लग्न थाटामाटात पार पडले. नवरा नवरीचा गृहप्रवेश झाला. परंतु नातेवाईक, सगे सोयरे यांच्यामध्ये एकच चर्चा चालू होती.
” प्रतापने तर चांगलाच प्रताप केला आहे.त्याला लग्नासाठी दुसरं कोणी भेटलं नाही का ? “
“किमान आपल्या घराण्याला शोभेल अशी तरी मुलगी त्याने पाहायची. हिला रंग नाही, रूप नाही. आपला प्रताप मात्र गोरा गोमटा, राजबिंडा किती देखणा आहे.”लग्नाला आलेली सर्व लोकं हेच बोलत होते. तरी न राहून एक जण आबासाहेबांना बोललाच.”काय हो आबासाहेब सुनबाई निरखून पारखून नाही आणली वाटतं ?” आबासाहेब मात्र काहीही बोलले नाही.त्यांनी फक्त स्मित हास्य केले.
” सुनबाई…… माप ओलांडून घरात या.” आबासाहेबांनी मोठ्या प्रेमाने साळुचे स्वागत केले.लोकांचे बोलणे ऐकून साळू मात्र कावरी बावरी झाली होती.प्रतापने साळूचा हात पकडून तिला प्रेमाने घरात आणले.
साळू ही रंगाने नावाप्रमाणेच सावळी होती. आणि प्रतापचं रूप हे नक्षत्रवानी होतं. सगळ्यांच्या मनात एक प्रश्न घुमत राहीला की प्रतापने या मुलीला कसे पसंत केले ? प्रतापने व आबासाहेबांनी कोणाकडेही लक्ष दिले नाही. त्यांचा आनंद हा ओसांडून वाहत होता. लोकांचे बोलणे ऐकून साळूच्या मनात नाना प्रश्नांनी घर केले. तिला प्रतापने नजरेनेच धीर दिला. ह्या सर्व प्रश्नांना सामोरे जावे लागणार हे प्रतापला ठाऊकच होते. परंतु त्याच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची चिंता दिसत नव्हती. आबा ही मनोमन सुखावले होते.
नेमकं प्रताप ने काय पाहिलं असेल बरं या मुलीमध्ये ? आम्हाला कोणाला सांगायचं ? आम्ही दिली असती की चांगली स्थळे शोधून. सगळ्यांना एक कोडंच पडलं. प्रत्येक घरात आपसात चर्चा चालू झाली. प्रतापची पारख चुकली. त्याने कोणाला विचारलं नाही का? अशा एक ना अनेक चर्चा लोकांमध्ये सुरू झाल्या. साळूला मात्र लोकांसमोर कसे जावे हे समजत नव्हते. मी कसं लोकांना उत्तर देऊ ? प्रतापने का असं केलं ? का केलं माझ्यासोबत लग्न ? त्याला दुसरी सुंदर मुलगी भेटली असतीच की ? मला उगाचच कोड्यात टाकलं आहे. लग्नानंतर काही दिवस गेले.
साळू आता घरात चांगलीच रमू लागली. परंतु जेव्हा ती घराबाहेर पडत असे ; तेव्हा लोकं तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत. ती लोकांच्या नजरेला नजर देत नव्हती. तिला कोणी बोलत नव्हते परंतु तिच्या पाठीमागे तिची तुलना चालत. साळू घराबाहेर पडण्यासाठी टाळत होती. तिच्या मनाची घालमेल प्रतापने ओळखली.
संध्याकाळ झाली.साळूने देवापुढे दिवा लावला.तिच्या मंजुळ स्वरात शुभंकरोती आणि मंत्रमुग्ध करणारे भजन ऐकताना आबा आणि प्रताप दोघेही भारावून गेले.तिची श्रध्दा ,निष्ठा ,तिच्या आवाजातील सात्विकता मन मोहून टाकत होती. जणू तिच्या येण्याने घरातील चैतन्य पुन्हा प्रफुल्लित झाले होते. साळूच्या स्वभावामध्ये वेगळीच निरागसता होती. तिच्या गोड स्वभावामुळे तिने सगळ्यांना आपलंसं केलं होतं. देवाने तिला रंग, रूप दिले नाही; परंतु सगुण मात्र ठासून भरले होते.
आबा आणि प्रतापच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून साळू हसली. मनात उठणाऱ्या प्रश्नांचे वादळ एकदम शांत झाले. प्रतापने साळुला आपल्या जवळ बसवले.
” तु कसला एवढा विचार करते साळू ? लोकांचा का? मी तुझ्या पाठीशी भक्कम उभा आहे .मला तर काहीच अडचण नाही .आणि मला लोकांची पर्वा नाही.उलट मीच स्वतःला अभागी समजतो.की मी तुझ्या पात्रतेचा नाही. तुला माहित आहे का साळू तुझ्यामध्ये नेमकं काय आहे ? तु इतरांपेक्षा खूप वेगळी आहे गं .. ” प्रताप अभिमानाने बोलत होता. आबांनी ही सुनबाई चे कौतुक केले. साळू आता भरून पावली.
