लेखिका – रजनी अशोक देवधर
संध्याकाळी पावसाचा जोर अजून वाढला. दिवसभर जराही विश्रांती न घेता अविरत कोसळत होता पाऊस.दिवसच होते त्याचे. वार्यांनी लांब वरून भरून आणलेल्या ,पाण्यानी ओथंबलेल्या काळ्या घागरींची आकाशात एकच दाटीवाटी झाली होती. एकमेकींचा धक्का लागून त्या फुटत होत्या.रात्र झाली. वार्याचा जोर वाढला.
तिच्या घरा समोरचा विहीरी शेजारचा तो महाकाय पिंपळ नखशिखांत भिजलेला; तो हादरला होता.सतत कोसळणारा पाऊस ,सोसाट्याचा वारा आभाळच फाटल होतं जणू. त्या पिंपळाचा गद्गदलेला आक्रोश उत्तरोत्तर वाढत होता. वारा आणी पावसाच्या थैमानाने रात्र आक्राळ विक्राळ झाली होती. तशातच लाईट गेले. तिनी मेणबत्त्या लावल्या.
तिच्या तिसऱ्या मजल्यावरील घरामधून दिसणारा तो महाकाय पिंपळ त्याच आक्रंदन तिला दिसत होत. गदागदा हलत होता तो. मध्यरात्री ही शांत नाही झाला पिंपळ . पिंपळाखालची ती गोल ,भली मोठी विहीर; जी.एं.च्या कथांत असते तशी अगदी . काळीकभिन्न ,अनामिक गूढ उदरात जपणारी, उसासत त्याला वाचा न फोडणारी .विहीरीकडेच्या पिंपळाची पानगळ संपून धुमारे आले की प्रकाशाला आत जायला मज्जाव करणारं तिच्यावरच भलं मोठं पिंपळाच छत्र असंख्य छोट्या मोठ्या जीवांनी गजबजून जात असे.
खोडावरून मुंग्या ,डोंगळे ,हवेत उडणारे किडे त्यांना मटकावणारे चिमुकले पक्षी ,खारी ,वटवाघळं अनेक जीव पिंपळाने वाढविले .खाऊपिऊ घालून मोठे केले . पिंपळ जाणता कित्येक दशके उन्हाळे पावसाळे पाहिलेला. उन्हात चमकायचा ,वाऱ्याने सळसळायचा. अंगाखांद्यावर बागडणाऱ्या इवलुशा पाखरांची किलबिल ऐकायचा .अवखळ चिमण बाळांच्या खोड्या पाहताना मजेत असायचा अगदी. फांद्या लाल फळांनी लगडल्यावर दिवसभर पाखरांचा किलबिलाट आणी काळोख पडताच पहाटे पर्यंत चालणारा वटवाघळांचा कचकचाट असायचा पिंपळावर . घुबडं ,वटवाघळं जे येतील त्या साऱ्यांना आसरा देत खाऊ घालणाऱ्या पिंपळाला त्या दिवशी हे असं काही विपरीत घडेल असं मुळीच वाटलं नव्हतं. गॅलरीतून पाहणाऱ्या तिला शोकाकुल ,व्याकुळ पिंपळाचं आक्रंदन दिसत होतं .
पहाटे पावसाच्या धारा थांबल्या. पिंपळाने वाहिलेले अश्रुंचे लोट झेलत मूक स्तब्ध झालं होतं विहीरीचं पाणी .विहीरीच्या आत मासोळ्यांची झुंबड भक्षावर तूटून पडली होती . सकाळ झाल्यावर हादरलेल्या,आक्रंदन करणाऱ्या पिंपळाचा उन्माद अखेर थांबला. तो समंजस शांत झाला. त्याला शेवटचा निरोप द्यायचा होता त्याच्या छोट्या सवंगड्याला. शेजारी तळमजल्यावर घर होत त्याच्या सवंगड्याचं . त्याच्या घरातल्या स्टडी रूमवर पिंपळाने छानदार गारव्याचे छत्र धरले होते.
या स्टडी रूम मध्ये रात्री उशिरापर्यत अभ्यास करायचा तो.फिजिक्स मध्ये डॉक्टरेट मिळवलेले वैज्ञानिक वडील ,गणिताची प्राध्यापक असलेली आई आणि तो असे त्यांचे त्रिकोनी कुटुंब तिथे राहत होते. अभ्यासू, शांत ,फारसे कोणामधे न मिसळणारे, कोणाच्या अध्यात मध्यात नसलेले , सतत कार्यमग्न राहणारे ते कुटुंब होते. वीस वर्षांपूर्वी त्या सोसायटीत नवीन घर घेतलेल्या त्याच्या आई,बाबांबरोबर घरी आलेल्या दुपट्या मधल्या त्याला पिंपळाने पाहिले आणि पिंपळ अगदी हरखून गेला. तो गोजिरवाणा तान्हुला पाहून आनंदाने सळसळला. पिंपळाचा हा छोटा सवंगडी रांगू लागला, गॅलरीत बसून एक घास काऊचा, एक घास चिऊचा जेवू लागला. त्याचे चिमणे ,बोबडे बोल ऐकल्यावर पिंपळ तृप्त होत असे. एक दिवस चिमुकला सवंगडी पिंपळाला टाटा करून शाळेत गेला तेव्हा पिंपळ “खूप खूप शिक आणी मोठा हो बाळा” म्हणत पाठीवर कौतुकाची थाप देत खुदकन हसला.
