सिद्धी खूपच फुगून कोपऱ्यात बसली.”तुम्ही ताईचे लाड करता ,आता काय तिचा Happy Birthday आहे का? का बरं तिला नवीन ड्रेस आणलेत?मला पण नवीन ड्रेस पाहिजे. ती ऑफिसला जाऊन मज्जा करते.
आई म्हणाली , “मनी अग ताई ला internship ला जायचे आहे आणि office मधे t shirt Jean’s चालत नाही. ते काय कॉलेज आहे? आता तुझी शाळा सुरू होणार तर तुला पण नवीन युनिफॉर्म आणणार आपण, मग ताई काय अशी फुगून बसेल?”
सिद्धी हट्टाला पेटून उठली ,”ठीक तर मग! मी पण आता काहीतरी काम करणार आहे” सिद्धीच्या डोक्यात ताई सारखे काहीतरी करायची इच्छा प्रबळ झाली.

तसे बघायला ताई व सिद्धी मध्ये दहा वर्षाचे अंतर. आता सिद्धी नऊ वर्षाची व ताई सेकंड इयर मधे होती. प्रत्येक सेमिस्टर झाल्यावर सुट्टी मध्ये एक महिना कंपल्सरी इंटर्नशिप करावी लागत होती. हा अनुभव गाठीशी असल्यामुळे पुढे जाऊन नोकरी मिळायला सोपे होणार होते. सिद्धी आता चौथी जाणार होती. ती सोसायटीतल्या मित्र-मैत्रिणींना भेटायला गेली.
तिच्या चिडण्याचा वृत्तांत तिने त्या बाळ गोपाळांना सांगितला व आपण काहीतरी करूयात म्हणून विचारणा केली.तिच्या दोन मैत्रिणी व एक मित्रांनी अभिनव कल्पना काढली,”सिद्धी आपण सरबताचा स्टॉल टाकायचा का?”ही कल्पना सर्वांनाच खूप आवडली.
चला तर मग काय व कसे करूयात?आता मुलांचा मोर्चा ताईकडे आला.
सिद्धी म्हणाली,”ताई आम्ही सरबताचा स्टॉल टाकणार आहोत, तू कशी ऑफिसला जाणार आहेस नवीन कपडे घालून तसेच मी पण नवीन फ्रॉक घालून सरबताच्या स्टॉलवर जाऊन पैसे कमावणार आहे”.ताईला खूपच हसू आले. पण मुलांचा उत्साह बघून या खेपेला ही नुसतीच बडबड नाहीये हे तिच्या लक्षात आले.
आता सरबताच्या स्टॉलसाठी काय काय लागणार आहे असे ताईंनी विचारल्यावरसर्व बच्चे कंपनी विचार करू लागले.
ताई म्हणाली,”उद्यापर्यंत आपापल्या वहीमध्ये सर्व गोष्टी लिहून काढा, उद्याला परत याच वेळेला आपण भेटू व मग सर्व गोष्टी ठरवूयात.”
पूर्ण संध्याकाळभर सिद्धीबाईंचा मूड एकदम छान होता. वहीमध्ये काहीतरी लिखाण चालू होते. जेवण पण पटापट न कुरकुर करता झाले.सकाळी सकाळी स्वारी आवरून मैत्रिणींकडे जाऊन येते म्हणून गेली.दोन मैत्रिणी व एक मित्राची मीटिंग घेऊन विजयी मुद्रेने परत आली.संध्याकाळी ठरलेल्या वेळेला मंडळी ताईच्या भोवती जमली.
ताई म्हणाली,”एकेक करून आपल्या आयडिया मला सांगा.”
सिद्धीने बोलायला सुरुवात केली,”ताई आम्ही चौघे मिळून सरबताचा स्टॉल टाकणार आहोत”
आमच्या सरबताच्या दुकानाचे नाव आहे RASS (Rishi ,Avni,Sayali आणि Siddhi) कसे वाटले नाव तुला?
ताई म्हणाली ,”नाव मस्त आहे! पण बाकी काय? कुठे करणार आहात ?काय काय वस्तू लागणार आहे? सरबत कोणाला छान करता येते? सरबताची किंमत कोण ठरवणार आहे?”
बच्चे कंपनी थोडीशी गोंधळूनच गेली.ताई म्हणाली “घाबरू नका, आता या सर्व मुद्द्यांचा विचार करा व एक तासानंतर परत आपण भेटू.”
आता मात्र बच्चे कंपनीच्या लक्षात आले, आपल्याला खूप तयारी करायला लागणार आहे. अवनी म्हणाली,”माझा बाबा टूरला जातो तेव्हा मी त्याला नेहमी म्हणते तू मजा करूनच येतोस, छान छान हॉटेलमध्ये राहतोस बाहेरचे खातोस, विमानाने फिरतोस किती मज्जा असते तुझी. आत्ता मला समजले काम करायचे म्हणजे खूपच कष्ट पडतात.”
सिद्धीच्याही लक्षात आले ताई कामावर जाणार म्हणजे तिलाही खूप कष्ट पडणार आहेत. आपण उगाचच फुगुन बसलो.आता मुलांनी परत एकदा कागद पेन्सिल घेतली. ताईंनी सांगितल्याप्रमाणे आधी कुठली सरबते करायची ते ठरवले.आता सरबत कशात द्यायचे? म्हणजे आपल्याला ग्लास लागणार आहेत. ऋषी म्हणाला प्लास्टिकचे नको आपण कागदीच घेऊ प्लास्टिक हामफुल असते आपल्या शरीराला असे माझी आई कायम सांगते.
