कथा – जिलेबी… साखरमिठी
जिव्हारी लागलेल्या गोड आठवणींची मिठी
आज अनंत चतुर्दशी. बाहेर ढोल-ताशांचा कडकडाट, बासरीचे सूर, गणेश विसर्जनाचा उत्सव – सर्वत्र आनंदाचा गजर, पण अवंतिका या सगळ्यात शांत बसलेली होती. तिचं मन मात्र या सजीव जल्लोषापासून फार दूर होतं. तिच्या मनात विचारांचे गहिरे तरंग उठत होते.
उद्यापासून पितृपक्ष. पितरांच्या, आपल्याला कायमचे सोडून देवाघरी गेलेल्या आपल्या प्रियजनांना स्मरण करण्याचे दिवस. ” आपल्याला आपली माणसं विसरता येतात का? प्रत्येक क्षणात, प्रत्येक कृतीत, त्यांच्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात असतातच ना? मग हे खास दिवस कशासाठी? जणू काही आपली जखम हळूहळू भरत असताना कुणीतरी पुन्हा ती उघडावी, आणि ती जखम रक्तबंबाळ व्हावी असं काहीतरी. पण समाजाच्या रूढी-परंपरांना निभावणं गरजेचंच आहे. असो.” विचारात असलेली अवंतिका आईच्या बोलण्याने भानावर आली.
“अग अवे, कधीपासून हाका मारत आहे तुला. लक्ष कुठे आहे तुझे. अग, गुरूजींना फोन कर आणि बाबांच्या श्राद्धासाठी येण्याचे सांग त्यांना. आता तुलाच हे सगळं बघावा लागणार आहे. ह्याआधी तुझे बाबा तुझ्या आजी आजोबांच्या श्राद्धासाठी त्यांना बोलावत दरवर्षी; पण आता त्यांच्याच श्राद्धासाठी “ बोलता बोलता आलेला हुंदका थांबवत आई निघून गेली. अवंतिकेने ही आपला दाटलेला गळा आणि पाणावलेले डोळे पुसत गुरूजींना फोन केला.
“ हॅलो गुरूजी, नमस्कार. मी अवंतिका बोलते आहे. अं..हो, हो. त्यांचीच मुलगी. चार दिवसांनी बाबांचे श्राद्ध आहे. तुम्ही याल ना करायला ? बरं. बरं. तुम्ही श्राद्धासाठी लागणार्या सामग्रीची यादी आणि तयारी काय करायची हे सांगाल का? अं. हो. मी आई आणि ताई मिळून करू. “ गुरूजींना सगळं सांगून अवंतिकेने गुरूजींकडून सगळी माहिती करून घेतली.
दरवर्षी येणाऱ्या गुरूजींना घरातील सदस्य आणि घराची परीस्थिती माहित होती. त्यामुळे त्यांनी अवंतिकाला सांगितले, “ हे बघ पोरी, तुझे बाबा आणि मी फक्त ह्या एका दिवशी भेटत होतो. पण आमचा स्नेह फार होता. मी तुमच्या घराला, तुम्हाला परका नाही. मी श्राद्धासाठी लागणारी सगळी सामग्री घेऊन येईन. तुम्ही फक्त बाबांच्या आवडीचा स्वयंपाक करा.” बरं म्हणत अवंतिकाने फोन ठेवला.
आईला गुरूजींबरोबर झालेले बोलणे सांगण्यासाठी अवंतिका आईच्या खोलीत गेली. गुरूजींनी श्राद्धासाठी लागणारी सगळी सामग्री आणणार आहे असे जरी सांगितले तरीही बाकीच्या तयारीची यादी अवंतिकाने आईला विचारून केली. पुढचे दोन दिवस तयारी करण्यात निघून गेले.