पिंपळा मधून ठिबकणारे थेंब थांबले. विहीरीने आ केला आणि संध्याकाळपासून हरवलेला ‘तो पिंपळाचा सवंगडी ‘विहीरीच्या पाण्यावर पहुडलेला सार्यांनी पाहिला. रात्रभर त्याच्या अचेतन देहावर विहीरीतल्या माशांनी ताव मारला होता. हादरलेले शेजारी ,पाजारी,आप्त स्वकीय पुढच्या तयारीला लागले .तिच्या सोसायटीचा परिसर शोकाकूल गर्दीने ओसंडला.
त्याचा अचेतन देह पांढऱ्या कपड्यात गुंडाळला होता. पिंपळ मिटून गेला होता . स्तब्ध होऊन त्याच्या सवंगड्याच अंत्यदर्शन घेत होता. चांगल्या इंजिनियरिंग कॉलेज मधून उत्तम ग्रेड ने पास होणाऱ्या त्या बुद्धिमान,सरळमार्गी मुलाचे आयुष्य का संपले कोणालाच कळले नाही . सोसायटीत उलट सुलट चर्चा ना ऊत आला. रिकामा वेळ घालवण्यासाठी चालणाऱ्या गप्पांना नवा विषय मिळाला . कॉलेजमध्ये रॅगिंग,ड्रग च व्यसन, प्रेमभंग,परीक्षेत अपयश,गंभीर आजार अस काहीही नसताना त्यानी मरणाला स्वतःहून का कवटाळलं? की तो निव्वळ अपघात होता? “मित्राकडे जाऊन येतो” म्हणून सांगून घराबाहेर पडलेला तो घरी न येता घराशेजारच्या विहीरी जवळ का गेला? विहिरीच्या कठड्यावर बसल्यावर त्याचा तोल गेला की त्यानी उडी मारली? कोणालाच समजेना. तर्क,कुतर्कांना उधाण आलं.
“विहीरीत साती आसरा असतात त्या बोलावतात”
“काहीतरीच. त्या रक्षण कर्त्या देवता असतात त्या कशाला कोणाचा जीव घेतील ?”
“घराशेजारी पिंपळ असू नये त्यावर अमानवी शक्ती,अतृप्त आत्मे ,भुतंखेतं असतात. “
“पिंपळाच सावट ज्या घरावर पडतं तिथे राहणाऱ्या कुटुंबाचा वंश वाढत नाही”.
” पिंपळ अशुभ असतो . पडके वाडे ,ओसाड ,निर्जन जागी पिंपळ असतात. नांदत्या वस्तीत पिंपळ हवा कशाला ?
“ पिंपळ तोडून टाकूया? .
” गुलमोहर,शेवगा,पेरू अशी चांगली झाडं आहेत आपल्या सोसायटीत . हा पिंपळ नको. “
“आपली सोसायटी होण्या आधी इथे शेत होत .त्या शेत मालकाची बायको पाणी काढताना या विहिरीत पडून मेली होती.”
“रात्रीचा वॉचमन सांगत होता पिंपळाच्या झाडावरून कसलेतरी आवाज येतात. ”
” आपली मुलं बाळ इथे खेळतात ,वावरतात त्यांना कसली बाधा नको व्हायला. या पिंपळाच सावट नको आपल्यावर ”
गप्पांचा रोख अखेर पिंपळाकडे वळला. त्याच्या आई वडिलांच्या अपरोक्ष चालणाऱ्या या गप्पा आकस्मिक पणे या वेगळ्या वळणावर आल्या. त्या सोसायटीत ए ,बी , सी अशा तीन बिल्डिंग होत्या. “आमच्या घरात काळोख येतो या पिंपळामुळे ” पिंपळा शेजारी असणाऱ्या ‘सी ‘बिल्डींग मधल्या दुसऱ्या,तिसऱ्या ,चौथ्या मजल्यावर राहणाऱ्यांनी एकमुखाने तक्रार केली. आणि पिंपळ, त्याच सावट नको यावर शिक्का मोर्तब झालं. सोसायटीच्या मिटिंग मध्ये पिंपळाला जीवे मारून नामा निराळं कस राहायच याची खलबतं केली जाऊ लागली.
“बुंध्या जवळ मातीत विषारी पावडर पसरली की झाड सुकत जात आणि मरत. आपल्यावर झाड तोडल्याचा गुन्हा नाही ” सेक्रेटरी वदले .
