Marathi  ‌‌Emotional Story – मी आहे!

WhatsApp Group Join Now

  नरेश खूपच टेन्शनमध्ये होता. त्यांनी भराभरा त्याच्या मित्राला फोन केला,”बाबांना श्वास घ्यायला त्रास होत आहे, तू त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करू शकशील का?”

हजारो मैलानवरून ही धावपळ करताना नरेशच्या जीवाची खूपच तगमग होत होती. मित्राने लगबगीने नरेशच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. मित्राच्या फोनवरून नरेशनी बाबांच्या तब्येती विषयी डॉक्टरांशी सविस्तर चर्चा केली.

तो अक्षरशः हतबल व रडवेला झाला होता. मनात अनेक शंकांचे काहूर माजले होते. आपण पोहोचेपर्यंत बाबांची व आपली शेवटची भेट तरी होईल का? त्यांना काही आपल्याला सांगायचे आहे का?निरोप द्यायचा आहे का? कदाचित शेवटचा? … 

मन चिंती ते वैरी न चिंती.

आई गेल्यापासून गेली बारा वर्षे बाबा एकटेच राहत होते. ते आता वार्धक्याकडे झुकत चालले आहेत हे नरेशच्या ध्यानीच आले नाही.

एखाद दोन वर्षातून एक दीड महिन्यांसाठी बाबांना  तो अमेरिकेत  बोलून घेत असे. कोविड मुळे दोन वर्ष बाबा तिकडे अमेरिकेत येऊ शकले नव्हते व नरेश भारतात. पुढचे दीड दोन वर्ष मुलाच्या शिक्षणासाठी कॉलेजच्या ऍडमिशन साठी म्हणून नरेश बाबांना भेटू शकला नव्हता. तब्बल चार वर्षानंतर आज बाबांची तब्येत बिघडली म्हणून अगदी अचानक घाई घाईने नरेशनी भारतात यायचा निर्णय घेतला. 

ऑफिसमध्ये रीतसर मेल पाठवून ताबडतोब नरेशनी जे पहिले विमान भारतात घेऊन जाईल त्याची चौकशी केली. 

नीरजाने विचारले “तु परत कधी येणार?” “माहित नाही बघू”नरेशनी तुटक उत्तर दिले.

“अरे! प्रेसिडेंटला कळवले का? नाहीतर चक्क वर्क फ्रॉम होमचा ऑप्शन घेतोस का?” बायकोच्या प्रश्नाकडे त्याचे अजिबात लक्ष नव्हते. “सोहमला भेटून  जाशील का? तो आल्यावर विचारेल बाबा कुठे आहे?” नीरजा बडबड करत होती, पण आता नरेशचे लक्ष पूर्ण बाबांकडे लागले होते. इतर वेळेस मुलाचे लाड करणारा नरेश आज कुठल्याही गोष्टीची परवा न करता बाबांच्या ओढीने घरातून बाहेर घराकडे चालला होता.

एअरपोर्टवर आल्यावर जे विमान लवकरात लवकर भारतात घेऊन जाईल त्याचं त्यानी बुकिंग केले. ऑफिसमध्ये काही जुजबी फोन करून,नरेशनी त्याच्या कामाची जबाबदारी इतरांवर सोपवली. परत यायची कुठलेही तारीख त्यानी निश्चित केली नव्हती. एकच विचार त्याच्या मनात घोळत होता व तो म्हणजे बाबा.. बाबा आणि बाबा…..

सहा आठ महिन्यासाठी म्हणून अमेरिकेत गेलेला नरेश आता तब्बल वीस वर्षे तिथे स्थायिक झाला होता. 

बाबा साठाव्या वर्षी रिटायर झाले. आई-बाबांनी आता भारतात व भारताबाहेर मस्त फिरून एन्जॉय करावे असे नरेशला कायम वाटायचे.

