” हे काय मार्क आहेत ? आरव अभ्यास तर करायला नकोच असतो तुला. मार्क पडणार तरी कसे ? तो वरद बघ. तुझ्याच वर्गात आहे ना. त्याला बघ किती छान मार्क आहेत. सगळ्या विषयांमध्ये पैकीच्या पैकी आणि तू बघ . ते काही नाही. आजपासून तुझे खेळणे बंद. आजपासून फक्त अभ्यास एके अभ्यास. समजले ” . आई कधी पासून आरवला ओरडत होती आणि आरव निमूटपणे खाली मान घालून ऐकत होता. बाबांचाही ओरडा खाऊन आरव रडकुंडीला आला होता.
चौथीच्या वर्गात शिकणारा आरव अभ्यासात यथातथाच होता . बऱ्यापैकी मार्क मिळतील इतकाच अभ्यास तो करायचा. अभ्यासात त्याचा रस तसा कमीच होता. गणित सोडवायला घेतले की बेरीज , वजाबाकी , गुणाकार भागाकार जसे त्याच्या डोक्याभोवती गोल गोल पिंगा घालायचे . विज्ञान अभ्यासायला घेतले की त्यामधील आकृत्या अवती भोवती फेर धरुन नाचायच्या. अशीच गत इतिहास भूगोलाची होती. मराठी तर वेलांटी पहिली की दुसरी यातच अडकून पडली होती. पाढे पाठ करता करता होणारी दमछाक आरवला नको असायची.
आरव मैदानी खेळात रमणारा मुलगा होता. फुटबॉल तर त्याच्या जिव्हाळ्याचा विषय होता. शाळेतून घरी आला की आरवला मैदानावर जायचे वेध लागायचे. काॅलनी मध्ये असणारे सगळे मित्र मंडळ जमा करून तो फुटबॉल खेळत बसायचा. आई मात्र अभ्यासाचे तुणतुणे घेऊन सतत त्याच्या मागे मागे फिरायची.
आज आईचा राग आरव सोबत फुटबॉल वर देखील बरसला. आईने रागारागाने तो फुटबॉल अडगळीच्या खोलीत फेकून दिला. आरवला सख्त ताकीद दिली की अभ्यासा शिवाय काहीही करायचे नाही. फुटबॉल तर नाहीच नाही. बाबाही आईच्या साथीने उभे राहिले. फुटबॉल मिळणार नाही असे त्यांनी आरवला निक्षून सांगितले. आधी अभ्यास कर . चांगले मार्क घेऊन ये तेव्हाच मिळेल फुटबॉल. आई आणि बाबा दोघेही आरवचे मार्क पाहून खूप चिडले होते.
फुटबॉल जसा अडगळीच्या खोलीत बंद झाला तसा आरवने रडून गोंधळ घातला पण ; आई आणि बाबांवर याचा काडीमात्र फरक पडला नाही. त्या दिवसापासून आरवचे खेळणे बंद झाले. सकाळी लौकर शाळेत जाणे आणि आल्यावर पुस्तक वही मध्ये डोके घालून बसणे. आरव दररोज चिडत होता. आई माझा फुटबॉल दे म्हणून रडत होता पण ; आई आणि बाबांना आरवच्या अभ्यासाची इतकी काळजी लागून राहिली होती की त्यासमोर आरवचे रडणे दुर्लक्षित होऊ लागले.
बाबा आता स्वतः आरवचा अभ्यास घेत होते. गणित , विज्ञान , सगळे भाषा विषय अगदी खोलात जाऊन शिकवत होते. आरवही हळूहळू अभ्यास करु लागला होता पण ; लक्ष मात्र खिडकीतून दिसणाऱ्या मैदानाकडे लागून राहिलेले असायचे.
आरव आता त्याच्या ठरलेल्या दिन क्रमानुसार चालला होता. आई आणि बाबांना वाटले की आपण घेतलेला निर्णय योग्य होता पण ; आई आणि बाबांच्या लक्षात ही गोष्ट नाही आली की आरव पहिल्या सारखा नव्हता राहीला. शांत झाला होता तो. दंगा नाही की मस्ती नाही. खोड्या नाहीत की खिदळणे नाही ; पण सतत अभ्यासात गढणारा तर तो नक्कीच नव्हता आणि म्हणूनच त्याची आतल्या आत घुसमट होत होती . आरव अबोल होत चालला होता. जेवणातही हे नको तेच पाहीजे म्हणणारा आरव निमूटपणे समोर असेल ते खात होता.