चौथ्या दिवशी सकाळी गुरूजी वेळेवर आले. त्यांनी श्राद्धाची पुजा मांडायला घेतली. पूजा सुरू झाली. त्याच वेळी अवंतिकाचं मन पुन्हा आठवणींच्या गर्तेत हरवून गेलं. “दरवर्षी बाबांनाही असंच वाटत असणार का? तेही दरवर्षी आजी-आजोबांच्या श्राद्धात अशाच भावनांच्या आवेगात हरवत असणार का? मन आतून रडलं असेल त्यांचंही.” ती स्वतःला सावरत होती; पण मनाच्या खोलवर एक वेदना होती बाबांच्या आठवणींची, त्यांच्या अस्तित्वाच्या जाणिवेची. आज आजी आजोबांचे श्राद्ध करणाऱ्या बाबांचे श्राद्ध सुरू आहे. का हा दिवस आला? असे विचार अवंतिका करत असतानाच तिला हे सुद्धा जाणवले की तिथे असलेली तिची आई. ताई, जावई, मुलं सगळे आपलं दुःख लपवत एकमेकांना सांभाळत आहेत.
श्राद्ध करून झाले. नमस्कार करून झाले. गुरूजींनी बाबांसाठी, देवासाठी, गाईसाठी जेवणाची नैवेद्याची पाने घ्यायला सांगितली. अवंतिका आणि तिच्या ताईने नैवेद्याचे पान वाढायला घेतले. सगळं वाढून झाल्यावर गुरूजींनी बाबांच्या आवडीचे पदार्थ वाढण्यास सांगितले. लाडू, घारगे, उकड, थालीपीठ हे पदार्थ वाढून झाले. सगळ्यात शेवटी बाबांची आवडती जिलबी वाढताना मात्र अवंतिका क्षणभर थबकली. त्या जिलबीत तिच्या बाबांच्या आठवणी दडलेल्या होत्या. ती क्षणभर त्यात हरवून गेली.
बाबा आणि ती – ह्या दोन व्यक्ती, आणि त्यांच्यातली एक अनोखी साखरमिठी – जिलबी. बाबा तिच्याकडे शेवटचे राहायला आले ते दिवस आठवून तिला रडू आलं. ज्या दिवशी ते तिच्याकडे राहायला आले त्या दिवशीही येताना जावयांसाठी, मुलांसाठी जिलबी घेऊन आले होते. “अगं अवे, हे घे. हे दे जावयांना आणि मुलांना. गरम गरम आहे. त्यांना आवडते ना. दे लगेच.” जिलबीचा बॉक्स अवंतिकाच्या हातात देत बाबा अवंतिकाला म्हणाले.
“हे हो काय बाबा. दरवेळेस मुलांचे आणि जावयाचे लाड. कशाला दरवेळेस घेऊन येता? ” अवंतिकेने बाबांना विचारले.
“अग विचारू नकोस. तुझ्याकडे येण्यासाठी निघालो आणि ह्यांच्या लक्षात आले जिलबी घ्यायची राहिली ते. मग तसेच तडक आपल्या नेहमीच्या दुकानात गेले आणि हे दोन बॉक्स घेऊन आले.” आईने अवंतिकाला बाबांनी केलेली धावपळ सांगितली.
“आता मात्र तुम्हाला खरंच रागावले पाहिजे बाबा. अहो कशाला इतकी धावपळ करून जिलबी आणलीत? एखाद वेळी नसती आणली तरी चाललं असतं. दरवेळेस घेऊन येताच ना. इथून आणली असती तुमच्या जावयांसाठी. अशी धावपळ करत जाऊ नका बरं.” अवंतिका बाबांना समजावण्यासाठी म्हणाली.
जावयांनी सुद्धा समजावण्याच्या सुरात बाबांना सांगितले, “अहो बाबा, तिचं म्हणणं बरोबर आहे. अशी धावपळ करून चालणार नाही. तब्येत महत्वाची. तुम्ही सकाळीच फिरायला जाता त्यावेळेस ही आणली असती तर ठिक होतं. परंतू ह्या जिलेबीसाठी, आमच्यासाठी तुम्ही परत इतक्या लांब जाऊन येणं हे तुमच्या तब्येतीला बरे नव्हे.”