गावामध्ये श्रीधर पाटलाच्या मुलाच्या लग्नाची जंगी तयारी चालू होती. सर्व गावाला फुलांची रोशनाई , सजावट केली होती. सोंगा-ढोंगा मध्ये लग्न पार पडले. पाटील मंडळी सर्व खुश होती. पुन्हा लोकांमध्ये चर्चा चालू झाली. की “म्हणे श्रीधर पाटलांची सून म्हणजे अप्सरेलाही लाजवील असे तिचे रूप आहे. “असे काहीजण म्हणत. तर काहीजण असे म्हणत की, “आबासाहेबांनी मात्र सुनेची पारख अजिबात केली नाही.”
” कुठे आबासाहेबांची सून आणि कुठे श्रीधर पाटलांची सून दोघींमध्ये जमीनआसमानाचा फरक आहे. श्रीधर पाटलांच्या मुलाचा आणि सुनेचा अगदी लक्ष्मीनारायणासारखा जोडा आहे. आणि आबासाहेबांच्या मुलाचा आणि सुनेचा जोडाच नाही ते अगदी विजोड आहेत.” हे लोकांचं बोलणं साळूने ऐकले. पुन्हा नकारात्मक विचार तिच्या मनामध्ये साठवायला सुरुवात झाली . स्वच्छ आणि नितळ पाणी जसं ढवळून निघावं तशी साळूच्या मनात विचारांची ढवळाढवळ चालू झाली.जड अंतकरणाने साळू घरी आली.
“आबासाहेब आहे का घरात ?” श्रीधर पाटलाने ओसरीतूनच आवाज दिला.
” या की पाटील कसं काय येणं केलं ?”आबासाहेब बोलले.
” सहजच आलो तुम्हाला भेटायला. मित्राची हाल हवा विचारावी म्हटलं .” श्रीधर पाटील म्हणाले.
” सुनबाई वाईस थोडा चहा टाका .” आबांनी साळूला आवाज देत सांगितले.
” काय हो आबासाहेब कसा चाललाय प्रतापचा संसार ? खुश आहे का संसारात ?” श्रीधर पाटील कु -भावनेच्या स्वरात बोलले .
” हो मग… एकच नंबर काहीही चिंता नाही”. आबांनी भरलेल्या उत्साहाने उत्तर दिले.
साळू बाहेर आली . तिने श्रीधर पाटलांना वाकून नमस्कार केला .
” काय गं पोरी नाव काय तुझं ? चांगलंच नशीब फळफळलय तुझं ?”असं बोलून श्रीधर पाटील मिश्किलपणे हसले.
साळुने एकदम आदराने आणि मृदू शब्दात तिचे नाव सांगितले. आणि चहा पाणी आणण्यासाठी ती आत मध्ये निघून गेली.
सुनबाईंचा स्वभाव शांत आहे वाटतं. पण आबासाहेब तुमची पारख चुकली वाटतं . आमची पारख पाहिली का ? आमच्या सुनबाईचा आणि लेकाचा जोडा कसा नक्षत्रावानी आहे. चार चौघात उठून दिसेल अशी आहे आमची सुनबाई . श्रीधर पाटलांनी आबांकडे पाहत विचारलं.
फक्त सुंदर असणे म्हणजे पारख होत नाही पाटील . सुनबाई आमची खूप गुणी आहे. तिला इतरांबद्दल आदर आहे , लहानांबद्दल प्रेम आहे , सगळ्या माणसांना ती आपल्या प्रेमाने बांधून ठेवते. स्वभावाचे म्हणाल तर राग तिला स्पर्श सुद्धा करून जात नाही. तिच्या स्वभावामध्ये वेगळीच लकब आहे. आमची साळू सकारात्मक विचारांनी पुरेपूर भरलेली आहे. चांगल्या माणसांची पारखी दिसण्याने नाही तर त्यांच्या अंतर्मनातील असणाऱ्या सकारात्मक विचाराने होते. साळू जेव्हा बोलते तेव्हा तिच्या तोंडातून फक्त अमृतवाणीचं बाहेर येते.
” असं नसतं आबासाहेब किमान आपल्या घराण्याला शोभेल अशी तरी मुलगी पाहिजे.” श्रीधर पाटील मात्र त्यांचा हेका सोडत नव्हते.
“ते तुम्ही काहीही म्हणा पाटील परंतु आमच्या घराला तर साळूमुळेचं शोभा आली आहे. प्रतापची आई गेल्यापासून घराचं घरपणचं हरवलं होतं. साळू मुळे घरातील कानाकोपरा जिवंत झाला आहे.” हे सर्व सांगत असताना आबांच्या चेहऱ्यावर एक वेगळे समाधान होते.
“बरं चला येतो मी” असं म्हणून श्रीधर पाटील निघून गेले. आबांनीही आपल्या नित्याच्या कामाला सुरुवात केली.
