दारुडा नवरा लईच मारायचा. काय बी चांगलं चुंगलं बनवलं कि सखूबाई पयलं नवऱ्याच्या पानात वाढायची. पोरं जाम कावायची. बापाच्या ताटाकडे भुकेल्या नजरेने बघायची. सखूबाईचं मन पार पिळवटून जायचं. पण परिस्थितीमुळे हतबल होती ती! नवऱ्याच्या पुढे पोरांचं होईस्तवर टोपात काय बी उरायचं न्हाय. टोपाचा खडखडाट ऐकत सखूबाई नि तिची म्हातारी सासू जेवून घ्यायच्या.
गेली कित्येक वर्षे सासू अंथरूणाला खिळून होती. म्हातारीचा जीव कशात अडकला होता कोण जाणे! कायम आढ्याकडे डोळे लावून बघत बसायची. पुढ्यात येईल ते गिळायची अन गप्प पडून राहायची.
तिचं सगळं अंथरुणातच करावं लागे. सखुबाईचा पार पिट्टया पडायचा. पहाटेपासूनच बिच्चारी कामाला लागायची. म्हातारीचं आवरून घरचं धुणी भांडी स्वयंपाक होईस्तवर कामाला उशीर व्हायचा. निस्ता कोरा चाय पिऊन सखूबाई कामावर धावे. म्हातारीचे औषध पाणी, पोरांची वह्या पुस्तके सगळा भार एकट्या सखूबाई वरच होता.
लग्न झाल्या दिवसापासूनच सखूबाईला कळाले नवरा आळसोबा आहे. त्याला कामावर जायचा खूपच कंटाळा. दिवसभर नुसता विड्या फुंकत पडून राहतोय. जरा मोका मिळाला कि सखुबाई वर झडप घालायचा. ती बिचारी सासू सासऱ्यांच्या चोरट्या नजरांपासून वाचत दिवसभर कामे उपसत बसायची. अशाने नवऱ्याची नोकरी तर गेलीच पण त्याला दारूचे व्यसनही लागले. दिवसभर दारू पिऊन पडून राहू लागला. वर अजून पैशासाठी मारझोड सुरू झाली. सासरा मेल्यावर परिस्थिति अजूनच गाळात गेली. म्हातारा थोडं तरी कमवून आणे. त्यात पोटाला दोन घास तरी मिळत होते. आता जगायचे आणखीनच वांधे झाले. संसाराची कुठलीही जबाबदारी न घेणाऱ्या नवऱ्याने सखूबाई वर मात्र दोन पोरांची जबाबदारी टाकून आपले कर्तव्य पार पाडले. सखूबाई संसारात पार अडकून गेली.
घरोघरी धुणीभांडी करणाऱ्या सखूबाईचा एकटीचा पगार संसाराला कितीसा पुरणार? पण कपड्यांना ठिगळं लावता लावता ती संसारालाही ठिगळं लावत दिवस ओढत होती. विस्कटलेला संसार सावरत होती.
त्यादिवशीही नवरा रोजच्या प्रमाणे दारू पिऊन आला नि जेवायला ताटावर बसला. पानात मेथीची भाजी बघून चवताळला. तोंडाने शिव्यांचा रतीब घालायला लागला. पोरं बिचारी घाबरून आई मागे लपली. ते बघून त्याला अजूनच चेव आला. त्याने खर्रकन चुलीतले लाकूड ओढले नि त्या जळत्या लाकडाने सखूबाईला मारायला धावला. पोरं ढयाsss बोंबलून ओरडू लागली. झटापटीत नवरा तोल जाऊन निखऱ्यांवर पडला. तसा ताडकन शुद्धित आला. सखूबाईच्याच हाताला धरून उठला. पण चांगलाच भाजला होता. ढोसलेली सगळी पार उतरली होती. पोरांकडे बघून गपचूप कोपऱ्यात बसला नि मुकाट जेवला. अगतिक सखूबाई दुखऱ्या अंगाने आणि जखमी मनाने रात्रभर नवऱ्याच्या अंगाला तेल चोळत बसली. मोठी होऊ लागलेल्या पोरांनी सखूबाईच्या हृदयावर मात्र हलकेच फुंकर मारली.
