कथेचे नाव – न्याय
” मायबाप प्रेक्षकहो ! आमच्या नाटकाचा हा पहिलाच प्रयोग. तरी आपण सर्व आवर्जून आलात, आमच्या कलाकारांना आपण उत्स्फूर्तपणे दाद दिलीत त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. एक नवोदित दिग्दर्शक म्हणून मी आपणा रसिक प्रेक्षकांना विनंती करतो की ह्या नाटकाची तुम्ही माऊथ पब्लिसिटी करावी जेणेकरून आमच्या ह्या नवीन नाटकाचे नाव देश विदेशात जाऊन पोहोचेल.” नाटकाचा लेखक तसेच दिग्दर्शक सचिन वायकर आणि नाटकातील कलाकारांनी मायबाप प्रेक्षकांना मानाने वंदन केले आणि पडदा पडला. सगळे कलाकार मेकअप रूममध्ये गेले. सचिन देखील त्यांच्या मागोमाग मेकअप रूममध्ये पोहचला.
सचिन आल्यावर सगळ्या कलाकारांनी आपले नाटक प्रेक्षकांना आवडले म्हणून जल्लोष केला. ” भूषण ! काय जबरदस्त ऍक्टिंग केलीस यार. आपला पहिला प्रयोगच इतका सफल झाला आहे की नक्कीच आपल्या नाटकाचे हजार – दोन हजार प्रयोग होऊ शकतात. भूषण इतकेच तुम्हा सर्वांचेच कौतुक आहे की, तुम्ही सर्वांनी तुमच्या अभिनयाची छाप पाडली आहे. सगळ्यांनी अगदी जीव ओतून काम केले आहे. चला, आता आपल्या सर्वांवर मोठी जबाबदारी आहे ती म्हणजे आपलं नाटक अधिकाधिक दर्जेदार व्हावे याची. सगळ्यांना पुढच्या प्रयोगाच्या तारखा समजल्या आहेत ना ? सचिनने कलाकारांना विचारले.

” हो.” सगळ्यांनी एकच गलका केला.
” ठीक आहे तर, चला उद्याच्या प्रयोगासाठी तयार रहा.” इतके बोलून सचिनसकट अन्य कलाकार, बॅक स्टेजच्या कलाकारांनी पॅकअप केले. नाटकात वापरण्यात आलेली प्रॉपर्टी एका टेम्पोत ठेवली गेली. तो टेम्पो गोडाऊनच्या दिशेने निघाला.
जातीने सगळी पाहणी करून सचिन आपल्या घरी गेला. घरी गेल्यावर अंघोळ करून त्याने देवाला मनोभावे नमस्कार केला तसेच आईबाबांना नमस्कार केला. आज त्याच्या व्यावसायिक नाटकाचा पहिलाच प्रयोग खणखणीत पार पडला होता. लागलीच पुढच्या पंधरा दिवसाच्या नाटकाच्या प्रयोगासाठी तारखा देखील मिळाल्या होत्या. आज सचिनचे स्वप्न पूर्ण झाले होते.
सचिन वायकर अतिशय हुशार, मेहनती मुलगा. कॉलेजमध्ये असल्यापासून त्याने अभिनयक्षेत्रात करिअर करायचे ठरवले होते. त्याच्या घरात अतिशय प्रतिकूल परिस्थिती. त्याचे बाबा अर्धांगवायू झाल्याने पाच वर्षे बेडवर होते आणि आई बिचारी त्यांची सेवा करण्यात व्यग्र. घरातील परिस्थिती अशी असून देखील सचिनने आपल्या इच्छाशक्तीला मुरड घातली नाही. कॉलेजमध्ये असताना अनेक नाट्यस्पर्धांमध्ये त्याने अभिनय, दिग्दर्शनाची, लेखनाची चुणूक दाखवून दिली होती. त्याच्या जवळच्या खास मित्र – मैत्रिणींनी मिळून व्यावसायिक नाटकात उडी मारली आणि आज त्यांच्या नाटकाला प्रेक्षकांकडून पसंतीची पावती मिळाली होती. नाटकातील प्रमुख कलाकार भूषण याने तिशीतील असून देखील एका पासष्ट वर्षांच्या वयस्कर व्यक्तीची भूमिका इतकी चोख बजावली होती की, प्रेक्षकांना वाटले सुद्धा नाही की तो कलाकार वयाने लहान आहे. भूषणच्या भूमिकेचे सगळीकडून कौतुक झाले.