हळूहळू साळूचे गोड कौतुक कानावर येऊ लागले. तिच्या अंगी असलेल्या संस्कारांची पारख आता सगळ्यांना होत होती. लाखात एक असा साळूचा स्वभाव होता. दीनदुबळ्यांना मदत करणं, मुक्या जनावरांची काळजी घेणं, त्यांना जीव लावणे, शेजाऱ्यांना मदत करणं, लहान मुलांवरती प्रेम करणं, वयोवृद्ध माणसांची काळजी घेणं हे आता साळूला दररोजचं झालं होतं . आणि हे सर्व करताना साळू त्या कामात हरवून जात होती. सगळ्यांना साळू विषयी आपुलकी वाटू लागली, प्रेम वाटू लागले, साळूच्या दिसण्यापेक्षा साळूचं असणं आता सगळ्यांना हवं हवसं वाटू लागलं.
गावात आता सर्व लोक साळूला ओळखू लागली. साळूच्या चांगुलपणाचा डंका आता पंचक्रोशीतही वाजू लागला. परंतु साळूला त्याचा कधीही घमंड झाला नाही. उलट लोकांचे प्रेम पाहून साळूचा आनंद द्विगुणीत होत होता. दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याची चेतना तिच्यामध्ये नव्याने संचारत होती. सर्वांसाठी साळू ही अनोखं व्यक्तिमत्व होतं. गावामध्ये कधीही साळूचं कोणाची वैर नसे, कधीही कोणाशी ती भांडत नसे. तिच्या चांगुलपणामुळे इतर लोकांवरही त्याचा चांगलाच परिणाम होत होता.
असेच एके दिवशी सर्वजण आपापल्या कामांमध्ये असताना वाऱ्यासारखी गावभर बातमी पसरली की श्रीधर पाटलांची सून कोणा एका मुलासोबत पळून गेली.
” तिला तिच्या सौंदर्यावरती विशेष गर्व होता.” असे कोणी म्हणत ; तर ” ती कधीही कोणाशी व्यवस्थित बोलत नसायची, कधीही कोणाशी प्रेमाने बोलली नाही की कधी कोणाला जीव लावले नाही.” असे काही काही म्हणतं .
श्रीधर पाटलांना मोठा धक्का बसला. त्यांना आता आपल्या मुलाची काळजी वाटू लागली. त्यांना त्यांच्या बोलण्याचा पश्चाताप झाला.
श्रीधर पाटील आबासाहेबांना भेटायला आले. त्यांनी हात जोडून आबासाहेबांची माफी मागितली.
” खरचं आबासाहेब मला माफ करा ! मी तुमच्या सुनेबद्दल खूप चुकीचं बोललो. खरं तर माझीच पारख चुकली. तुमची पारख अगदी योग्य आहे. तुमच्या सुनेच्या चांगुलपणाने अख्ख गाव व्यापून टाकलं आहे. खरं बोलत होता आबासाहेब तुम्ही .दिसण्यापेक्षा चांगलं असणं खूप महत्त्वाचं आहे. याबाबतीत तुझा प्रताप खरचं खूप हुशार निघाला. माणूस दिसण्यापेक्षा त्यातली सगुण खूप महत्त्वाचे असतात. जे तुमच्या साळूच्या स्वभावात ठासून भरले आहेत. एवढी कर्तबगार आणि हुशार मुलगी खरंच मी कुठेच पाहिली नाही. मुळात आबासाहेब तुम्ही प्रतापला खूप छान संस्कार दिले. त्या संस्काराच्या जोरावरती प्रतापने अशी चांगल्या संस्कारांची मुलगी शोधून काढली . त्यांनी कधी तिचं रंग रूप पाहिले नाही तर तिचा स्वभाव पाहिला तिचे संस्कार पाहिले.”
ते पुढे म्हणाले की फक्त सौंदर्य पाहिलं तर घराची अब्रू जायला वेळ लागत नाही. परंतु सौंदर्याबरोबर गुण पाहिले तर त्यांचा संसार अजून खुलून निघतो. परंतु आबासाहेब तुमच्या साळू कडून भरपूर काही शिकण्यासारखं आहे. या गोष्टीवरून एकच लक्षात येते की कोणत्याही गोष्टीची पारख करताना चौकस बुद्धी आपल्याकडे असणं खूप गरजेचे आहे.
श्रीधर पाटलांनी पुन्हा आपल्या मुलाचे लग्न एका गुणवान मुलीशी लावून दिले. यावेळी मात्र त्यांची पारख चुकली नाही.
आपल्या बायकोचे व आपल्या सुनेच्या गुणांचे चौघडे सर्वत्र वाजत आहेत हे पाहून आबा आणि प्रताप यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
आता खऱ्या अर्थाने लोकांच्या मनातील काळा रंग, गोरा रंग, कुरूप,स्वरूप या मधले गैरसमज मिटले.गावातील सर्वांना साळूकडून नव्याने काहीना काही शिकण्यास मिळू लागले.
धन्यवाद !
तुम्हाला ही कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्य मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WatsApp ग्रुप ही जॉईन करा.
लेखिका – शितल औटी ,जुन्नर
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
खूप छान कथा
Thank you
छान मांडणी.
Thank you
खुप छान, अप्रतिम असे लेखन आणि सुंदर जुळवून आणली अशी मनमोहक कथा, खुप छान 👌👌
Thank you