CPA झाल्यावर Goldman Sachs & Co ची अमेरिकेला जायची संधी नरेशला मिळाली आणि आईने रडारडी करत अबोला धरला. सोहम खूपच लहान होता जेमतेम सहा महिन्याचा, त्याचे कसे होईल? नीरजा घरात एकटी सगळे कसे सांभाळेल? अनेक प्रश्नांनी आईने भंडावून सोडले होते.

त्यावेळी बाबांनी मध्यस्थी करून “सर्व गोष्टी ठीक होतील नरेशला जगातली उत्कृष्ट कंपनी बोलवत आहे अशी संधी परत परत येत नाही” असे आईला समजावून सांगितले होते. “त्यांना त्यांचा संसार करू दे, जबाबदाऱ्या घेऊ दे, अडीनडीला आपण आहोत ना? आणि अमेरिका लांब थोडीच आहे?” बाबांची एक खास शैली होती कितीही अवघड प्रसंग असो अथवा संकट आले तरी त्यातून ते अतिशय शांतपणे मार्ग काढत असत. 

“आणि अमेरिका लांब थोडीच आहे” बाबांचे शब्द नरेशला परत परत आठवत होते.

हो! अमेरिका खूपच लांब आहे. प्रत्येक क्षण नरेशला एका युगासारखा वाटत होता.

 नरेश विमानाच्या प्रतीक्षेत बसला होता.

फोनची रिंग वाजली की त्याला छातीत धसस् होत होते. कोणाचा फोन असेल? कुठून आला  असेल? कशासाठी असेल? बाबा.. बाबा बरे असतील ना ? एक ना अनेक प्रश्न डोक्यात रुंजी घालू लागायचे…ही जीव घेणी  प्रतीक्षाच कधी संपेल आणि आपण बाबांना भेटू असे त्याला झाले होते…

सहज चाळा म्हणून त्यांनी मोबाईल मधले फोटो बघायला सुरुवात केली. त्याचे,नीरजाचे, सोहमचे फोटो…down the memory lane…तसा नरेशला बाबांच्या 75 व्या वाढदिवसाचा व्हिडिओ डोळ्यासमोर आला. छोटे खानी पण छान वाढदिवस साजरा झाला होता. अगदी अचानक बाबांना सरप्राईज. त्यांच्या वाढदिवसाचे सर्व प्लॅनिंग अमेरिकेतूनच करून नीरजा व सोहमला घेऊन नरेश भारतात आला होता. काही निवडक नातेवाईक व बाबांचे मित्र मंडळी यांना बोलावून केलेला तो वाढदिवस व प्रत्येकाने बाबांविषयी भरभरून बोलून दिलेल्या शुभेच्छा त्या सर्व आठवणी त्याने या छोट्याशा मोबाईल मध्ये बंदिस्त केल्या होत्या.

विचारांच्या तंद्रीत असतानाच नरेशच्या मित्राचा फोन आला, डॉक्टरांना काहीतरी महत्त्वाचे निर्णय घ्यायचे होते व त्यासंबंधी नरेशची परवानगी हवी होती.

 बाबांना आता व्हेंटिलेटर लावायची गरज होती. पुढचे 48 तास काळजीचे होते.डॉक्टर सांगतील व तिथे असलेल्या मित्रावर विश्वास ठेवून नरेशनी त्या गोष्टीला मान्यता दिली.

विमान सुटायला अजूनही थोडा अवधी होता. 

पुढचे 24 तास तो या सर्वांना not reachable असणार होता व त्यामुळे बाबांच्या तब्येती विषयीचे सर्व महत्त्वाचे निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार व जबाबदारी त्याने नीरजाच्या हाती सुपूर्त केली.

विमानाचे बोर्डिंग सुरू झाले. विमानात बसल्यावर प्रार्थमिक सूचना संपल्यावर “please do not disturb, I don’t want anything” अशा सूचना एअर होस्टेसला देऊन नरेशने घट्ट डोळे मिटले. त्यानी आता स्वतःला बालपणीच्या  आठवणींन मध्ये झोकुन दिले.मनाच्या खोल खोल विहिरीत एक एक पायरी तो खाली उतरू लागला.

