देव्हाऱ्यातली आणि मनातील गौराई….
राजश्री सोसायटीत आज सगळ्याजणी संध्याकाळची वाट बघत होत्या. आज कपाटात घुसमटलेल्या नवीन काठपदराच्या, रंगीत साड्या बाहेर फिरायला जाणार म्हणून खूष होत्या. ह्या बायकांपेक्षा कपाटातील कोंडलेल्या साड्याच बहुधा अशा कार्यक्रमाची जास्त वाट बघत असतील. आज ती संधी त्या साड्यांना मिळाली. तसेच गॉसिपची आणि खमंग खाण्याच्या मेजवानीची संधी सोसायटीतील बायकांना मिळाली होती. त्यामुळे सोसायटीतील वातावरण आज आल्हाददायक होतं. बायका खूष असल्यामुळे प्रत्येक घरामधील वातावरण सुद्धा ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ असंच झालं होतं.
संध्याकाळी रंगबेरंगी साड्या नेसलेले विविध रंग जाईच्या घरी अवतरले. जाई लेले. सोसायटीत तीन वर्षांपूर्वी आलेलं नवीन बिऱ्हाड. लेले कुटुंब तीन पिढ्यांच्या धारणेचा संगम होता. जाई, तिच्या सासूबाई दिपाली, आणि आजेसासूबाई तिघीही छान तयार झाल्या होत्या. निमित्त होतं चैत्रगौरीचं हळदीकुंकू. जाई नावाप्रमाणेच नाजूक, गौरवर्णीय. हिरव्यागार साडीमध्ये जाईच्या नाजूक फुलाप्रमाणेच दरवळत होती. सजवलेली चैत्रगौरीचं. सुहास्य वदनाने सगळ्यांचे स्वागत करत होती.

तीन खोल्यांच्या ब्लॉकमध्ये तीन पिढ्या गुणागोविंदाने नांदताना बघायला सोसायटीतील सर्व सभासदांना आवडत होते आणि त्या कुटुंबाचा हेवा सुद्धा करत होते. सोसायटीतील कुठलीही व्यक्ती आपल्या प्रत्येक प्रश्नावर ऊत्तर मिळवण्यासाठी लेले कुटुंबाकडे जात असत. कारण तीन पिढ्या त्या प्रश्नावर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करून त्याचे ऊत्तर देत होते.
बैठकीच्या खोलीत आज चैत्रगौर सजली होती. एका लहानशा झोपाळ्यावर गौरी सजून स्थानापन्न झाली होती. तिला फुलांची आरास केली होती. वेगवेगळी सुगंधित फुले, फळांची आरास केली होती. स्वादिष्ट फराळ, खमंग फोडणी दिलेली वाटली आंब्याची डाळ, कैरीचं पन्हं अशा बर्याच पदार्थांची रेलचेल टेबलावर होती.
मागच्या दोन वर्षांपेक्षा ह्या वर्षीचा थाटमाट जरा जास्तच होता असं बाकीच्या बायकांना वाटून गेलं. म्हणजे हे असं त्यांना मागच्या वर्षीसुद्धा वाटलंच होतं. पण ह्या वेळेस पदार्थांची चंगळ जरा जास्त होती. आजींनी आलेल्या सगळ्या बायकांना शांत बसून घ्यायला सांगितले. त्यांनी त्यांच्या सूनबाई दिपाली आणि नातसूनेला जाईला हळदीकुंकू सुरू करण्यास सांगितले. हळदीकुंकू देऊन झाल्यावर आजी म्हणाल्या, “तुम्हाला कुणाला जाण्याची घाई नाही ना. म्हणजे करूच नका. मागील वर्षीसुद्धा आलात आणि गेलात. गप्पाच झाल्या नाहीत. हळदीकुंकू असतेच ह्यासाठी. छान गप्पा मारण्यासाठी मनमुराद हसण्यासाठी.”
