कथेचे नाव – ‘कवडसा ‘ जीवनाच्या शेवटच्या क्षणाला जगण्याचं नवं बळ देणारी भावनिक कथा

WhatsApp Group Join Now

रात्रीच्या दुनियेत चंद्र एक एक पाऊल पुढे टाकत होता. चांदण्यांचा लखलखाट चालू होता. सर्व झाडे झुडपे शांत विसावले होते. पशुपक्षी आपल्या घरी निवांत झोपले होते. हळुवार शितल वारा अंगाला स्पर्श करून जात होता. डोंगर मात्र तटस्थ उभे राहून पहारा देत होते. निसर्ग जणू आपल्या दुनियेत सुखावून गेला होता. चंद्राच्या प्रकाशामध्ये चांदण्यांचा प्रकाश मिसळून जात होता. त्यांच्या प्रकाशात सर्वसृष्टी न्हाऊन निघत होती.

              सर्वजण आपापल्या जगण्याचा आनंद घेत होते.पण वामनराव खोल विचारात गढून गेले होते.आजूबाजूच्या वातावरणाचा त्यांच्यावर काही परिणाम होत नव्हता.घराच्या अंगणात बाज टाकून एकटक चांदण्याकडे पाहत होते.एक प्रहर कधीच टळून  गेला होता. तरीही त्यांना झोप लागत नव्हती. पंच्याहत्तर वर्षांपूर्वीची आयुष्यभराची बेरीज, वजाबाकी , जमापुंजी,साठवलेल्या गोड कडू आठवणींचा पाठपुरावा घेण्यात अर्धी रात्र कधीच सरून गेली होती. वामन रावांची पत्नी सावित्रीबाई यांनी आपली जीवन यात्रा वर्षभरापूर्वीच संपवली. एकटे पडलेले वामनराव आता मात्र पूर्ण खचून गेले . दोन्ही मुलांच्या प्रपंचामध्ये वामन रावांची उचल बांगडी झाली . अडकित्यात सुपारी सापडावी तशी वामनरावांचे गत झाली होती. कधीकाळी शब्दाला असलेली किंमत आणि नावाचा असलेला दरारा आज मात्र अडगळ बनुन राहिला होता. आजही त्यांचा  मान टिकून होता. परंतु तो फक्त बाहेरच्या लोकांपुरताच. घरी मात्र त्यांची किंमत शून्य झाली होती.

          ” सावित्री असती तर आज मला कोणाची बी गरज भासली नसती.पण आज मला परस्वाधिन व्हावं लागलं.आता आपलं स्वातंत्र्य संपलं.सावित्री पोरं बाळ सांभाळायची,घरातली किरकोळ कामं करायची. तर तिचा कोण बी जास्त राग नव्हतं करत.पण मला काय बी काम व्हईना झालंय त मी नकुसा झालोय सगळ्यांना. कव्हा संपायचा माझा ह्यो खेळ .जगणं नकुसं झालंय.पण मरण बी येईना झालंय. मन कुठं रमवायचं” असे विचारचक्र चालू असताना थंड हवेची झुळूक  वामनरावांना निद्रेच्या आधीन करून गेली.

        “बघा जाऊबाई काय म्हणावं तात्यांना  दिस  किती वर आलाय तरी तात्या ढाराढुर झोपलेत. शोभतं का त्यांना ? लहान लहान पोरं बी  शाळेत आवरून गेली.तरी म्हातारं आजुन झोपलय .” वामनरावांची धाकटी सून मोठ्या जावेला हात वारे करून बोलू लागली.

         “त्यांना काय काम हाय का तवा लवकर उठाया? नुसतं खायला कहार आणि भुईला भार बाकी काय” नाक डोळे मोडत मोठी सून बोलू लागली.

