भर दुपारची वेळ होती.झाडाचे पानही हालत नव्हते.मांडवी नदीच्या काठी असलेल्या स्मशानभूमीत नावाप्रमाणेच स्मशान शांतता पसरली होती. सगळेजण बायजा आजीच्या दशक्रियेसाठी आले होते.सर्व विधी पार पडले .फक्त काकस्पर्श होण्यासाठी सगळी माणसे खोळंबली होती.काकस्पर्श झाल्याशिवाय मागे फिरता येत नव्हते. बायजा आजीच्या दोन्ही मुलांना “पुन्हा एकदा हात जोडून या? “असे निमकर सर म्हणाले.ते दोघे पिंडाला हात जोडून मागे आले .तरीही जवळपास कावळे फिरकलेही नाही.पाठोपाठ मुलगी गेली, नातवंडे गेली,सूनाही गेल्या .परंतु काही फायदा झाला नाही.
“आता काय करायचे ? म्हणून लोकांमध्ये चर्चा चालू झाली.काय झालं असेल ? कुठं जीव अडकला असेल म्हातारीचा काही कळेना ?” बाराचा काटा कधीच ढळून गेला.आता बसलेली माणसे बावचळू लागली. लोकांना धीर धरवत नव्हता .त्यांची पुढची कामे खोळंबली होती .
सगळं गणगोत पाया पडून आले .पण त्याचाही काही परिणाम झाला नाही .शेवटी जाणत्या माणसांमधून एकजण म्हणाला की,दर्भाचा कावळा करा किंवा गावठी गाय घेऊन या.असे ठरल्यानंतर भटजीबुवांनी दर्भाचा कावळा करण्यास घेतला. सगळ्यांची मने आता आवरू पाहत होती.बरच वेळ कंटाळलेली लोकं थोडी शांत झाली.
तेवढ्यात भटकत आलेली सुमी पिंडापाशी आली. फाटके परकर पोलके , केसं वेडीवाकडी होऊन वाऱ्यावर भुरभूर उडत होती , पायामध्ये तुटक्या बंदाची चप्पल घातलेली . तिने भिरभिर नजर सगळ्या बसलेल्या माणसांवर टाकली.आणि एक नजर बायजा आजीच्या फोटोकडे पाहिले.तिच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले.उदांत अंतकरणाने तिने हात जोडले. डोळे मिटले. आणि “आज्जेssss..”म्हणून टाहो फोडला. ती बायजा आजीच्या फोटोसमोर नतमस्तक झाली.
सगळ्या स्मशानभूमीत एकच शांतता पसरली होती.सगळ्यांच्या नजरा सुमीवर स्थिरावल्या होत्या. “ही येथे काय करते? काय नातं हिचे आणि बायजा आजीचे ? ” हा प्रश्न जणू सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. कंटाळलेली लोकं आता मनातल्या मनात तिला बोलू लागली . “हीचं काय आता मध्येच ?आता कुठे कार्यक्रम उरकायच्या मार्गावर होता.आणला हिने व्यत्यय .”लोकं कुजबुज करू लागली .तेवढ्यात जवळच्या झाडावर बसलेला कावळा काव ss काव ss.. करत घिरट्या घालू लागला.आतापर्यंत सामसूम बसलेले कावळे एक एक करत गोल गोल फिरू लागले. सगळेजण आकाशाकडे पाहू लागले.
सुमी खाली घोंड घालून पिंडापाशीच बसली होती.आश्चर्य वाटावे तसे भराभर कावळे खाली आले.आणि त्यांनी पिंडाला घेरले.आणि आखेर काकस्पर्श झाला.लोकांमधून टाळ्या ऐकू आल्या.सगळ्यांना एक नवलचं वाटले.आता निमकर सर बोलू लागले.सगळे घाईने जाण्यापेक्षा सर काय बोलणार आहे याकडे कौतुकाने पाहू लागली. सरांनी बोलणे चालू केले.
“तुम्हाला प्रश्न पडला असेल,की पोटची मुले आहेत ,मुलगी आहे , लाडकी नातवंडे आहेत तरी म्हातारी पिंडाला का शिवली नाही ?आणि ही सुमी ..ती ना नात्यातली ना गोत्यातली तरी क्षणाचाही विलंब न लावता म्हातारी पिंडाला शिवली.असे झाले कसे ? मला माहित आहे तुम्हाला सगळ्यांना जाण्यास उशीर झाला आहे.पण एवढ्या वेळ थांबले आहात तर अजून जरा वेळ थांबा.” सगळ्यांवर नजरेचा कटाक्ष टाकत सर बोलले.