त्यावर बाबा म्हणाले, “वाह ग वाह अवे! म्हणे कशाला आणलीत? म्हणे इथून आणली असती. मला काय झालयं? मी अगदी ठणठणीत आहे. तू विसरलीस वाटतं. तू लहान असताना मी घरीच केलेली जिलबी तूच सगळ्यात जास्त खात होती. तुला आठवतं तू कॉलेज मध्ये असताना एकदा मैत्रीणीकडे गेली होतीस. त्यावेळेस टिव्हीवर एक जाहिरात लागली होती. एक लहान मुलगा घर सोडून स्टेशनवर बसलेला असतो व तिथे एक काका येऊन त्या मुलाला सांगतात की त्याची आई जिलबी बनवत आहे. ते ऐकून तो घरी येतो व सांगतो जिलबी खाण्यासाठी घर सोडून जाणं कॅन्सल. ती जाहिरात बघितल्यावर तू मैत्रीणीला म्हणाली होतीस माझे बाबा सुद्धा घरी अशीच जिलबी बनवतात आणि ती जिलबी खाण्यासाठी मी त्यांना सोडून कुठेही जाणार नाही. आठवलं का? मग जर तुझ्यासाठी जिलबी बनवत होतो तसं आता जावयांसाठी आणि मुलांसाठी आणतो. आता करायला जमत नाही. म्हणून त्यांना आवडते त्या आपल्या नेहमीच्या दुकानातली न विसरता आणतो. तू हल्ली खूपच ओरडायला लागली आहेस मला. बघा हं जावई. माझी मुलगी बाबाला दरडावते आहे.”
त्यावर अवंतिका हसत आपल्या नवर्याला म्हणते, “बघितलंत ना! कसे लेकीला बोलतात ते?. आधीचं इतकं ऐकून दाखवलं; पण जिलबी आणली फक्त जावयांसाठी आणि नातवंडांसाठी. मुलीसाठी नाही. मुलीसाठी फक्त कडक शब्द आणले आहेत.” असं म्हणत ती जिलबी डिशमध्ये काढून आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेली.
डिशमधली जिलबी खात जावयांनी आणि नातवंडांनी जिलबी आवडल्याची आणि झालेल्या आनंदाची पोचपावती बाबांना दिली. त्यावर ते म्हणाले, “बघितलंस अवे, ह्याच आनंदासाठी मी आज धावपळ केली. ह्यांच्या चेहर्यावरील आनंद बघितला की माझ्या मनाला तृप्ती मिळते. ह्या जिलेबीचा गोडवा ह्यांना आनंद आणि मला तृप्ती देतो.
ही जिलबी आणण्यात आणि देण्यात सुद्धा एक गंमत आहे. ही जिलबी बघितल्यावर मला काय वाटतं सांगू? मला वाटतं, प्रत्येक माणूस हा ह्या जिलबीसारखा आहे. गोल गोल, वेटोळे घातलेला; तरीही गोड. ह्या जिलबीकडे बघ कशी केशरी रंगाची तुकतुकीत गोल, गोड राणी. थाटात विराजमान आहे ह्या डिशमध्ये आपल्याला गोडवा देण्यासाठी आणि आपण सज्ज आहोत तो गोडवा घेण्यासाठी. जिलबी प्रतिक आहे माणसाचे. तुम्ही म्हणताना हल्ली नवीन ते , ‘तेढा है पर मेरा है’ असंच.” असं म्हणत बाबांनी अवंतिकेला एक जिलबी भरवली व तिची समजूत काढली.