सचिनची ‘ लालसा ‘ नाटकाची गाडी सुसाट सुटली होती. मुंबई बरोबरच पुणे, नाशिक, सोलापूर, नागपूर, इंदोर येथे नाटकाचे सातत्याने प्रयोग होत होते. आज त्यांच्या नाटकाचा प्रयोग रत्नागिरीत होणार होता. संध्याकाळी चारचा प्रयोग असल्याने पहाटे पाचला मुंबईतून निघून ही मंडळी रत्नागिरीला जाण्यास निघाली होती. नेहमी हसतखेळत असणारा भूषण मात्र ह्या प्रवासात एकदम गप्प गप्प होता. सगळ्यांनी त्याला ह्याबद्दल विचारले की, ” अरे आज तू इतका शांत का ?” तरीही भूषण कोणाशीच काही बोलत नव्हता.
नाटककंपनीची बस दुपारी एक वाजता रत्नागिरीत पोहचली. थोडं खाऊन, थोडा आराम करून प्रयोगासाठी सारेजण सज्ज झाले. दरम्यान भूषण अजूनही शांतच होता. त्याच्या अशा वागण्याने आता मात्र सचिनला भीती वाटू लागली की हा आजचा प्रयोग तरी व्यवस्थित करेल ना ?
रंगमंचाचा पडदा उघडला आणि काय आश्चर्य ? भूषणने नेहमीच्या अभिनयापेक्षा आजच्या प्रयोगात जास्त जीव ओतून भूमिका वठवली की प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. नाटक संपले आणि भूषण मेकअप रूममध्ये न जाता तरातरा प्रेक्षकांमधून निघून गेला. भूषण निघून गेला हे कोणालाच समजले नव्हते. भूषणला सगळेजण शोधत राहिले; पण भूषण नाट्यगृहात कुठेच सापडला नाही. भूषण कुठे गेला असेल ह्या विवंचनेत सचिनचे धाबे दणाणले होते. दोन – तीन मित्रांना घेऊन सचिन भूषणला शोधण्यास बाहेर पडला. एकतर रात्रीचे आठ वाजले होते. मुंबईसारखी रत्नागिरी शहरात रात्रीची गर्दी नव्हती तरीही भूषणला नक्की कुठे शोधायचे हे कोणालाच समजत नव्हते.
इथे भूषण रत्नागिरीजवळील एका खेडेगावात जाऊन पोहचला आणि तिथल्या एका मोठया वाड्यात थडकला. अचानक हवेमध्ये गारवा निर्माण झाला. वाड्याजवळील माडाची झाडे सळसळ कापू लागली. एका क्षणात आभाळ भरून आले आणि विजा कडाडू लागल्या. त्यातच भूषणला पाहून त्या वाड्याचे मालक दिलीप भाटकर याची दातखिळी बसली. त्याने चाचरतंच विचारले, ” अण्णा तू ? तू कसा आलास ? तुला तर मी ????? तू भुssssssssत बनून तर नाही ना आलास ?” भिंतीवरचा अण्णांचा फोटो वाऱ्याने थडथड आपटू लागला.
