अंजूताईचा, प्रवेशिका पूर्णच्या बॅचचा गायनाचा क्लास चालू होऊन पंधरा-वीस मिनिटं लोटली होती. दहा वर्षांच्या आतली सात-आठ पिटुकली, हे तिचे त्या बॅचचे विद्यार्थी.
मोठ्यांच्या बॅचेस तिने वेगळ्या केल्या होत्या. कॉलेज, ऑफिस यांच्या वेळेनुसार सोयीच्या बॅचेस तिने आखल्या होत्या.
अतिशय सुरेल, मुलायम आवाजाची आणि तितक्याच गोड स्वभावाची अंजू, या सगळया बच्चेकंपनीची अतिशय लाडकी ताई होती. तिलाही या बॅचच्या मुलांना शिकवताना खूप मजा यायची. त्यांचे निरागस प्रश्न, त्याहून निरागस चेहरे पाहताना ती अगदी रमून जायची त्यात.
खरंतर इतक्या लहान वयात गाण्याची विशेष समज असलेला एखादाच विद्यार्थी होता. बाकीची मुलं, आपल्या पालकांनी गाण्याच्या क्लासला घातलंय म्हणून आपली येत होती. त्यात त्या बिचाऱ्यांची काहीच चूक नव्हती.
रिऍलिटी शो बघून बऱ्याच पालकांना असं वाटत असतं की, आपल्या पाल्यानेपण ऑल राऊंडर व्हावं. गायन, वादन, नृत्य, चित्रकला, स्पोर्ट्स इत्यादी सर्व कलांमध्ये त्याने अगदी निपुण व्हावं.
क्षेत्र कुठलंही असू दे, कठोर परिश्रम, सातत्य, फक्त त्याच गोष्टीचा ध्यास याशिवाय यश मिळणं शक्य नाही, याचा सोयिस्कर विसर तर यांना पडला नाही ना? अशी शंका मग अंजूला यायची.
शिवाय अभ्यासात चमकावं ही अपेक्षा तर या छोटयांच्या मानगुटीवर सदा बसलेली असतेच. या सगळ्यांत त्यांची आवड, कल, इच्छा याचा कुठे विचार होतो का?
विचारांत गढून गेलेली अंजू भानावर आली.
गोबऱ्या गालांची सई तिचा हात हलवत तिला सांगत होती, “ए ताई, आज प्लीज गाण्याचा अभ्यास नको ना घेऊस. कालच आमची क्लास टेस्ट संपली आहे.”
तिचीच री ओढत वेद म्हणाला, “हो ताई, आज लगेच अभ्यास नको. आज आपण काहीतरी गेम खेळूया का?”
या मुलांची गाण्याची परिक्षा आता जवळ आली होती म्हणून अंजू त्यांची तोंडी परिक्षेची तयारी करुन घेत होती. रागांची माहिती, तालांची संपूर्ण माहिती, ताल हातावर देऊन दाखवणे, छोट्या-छोट्या व्याख्या असा त्यांचा अभ्यास, सध्या सुरु होता.
जेव्हा सगळी मुलं गलका करत हेच सांगायला लागली तेव्हा ती म्हणाली, “ओके, आज अभ्यास नको. कुठला गेम खेळूया? थांबा हं, जरा विचार करु दे मला.”
तिला मग एक मस्त कल्पना सुचली. ती सगळ्यांना म्हणाली, “तुम्हाला कसा शाळेत व्हॅल्यू एज्युकेशन हा टॉपिक शिकवतात, तसंच आपले सप्तसूरही आपल्याला जीवनाची मूल्यं, व्हॅल्यू एज्युकेशन शिकवतात बरं का.”
रितिका आश्चर्याने म्हणाली, “खरंच ताई? कसं ते सांग ना.”
“बघा हं, पहिला स्वर ‘सा’. तो आपल्याला सांगतो, सारे समान आहेत, इक्वल शब्द माहिती आहे ना? रिच-पुअर, गर्ल-बॉय, हिं*दू-मु*स्लिम असा भेदभाव करायचा नाही. आपण सगळे एकच आहोत. काय, समजतंय ना?”
चिराग जोरात ओरडला, “हो ताई, आमच्या टीचर पण हेच सांगतात की आपला पूर्ण क्लास एकच आहे, कोणाशी भांडायचं नाही.”
“करेक्ट. फक्त तुमचा क्लासच नाही, आपला पूर्ण देश एकच आहे. समानता हा आपल्या कल्चरचा मुख्य भाग आहे, असला पाहिजे.