मागच्या खेपेला बाबा अमेरिकेला आलेले असताना त्यांनी सोहमच्या वाढदिवसाला केलेली पनीर भुर्जी,दाल माखनी व त्यांच्या पाककृतीला सगळ्यांकडून मिळालेली दाद…

वहा वा! 

“सोहम you are luck तुझे आजोबा खूप छान जेवण बनवतात” व सोहमची उत्स्फूर्त  प्रतिक्रिया “Yess he is cool aajoba, love you! “म्हणून मारलेली घट्ट मिठी नरेशच्या डोळ्यासमोर ते दृश्य तरळून गेले. 

बाबा अमेरिकेत आल्यावर संध्याकाळी त्यांनी सांभाळलेली स्वयंपाकाची बाजू वेगळ्या चवीचं प्रेमाने बनवलेले आयते सुग्रास जेवण   म्हणजे नीरजाचे लाड ,जणू तिचे माहेरपणच सुरू असायचे.

आई-बाबा पहिल्यांदा अमेरिकेला आले होते तेव्हा त्या दोघांचा खूपच आधार वाटला होता.

छोट्याशा सोहमला दिवसभर खेळवणारे बाबा.. नीरजा बरोबर सामान व इतर कामे करणारे बाबा…ते आले की मला एकदम आधार मिळायचा, रिलॅक्स व छान वाटायचे…

भारतात मी घेतलेला फ्लॅटला भाड्याने चढवून दर महिना मिळणाऱ्या भाड्याचे SIP करून सोहमच्या नावाने बाबांनी बरीच माया जमा केली. इन्व्हेस्टमेंट ,टॅक्स या कशाचाही दूर दूर पर्यंत माझ्याशी संबंध येत नाही. भारतातले पैशाचे सर्व व्यवहार एक हाती बाबांनी छान सांभाळायचे त्यामुळे मी कायमच निश्चित असायचो.

नरेशला एकदम “सांभाळायचे”या मनातल्या विचारांवर तो क्षणभर थबला…. सांभाळतात…आणि पुढेही तेच सांभाळतील…

त्यांनी घड्याळात बघितले आता त्याला थोडीशी भुकेची जाणीव झाली होती.

त्यांनी एअर होस्टेसला बोलावून खायला काहीतरी मागून घेतले.

नरेश परत एकदा विचारांमध्ये घढून गेला.

त्याला आठवले बारावी झाल्यावर त्याला छान मार्कस मिळाले होते. सगळ्या नॅशनल, नामांकित (NIT,BITS) कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग साठी त्याला सहज ऍडमिशन मिळाली होती पण त्याला बँकिंग आणि फायनान्स मध्येच करिअर करायचे होते.

बाबांनी त्याला बारावीच्या सुट्टीनंतर दोन महिने सीए कडे काम करायला पाठवले होते. प्रत्येक निर्णय घ्यायच्या आधी सर्व बाजूंनी विचार करावा व प्रत्येक घेतलेला निर्णय हा 

अभ्यासपूर्व असावा असा त्यांचा कायमच अग्रह असायचा.

त्या कोवळ्या वयात नरेशला बाबांचा खूपच राग आला होता.सुट्टी मध्ये सगळ्या मित्रांनी उनाडक्या केल्या होत्या व बाबांनी जबरदस्तीने त्याला सीए कडे कामासाठी पाठवले होते.  पण पुढे जाऊन पहिल्या झटक्यात सीए झाल्यावर, या सर्व गोष्टी बाबांमुळे शक्य झाल्या ही प्रांजळपणे दिलेली कबुली सर्व सर्व त्याला अगदी स्पष्ट आठवत होते….

बाबांनी शिक्षणासाठी कायमच प्रेरणा दिली होती. देशाबाहेर जर संधी हवी असेल तर

बाहेरच्या देशातले कोर्स करणं गरजेचे आहे आणि म्हणूनच त्यांनी मला certified public accountant (CPA) करणे किती गरजेचे आहे, हे त्यांनी पटवून दिले होते. आज केवळ त्यांच्या ग्रहामुळेच मी अमेरिकेत स्थायिक होऊ शकलो.

