Marathi bodh katha – आणि ससा जिंकला. 

WhatsApp Group Join Now

        डोंगरमाथ्यावर जल्लोषाला उधाण आले होते.तिथे उपस्थित प्रत्येक प्राणी कासवाचे अभिनंदन करत होता. कासवाच्या भोवती फेर धरुन गोल गोल फिरणाऱ्या त्या सर्व प्राण्यांनी एकच कल्ला माजवला होता. कासव शर्यत जिंकले होते आणि आणि याचा आनंद कासवाच्याही चेहऱ्यावर झळकत होता. अशक्यप्राय वाटणारी गोष्ट कासवाने शक्य करुन दाखवली होती म्हणूनच समस्त प्राण्यांनी कासवाचा सत्कार करण्याचे ठरवले. एक म्हातारा हत्ती पुढे येऊन सत्कारा संबंधी आपण लौकरच एक सभा घेत आहोत असे जाहीर करतो. 

          दूरवर एका दगडाच्या कोपऱ्यात बसलेला ससा खिन्न मनाने समोरील दृश्य पाहत होता. डोळे भरून वाहत होते आणि मनात वादळाने थैमान घातले होते. पश्चात्ताप आणि केवळ पश्चात्ताप उरला आहे माझ्या हाती असा सतत नकारात्मक विचार मनात येत होता आणि निराशेचे सावट अजून गडद होत होते. 

      सगळे आनंद साजरा करत असताना रडणाऱ्या सशाकडे हरणाचे लक्ष जाते आणि सशाची अवस्था पाहून त्याला वाईट वाटते. हरीण शेजारी पाहते तर कोल्हा जल्लोषात मग्न असतो. हरीण कोल्हयाला तिथून बाजूला घेऊन येते आणि रडणाऱ्या सशाकडे बोट करून बोलू लागते. 

     “कोल्होबा , अरे तो बघ ससोबा रडतोय. आपण त्याला समजावूया का ? म्हणजे मला वाईट वाटले रे त्याला असे पाहून. चल आपण त्याला समजून सांगूया “. हरीण सशाकडे चालू लागले . कोल्हा मात्र तिथेच थांबला होता. 

     ” हरीण दादा , काही गरज नाही त्याच्याकडे जायची किंवा त्याला समजवायची. जे काही घडले आहे ते त्याच्या कर्माचे फळ आहे. त्याचा गर्विष्ठपणा त्याच्या या अवस्थेला जबाबदार आहे “. कोल्हा झटकन् मान फिरवत तिथून माघारी फिरला. हरीण मात्र हतबल होऊन सशाकडे पाहत राहीले. 

       काही दिवस कासवाच्या कौतुकात निघून गेले. प्रत्येक प्राणी आता आपापल्या कामात व्यस्त होता. सशाला जणू सगळे विसरून गेले होते. हरीण मात्र काही केल्या सशाचा रडवेला आणि उदास चेहरा विसरु शकत नव्हते. प्रयत्नपूर्वक त्याने सशाला विसरण्याचा प्रयत्न केला पण ; निष्फळ ठरले त्याचे प्रयत्न आणि सरतेशेवटी त्याने सशाला भेटण्याचा निर्णय घेतला. 

       “कोणी आहे का आतमध्ये ? ससोबा , ससोबा आहेस का रे तुझ्या घरात ? बाहेर येशील का ? हे बघ मी तुझ्या साठी काय आणले आहे ? छान छान गाजरे ! अगदी तुला आवडतात तश्शी ! ये ना रे बाहेर. मला बोलायचे आहे तुझ्याशी “. हरीण सशाला विनवत होते पण ; ससा काही त्याच्या बिळातून बाहेर यायला तयार होईना. 

       खूप विनवण्या केल्यानंतर आखिरकार ससोबा बाहेर आला. मान खाली घालून हरीण काय बोलते हे ऐकू लागला. हरीण मात्र शांतपणे सशाला पाहत उभे होते. हरीण काहीच बोलत नाही हे पाहून सशाने हळूच मान वर करून पाहीले तर हरीण सशाकडे पाहून स्मितहास्य करत होते. 

     “हरीण दादा , तू का आला आहेस इकडे ? आणि इतकी सारी गाजरे तू माझ्या साठी आणली ? ” ससा प्रश्नावर प्रश्न विचारत होता आणि हरीण अजूनही शांतपणे सशाला न्याहाळत होते. 

       ” काय रे ससोबा , इतके दिवस दिसला नाहीस. आहेस तरी कुठे ? आज माझ्या बरोबर डोंगर माथ्यावर येशील ? मी तुला सोबत न्यायला आलो आहे ” . हरीण सशाला म्हणाले आणि त्याच्या प्रतिक्रियेची वाट पाहू लागले. ससा आधी तर नाहीच म्हणत होता. शेवटी कसाबसा तयार झाला. 

     “डोंगरमाथ्यावर नको , आपण जंगलात फिरु. बरेच दिवस झाले घरातून बाहेर पडलो नाही. आता तू एवढे म्हणत आहेस तर चल “. ससा एक गाजर हातात घेऊन पुढे चालू लागला आणि हरीण हलके हसत मागून चालू लागले. 

      ” डोंगरमाथ्यावर न जाता दोघेही जंगलात फिरु लागले. फिरता फिरता इतर प्राणीही भेटत होते आणि त्यांना पाहून सशाला स्वतःची झालेली हार आठवत होती. प्राणी तर त्याच्याशी नेहमीप्रमाणे बोलत निघून जात होते पण ; का कोणास ठाऊक सशाचे मन मात्र त्याला खात होते आणि हरणाने हे बरोबर हेरले. 