सुमी डोकं खाजवत माणसानंमधून निघाली तिला यातलं काही समजत नव्हतं .तिला किती दिवस न दिसणारी बायजा आजी फोटोत दिसली म्हणून ती या दिशेने आली.सुमी म्हणजे आई बापा विना पोरं …लहानपणापासून ती चार घरच्या तुकड्यांवर जगलेली.तिला कोणी तीचं म्हणून घेणारं नव्हतं.कीव येईल तो तिला घासभर खायला द्यायचा.तिचे दिवस असेच चालले होते.तिच्या बुध्दीत म्हणावे अशी सुधारणा नव्हती.परंतु तिला जिवंत भावना होत्या. “सुमेsss… थांब” .निमकर सरांनी आवाज दिला.डोके खाजवतच सुमी किलकिल्या डोळ्यांनी मागे पाहू लागली.
सगळेजण शब्द न शब्द कान टवकारून ऐकत होते.सर सांगू लागले.” सुमीचे आणि बायजा आजीचे नाते रक्ताचे नव्हते;तर त्यापेक्षाही मोठे होते.जे बायजा आजीच्या घरच्यांनी करायला हवे होते ते सगळे सुमीने केले.ज्या गोष्टीची आजीला गरज होती ती सुमीकडून मिळाली.कसली गरज होती आजीला ? पैशाची,सोन्या नाण्याची ? का नव्या नवागल्या कपड्या लत्त्त्याची ? नाही .. या कोणत्याच गोष्टीची आजीला गरज नव्हती .बायजा आजीला गरज होती मायेची ,प्रेमाची… ” निमकर सर तळमळीने बोलत होते. बायजा आजीच्या मुलांनी व मुलीने मान खाली घातली.त्यांना माहीत होते सर काय बोलणार आहेत.
” तुम्ही पिंडाच्या पाया पडल्यावर कावळा शिवावा अशी अपेक्षा तरी का धरावी ? विचारा स्वतःच्या मनाला तुम्ही काय केले ते ? बायजा आजीला घराबाहेर अडगळीच्या खोलीत ठेवले. तिला पोटाला पोटभर विचारले नाही .तरी तिच्या त्रासातून कधी आपण सुटणार याचीच वाट बघत होते .चांगल – चुंगल केलं की मापाचेच खायला द्यायचे. इच्छा असूनही तिला मागता येत नव्हते.आणि मागितले तरी तिला दिले नाही.कितीही सुख दिले आणि पोटाला अन्न नाही दिले तर चालेल का ? बिचारी मन मारून जगत होती.कधी मायेने तिची विचारपूस केली नाही. ना कधी औषध पाणी विचारले. कधी नातवंडांबरोबर प्रेमाने गुजगोष्टी करून दिल्या नाही.जे तुमचं कर्तव्य होत ते तुम्ही कधीच पार पाडले नाही.मग कसा काकस्पर्श होईल.
पण ज्या मुलीच्या पोटाचाच थांगपत्ता नाही.त्या मुलीने प्रेम दिले.पोटभर जेवण दिले.तुम्ही म्हणाल की पोटभर जेवण कसे दिले ? तर ती दररोज घराघरांतून गोळा केलेलं अन्न स्वतः खायची आणि बायजा आजीला पण खाऊ घालायची.आजीपाशी जाऊन तासनतास वेळ घालवायची.दिवसातला बराच वेळ हा बायजा आजीचा सुमीमुळे चांगला जाऊ लागला.
बायजा आजीचा तुमच्यापेक्षा सुमीकडे ओढा वाढला.एक दिवस असा गेला नाही की सुमी आजीकडे गेली नाही.आजीचे शेवटचे दिवस सुमीमुळे बरे गेले.पण तुम्ही सुमीचाही राग राग केला. पण तिच्या प्रेमामुळे आज बायजा आजीला मुक्ती मिळाली.आजीचा थोडाही तुमच्यात जीव अडकला नव्हता.तिचा जीव सुमीत अडकला होता.तुमच्या जाचातून मोकळी झाली बायजा आजी.”
सरांच्या बोलण्याचा कुठेतरी सगळ्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता.बऱ्याच जणांना चुका करण्यापासून वाचवले होते.सगळ्यांच्या मनावरची जळमटे आज दूर होऊन मनं स्वच्छ झाली. जणू काही खाडकन डोळेच उघडले होते.सगळी लोकं समधानाने घरी परतली.
समाप्त !
तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा. आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.अशाच नवनवीन कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या “लेखक मित्र” या वेबसाईटला नक्की भेट द्या.तसेच आमचा “WhatsApp” ग्रुपही जॉईन करा.
धन्यवाद !
लेखिका – शितल औटी, जुन्नर
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
छान कथा..!
Thank you
खूप छान कथा, माणूस गेल्यावर त्याचे कार्य करण्यापेक्षा तो जिवंत असताना त्याला जपणे महत्वाचे असते.
Thank you
सत्य परिस्थिती ची मांडणी केली खरं खूप गरज आहे याची डोळे पाणावले वाचून… खूप छान 👌👌
खूप सुंदर कथा, मनाला भावुन गेली…