नरेशला त्याचे शाळेतले दिवस व तरुण बाबा आठवले. पहिल्यांदा सायकल शिकताना बाबांनी दिलेला आधार “घाबरू नको मी आहे”

म्हणत अलगद सोडलेला आधार…

थोडेसे लांब गेल्यावर बाबा बाजूला नाहीत म्हटल्यावर  गडबडलेला माझा चेहरा….

 व मागून टाळ्या वाजवून बाबांनी केलेले कौतुक “अरे मस्त! जमले की तुला”म्हणून बीलगलेले  बाबा…. नरेशच्या डोळ्यात पाणी आले..

“घाबरू नका बाबा मी येतो आहे ”नरेशनी मनातूनच बाबांना आश्वासन दिले.

याही परिस्थितीतून मार्ग निघेल… तुम्ही तो नक्कीच काढाल…अजूनही तुमच्या आधाराची मला, नीरजाला, सोहमला गरज आहे बाबा…

“Ladies and gentleman, we have begun our descent into Mumbai. Please turn off all portable electronic devices and stow them until we have arrived at gate no -3.  In Preparation for landing in Mumbai ,be certain your seat back is straight up and your seat belt is fastened”

विमानात अनाउन्समेंट झाली व नरेश खाडकन जागा झाला. आता फक्त एका तासाचीच दुरी होती त्याच्यात व बाबांमध्ये.

नरेशनी मित्राला फोन केला. डोक्यावरची 48 तासाची टांगती तलवार अजूनही लटकत होती.

टॅक्सी घेऊन तो थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचला.

ICU मधे बाबांना पाहून तो अक्षरशः कोसळलाच. डॉक्टरांनी नरेशला त्याच्या बाबांना भेटायची परवानगी दिली.

नरेश बाबांच्या जवळ गेला व त्यांनी प्रेमाने बाबांचा हात हातात घेतला.

“बाबा मी आलो आहे, किती धावपळ करायला लावलीत. सोहम व नीरजा तुमची वाट पाहत आहेत आपल्याला अमेरिकेला जायचे आहे. या खेपेला तुमचे ग्रीन कार्ड मिळणार आहे. मी तुम्हाला कुठेही जाऊन देणार नाही”…नरेश भडाभडा बोलत होता.

बाबांच्या कण्हण्याचा आवाज आला. डोळे किलकिले करून बाबांनी नरेश कडे बघितले.

“तू कधी आलास?”बाबांचे शब्द ऐकण्यासाठी नरेशनी जीवाचा कान केला.

बाबांनी नरेशचा हात हातात घेतला …अस्फुट शब्द कानावर आले “घाबरू नकोस मी आहे ना”

वृषाली पुराणिक,पुणे

पुरुषांच्या आयुष्यातले हळवे क्षण व एका मुलाची वडिलांना भेटायची तगमग नात्यांवर गुंफलेली ही कथा तुम्हाला कशी वाटली,ते नक्की कळवा.                  

आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WasApp ग्रुप हि जॉईन करा.

   धन्यवाद !

10 thoughts on “Marathi  ‌‌Emotional Story – मी आहे!”

    1. खूप खूप धन्यवाद. आपल्या प्रतिक्रिया नवीन विषय हाताळायला व प्रयोग करायला ऊर्जा देऊन जातात.

  1. जयश्री देशपांडे

    नरेश ची तगमग, बाबांच्या आणि त्याच्या मधील भावबंध, त्यांना भेटण्याची तळमळ खूप प्रभावी पणे मांडली आहे. कथेचा शेवट वाचकांवर सोडला हे छान झाले. त्यामुळें positive विचार मनात येतात.
    कथा आवडली.

    1. आपण केलेले नेहमीच कौतुक. वेगवेगळ्या विषयांसाठी लिखाण करायला प्रेरणा देऊन जातात. खूप खूप धन्यवाद

  2. आपल्या प्रतिक्रिया नवीन नवीन विषय हाताळायला ऊर्जा देऊन जातात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top