       “ससोबा , मला तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे म्हणून मी तुला बोलावले आहे. तुला काही गोष्टी सांगेन.त्या ऐकायच्या की नाही सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून आहे ” . ससा कान टवकारुन ऐकू लागला. 

     ” हे बघ , मुळात जेव्हा एखादा खेळ किंवा एखादी स्पर्धा होते तेव्हा कोणीतरी जिंकणे आणि कोणीतरी हारणे ही स्वाभाविक गोष्ट आहे . हार जीत खेळाचा भाग आहे. एक स्पर्धा हारल्याने अख्खं आयुष्य हारत नाही , एक परीक्षा नापास झाल्याने अख्खं आयुष्य नापास होत नाही “. ससा आता शांत चित्ताने ऐकू लागला. 

      “ससोबा , आता दुसरा मुद्दा ऐक. खेळातील हार जीत दोन्ही बाजूंनी खिलाडू वृत्तीने मान्य करावी. म्हणजे काय तर कासव जिंकले आहे तर जिंकले आहे हे मान्य करून तू त्याचे अभिनंदन करायला हवे होते . त्याचा विजय तुझ्या मनाने स्वीकारला असता तर तुला तुझ्या पराभवाचे इतके वाईट वाटले नसते जितके वाईट प्रत्यक्षात तुला वाटले ” . सशाला हळूहळू जाणीव होऊ लागली आणि आता हरणाचे पुढचे बोल तो आता व्यवस्थित ऐकू लागला. 

       “ससोबा, आता महत्त्वाचा मुद्दा ऐक, प्रतिभा सर्वांकडे असते पण वेगवेगळी. म्हणजे काय तर जसे तू चपळ आहेस तसे कासव शांत आणि स्थिर आहे जी त्याची प्रतिभा आहे. शर्यतीच्या सुरुवातीला कासवाला देखील कल्पना होती की सशासोबत शर्यत लावायची म्हणजे हार पक्की आहे तरीही ते शर्यतीत उतरले. त्याच्या प्रतिभेच्या जोरावर जिंकले देखील. म्हणजे प्रतिभा महत्त्वाची आहे पण ; प्रतिभेचा गर्व असू नये जो तुला आहे ससोबा. गर्व न करता प्रतिभेला , कौशल्याला कौशल्याने वापरायला शिक “. हरीण सशाला समजावण्यात हळूहळू यशस्वी होऊ लागले. 

      “आता पुढचा आणि शेवटचा मुद्दा ऐक ससोबा , कधीही प्रतिस्पर्ध्याला कमजोर समजण्याची चूक करू नये आणि नेमकी तिच चूक तू करून बसलास. कासवाला कमी समजण्याची चूक. प्रतिभेचा गर्व नाही तर आदर करायला शिक ससोबा. तुला तुझा अती आत्मविश्वास नडला. तू जर डोंगर माथ्यावर पोहोचून झोपला असतास तर ? शर्यत पूर्ण करून तू थांबला असतास तर ? याचा अर्थ तू ध्येय पूर्ण होण्याआधीच थांबलास ससोबा. कळते का तुला काय म्हणायचे आहे मला ? ” ससा आता रडायला लागला होता. 

       ” खूप खूप धन्यवाद हरीण दादा. खूप खूप धन्यवाद. आज तू माझे डोळे उघडले “. ससा हरणाचे आभार मानून तिथून धावत सुटला. सगळ्या जंगल वाटेने धावताना तो अक्षरशः आनंदाने ओरडत होता. त्याच्या या धावण्याने आणि ओरडण्याने सगळे प्राणी अवाक् झाले आणि त्याच्या पाठोपाठ धावू लागले. ससा धावत धावत तळ्याजवळ पोहोचला. तिथे कासव हळूहळू पाण्यात चालले होते. त्याला पाहून सशाने आनंदाने हाक मारली. आवाज ऐकू येताच कासव मागे फिरले. सशाला पाहून कासवाच्या कपाळावर आठ्या उमटल्या. 

       “कासव दादा, कासव दादा “. सशाचे डोळे भरून आले. ” कासव दादा , मला माफ कर. मी चुकलो. खूप चुकलो. तुला कमी लेखायची चूक केली. माझ्या वेगाचा गर्व बाळगला. ध्येयापर्यंत पोहोचायचा प्रयत्न अति आत्मविश्वासामुळे सोडला. या सगळ्या माझ्या चुका होत्या. सगळ्यात मोठी चूक होती ती म्हणजे तुझा विजय मान्य न करणे पण ; आज मी मान्य करतो तू जिंकलास . खूप खूप अभिनंदन तू शर्यत जिंकलास ” . सशाचे डोळे भरून वाहू लागले आणि मनावरील मळभ स्वच्छ झाले. 

       “ससोबा , मी त्या दिवशी शर्यत जिंकलो पण; आज मी तुझी मैत्री जिंकली. आज तू जिंकला आहेस ससोबा. आज तुला यशाचा खरा अर्थ कळला आहे म्हणून आज तू जिंकला आहेस “. कासवाचे डोळे भरून आले. कासव आणि ससा दोघेही आनंदाश्रू ढाळत होते आणि परत एकदा सगळे प्राणी मैत्रीचा जल्लोष साजरा करत होते. 

……….समाप्त ……….

कथा कशी वाटली आपला बहुमूल्य अभिप्राय देऊन जरुर कळवा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी लेखक मित्र या वेबसाईटला भेट द्या. आमचे what’up चॅनेल फाॅलो करा. धन्यवाद. 

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)  

6 thoughts on “Marathi bodh katha – आणि ससा जिंकला. ”

  1. रश्मी कोळगे

    खूप छान.. आहे ती कथा सकारात्मक तेकडे वळवली…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top