“अहो हा लहान झाडांसाठी उपाय आहे. इतका मोठा वृक्ष नाही मरणार त्या पावडरींनी” कमिटी मेंबर राणे म्हणाले.
“लेले तुमची ओळख आहे न टी. एम. सी. मध्ये . मग बघा काहीतरी करा ”
” परवानगी शिवाय तोडलं तर नस्ती झेंगटी मागे लागतील.तो नवीन कमिशनर पर्यावरण वादी आणि कडक स्वभावाचा आहे. फक्त दंड नाही . जेल मध्ये टाकायला कमी करणार नाही ”
‘”असेना किती कडक . आपण मार्ग काढू काहीतरी ”
त्या विशाल पिंपळाची शितल छाया ,त्या छायेत विसावणारे अनेक पक्षी ,त्यांची पिल्लं , घरटी याच कोणाला अप्रुप नव्हत. बहुमताच्या गलक्या मध्ये तिचा एकाकी आवाज दुबळा झाला.
” त्यांना बोलून दे काहीही . म्युनसिपाल्टी इतका जुना वृक्ष तोडायला कधीच परवानगी देणार नाही. तू मुळीच काळजी करू नको” मिटिंग मध्ये पिंपळाच्या मुळावर येणाऱ्या कट कारस्थानाला कडाडून विरोध करणाऱ्या तिच्या नवऱ्यानी दिलासा दिला .
ती , नवरा आणि तिची मुलं निसर्ग प्रेमी होते. पिंपळाशी ,पिंपळावर येणाऱ्या पाखरांशी , तुरुतुरु धावणाऱ्या खारींशी त्यांचं मैत्र होत . पिंपळाला वाऱ्यावर सळसळताना पाहून ती मनोमन हरखत असे.
त्या संध्याकाळी घरी परतलेली ती, तिची मुलं सुन्न झाली होती. विहिरी जवळ पिंपळाच्या फांद्या, आणी पानांचे मोठे ढीग पडले होते .सकाळच्या कोवळ्या उन्हात सळसळणारा पिंपळाचा उंच,विशाल ,डेरेदार वृक्ष दिवसा अखेर लहान , भुंड्या खोडाच्या रूपात शिल्लक होता. या निर्दय कत्तलीचा जाब विचारायला गेलेल्या तिच्या नवऱ्याला परवानगीचा कागद दाखवून सेक्रेटरीने निरुत्तर केले होते. दिवसभर तिच्या घरी कोणी नसल्याचा मोका साधला होता. म्युनसिपाल्टी कडून फांद्या छाटण्याची परवानगी घेऊन बेगुमान तोड केली होती. एकही फांदी,डहाळी नसलेला तोडून लहान केलेला जेमतेम सात,आठ फूट उंचीचा तो निष्पर्ण बुंधा पाहून ती गलबलली . त्याच सळसळणारं चैतन्य आठवून मनोमन कष्टी झाली .पिंपळ तोडला आणि एक पोकळी निर्माण झाली.
आठवडाभरात नवल घडले.जीवनाचे कोवळे अंकुर बुंध्यावर डवरु लागले. पानांच्या इवल्याशा सुरनळ्या हलकेच उलगडू लागल्या. कोवळ्या लूस पोपटी पालवीने ते जुने खोड बहरले. ऋतुचक्र नेहमीच्या गतीने फिरत होते. हिवाळा,उन्हाळा संपून परत पावसाळा आला. पावसाच्या आगमनाने पिंपळावर अनेक धुमारे आले. पावसात चिंब भिजून पिंपळावरच्या डहाळ्या जोमाने वाढल्या. मृतात्मा,अशुभ, सावट,वंश क्षय या खुळचट समजुती उराशी बाळगणाऱ्यांनी बेछूट घाव मारत मृतप्राय केलेला तो जीर्ण वृक्ष पुन्हा वाढू लागला .शहरी प्रदूषणात ,सिमेंटच्या जंगलात असंख्य किडे माकोडे ,पक्षी ,खारी ,वटवाघळं यांच्यावर मायेचं छत्र धरत त्यांच्या वंशवृद्धीला सहाय्य करणारा पिंपळ; जीवघेणे मानवी संकट पचवून पुन्हा वाढू लागला होता.
ती सारे पाहत होती. ‘सी बिल्डींग मध्ये तळ मजल्यावर राहणारे पिंपळाच्या छोट्या सवंगड्याचे आई वडील; पुत्र शोकाच दुःख बाजूला सारून शालेय विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे वैज्ञानिक प्रकल्प करत होते, विज्ञान पत्रिकांमध्ये लेखन करत होते. संकटांवर न डगमगता मात करायची. दुःखाचे सावट मनावर कायमसाठी येऊ द्यायचे नाही ही तिला मिळालेली शिकवण खूप अमूल्य होती. साधतात. पिंपळाच आणि तिचं नातं जिव्हाळ्याच्या धाग्याने बांधलेले होते.
लेखिका – रजनी अशोक देवधर , ठाणे
(कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत, कोणीही परवानगीशिवाय कथेचा वापर करू नये )