सखूबाईचा पगार झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीच मोठ्याचा वाढदिवस होता. सकाळ पासूनच तो खुश दिसत होता. स्वस्तातले का होईना पण नवीन कपड्यांत खुलून दिसत होता. सखूबाईने प्रेमाने पाटावर बसवून औक्षण केले. आणि पोराला वाढदिवसाची भेट म्हणून दोनशे रुपये दिले. पैसे बघून पोरगं हरखून गेलं. म्हणालं, “आई आज रातच्याला कोंबडीचे मटण बनवशील? मी आणतो. आपण आज पोटभर जेवू.” “होय रे बाळा!” म्हणताना सखूबाई कळवळली. कालच पैसे हातात आलेत. आज मटण बनवायचे म्हणजे मसाल्यालाही बरेच पैसे पडतील. तेल, तिखट, कांदा-खोबरं जास्तीचं आणावं लागेल. अजून पोरांच्या फिया भरायच्यात. महिन्याचे सामान भरायचेय. त्यात म्हातारी कालपासून लईच खोकतेय. ते औषधबी आणायचेय. कसं निभावनार! पण असू देत. पोराची येव्हढी तरी इच्छा पुरी करायलाच होवी. बिचारा वाढदिवस हाये तर काय हट्ट तर करत नायच अजून त्याला दिलेले पैशांनी पण घरात मटण आणतोय. म्हातारीला पण दोन खडे रश्श्यातून दिले तर तिच्याही घशाला आराम मिळेल.
मनाशी निश्चय करून सखूबाई कामावर गेली. मालकिणीकडून हात उसने पैसे मागितले. तिनेही ‘पुढच्याच महिन्यात कापून घेईन’ असे बजावूनच पैसे दिले. तरीसुद्धा सखूबाई बिचारी मोहरून गेली. संध्याकाळी जाताना मटणाच्या विचारात तरंगतच घरी परतली.
आज घरात खुशीचे वातावरण होते. खेळायला गेलेली पोरं सुद्धा मटणाच्या आशेने लवकर येऊन अभ्यासाला बसली. मोठ्याने चांगले अर्धा किलो कोंबडीचे मटण आणले होते. बारक्याने लसूण पण सोलून ठेवला होता. सखूबाईला पोरांची अधीरता जाणवली. खूप वर्षांनी पोरांच्या जिभेला तिखटाची चव लागणार होती. तिने लगेच कांदा खोबरे भाजायला घेतले. नुकताच आणलेला खडा मसाला घालून मटणाचे खास वाटण बनवायला घेतले. लहानपणी सखूबाईची आई असेच मटण बनवायची. सखूलाही शिकवले होते तीने. पण लग्नानंतर कधी फारशी वेळच आली नाही तिखट बनवायची. सखूबाईला लहानपणीचे दिवस आठवले. बाबा बऱ्याचदा रविवारी मटण आणायला बाजारात जात असत. ते पण बोकडाचे मटण असे. तेव्हा कलेजी, भेजा असेही काही बाही आणत. आई सगळ्यांत शेवटी जेवे. पण तिलाही पुरेसे उरत असे.
मसाल्या मध्ये कोंबडी रटरटू लागली तसा घरभर घमघमाट दरवळला. म्हातारी सुद्धा कधी नव्हे ती अंथरुणातून उठून बसली. दरवाज्याकडे डोळे लावून पोराच्या वाटेकडे नजर लावून बसली. भाकऱ्या करता करता सखूबाई देवाला विनवत होती, “आज तरी पोरांना सुखाने पोटभर जेवू दे.”
