कथेचे नाव – ” कृष्ण वेडी ” कृष्ण प्रेमात रंगून जाणारी भक्तीमय कथा

WhatsApp Group Join Now

पहाटेची वेळ होती. सगळे साखरझोपेत होते.नुकताच पाखरांचा गलबला ऐकू येत होता.दूभत्या गाय असणारीच काय ते लवकर उठले होती.राजाराम पाटलांच्या वाड्यात एकच गोंधळ उडाला.सगळे इकडे  तिकडे शोधाशोध करत होते.

          “सरसा आगं काय झालं ? काय हा गोंधळ ?” प्रश्नार्थक नजरेने पाटलांनी विचारले.

          सरसा रडू लागली. पाटलांनी तिला धीर देत विचारले काय झाले ?

         “आहो कृष्णकली कुठं गेली ?  काहीच कळत नाही.माझा जीव घाबरून गेलाय.एवढीशी पोरं ती एवढ्या अंधारात कुठं गेली असेल ? ”  बोलताना सरसाचा थरकाप होत होता.

          “आगं थांब जरा  किती जीवाची घालमेल करून घेतेस. मी आहे ना ? मग चिंता नसावी. मी शोधतो तिला ? मला अंदाज आहे ती कुठे गेली असेल त्याचा .तू नको काळजी करू?

            धोतराचा सोगा हाताने सावरत राजाराम पाटील बाहेर पडले.अंधार अजूनही दाटच होता. माणसाला माणूस दिसत नव्हते. कारण ती वेळ ब्रह्ममुहूर्ताची होती. झपझप पावले टाकत पाटील डोंगराच्या पायथ्याशी आले. तिथे एक सुंदर कृष्णाचे मंदिर होते.ते मंदिर डोंगराच्या कुशीत वसलेलं होतं. काकड आरतीचा आवाज कानावर पडू लागला.पाटील मंदिरा बाहेर आले.त्यांनी चप्पल एका बाजूला काढली.पायरीला दोन्ही हाताने स्पर्श करून ते आत गेले. गावातील मोजकीच परमार्थिक माणसे काकड आरतीला आली होती. सर्वजण देहभान विसरून काकड आरती करीत होते. पाटलांनी  मंदिरात चारही बाजूने नजर फिरवली. तेव्हा त्यांना दिसले की खांबाला पाठ देऊन कृष्णकली हात जोडून एक टक कृष्णाच्या मूर्ती कडे पाहत बसली होती. कानावरती काकड आरतीचा ताल आणि नजर फक्त कृष्णाला न्याहाळत होती.

          पाटलांनी ही तिची शांतता भंग केली नाही. तेही तेथेच  बसले.आणि त्यांच्यात रममाण झाले.काकड आरती झाल्यानंतर सुमधुर भजनाने सगळा परिसर एकदम भक्तिमय होऊन गेला. ” कृष्णकलीला काही म्हणून उपयोग नाही. मीही लहान होतो तेव्हा असाच या मंदिरात येऊन बसायचो.किती ते मनमोहक सगुण साकार रूप खरंच मनाला शांत करून जातं.मलाही  ही कृष्णभक्ती भौतिक जगाचा विसर  पाडून परमार्थात समाधीस्थ करून जाते.आणि या लेकराला किती लवकर उमजले.अवघ्या सहा वर्षाची पोरं ! पण सांगितलेल्या गोष्टी लगेच मनात रुजवते.”बऱ्याच वेळ राजाराम पाटील स्वतःशीच संवाद साधत होते.

        ” पाटील sss ” या आवाजाने ते विचारातून बाहेर आले.

  ” हां ss…. ” म्हणून पाटलांनी मागे वळून पाहिले. साठीच्या वयातील गावचे कान्होजी बाबा . पांढरे शुभ्र कपडे, कपाळाला लावलेला अष्टगंध यामध्ये त्यांची काया मनाला अध्यात्मिक समाधान देऊन जात होती.