         अर्ध्या झोपेमध्ये वामनराव हे सर्व ऐकत होते. पण त्यांचा नाविलाज  होता. “बोलून तरी काय उपयोग .बोलून माझाच अवमान व्हणार  त्यापेक्षा जाऊंदे”  तुटलेलं विचारचक्र पुन्हा जोडत तात्या विचार करू लागले .हे आता रोजचंच झालं होतं. फक्त जगाच्या लाजं काजं सांभाळायचं बाकी तात्यांबद्दल काही आपुलकी उरली नव्हती.जेवढं मिळलं तेवढंच खाणे ,जे मिळेल त्यातच समाधान मानायचे असा आता तात्यांचा नित्यक्रम झाला.जोपर्यंत सावित्री होती; तोपर्यंत  वामनरावांचीही आदराने विचारपूस केली जायची.पण आता कोणी लक्ष देत नाही. सूना तर नाहीच देती.पण पोटची पोरं  देखील विचारत नाही.

          “आजन्म ज्यांच्यासाठी खस्ता खाल्ल्या  त्यांनाच नकुसा  झालो.एक काळ असा व्हता.माझी पोरं माह्याईना जेवत नव्हती. मह्याईना त्यांची सकाळ व्हईना आण मह्याईना  रात ढळत  नव्हती.पण आता सकाळ, संध्याकाळ ताट सरकायचं आण निघून जायचं. ह……..  ” उसासा सोडत पुन्हा तात्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर आले. थरथरत्या हातांनी खाटंजवळची काठी घेऊन कंबरत वाकत घरात निघाले. स्वतःच्या हाताने चुलीवरचं तापलेलं पाणी घेऊन आंघोळ केली. सकाळचे सर्व विधी आवरून तात्या जेवण करायला बसले. टोपल्यात पाहिले तर फक्त एक चतकोर भाकर. तात्यानं गुमान ती भाकर खाल्ली. काम जरी करत नसले तरी पोटाला जेवढी भूक लागायची तेवढी लागतच होती. पण जास्त मागायला गेलो की लगेच तुम्ही काय काम करता? कशाला पाहिजे एवढं खायला ? किंवा तुम्हाला जास्त खाल्ल्याने त्रास होईल असं म्हणत साळसूदपणाचा आव आणत.

            सणवार आले की घरामध्ये गोडधोड व्हायचं. तात्यांना पहिल्यापासूनच पुरणपोळी खूप आवडत होती. सावित्रीबाई होत्या तेव्हा पुरणपोळी जास्तीच्या बनवून ठेवायच्या. पण आता तात्या तुम्हाला एक पोळी अजून देऊ का? असेही कोणी विचारत नाही. सावित्रीबाई गेल्यापासून घरामध्ये मनमानी कारभार चालू लागला. आदराने बोलणाऱ्या सूना आता उलटे फिरून बोलायला लागल्या. तात्यांचा पदोपदी अपमान होऊ लागला. दिवसेंदिवस तात्या शरीराने आणि मनाने  खचून चालले होते. क्षणाक्षणाला जगणं नकोसं वाटू लागलं . जोपर्यंत जमीन तात्यांच्या नावावर होती; तोपर्यंत मुले तात्यांच्या मागे पुढे करत होती.चांगुलपणाचा फायदा घेऊन मुलांनी जमिनी स्वतःच्या नावावर करून घेतल्या. हीच तात्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक ठरली. सरड्याला ही रंग बदलायला वेळ लागत असेल. परंतु आपल्या पोटचीचं पोरं एवढ्या लवकर रंग बदलतील असं तात्यांना कधीही वाटलं नव्हतं.

              शेजारचे रामूआण्णा आणि वाडीतलं कृष्णाजी आप्पा हे तात्यांचे खास जोडीदार  . जेव्हा ते तात्यांच्या घरी यायचे किंवा तात्या त्यांच्या घरी जायचे तेव्हा प्रत्येकाचा दुःखाचा डोंगर कमी झाल्यासारखा वाटत. पण नियतीचा फेरा कोणी बदलू शकत नाही. रामू आण्णा खितपत गेले.आणि कृष्णाजी आप्पा यांना हृदयविकाराचा झटका आला. दोघांचाही शेवट अशाप्रकारे झाला. तात्यांना काळजी वाटू लागली की आपला शेवट कशाप्रकारे होईल ?आपणही निरोप घेतला पाहिजे पण कसा?असे  विचार असंख्य वेळा तात्यांच्या मनात येऊन गेले.परंतु पुन्हा मन  धीट करून स्वतःला सावरायचे.