आता येतो आपला ‘रे’. तो सांगतो, राखा पर्यावरणाचे भान. आपण रहातो ती लॅन्ड, पाणी, हवा हे आपण किती प्रदूषित करतो आहोत. किती प्रकारचं पोल्यूशन आपल्या गाड्यांमुळे, प्रमाणापेक्षा मोठ्या आवाजांमुळे, प्लास्टिकच्या अती वापरामुळे, फॅक्टरीतील केमिकल्समुळे होत असतं, तुम्हाला कल्पना आहे का? शिवाय आपण आपल्या टेकड्या, नद्या, मंदिरं, किल्ले तिथे कचरा टाकून किती अस्वच्छ बनवत असतो की नाही?”
निहार आता सांगायला लागला, “ताई, आम्ही मागच्या वर्षी कुलू मनालीला गेलो होतो तेव्हा आमचा गाईड सारखं सांगत होता, कुठेही. खाण्याचे कागद, बॉटल्स टाकू नका.”
आता सगळ्यांनाच आपापल्या ट्रिपच्या आठवणी यायला लागल्या होत्या. काहींनी त्यांच्या या वर्षीच्या ट्रिपचे प्लॅन्सपण सांगायला सुरुवात केली.
सगळ्यांना शांत करताना अंजूच्या नाकीनऊ आले. ती पुढे म्हणाली, “हं, आता पुढचा स्वर ‘ग’. हा काय सांगतो, गरीबांना मदत करा. हेल्प नीडी पीपल. ती मदत पैश्याच्या स्वरुपात शक्यतो नसावी बरं का!
नाहीतर मग सगळ्यांकडून जर पैसे मिळायला लागले तर कष्ट करायचं, ती लोकं विसरुनच जातील. त्याऐवजी त्यांना जुने कपडे, खाण्याच्या गोष्टी, धान्य, घरातलं जुनं सामान असं दिलं तर जास्ती चांगलं.”
“ताई, मी सिग्नलच्या इथे जी लहान गरीब मुलं दिसतात ना, त्यांना बिस्किटं, केळी असं खायला देतो.”
खरंतर ती मुलं सहज वेदपेक्षा मोठी असतील; पण आत्ता हे बोलताना एखादया पोक्त माणसासारखा त्याचा आविर्भाव बघून अंजूला मजा वाटली. ती त्याच्या पाठीवर थोपटून म्हणाली, “दॅटस् गुड! ओके, आता पुढचा स्वर ‘म’. तो काय सांगतो बरं? तो सांगतो, मोठयांचा आणि गुरुजनांचा आदर, मान ठेवा. रिस्पेक्ट ऑल एल्डरली पीपल अँड टीचर्स. गुरुपौर्णिमा आणि टीचर्स डे ला तुम्ही टीचर्सना नमस्कार करता, फुलं देता, कधी कार्ड वगैरे बनवून देता; पण घरातल्या मोठ्या माणसांना कधी वाकून नमस्कार करता का? खरंतर आपले पहिले गुरुसुध्दा घरातली मोठी माणसंच तर असतात. मग त्यांच्या वाढदिवसाला, सांगा पाहू कोण-कोण फुलं देतं?”
सई म्हणाली, “ताई, फ़ुलं नाही; पण त्यांच्या बर्थडेला मी स्वतः कार्ड बनवून देते सगळ्यांना. नमस्कार”..इथे ती जरा घुटमळून म्हणाली, “तो नाही करत मी.”
आपण नमस्कार करत नाही, याचं वाईट वाटलेलं तिच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसत होतं. हीच प्रतिक्रिया बाकी मुलांचीही होती.
‘चला! एक चांगला विचार मुलांच्या मनात सहज रुजवता आला,’ अंजूच्या मनात आलं.
“आता नेक्स्ट ‘प’. तो सांगतो, परमेश्वराच्या चरणी लीन व्हा.”
यावर सगळ्यांचे प्रश्नार्थक चेहरे बघून अंजूला जाणवलं, त्यांना समजेल अश्या सोप्या भाषेत सांगावं लागणार.
तिने पुढे बोलायला सुरुवात केली, “बघा हं, घरी जसे तुमचे आई, बाबा, आजी, आजोबा, जी कोण मंडळी असतील ती तुमची सर्वतोपरी काळजी घेतात, अगदी तुमच्या अभ्यासापासून ते तुम्हाला बरं नसतं तिथपर्यंत. तुम्हाला कसा विश्वास वाटत असतो, की काहीही झालं तरी माझ्या घरचे माझ्याबरोबर आहेत. ते सगळ्याची काळजी घेणार, मला चिंता करायचं काहीही कारण नाही. त्यांच्यावर सगळी जबाबदारी टाकून तुम्ही अगदी निर्धास्त होता की नाही? घर चालवणं ही जशी पालकांची जबाबदारी, तशी हे आख्खं युनिव्हर्स चालवायची जबाबदारी कोणीतरी घेत असेलच ना?