         ” काय रं ! पोरा लई दिसांनी येणं केलं मंदिरात ?पहिल्यासारखा आता तू येत नाय .लग्नाच्या आधी आम्ही म्हटलो हा संन्यास घेतो की काय ? एवढा तू कृष्ण प्रेमात बुडून गेला होता.पण आता प्रपंचवाईक झाला . नाई का?बरंय बरंय ” असं म्हणून कान्होजी बाबा निघून गेले.पुन्हा राजाराम पाटलांनी स्वतःला गूढ विचारांतून बाहेर खेचून काढले.एवढे बोलणे होऊन देखील कृष्णकली  अजूनही खांबाला पाठ लावूनच बसली होती.

           “बाळा कृष्णकली ” म्हणून पाटलांनी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला .हळूच तिने मागे वळून पाहिले.

    ” आबा ss ” एवढंच ती बोलली.आणि पुन्हा एकटक ती कृष्णाकडे पाहू लागली.

         ” कृष्णकली एवढं काय पाहत आहेस बाळा ? चल आता जाऊया घरी.उद्या आपण दोघेही लवकर येऊ . “असं म्हणून पाटलांनी कृष्णकलीला उचलून घेतले.

        आबांच्या खांद्यावरून ती कृष्णालाच बघत होती.दररोज राजाराम पाटील देवपूजेत कृष्णाचं चरित्र वाचून दाखवत.कृष्णकली मन लावून ऐकत.हळूहळू तिच्यातील कृष्णभावना  जागी होऊ लागली.सकाळ ,दुपार, संध्याकाळ ती सतत कृष्णाच्याच गोष्टी विचारु लागली.

           “कृष्णकली तुझं वय नाही हे बाळा तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे.”असं वारंवार सरसा  सांगत असे. पण कृष्णकली अधिकच कृष्णप्रेमात रंगत चालली होती. तिला कोणाच्या बोलण्याचे काही वाटत नव्हते. दिवसामागून दिवस गेले.कृष्णकली मोठी होऊ लागली.आता तिच्या मैत्रिणींच्या सहवासात तिला कृष्णाचा विसर पडेल .असे घरातील लोकांना वाटे. पण तसे काही झाले नाही.उलट तिची भक्ती अधिकच तीव्र होत गेली.जणू तिला बाह्य जगाचा विसरच पडत  चालला होता.

            कृष्णाप्रेमात वेडी झालेल्या कृष्णकलीला तिच्या आबांचा पूर्ण पाठींबा होता .

       ” तुमच्यामुळेच ती एवढी भक्तीच्या आहारी गेली आहे. अशाने तिचे पुढे कसे होईल.”सरसा तिची काळजी दाखवत बोलली.

       “अगं  सरसा तू उगाचंच काळजी करत आहे.मला तर तिचा अभिमान वाटत आहे . कारण  मुली या वयात चुकीच्या मार्गाला जायची भीती जास्त असते.पण आपली कृष्णकलीच्या  मनाला असे विचार स्पर्श सुद्धा करत नाही.” आबा विश्वासाने बोलत होते.

        सरसाला सर्व कळत होते. पण वळत नव्हते.कारण एका आईच्या मनात आपल्या मुलीने  शिक्षण घेण्यापेक्षाही तिचे लग्न चांगल्या घरंदाज घरात व्हावे. अशी माफक अपेक्षा असते.

ध्यानी मनी तूच कृष्णा l

कधी मिटेल माझी दर्शनाची तृष्णा ll

तूच माझ्या ध्यासात तूच माझ्या श्वासात l

व्यापला तू माझ्या नसानसात  ll

भूल टाकली तू माझ्यावरी l

देहभान विसरली तुझी कृष्णकली ll

कृष्णकली कृष्णासाठी  शब्द गुंफू लागली.