            आता पंढरीच्या वारीला जायचं पुन्हा कधी न येण्यासाठी.असा दृढ निश्चय तात्यांनी मनोमन केला. आयुष्यभर प्रपंचासाठी वाहिलेले आयुष्य आता सत्कर्मी  लावले पाहिजे.  या मायाजाळातून बाहेर पडून मनाला शांततेच्या मार्गावरती नेले पाहिजे. असा तात्यांच्या   मनात विचार घोळवू लागला.

         “वामनराव sssssss ओ वामनराव ssssss दरवाजावरती थाप पडली. कोण हाय? म्हणून तात्यांनी विचारलं. आरं मी म्हादबा…. एक चांगली बातमी घेऊन आलोय.तुला बी आवडलं. किंवा तू त्याची वाटच बघत असल.” सुतराचा म्हादबा म्हणाला. म्हादबा  हा पण तात्यांचा चांगला मित्रच होता परंतु त्याची ये जा कमी असायची.  कोमजलेल्या फुलाला पाण्याचा स्पर्श व्हावा. आणि ते टवटवीत व्हावं . तसं तात्यांच्या  चेहऱ्यावरती मंजुळ हसू उमटलं.

           “काय बातमी हाय रं.”आनं मला बरं वाटलं असं काय हाय?आता मला  कशातच राम वाटतं नाय. सगळेजण आपापली स्वार्थाची पोळी भाजून घेतय बघ. आनं कशाची चांगली बातमी.”तात्यांचा टवटवीत चेहरा क्षणार्धात मावळला.

        “आरं तात्या असं बोलून चालणार हाय व्हय. उरलेलं दिस आपण भजनात, किर्तनात रमवलं पाहिजे. काय उगाच घरातल्याच खुरापती उराशी कवटाळून बसलाय. घरच्यांना काय शिमगा ,दिवाळी करायची ती करुदे .आनं तू माझ्याबरोबर चल. घरच्या या राहाडगाडग्यातून तू मोकळा होशील.”

         “ते संमद झालं पण काय बातमी हाय हे तू तर सांगितलं नाय.”तात्या म्हणाले.त्यांच्या चेहऱ्यावरच्या विसावलेल्या खुणा स्पष्ट दिसत होत्या.

      “आरं आपल्या वाडीत विठ्ठल रुक्मिणीच्या जुन्या  मंदिराचा जिर्णोद्धार व्हणार हाय.आण  आता दररोज भजन, कीर्तन बी व्हणार हाय तू  उद्यापासूनच ये.” म्हादबा कौतुकाने सांगत होता.

         म्हादबा  जाऊन बराच वेळ झाला.तरी तात्या विचारांतून बाहेर आले नाही.दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग तात्यांना सापडला.भरकटलेल्या  जीवाला  योग्य मार्ग दिसला. पानांना ,फांद्यांना बाजूला करत हळुवार एक कवडसा जमिनीला उजळून टाकतो. तसं या बातमीने तात्यांचे मन उजळून टाकले .आता चिंता नव्हती .

            रात्र झाली.आज मात्र तात्या निवांत झोपले.पडल्या पडल्या झोपही चांगली लागली.कोणत्याही विचारात गढून गेले नाही.चंद्र,चांदण्याच्या दुनियेत तेही सुखावून गेले.

           सकाळ झाली.तात्या लवकर आवरून निघून गेले.घरातली सर्व मंडळी उठली. “आज चक्क म्हातारं लवकर उठलं ?” तोंडावर चमत्कारिक पद्धतीने हात ठेवत धाकटी सून म्हणाली.