नवरा घरात शिरताच मटणाच्या वासाने आनंदला. आज जेवायला कोंबडीचे मटण आहे म्हणताच अजून एक बाटली कोनाड्यातून काढली आणि घशात रिचवली. तसा पोटात मोठाच आंगडोंब उसळला. “लवकर जेवायला वाढ गं भवाने!” म्हणत सखूबाईच्या अंगावर खेकसला.
“व्हय व्हय”, म्हणत बिचारीने वाढायला घेतले. ताटात मटणाचा रस्सा वाढताच नवऱ्याची भूक अजूनच जोरदार खवळली. अर्धे अधिक पातेले रिकामे झाले तरी तो काही पानावरून ऊठेचना! पोरं बिचारी आशाळभूत पणे वाट बघत होती. केव्हा एकदा बाप उठतोय आणि आपल्याला जेवायला मिळतंय म्हणून चरफडत होती. आज म्हातारीच्याही तोंडातून लाळ गळत होती. एखादा तरी खडा आपल्यालाही चाखायला मिळावा म्हणून कधीची आशा लावून बसली होती.
बाप ढेकर देत एकदाचा तोल सावरत उठला तशी पोरं लगेच मटणाचे पातेले ओढून बसली. तळाशी अगदीच थोडेसे तुकडे होते. रस्सा सुद्धा जेमतेम नावालाच उरला होता. बापाला मनातून शिव्या घालत उरलं सुरलं पातेलं पोरांनी चाटून पुसून साफ केलं. सखूबाईचं मन पार मरून गेलं. म्हातारीच्या तोंडातली लाळही तोंडांतच सुकून गेली. सुनेबरोबर तिनेही बिचरीने नुसता भात पाण्याच्या घोटाबरोबर गिळला नि पुन्हा आढ्याकडे बघत बसली. दुसऱ्याच दिवशी तिने ‘राम’ म्हटले.
सखूबाईला फार वाईट वाटले. म्हातारीची आस राहिली तर तिला मुक्ती नाही मिळणार या श्रद्धेने तीने कर्ज काढून बाराव्याला खास बोकडाचे मटण आणले. पिंडावर बाजूला मटणाचा निवेद ठेवताच घास शिवायला कावळ्यांची झुंबड उडाली. या वस्तीतल्या कावळ्यांना तरी कधी मटणाचा घास मिळणार होता? पण म्हातारीच घासाला शिवली, तिची आस पुरी झाली असे समजून सखूबाईच्या जीवाला शांतता मिळाली.
पोरे मोठी झाली. आपापल्या संसाराला लागली. नवरा जाऊनही वर्षे झाली. आता पोरांच्या राज्यात सुना आधी नवऱ्यांना आणि पोरांना वाढतात. मग सासूबरोबर जेवायला बसतात. म्हातारी सखूबाई अंथरूणात पडल्या पडल्या आढ्याकडे डोळे लावून बसलेली असते.
आज सुनेने कोंबडीचे मटण शिजवायला घेतलेय. खूप वर्षांनी मसाल्याच्या घमघमाटाने सखूबाईच्या तोंडाला पाणी सुटले. जेवणाची वेळ होईस्तवर तिला दम निघेना. कधी नव्हे ती सखूबाई अंथरुणावर उठून बसली. एव्हढयात पोरं आली नि पानावर बसली. त्यांचं खाऊन होईस्तवर पातेल्यात खडखडाट ऐकू येऊ लागला. बिचारी सखूबाई समजून चुकली. तिची तोंडातली लाळ तोंडताच सुकून गेली. सखूबाई आपल्याच श्राद्धाची वाट बघत आढ्याकडे डोळे लावून बसली..!
तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा. आपल्या मित्र परिवारा सोबत शेअर करायला विसरु नका. अशाच नवनवीन कथा आम्ही तुमच्या पर्यन्त पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाइटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप ही जॉइन करा. धन्यवाद!
लेखिका – जिज्ञासा कुंदन म्हात्रे, मुंबई
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
hrudaysparshi