ती जबाबदारी घेतो त्याला आपण बाप्पा, देव, सुप्रीम पॉवर म्हणतो. इतक्या मोठ्या विश्वाचा पसारा जी शक्ती समर्थपणे चालवते, त्याला आपण देव म्हणतो. तुम्ही अजून या गोष्टी डोळसपणे समजून घेण्याएवढे मोठे नाही आहात; पण असं बघा, जेव्हा तुम्ही बरं नसतं तेव्हा डॉक्टरकडे जाता, तेव्हा ते देतील ती औषधं त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून घेता ना? त्यावेळी त्यांची वैद्यकीय ज्ञानाची शक्ती तुम्हाला मदत करते. मग अश्यावेळी लोकं म्हणतात, ‘अगदी देवासारखे धावून आलात.’ आपल्याला कुठल्याही संकटातून बाहेर पडण्यासाठी जी शक्ती मदत करते, ती शक्ती म्हणजे देव.”
हा डोस जरा जास्तीच हेवी झाला होता हे सगळ्यांच्या चेहऱ्यावरुन तिला जाणवलं. तिने ठरवलं, आता अजून जास्त ताणायला नको.
“आता पुढचा स्वर आहे ‘ध’. ‘धरा सत्याची कास’. ऑल्वेज स्पीक ट्रूथ.”
आता सगळ्यांना कंठ फुटला. “हो ताई, शाळेत, घरी, सगळे हेच सांगतात आम्हाला.”
“मग, बरोबरच आहे ना ते. शिवाय खरं बोलल्याचा एक फायदा सांगू? आपण कोणाला काय सांगितलं होतं ते लक्षात ठेवावं लागत नाही.
कधीतरी शाळेत जायचा कंटाळा आला, अभ्यास करायचा मूड नसला, तर तुम्ही जे बहाणे आईला सांगता ना, ते तिला कळत नाहीत असं नाही; पण मग तिचं स्वतःचं बालपण आठवून तीसुध्दा तुमचं खोटं तिला समजलंच नाही असं दाखवते बरं का!”
यावर, एखादी चोरी पकडली जावी तसे सगळ्यांचे चेहरे झाले. “अँड नाऊ द लास्ट स्वर, ‘नी’.
निसर्गाच्या, नेचरच्या सहवासात जितकं जमेल तेवढं रहा. मोकळ्या, शुद्ध हवेतला ऑक्सिजन आपल्याला तिथे भरभरुन मिळतो. आपल्या मनाला पण दारं, खिडक्या असतात. निसर्गाच्या सान्निध्यात ती पटापटा उघडतात. मग आपण अजून नवनवीन गोष्टी आत्मसात करु शकतो. वेगवेगळे, छान-छान अनुभव तिथे साठवून ठेवू शकतो. नेचर जसं भव्य, एकदम जायंट असतं ना, तसंच आपलं मनही मग विशाल, मोठं होतं. हा इतका सुंदर निसर्ग जपायची जबाबदारी मात्र आपली.
चला, संपले की सगळे सूर बोलता-बोलता. काय, आवडली का ही आगळीवेगळी सरगम?”
सगळ्या मुलांनी एकासुरांत सांगितलं, “हो ताई, भारी होती एकदम. लक्षात ठेवायला पण किती सोपी. आमच्या फ्रेंड्सना पण सांगू आम्ही.”
आजचा क्लास सार्थकी लागला म्हणायचा, अंजूच्या मनात आलं.
आजच्या तिच्या सुरावटीवर, जीवनमूल्यांचे सप्तसूर अगदी अचूक उमटले होते.
-समाप्त
-सौ. राधिका जोशी, पुणे
आपण सर्वांनीच हे सप्तसूर आळवले, तर सर्वांचं जीवन एखादी सुरेल मैफल होऊन जाईल. नाही का?
तुम्हाला ही कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरु नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुपसुद्धा जॉईन करा.
धन्यवाद !
खूप सुरेख. विविध नाविन्यपूर्ण विषय व सहज सोप्या भाषेत त्याची मांडणी हे तुमचे कौशल्य आहे.
व्वा अतिशय सुरेख संज्ञा मांडल्या आहेत लेखिकेने. प्रत्येक स्वर हा अशा पद्धतीने सर्वांनी च लक्षात ठेवले तर गाणे गाता येवो की न येवो उत्तम व्यक्तिमत्व बनण्यास नक्कीच उपयोग होईल. खूप सुंदर बोध कथा, अशा बोधकथा आताच्या मुलांना सांगायला च हव्यात.
धन्यवाद!!
खूप छान कथा
धन्यवाद!!
धन्यवाद!