” हो ! असंच समज. तू मला आणि माझ्या बायकोला फसवून आमची ह*त्या केलीस. काय मिळवलंस असे वागून ? तुला काय वाटलं आता अण्णाला आपण यमदानास पाठवले तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीचा तू एकमेव वारस बनशील ? अरे तुला प्रॉपर्टी हवी होती तर माझ्याकडे तसे स्पष्टपणे मागायची होती. असे मला फसवून तू काय मिळवलेस ? लालसेपोटी तुझ्या मोठ्या भावाला आणि आईप्रमाणे असणाऱ्या वहिनीला मार*ताना तुझे हात कसे कापले नाहीत ? आम्हाला मुलबाळ नव्हते. आमच्यामागे तुलाच ही संपत्ती मिळणार होती. तुला माझ्यावर इतका सुद्धा विश्वास नव्हता ? लोकांचे म्हणणे ऐकून इतके मोठे वाईट कृत्य केलेस ? तुला काय वाटले की चारचौघात आमच्या दोघांचा नैसर्गिक मृ*त्यू ठरवून तू नामानिराळा होशील ? तू केलेले पाप कायमचे दडले जाईल ? तुला कधीच शिक्षा होणार नाही ? अरे गेले दहा वर्षे तडफडत होतो मी. मला मुक्ती मिळाली नव्हती. आज देवाने माझे म्हणणे ऐकले त्यामुळे आज मी तुला सगळ्या गोष्टींचा जाब विचारायला आलो आहे. तुला ज्या दिवशी शिक्षा होईल त्या दिवशी मी मुक्त होईन.” अण्णांच्या रूपाने भूषण बोलत होता.
दिलीपचे कुटुंब एव्हाना तिथे जमा झाले होते. वास्तविक अण्णांना पाहून त्यांनाही धडकी भरली होती. दिलीपचे कुटुंब केवळ स्तब्ध होऊन समोर काय घडते आहे पाहत राहिले होते.
” अण्णा ! मी चुकलो. मला माफ कर. तू तुझी सगळी प्रॉपर्टी आणि हा भला मोठा वाडा एका अनाथआश्रमाला देणगी म्हणून देणार होतास असे लोकांकडून ऐकायला येत होते. मी असताना तू तुझी प्रॉपर्टी ऐऱ्यागैऱ्यांना देणार आहेस हे ऐकून माझा तिळपापड होत होता. त्याच रागात मी हे वाईट कृत्य केले.” दिलीप म्हणाला.
” यु आर अंडर अरेस्ट.” असे म्हणून दिलीपच्या सुनेचा धाकटा भाऊ विनायक सावंत जो पोलीस खात्यात इन्स्पेक्टरच्या पदावर होता. त्याने दिलीपला ताब्यात घेतले. दिलीपला ताब्यात घेतल्यावर भूषण अण्णांच्या फोटोखाली कोसळला.
भूषण शुद्धीवर आला तेव्हा तो एका हॉस्पिटलमध्ये होता. भूषणला काल रात्री काय घडले हे आठवत देखील नव्हते. सचिनला जेव्हा इन्स्पेक्टर विनायकने सारा वृत्तांत सांगितला तेव्हा सचिनच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला होता. अण्णांच्या आ*त्म्याने दिलीपला शिक्षा व्हावी म्हणून आपले जीवनचरित्र सचिनमार्फत लिहून घेऊन त्यावर त्याच्याकडूनच नाटक बसवून घेतले होते. अण्णांच्या वयात हुबेहूब दिसणाऱ्या भूषणला अण्णांचा रोल दिला गेला होता. नाटक संपल्यावर भूषण त्याचा मेकअप न उतरवता भरकटत अण्णांच्या वाड्यावर खुद्द अण्णा म्हणून गेला होता. एका शक्तीने भूषणला त्या वाड्यावर नेले होते. वाड्यावर त्या दिवशी नेमका दिलीपच्या सुनेचा इन्स्पेक्टर भाऊ विनायक तिला भेटायला येणार होता हे औचित्य साधून सचिनच्या नाटकाचा प्रयोग रत्नागिरीत होता. हे सगळे प्रसंग अण्णांच्या आ*त्म्याने घडवून आणले होते.
दिलीपला जन्म*ठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. अण्णांच्या आ*त्म्याला कायमची मुक्ती आणि न्याय मिळाला होता.
( समाप्त )
सौ. नेहा उजाळे,ठाणे
सदर कथा ही मनोरंजनाच्या दृष्टीने लिहिली असून त्यामागे अंधश्रद्धा पसरविण्याचा हेतू नाही.
तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.
धन्यवाद !
छान आहे.👌
मनःपूर्वक आभार 😊🙏
Khup mastt
मनःपूर्वक आभार 😊🙏