बाबांनी खरचं एक शिकवण दिली होती. आयुष्यासाठी एक तत्वज्ञान दिलं होतं. आपल्या माणसातील गोडवा बघा. त्याचा आकार, त्याचा स्वभाव कितीही वेटोळा, गरगरीत, ओबडधोबड असला तरीही त्या माणसात असलेला गोडवा बघा. माणसातला गोडवा शोधायला हवा. तरच माणुसकी, आपलेपणा, प्रेम, माया टिकून राहिल. बाबांची शिकवण तिच्या मनात घर करून बसली होती. त्या साध्या जिलबीमध्ये बाबांनी तिला जगण्याचं तत्वज्ञान दिलं होतं. आपल्या माणसांतल्या गोडव्याला जपायचं, त्यांची काळजी घ्यायची, त्यांचं प्रेम वाढवत रहायचं – हाच खरा गोडवा. ती ह्याच विचारात असताना बाबांचे पुढचे शब्द तिच्या कानाला आणि मनाला टोचून गेले. “हे बघ अवे, मी आज आहे म्हणून हा गोडवा देऊ शकलो. ऊद्या तब्येतीने साथ सोडली की हा गोडवा मी त्यांना देऊ शकणार नाही. म्हणून आज आहे तोपर्यंत मला त्यांना गोडवा देऊन त्यांच्या चेहर्यावरचा आनंद बघून मन तृप्त करून घेतो.”
जिलेबीचा गोडवा आणि बाबांचे हे शब्द, त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद तिला आठवत होता. त्या एका साध्या गोष्टीत किती प्रेम असायचं! त्यांची काळजी, त्यांचं प्रेम, सगळं त्या गरम जिलबीतून जाणवत होतं. हे सगळंच आठवत असताना गुरूजींच्या आवाजाने अवंतिका भानावर आली. गुरूजी अवंतिकाला सांगत होते, “ अवंतिका बाबांच्या आवडीचे वाढून झाले ना. हे पान बाहेर ठेव. कावळ्याच्या रूपात येऊन बाबांना जेवायची आणि तृप्त होण्याची विनंती कर. “
घरचे सगळेच बाहेर येऊन हात जोडून विनंती करू लागले. अवंतिकाने सुद्धा हात जोडले आणि म्हणाली, “ बाबा तुम्हाला तुमच्या आवडीचे जेवण जेऊ घालून तुम्हाला तृप्त करायला गुरूजी सांगत आहेत; पण आम्हा सगळ्यांना माहीत आहे तुम्ही तृप्त कसे होणार ते? म्हणून मी तुमच्या जावयांना आणि नातवंडांना ही जिलबी आधी खायला देत आहे. तुमचा गोडवा त्यांना देत आहे. ती जिलबी खाल्यानंतरचा आनंदाचा गोडवा तुम्हाला दिसला ना? तुम्ही तृप्त झालात ना?
पण एक सांगू बाबा, तुम्ही मला भरवलेल्या जिलेबीचा गोडवा मला आता परत कधीच मिळणार नाही. आपल्या नेहमीच्या दुकानातल्या जिलबीमध्ये सुद्धा नाही.तरीही आज एक नक्की तुम्हाला सांगते. जिलबीसारख्या गोल गोल वेटोळे असलेल्या स्वभावाच्या माणसात गोडवा नक्की शोधून तो जपेन. आपल्या माणसातला आपलेपणा, माया ,प्रेम ह्यांचा गोडवा वाढवेन.
अजून एक तुमच्या जावयांना आणि नातवंडांना गोडवा देणारी जिलबी ह्यापुढे मी त्यांना तुमच्या वतीने देत राहिन. तुमच्याइतकं गोडवा देणारी व्यक्ती मला बनता येणार नाही; पण माझ्या वागण्यात कडूपणा येणार नाही ह्याची मी काळजी घेईन. तुम्ही निश्चिंत मनाने तृप्त व्हा. “ असे आश्वासन देत हात जोडून अवंतिकाने बाबांना तृप्त होण्याची विनंती केली. त्याच क्षणी कावळा आला, त्याने जिलबी खाल्ली आणि तृप्त होऊन उडून गेला. अवंतिकाने डोळ्यातले अश्रू पुसले. तिच्या मनात बाबांनी दिलेली शिकवण मात्र अजून गडद होत गेली – “प्रत्येक माणसातला गोडवा शोधायला हवा.
बाबा, तुमच्या घासाचा गोडवा अजूनही आहे,
केशररंगी जिलबीसारखा मनात दडलेला आहे,
तुमच्या आठवणींनी मारलेली ही साखर मिठी
तुम्ही नसतानाही तृप्ती सतत देत रहणार आहे.
–पुजा सारंग, मुंबई.