परीक्षा सुरू झाली होती आणि आई आणि बाबा आता जास्तच सतर्क झाले होते. आरवला मात्र कधी एकदा ही परीक्षा संपते असे झाले होते. एकदाची परीक्षा संपली आणि आई बाबाना हायसे वाटले पण ; निकाल तर अजून बाकी होता आणि म्हणूनच येता जाता दोघेही आरवला निकालाची आठवण करून देत होते. निकाल चांगलाच असला पाहीजे . मार्क चांगलेच असले पाहिजेत हे ऐकून ऐकून आरवला कंटाळा आला होता.
इतके दिवस जगन्नाथराव म्हणजे आरवचे आजोबा मात्र सर्व काही शांतपणे पाहत होते. त्रयस्थपणे बघितल्याने दोघांचीही बाजू त्यांना समजून चुकली होती आणि म्हणूनच त्यांनी एक निर्णय घेतला.
“बाबा, तुम्ही बोलावले ? काही काम होते का ? औषधे संपत आली आहेत का ? काही दुखतय ? डाॅक्टर कडे जायचे का ? ” आरवचे बाबा प्रश्नावर प्रश्न विचारत होते आणि यावर आजोबांच्या चेहऱ्यावर मात्र स्मितहास्य होते.
” विनय , तुला चौथीच्या वर्गात किती गुण मिळाले होते ? त्याचं काय आहे , मला वयोमानानुसार आता आठवत नाही. म्हंटलं तुला आठवत असेल , नाही का ? तुलाच काय सूनबाईला देखील आठवत असेल तिला चौथीच्या वर्गात किती गुण होते. किती गुण होते गं सूनबाई ? ” आजोबा उत्तराची वाट पाहू लागले. दोघांचेही चेहरे बघण्यासारखे झाले होते. त्यांना असे पाहून जगन्नाथरावांनी आपण त्यांना केवळ गप्पा मारण्यासाठी बोलावले आहे असे सांगताच दोघेही निवांत बसले.
” हा काय प्रश्न आहे बाबा ? चौथीचे गुण आता कोण विचारतय ? आणि कशाला ? गरजच काय लक्षात ठेवायची ? इतकी महत्त्वाची गोष्ट नाहीच आहे की लक्षात ठेवावी “. विनयने हसत उत्तर दिले.
” बर , गुण राहू देत पण ; लहानपणीचे खेळ तर आठवत असतील ना ? आणि तुझी खेळणी ? तो , तो बघ एक प्लॅस्टिकचा बाॅल आणि बॅट. खूप आवडतं खेळणं होतं तुझं. तो बाल खेळता खेळता चेपला तर किती रडला होतास तू विनय . अगदी तस्साच बाॅल मी तुला परत आणून दिला तेव्हा कुठे शांत बसला होतास. आठवतय तुला ? ” जगन्नाथराव विचारत होते आणि विनय लहानपणीच्या आठवणीत रममाण झाला. मोठमोठ्याने हसत बोलू लागला.
” हो बाबा , आठवतय ना. चांगलच आठवतय. ए , अक्षता , तुला माहीत आहे खूप रडलो होतो मी त्या दिवशी . मला तो माझा बाॅल आणि बॅट खूप प्रिय होते. खूप खेळायचो मी त्या बाॅल आणि बॅट सोबत. इतकेच नाही तर माझे सगळे मित्र आणि मी मिळून खेळायचो अगदी दिवस दिवस भर. सुट्टीच्या दिवशी तर जेवण करायची देखील शुध्द रहात नव्हती आम्हाला इतके खेळत होतो आम्ही ” . विनय आता खूप उत्साहाने बोलत होता.
” अक्षता , आम्ही ना सगळे मिळून सुट्टीच्या दिवसाची आधीच योजना आखायचो . आई जेवायला बोलवून थकायची पण ; आम्ही सगळे मित्र खेळण्यात एवढे गुंग असायचो की खेळ सोडून जायची इच्छाच व्हायची नाही “. विनय बोलतच होता की त्याला मधेच टोकत जगन्नाथराव बोलू लागले.