आजी असं म्हणाल्या बरोबर सगळ्याजणी हसून माना डोलवत होत्या. पुढे आजी म्हणाल्या, “आमच्या आईच्या काळापासून आत्ता पर्यंत आपल्या बायकांना गप्पिष्ट म्हटलं जातं. असं म्हटलं जातं कि तोंड सुरू असतं सारखं ह्या बायकांचं. पण त्यांना आपल्या मनातील सांगण्यासाठी, त्यांना आपलं दुःख हलकं करण्यासाठी मायेचं माणूस पाहिजे असायचं. म्हणून हे सणवार, रितीभाती, समारंभ.
आधीच्या काळात बायकांना पुरुषांसमोर बोलण्याची, ऊभं राहण्याची मुभा नव्हती. सणांना पुरूष माजघरात आणि बायका स्वयंपाकघरात. पाहुण्यांचा राबता. ह्यामध्ये बायकांना हवी ती मोकळीक मिळत नव्हती. ती मोकळीक मिळावी, हसताखेळता यावं तिथं पुरूषांचा वावर नसावा म्हणून काही समारंभ केले जातं. बायका फार हुशार हो म्हणून त्यांनीच ही सोय केली असावी हसण्याखिदळ्यासाठी आणि आपली हौस पुरवून घेण्यासाठी.
अजून एक कारण म्हणजे मुलगी लग्न होऊन सासरी आल्यानंतर तिला माहेरपणासाठी जाता यावं म्हणून काही रिती झाल्या. आता चैत्रगौरीचे हळदीकुंकू म्हणजे असंच एक कारण माहेरपणाला जाण्यासाठी. माहेरी आलेल्या लेकीचे कोडकौतुक करण्यासाठी, तिला हवं ते खाऊ पिऊ घालण्यासाठी चैत्रामध्ये लेकीच्या सासरी जाऊन रीतसर आमंत्रण केलं जात होतं. मग त्यानिमित्ताने लेकीला माहेरी आणलं जातं होत. त्या दिवसात निसर्गाला पालवी फुटते त्याप्रमाणेच लेक आपल्या आईबाबांना, नातेवाईकांना आणि माहेरपणाला आलेल्या आपल्या मैत्रिणींना भेटून टवटवीत होते. मनगूज करायला तिला माहेरी आणण्यासाठी निमित्त.
त्या दिवसात तिला आणण्याचं अजून एक कारण असावं असं मला वाटतं. चैत्रापासून ऊन्हाळा कडक होत जातो. पुढचा कडक वैशाख तिला सहन व्हावा ह्यासाठी तीची तब्येत चांगली रहावी तिला आराम मिळावा म्हणून कदाचित चैत्रगौरीचे निमित्त असावे. माझ्या माहेरी कैरीच्या खमंग वाटल्या डाळीची रास बनवली जायची. घराघरातून प्रत्येक सवाशीण यायची. अत्तराचा फाया देण, गुलाबपाणी शिंपडणं, सुवासिक फुलं देणं ही कामे माझीच असायची. आणि पुढे इथे सासरी सुद्धा अशाच खूप बायकांचा समारंभ. इतकी वर्ष झाली चैत्रगौरींच माहेरपण करत आहे; पण माझ्या तर जिभेवर आता सुद्धा आईच्याच हातच्या कैरीच्या वाटल्या डाळीची चव रेंगाळते आहे.” असं म्हणत आजीं बोलता बोलता शांत झाल्या.
त्याचं शांत होणं सगळ्यांनाच त्यांच्या बालपणीच्या, आपल्या माहेरच्या आठवणीत घेऊन गेलं. दीपालीने सुद्धा आपल्या माहेरी होणाऱ्या चैत्रगौरीच्या हळदीकुंकू ची आठवण सांगितली. ती म्हणाली, “माझे माहेर दापोलीचं. लग्न होऊन इथे आले. दापोलीत चैत्रात आंब्याच्या मोहराचा सुवास, कोकिळेचा स्वरसाज गौरींना सजवताना आम्हा मुलींना अजून ऊत्साहित करत असे. चैत्रगौरीचे हळदीकुंकू करायचे ठरले की आंब्याच्या झाडांखाली जायचं, कैरी पाडून घ्यायच्या, परकराच्या ओच्यात जमा करून पळत घरी जायचं. परकराचा ओचा रिकामा करायचा आणि परत पळत झाडाखाली कैर्या जमा करायला यायचं. मैत्रिणींबरोबर केलेली मजा, गौरीसमोर घातलेल्या फुगड्या, रिंगण करून गायलेली गाणी आणि हसून खेळून झाल्यावर झालेली दमछाक घालवण्यासाठी आईने , काकूने दिलेलं कैरीचं पन्हं. त्या कैरीचा आंबटपणा, गुळाचा गोडवा, वेलचीचा स्वाद आजही दापोलीत घेऊन जातो.” असं म्हणत दिपाली दापोलीच्या आंब्याच्या झाडाखालच्या आठवणीत रमून गेली.