          “दररोज पोटात लवकरचं कहार पेटतो. आनं आज आसच गेलय.येईन जेवायच्या येळला .”म*रु*दे दर येळला मीच चौकशी करायची. जाऊ दे जायचय तिकडं.जसं वय वाढत चाललंय तसं बावचलत चाललय म्हातारं…..” हाताला झटका देत मोठी सून बोलली.

             तात्या वाडीच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात येऊन पोहचले.काम चांगलं जोमात चाललं होतं.तात्यासारखे  सगळेजण आले होते . वृध्द लोकांना राहण्याची,खाण्याची उत्तम सोय केली होती. तात्यांनीही येथेच राहण्याचा निर्णय घेतला.सगळी दुःखे,चिंता त्यागून परमेश्वर नामात तल्लीन झाले.जमेल तशी सगळ्यांना मदत करायची.आणि त्यांच्या प्रेमाने आपली भूक भागवायची. 

           दिवसा मागून दिवस गेले. तात्यांचं उर्वरित जीवन मस्त चाललं होतं. तात्यांनी भूतकाळातील दुःखे कधीच मागे सोडून दिली होती. आता ते परमानंदात रंगून गेले होते. जणू त्यांना सुखाचा मृ*त साठाच सापडला होता.

             “तात्या आहे का?” मोठ्या मुलाने मंदिरातील एका माणसाला विचारले. “तात्या म्हणजे कोण? त्यांचं नाव काय?” मंदिरातील माणूस म्हणाला.

           “वामनराव नाव हाय त्यांचं माझा बा हाय त्यो” .चेहऱ्यावर बरेच प्रश्न घेऊन मोठा मुलगा बोलत होता.त्या माणसाने तात्यांना निरोप दिला.तात्या बाहेर आले.ते शांत होते.

          “तात्या शंकर (धाकटा मुलगा )काही ऐकत नाही.तुम्ही जमिनी आमच्या ताब्यात दिल्या.पण त्याला आता हा वाटप मान्य नाही.सगळं सरस तो घेतोय. आनं नीरस मला दिलं.तुम्ही चार शब्द समजावून सांगा.”पोटतिडकीने मोठा मुलगा बोलत होता.

          माझ्या जिवाला कधी सुख नाय दिलं.चार शब्द  पिरमाचं नाही बोलले. आणि आता चालले माझ्याक स्वार्थासाठी.तुम्ही दोघं बघून घ्या.मला काय फरक पडत नाय.मला काय पाहिजे होतं. फक्त तुमचा आधार बाकी काय नाय .मी माझा शेवटपर्यंत इतच थांबणार .सडेतोड उत्तर देऊन तात्या आत निघून गेले.

           मोठा मुलगा आल्या पावलांनी निघून गेला .मायेने ओतप्रोत भरलेल्या तात्यांकडून त्याची निराशा झाली. तात्यांनी भूतकाळातील दुःखद आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात बंद करून उर्वरित आयुष्य परमार्थात लावून आयुष्याला नवी कलाटणी दिली……

झालो म्हातारा राहिली नाही किंमत ..
हरवून बसलो जगण्यातली सगळी गंमत…

नाही सून मी तरी सोसला सासरवास….
आता जगू कोणासाठी म्हणून सोडून दिली आस…..

थकून गेले मन  झिजून गेली काया ……
आटून गेली सारी माणसांमधली माया…..

खचून गेले मन जगू तरी कसा?…
हळूच डोकावून गेला आशेचा ‘कवडसा ‘…….

आशेचा ‘कवडसा ‘…….
          आशेचा ‘कवडसा ‘ …

        तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा.आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.अशाच नवनवीन कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या “लेखक मित्र” या वेबसाईटला नक्की भेट द्या.तसेच आमचा “WhatsApp” ग्रुपही जॉईन करा.

         धन्यवाद  !

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)  

4 thoughts on “कथेचे नाव – ‘कवडसा ‘ जीवनाच्या शेवटच्या क्षणाला जगण्याचं नवं बळ देणारी भावनिक कथा”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top