” मग आई काय करायची ? तुझा बाॅल अडगळीच्या खोलीत फेकून द्यायची का ? दिवस भर नुसता खेळत रहायचास म्हणून किंवा अभ्यासाच्या नावाखाली तुझा खेळ बंद करायची का रे ? गुण कमी आहेत की जास्त आहेत म्हणून खूप ओरडायची का रे ? ” जगन्नाथरावांचे प्रश्न आता धारदार झाले होते आणि त्या प्रश्नांनी विनय आणि अक्षता गोंधळून गेले होते.
” नाही बाबा , आई किंवा तुम्ही खेळण्यासाठी कधी रागवत नव्हता. परीक्षा आहे या गोष्टीचे कधी दडपण नाही आले. अभ्यास हसत खेळत व्हायचा कारण परीक्षेचा बाऊ केला जात नव्हता . किती छान होते ते दिवस ! किती सुंदर होतं ते बालपण ! ” विनय स्वतःच्याच विचारांमध्ये हरवला होता. चेहरा खुलला होता त्याचा बालपणीच्या आठवणींनी.
” चुकलंच माझं विनय. तुझा बाॅल मी अडगळीच्या खोलीत फेकून द्यायला हवा होता . परीक्षा जवळ आलेत म्हणून तुझं खेळणं बंद करायला हवं होतं. हसत खेळत पार पडणारी तुझी परीक्षा तुझ्या साठी ओझं बनेल असं वागायला हवं होतं मी. चुकलंच माझं ” . जगन्नाथराव भावनिक होऊन बोलत होते आणि विनय व अक्षता भांबावून गेले होते.
” बाबा, असे का बोलताय तुम्ही ? ” विनयने प्रश्न विचारताच जगन्नाथराव थंड नजरेने विनय कडे पाहू लागले. आरवचा कोमेजलेला चेहरा डोळ्यासमोर आला आणि त्यांना गलबलून आले.
” तुझ्या बालपणीच्या आठवणी सुंदर आहेत. त्या आठवताच तुझ्या चेहऱ्यावर हसू फुलते विनय. तू क्षणभर का होईना तुझ्या अडचणी विसरून तुझ्या बालपणीच्या आठवणीत रममाण होतोस “. जगन्नाथरावांच्या बोलण्याला विनयने दुजोरा दिला.
” हो बाबा, बालपणीचा काळ सुखाचाच असतो आणि असावा. कारण आयुष्यातील तोच एक काळ असा असतो जो संपूर्ण आयुष्यात मिळणाऱ्या प्रत्येक जखमेवर फुंकर घालतो. संकटकाळी असो किंवा दुखा:च्या प्रसंगी असो एक बालपणीच्या आठवणीच असतात ज्या अशा कठीण समयी ओठांवरचे हसू कायम ठेवण्यात यशस्वी होतात ” . विनय बालपणीच्या आठवणी आठवून स्वत:शीच बोलत होता.
” मग आरव जेव्हा मोठा होईल तेव्हा त्याच्या कडे असतील का अशा सुंदर बालपणीच्या आठवणी ज्या आठवून त्याच्याही चेहऱ्यावर हसू फुलेल ? का सतत कोणत्या विषयात किती गुण मिळाले ? गणिताचे पाढे पाठ झाले का ? विज्ञानाच्या आकृत्या रेखाटल्या का ? मराठीचा निबंध लिहिला का ? याच विवंचनेत गुरफटलेल्या बालपणीच्या आठवणी असतील त्याच्याकडे ? आईने माझ्या रडण्याकडे दुर्लक्ष केले. बाबांनी माझा फुटबॉल अडगळीच्या खोलीत फेकून दिला. माझ्या वर्ग मित्राला माझ्या पेक्षा चांगले मार्क मिळाले म्हणून माझ्या कमी गुणांची तुलना केली की अभ्यासच महत्त्वाचा म्हणून माझं खेळणं बंद केलं “. विनय आणि अक्षता सुन्न होऊन ऐकत होते.