दिपाली आणि आजीच्या चैत्रगौरीतील आठवणी ऐकून कधीही जास्त न बोलणार्या सरला काकू त्यांच्या माहेरची आठवण सांगू लागल्या. “माझं माहेर फार काही श्रीमंत नव्हतं. पण ऋण काढून सण साजरा न करता आहे त्यात काटकसर करून छोट्या प्रमाणात सण साजरे करत होतो. चैत्रगौरींच हळदीकुंकु मात्र कधी होणार ह्याची वाट मी बघत असे.
हळदीकुंकू ठरलं की मी माझ्या बाबांबरोबर माझ्या मावशीच्या घरी जाऊन तिच्या बागेतील कै-या घेऊन येत असे. तसेच आमच्या बागेत आलेली फुले, फळे आणून आजीकडे देऊन घरोघरी आमंत्रण द्यायला धूम ठोकायची. हळदीकुंकूच्या दिवशी सकाळ पासून स्वयंपाक घरातुन तळणाचा खमंग वास यायचा. करंज्या तळून आणि पन्ह्यासाठी उकडलेली कैरी आणि गुळ एकत्र करून गार होण्यासाठी ठेवलेले असे. सगळा एक सोहळाच.
हे सगळं आटपून आई परत सजावटीसाठी बागेत. मग गौरीसाठी छोट्या फांदीला झोपाळा बांधत. तिच्यासाठी केलेल्या पदार्थांची आरास भोवताली असे. फुलांचा हार, फुलांचे दागिने काठाची साडी, सगळं घालून गौरी सज्ज होत होती. मग आईची तयारी. आई आणि आजीची कधीतरी नेसलेली चांगली लुगडी बाहेर निघत असे. जुना अत्तराचा दरवळ त्या साड्यांना तसाच येई. आईची ती जांभळी रंगाची साडी मला खूप आवडायची. आईच्या केसातही मोगरा दरवळून जायचा. बांगड्यांची किणकिण घरभर जाणवायची. वेगवेगळ्या रंगांची ऊधळण होत आहे असंच वाटायचं जेंव्हा बायका हळदी कुंकवाला यायच्या. सगळ्या हसतमुख, गजरे लेवून सजून यायच्या. अंगण अगदी फुलून यायचं.
पण आता ते अंगण रिकामं झालं आहे. शांतता पसरली आहे. कारण त्या अंगणाला सजवणारी, आनंदाने भरणारी, सुख,समृद्धीने, आपल्या मायेने न्हाऊन काढणारी आजी आणि आई दोन्ही त्या अंगणात नाहीत. घरातली गौर फक्त माहेरवाशीण नसते तर त्या घरातील अणुरेणूमध्ये असणारी त्या घरातील कर्ती स्त्री असते. तिचे कोडकौतुक व्हायला पाहिजे म्हणून चैत्रगौरी.” इतकं बोलून सरला काकू बोलायच्या थांबल्या. कारण त्यांच्या बोलण्याने वातावरणात अधिकच भावूक झाले.