सायली म्हणाली लिंबू सरबत मला छान करता येते. लिंबू सरबतासाठी लिंबू ,साखर ,मीठ ,पाणी इत्यादी साहित्य मी घेऊन येईन.सिद्धीला घरात कोकम सरबताचा कॅन आहे हे माहीत असल्यामुळे त्याच्यात फक्त पाणी टाकले की ते छान होते त्यामुळे कोकम सरबत करायची जबाबदारी तिने घेतली.
सायलीकडे पिकनिकला जातानाचा पाच लिटरचा वॉटर कुलर असल्यामुळे ती तो घेऊन येणार होती. आता कोकम सरबतासाठी अजून एक वॉटर कुलरची आवश्यकता असल्यामुळे बच्चे कंपनी त्याच्या शोधात निघाले. सर्व बच्चे कंपनीचा मोर्चा वृंदा काकूंच्या घरी गेला. तिथे त्यांना वॉटर कुलर मिळाल्यामुळे सर्वजण खुश झाले.आता मुद्दा होता कधी व कुठे?
सिद्धी म्हणाली चला ताईने बोलावले आहे त्याच्या आधी आपल्याला हे ठरवणे गरजेचे आहे.सोसायटीच्या दारात भाजीवाले काका दिसताच क्षणी सिद्धीला आयडिया आली,ती सर्व बच्चे कंपनींना घेऊन भाजीवाल्या काकांच्या स्टॉलवर गेली.
काका,”तुमची मदत हवी आहे आम्हाला”सिद्धीने बेधडक काकांसमोर आपला मुद्दा मांडला. काकांची संमती घेऊन बच्चे कंपनी खुशीमध्ये घरी परतले.
आता सर्व तयारीनीशी ताई समोर मांडी ठोकून सर्वजण स्थानापन्न झाले.उत्साहात सिद्धी म्हणाली,”ताई तू सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व प्लॅन केला आहे”
एकाच वेळेस चाही मुलांनी बोलायला सुरुवात केल्यामुळे ताईला काहीच समजत नव्हते.
ताई म्हणाली,”एका वेळेस एकाने सांगा.”
सायली म्हणाली,”ताई मी लिंबू सरबत करणार आहे व त्याच्यासाठी लागणारे सर्व साहित्य लिंबू ,साखर, मीठ, पाणी मी घेऊन येईन.”
सिद्धी म्हणाली,”आपल्या घरातला कोकम सरबताचा कॅन मी घेऊन जाणार आहे व मी कोकम सरबत करणार आहे”.
ऋषी म्हणाला,”मी पेपर ग्लास आणणार आहे”.
अवनी म्हणाली,”आम्ही सोसायटीच्या बाहेर भाजीवाल्या काकांकडून टेबल व दोन तासासाठी त्यांच्या स्टॉलच्या समोर सरबताचा स्टॉल येत्या रविवारी टाकायचा विचार केला आहे व त्यासाठी त्यांनी आम्हाला परमिशन दिली आहे.”एकंदरीत सर्व व्यवस्था चोख झाली आहे असे बच्चे कंपनींना वाटून खुशीने ताईच्या प्रतिक्रियेसाठी सर्वजण थांबून राहिले.
ताईंनी सर्वांना शाब्बासकी दिली व म्हणाली,”खूप मस्त, पण सरबत तुम्ही केवढ्याला विकणार आहात? व सरबत पिण्यासाठी तुमच्याकडे लोक कसे येतील? याचा काही विचार केला आहेत का?”परत बच्चे कंपनी विचार करू लागले.
आता ताई म्हणाली,”आपण एक काम करूयात, पुढच्या दोन दिवसांमध्ये तुम्ही प्रत्येक बिल्डिंगमध्ये जाऊन रविवारी पाच ते सात सरबताचा स्टॉल भाजीवाल्या काकांच्या इथे लावणार आहात याची जाहिरात करा”
बाकी सामान भाजीवाल्या काकांच्या शेजारी असणाऱ्या दुकानातूनच घ्या.तुम्ही चार पार्टनर आहात तर प्रत्येकाने शंभर रुपये कॉन्ट्रीब्युशन काढा. घरातून कुठलीही वस्तू घेऊ नका. जो काही खर्च होईल तो लिहून ठेवा. शनिवारी सरबत एकदा करून बघा व सर्व घरच्या मंडळींना प्यायला द्या.सर्वानुमते सरबताच्या ग्लासची किंमत बारा रुपये ठरवण्यात आली.दोन दिवस तयारी मध्ये बच्चे कंपनी खूपच बिझी होते. रविवारी चार वाजताच टेबल लावून ग्लास तयार करून मांडामानडी करून चारी मुले उत्साहाने तयार होती.
सहाच्या सुमारास स्टॉलवरची गर्दी बघून मुलांच्या मदतीला ताई धावून आली.सोसायटीतल्या सगळ्यांनी मुलांचे कौतुक केले त्यांना शाबासकी देऊन खाऊ दिला.संध्याकाळी मुलांनी भेळची पार्टी केली.
थकून सिद्धी घरी आली आजीपुढे पाय पसरून म्हणाली,”दमले बाई मी, मला तेल लावून दे ना?”
आज तिला खरी कमाई काय याचे महत्त्व समजले.
सौ. वृषाली पुराणिक,पुणे.
बालमित्रांसाठी सुंदर बोधकथा तुम्हाला कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhtsApp ग्रुप हि जॉईन करा.
धन्यवाद !
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
वा, मस्त👌👌
खूप खूप धन्यवाद
मस्त बोधकथा..👌👌
खूप खूप धन्यवाद.