“आज इथे मी आणि तू बसलोय ना विनय तिथे उद्या तू आणि आरव बसलेले असाल. तेव्हा तुझ्या कडून मी जसे तुझे बालपण पुन्हा ऐकले तसे तू त्याचे बालपण पुन्हा ऐकशील आणि तेव्हा वेळ निघून गेली असेल कारण तेव्हा आरव लहान नसेल. तेव्हा तो हट्टीही नसेल. त्याचाही संसार , कुटुंब , जबाबदाऱ्या यामध्ये गुंतला असेल तेव्हा तो नाही म्हणणार की आई बाबा मला फुटबॉल खेळायचा आहे. मला खेळायला जाऊ दे ” . अक्षताला एव्हाना रडू कोसळले होते.
” बालपण देगा देवा , मुंगी साखरेचा ठेवा ! विनय आणि अक्षता समजून घ्या त्याला. त्याचं बालपण या तथाकथित स्पर्धेच्या नावाखाली हिरावून नका घेऊ. अरे आता तर केवळ चौथीच्या वर्गात आहे तो. मान्य आहे की अभ्यास महत्त्वाचाच आहे पण ; आनंदी आयुष्य ही तेवढेच महत्त्वाचे आहे आणि यासाठी आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत ” . जगन्नाथरावांचे म्हणणे दोघांनाही पटू लागले होते.
स्पर्धा , महत्वाकांक्षा , यश हे सर्व सोबत वाहता वाहता कधी कुठे एका आनंदी क्षणासाठी क्षणभर थांबता आले तर तिथे तुम्हाला जगण्याचा खरा आनंद गवसेल ” . विनय आणि अक्षता आरवचा चेहरा आठवून भावुक होऊ लागले होते.
” त्याला मनसोक्त खेळू दे , बागडू दे , पडू दे , रडू दे , खोड्या करु दे , हरु दे आणि पुन्हा जिंकू दे. तुम्ही केवळ त्याचा भक्कम आधार बनून रहा. त्याला त्याचं बालपण जगू द्या ” . अक्षता सोबत आता विनयचेही डोळे भरले होते . जगन्नाथराव जागचे उठत दोघांच्याही डोक्यावर हात ठेवत बाहेर निघून गेले.
आरव हाॅल मध्ये बसून अडगळीच्या खोली कडे पाहत बसला होता इतक्यात त्याला मोठमोठ्याने खिदळण्याचे , हसण्याचे आणि ओरडण्याचे आवाज ऐकू येऊ लागतात. तो आश्चर्य चकित होऊन दरवाजा कडे धावत जातो आणि समोरील दृश्य पाहताच दरवाजातच थबकतो.
आरवचे सगळे मित्र आणि आरवचे आई बाबा घरासमोरील अंगणात फुटबॉल खेळत असतात तर आजोबा बाजूला आराम खुर्चीत बसून त्या सगळ्यांना प्रोत्साहन देत असतात. आरव डोळे फाडून समोरील दृश्य पाहत असतो. त्याला असे दरवाजातच थबकलेले पाहून विनय त्याच्या जवळ जातो आणि प्रेमाने त्याच्या गालावर हात फिरवून त्याला सोबत घेऊन अंगणात येतो. फुटबॉल आणून त्याच्या पायात ठेवतो आणि हे पाहून सगळे जोरजोरात ओरडून आरवला प्रोत्साहन देऊ लागतात.
आरव भरलेल्या डोळ्यांनी आपल्या आई बाबांकडे पाहू लागतो आणि विनयने त्याला डोळ्यांनीच इशारा करताच जोरात फुटबॉल उडवतो. आता तो ही त्याच्या मित्रांसोबत फुटबॉल खेळू लागतो . आज खूप दिवसांनी असा आनंदी आरव पाहून विनय आणि अक्षताच्या डोळ्यात पाणी भरले होते तर ओठांवर हसू खुलले होते. हे सर्व जगन्नाथराव समाधानाने पाहत होते.
समाप्त :
कथा कशी वाटली आपला बहुमूल्य अभिप्राय देऊन जरूर कळवा आपल्या मित्र परिवारासोबत कथा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी लेखक मित्र या वेबसाईटला भेट द्या. आमचे wht’s up चॅनेल फाॅलो करा. धन्यवाद.
सौ. मनिषा उदयसिंह पाटील, पुणे.
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
अप्रतिम कथा, पालकांनी बोध घेण्यासारखी
धन्यवाद
खूपच सुंदर
धन्यवाद