इतक्यात जाईची ऑफिसमधली आलेली सहकारी मैत्रीण जाईला म्हणाली, “जाई आय रिअली व्हाॅन्ट टू थँक्यू यू. तू मला जबरदस्तीने इथे यायला भाग पाडलं नसतं तर मी ही एन्जॉयमेंट मिस केली असती. आधी वाटलं काय ट्रेडिशनल घालून जायचं ह्या गरमीमध्ये. लगेच निघायचं म्हणून आले होते. पण वेळ कसा गेला कळलंच नाही. सगळच विसरायला झालं बघ. खूप एन्जॉय केलं आणि ते कैरीच सरबत खूप टेस्टी होतं. मला हे सगळंच भारी वाटतंय बघ. आपली किटी पार्टी जशी असते तशी ही जुन्या काळातील बायकांची किटी पार्टीच. तुझ्यामुळेच मला हे एन्जॉय करता आलं. खरचं थॅन्क्यू सो मच. पण आजी मला ना एक शंका आहे. म्हणजे माझे काही लग्न झाले नाही आणि इतक्यात करायचे नाही. मग मी तर कायमची माहेरवाशीण झाले ना. मग हे हळदीकुंकू रोज नाही का करता येणार. म्हणजे मग माझं रोजच कोडकौतुक होईल.” भावूक झालेलं वातावरण थोड हलकंफुलकं करण्याच्या ऊद्देशाने जाईच्या मैत्रीणीने विचारले.
त्यावर हसुन आजी म्हणाली, “अग हि गौर म्हणजे तुझ्यासारखी लाडकी लेक .लग्न होऊन सासरी गेलेली. ती माहेरपणाला थोड्याच दिवसांसाठी येते आणि परत आपल्या घरी नामिघून जाते. कायमची कशी राहिल. आणि लेक जर इकडे रमून राहिली तर तिकडे तिचा संसार कोण बघेल? तिच्या संसाराचा व्याप तिलाच नको का सांभाळायला. म्हणून थोडया दिवसांसाठीच आई तिचे सगळे लाड करून परत पाठवणी करते. तेवढ्यानेही ती सुखावून जाते ग. आणि कायमची माहेरवाशीण तू नाही राहणार आहेस. तुझं ही यंदा कर्तव्य आहेच. चैत्रगौरींचा तुला हाच आशिर्वाद आहे.” आजीने असं म्हणताच सगळ्यां गौरी हसून एकसुरात हो म्हणाल्या आणि आता मात्र आपली पंचाईत झाली ह्या अर्थाने जाईची मैत्रीण जाईकडे बघत होती.
प्रत्येकीच्या आठवणीतील चैत्रगौरी आज राजश्री सोसायटीत अवतरत होती. माहेरपणाचे चार दिवस नसतील परंतू चार घटका नक्कीच मिळत होत्या आणि ह्या चार क्षणांच्या आठवणीचे क्षण सगळ्याच जमा करत होत्या. फुगडी, झिम्मा, गाणी गात गौरींचं मनोरंजन सुरू होतं. आपली दुःख, वेदना, वाद, भांडण विसरून हसत खिदळत होत्या.
कोण कुणाच्या गौरी? एकमेकींना जीव लावावा हेच खरं म्हणत हातातल्या करंड्यातलं हळदी कुंकू एकमेकींना लावत होत्या. देव्हाऱ्यातली आणि मनातील गौरही मनोमन हसत होती. एकमेकींना जपा एकमेकींच्या लेकी व्हा हेच ती चैत्रगौर म्हणत असावी.
आली सोनपावलांनी आली गौराई माहेराला
चला सयांनो चांदण्यांनी लिंबलोण काढायला
सज्ज जाहली तिच्या स्वागताला सारी सृष्टी
आंब्यानेही केली मोहरुन तिच्या येण्याची पृष्टी
कोकिळेने आळवले गान तिच्याच स्वागताचे
गोर्यापान हातावर ऊमटले ठसे लाल मेंहदीचे
गुलमोहराला बहर देण्या तिला ऊबदार सावली
त्या सावलीच्या हिंदोळ्यावर ती भरून पावली
सजवली ताटी फळे फराळी गोमटी तिच्यासाठी
आली आहे माहेरवाशीण थोड्याच दिवसासाठी
सोनपावली गं आली गौराई आली गं माहेराला
चला गं सयांनो चांदण्यांनी लिंबलोण काढायला
__पुजा सारंग, मुंबई
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
दिनांक : १५\०४\२०२४.
तुम्हाला ही कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.
धन्यवाद !

Mast👌
धन्यवाद मॅडम 🙏🏻