       ” झालं हीचे चालू ..काय करावे कळत नाही ? खूप भक्त पाहिले पण हीच्यापेक्षा कमीच ”   कृष्णकलीची आजी वैतागून म्हणाली.

       “मला वाटतं हिचे लग्न लावून दिले तर ? थोडी प्रपंचात रमेल.आणि तिची कृष्ण भक्ती वर थोडी मर्यादा येईल .” सरसा मनातील भावना बोलून दाखवत होती.

         ” हे बघ बाळा आता तू मोठी झाली.मला वाटतं तुला मनासारखा जोडीदार मिळाला की तू तुझ्या संसारात रमून जाशील.तू भक्ती कर पण त्यावर थोडी मर्यादा ठेव.”सरसा तळमळीने बोलत होती.

     “आई पण मला लग्न नाही करायचे.आणि मी माझ्या कृष्णभक्तीवर का मर्यादा ठेवू.का मला तुम्ही त्याच्या साधनेतून बाहेर आणण्याचा प्रयत्न करता.माझे मन नाही लागणार गं  संसारात ,तरी का मला त्यात पुन्हा खेचता.” कृष्णकली पोटतिडकीने सांगत होती. आणि पुन्हा ती शब्दफुले वेचू लागली.

नाही मला ओढ या मिथ्या संसाराची l

मी कधीच होवून बसले सावळ्या हरीची ll

मनातली भावना त्याच्या चरणाशी वाहिली l

माझ्या जीवाची तळमळ त्याने जवळून पाहिली  ll

        “सगळीकडे चराचरात तोच व्यापून आहे. माझे मन त्याच्यातच गुंतले आहे.आता त्यातून मला बाहेर काढू नका .”कृष्णकलीच्या  तोंडून अमृताप्रमाने शब्द बाहेर पडू लागले .

    आई म्हणायची की ” जगाचेही काही नियम आहेत . लग्न कर नाहीतर हा समाज तुला सुखाने जगू देणारं नाही.तुझ्यातच काही उणीव आहे असं त्यांना वाटेल.आणि आम्ही गेल्यानंतर तुझ्या आयुष्याला कोणी वाली नाही बाळा.”हे सांगताना सरसाच्या जीवाची घालमेल होत होती. परंतु कृष्णकली ऐकणाऱ्यांमधील नव्हती.तिला आता कृष्णभक्तीचे वेड लागले होते.

जग मज विचारी दोघांमधील नाती l

मी तर कृष्ण सख्याच्या पायाखालील माती ll

तुझ्या माझ्या प्रेमाची वेगळीच कहाणी l

तुझ्या नामस्मरणाची सुमधुर वाणी ll

           सरसाची काळजी वाढू लागली.ती  बेचैन झाली.काय करावे ? ते सुचेना. राजाराम पाटलांनी तिला धीर दिला.आणि म्हणाले.हे बघ सरसा तिला आता पुन्हा या मायाजालात ओढू नको. ती तिच्या दुनियेत सुखावून गेली आहे.ते सुख तिच्याकडून घेवू नको.ती कृष्णवेडी झाली आहे.पुन्हा ती कृष्णाची रचना करू लागली.

तुझ्या नामात तल्लीन होऊन विसर पडला मलाच माझा..

अखंड चिंतन तुझे द्वारकेच्या राज्या ..

भौतिक सुखाची तोडून टाकली बेडी..

तुझ्या रंगात रंगून गेले मी तर झाले कृष्ण वेडी….
झाले कृष्ण वेडी……

         समाप्त !

तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा. आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.अशाच नवनवीन कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या “लेखक मित्र” या वेबसाईटला नक्की भेट द्या.तसेच आमचा “WhatsApp” ग्रुपही जॉईन करा.

        धन्यवाद !

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)  

2 thoughts on “कथेचे नाव – ” कृष्ण वेडी ” कृष्ण प्रेमात रंगून जाणारी भक्तीमय कथा”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top