्रसिद्ध होती ही चौकट. सगळी कहाणी ऐकून ही चौकट देवळापासून दूर जाऊन उभी राहिली आणि आपापसांत कुजबुज करु लागली.
” गण्या , काय वाटतंय तुला ? खरंच भुता*टकी आसल व्हय ? मला तर पटत न्हाय आसलं काय तर आसल म्हणून. पर त्या रंगा दादाची आवस्था बगितल्या म्या त्यामुळं काय कळना झालय “. पश्या देवळा बाहेरील पायरीवर बसत म्हणाला.
“आता रंगा दादाची आवस्था बगून बी म्हणतुयस की तुला भुता*टकी पटत न्हाय. रंगा दादाला पांढरं भूत दिसलं आसणार ” . गौऱ्या असे म्हणताच पश्या गौऱ्यावर चिडला.
” गप रे , आसं काय नसणार. म्या सांगतो कुठं तर पाणी मुरतय. मला सांगा अचानक हे पांढरं भूत आलं कुटनं ? मला असं वाटतय आपण याचा काय तो सोक्षमोक्ष लावला पायजे “. पश्याच्या म्हणण्याला चैत्याने दुजोरा दिला.
” पश्या बरोबर बोलतुय. काय तर चुकतय. पर काय ते दिसना झालय. पश्या म्या हाय तुज्या बर. या पांढऱ्या भूताचा सोक्षमोक्ष लावायचाच आता “. चौघेही मित्र कंबर कसून तयार झाले. रात्री सगळे पश्याच्या घरी जमले. बरीच चर्चा झाल्यानंतर शेवटी एक योजना ठरली आणि दिवसही ठरला. चौघांनीही तयारी सुरु केली.
सगळीकडे काळाकुट्ट अंधार चांगलाच दाटून आला होता. चैत्या आणि गौऱ्या वडाच्या झाडावर चढून बसले. पश्या वडाच्या झाडाला लागून असलेल्या ऊसाच्या रानात लपून बसला तर गण्या रस्त्याच्या कडेला सहज दिसून येईल असा उभा राहिला. बराच वेळ काहीच हालचाल दिसत नव्हती तसा गण्या वैतागला आणि वरती झाडाकडे पाहू लागला. झाडावर बसलेल्या चैत्याने त्याला हातानेच शांत राहण्याची खूण केली.
गण्या आता रस्त्यावर इकडे तिकडे फिरु लागला आणि अचानक त्याला ऊसाच्या रानात काही हालचाल जाणवली. दुर्लक्ष केल्यासारखे भाव चेहऱ्यावर आणत तो पुढे चालू लागला. काही वेळ गेला असेल की गण्याला कोणीतरी हाक मारल्या सारखे वाटले. यावेळी मात्र त्याने पाठीमागे वळून पाहिले पण ; काहीच दिसले नाही. गण्या पुढे पाहू लागला. थोड्या वेळात गण्याला हाक मारल्याचा भास झाला आणि गण्या जाग्यावर थबकला. गण्या त्या आवाजाने घाबरला होता. एक क्षण त्याला खरेच वाटले की इथे कोणीतरी आहे पण ; मागे वळून पाहताच कोणीही दिसले नाही. गण्याला आवाज तर ऐकू आला होता. पाठीमागे तर कोणीच नव्हते. गण्या जास्तच घाबरला.
पश्या , चैत्या आणि गौऱ्या गण्या वर लक्ष ठेवून होते. पश्या समोर गण्याकडे पाहत होता की पश्याच्या खांद्यावर हात पडला तसा पश्या स्तब्ध झाला. त्याच्या कपाळावर घर्मबिंदू जमा झाले. त्याने हळूहळू मान मागे वळवून पाहीले तर चैत्या आरामात पश्याच्या खांद्यावर हात ठेवून उभा होता. पश्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली पण ; त्याने कसाबसा आपला राग गिळला. हळू आवाजात तो चैत्याला काही बोलणार इतक्यात गण्या मोठ्याने ओरडला. त्याचा आरडा*ओरडा ऐकून पश्या आणि चैत्या धावत आले. पाहतात तो गण्या घाबरुन थरथर कापत होता. त्याच्या तोंडून आवाज बाहेर पडत नव्हता. आजूबाजूला मात्र कोणीच दिसत नव्हते. इतक्यात गौऱ्या देखील तिथे पोहोचला. गण्याची अवस्था पाहून सगळ्यांनी तिथून काढता पाय घेतला पण गौऱ्या सतत मागे वळून पाहत होता. वरती झाडावर बसून त्याने जे पाहीले होते त्यावरती त्याचा विश्वास बसत नव्हता.
सगळे कसेबसे पश्याच्या घरी पोहोचले. गण्या अजूनही थरथर कापत होता. पश्या आणि चैत्या देखील त्याची अवस्था पाहून बावरले होते पण ; गौऱ्या मात्र विचारात गढला होता. घाबरलेल्या गण्याला पाहून गौऱ्या आता चिडला आणि जोरात गण्यावर ओरडला.
” चूप ! एकदम चूप ! मी काय सांगतोय ते सर्वांनी नीट ऐका ” . असे म्हणून गौऱ्याने जे पाहीले ते सर्वांना सांगितले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कानांवर विश्वास बसत नव्हता. गण्याही सर्व काही ऐकून अस्वस्थ झाला. चौघेही सकाळ होण्याची वाट पाहू लागले.
गावची पंचायत बसली होती. अख्खा गाव हजर होता. सगळ्यांच्या रागीट नजरा समोर आ*रो*पी म्हणून उभ्या असलेल्या दिन्यावर रोखल्या गेल्या होत्या. रंगा , रंगाची बायको आणि आई खाऊ की गिळू अशा अविर्भावात दिन्याकडे पाहत होते.
काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांच्या शेतीचे नुक*सान करताना दिन्या गावकऱ्यांच्या तावडीत सापडला होता. एकदा माफ करुन गावकऱ्यांनी त्याला सोडून दिले पण ; दिन्याने मात्र काहीच धडा घेतला नाही आणि गावकऱ्यांच्या शेतीचे नुक*सान करतच राहीला. गावकऱ्यांनी त्याला पकडून गावाबाहेर हाकलून लावले आणि या अ*प*मा*नाचा बदला घेण्यासाठी दिन्याने पांढऱ्या भूताचे सोंग घेतले. येता जाता गावकऱ्यांना तो घाबरवू लागला. काल मात्र गौऱ्याने झाडावरून त्याला गण्याला घाबरवून ऊसाच्या शेतात पळताना पाहीले आणि दिन्या पकडला गेला.
दिन्याला त्याच्या या वागणुकीमुळे पोलीसांच्या हवाली करण्यात आले आणि गण्या , पश्या , चैत्या आणि गौऱ्या यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. आता सगळे गावकरी या चौघांना मानाने आणि सरळ नावाने म्हणजे गणेश, परेश, चैतन्य आणि गौरांग या नावांनी बोलवू लागले. गाव आता पांढऱ्या भूताच्या दह*शतीतून कायमचे मुक्त झाले.
समाप्त :
टीप : सदर कथा कोणत्याही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत नाही.
कथा कशी वाटली आपला बहुमूल्य अभिप्राय देऊन जरुर कळवा. अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी लेखक मित्र या वेबसाईटला भेट द्या. आमचे what’s up चॅनेलला फाॅलो करा. धन्यवाद.
सौ. मनिषा उदयसिंह पाटील.
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
खूप छान
धन्यवाद
मस्त कथा
धन्यवाद
Mast 👌
धन्यवाद
खूप छान कथा आहे
धन्यवाद