मराठी कथा – किंमत….!

WhatsApp Group Join Now

“उठा काकासाहेब, नाश्ता करायची वेळ झाली”. केअरटेकर् च्या आवाजाने  काकासाहेबांची शांतता भंग पावली.तशी झोप लागलीच नव्हती त्यांना, पण स्वतःच  स्वतःच्या शांततेत गुंग होऊन जाणे हे सवय चांगलीच की! काकासाहेब उठले आणि नेहमीच सस्मित आवाजाने म्हणाले,” काय मॅडम, काय म्हणताय”..तशी ती उत्तरली,” काही विशेष नाही पण आज तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे ,तुमच्या तब्येतीची बरीच रिकव्हरी झाल्याने तुम्हाला आज फिरता येईल ..पण जपून .! शरीराला त्रास होईल असं काहीही करायचं नाही ओके..”नर्स च्या शब्दांनी काका साहेबांना जरा प्रसन्न वाटलं.

Marathi Emotional Story

                       श्री. चिंतामणराव इनामदार हे शहरातील मोठ  प्रस्थ.पूर्वापार चालत आलेली प्रगतीशील शेती,त्या जोडीला त्यांनी स्वतः विकसित केलेले व्यवसाय,आयुष्यभर लागलेले समजूतदार पत्नी,पत्नीच्या मागे काळजी घेण्यास उच्चशिक्षित मुलगा आणि कर्तबगार सून  या गोष्टी त्यांची कीर्ती चिरंतन ठेवण्यास पुरेशा होत्या. मात्र पत्नीच्या मागे त्यांच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली होती त्याला मात्र कोणीही धक्का लावू शकले नाही. ती मात्र तशीच राहिली.तेव्हापासून त्यांना सर्वत्र तटस्थ वृत्तीचा प्रत्यय येत होता.लौकिक अर्थाने सर्व काही जवळ असणारे त्यांच्या आयुष्याला पूर्ततेचा भास देत होते.मात्र संवेदनशील मनाची सोबत,निर्व्याज करण्यातलं  आणि करून घेण्यातला निरागसपणा कोसो दूर गेला होता,त्यांच्या पत्नी सोबतच…!

             नाश्ता झाल्यानंतर ते दवाखान्याच्या परिसरातच पाय मोकळे करायला गेले.त्यांच्या मुलाचा दवाखाना असल्याने त्यांची उत्तम बडदास्त ठेवली होती.त्यांना कुठेही जाण्यास मज्जाव नव्हता. पण सर्वत्र त्याच त्याच परिचयाचा तोच आब…तीच व्यवहारी अदब… त्यांना आता नकोशी होती.त्यातच केवळ आपल्यासाठी कौतुकाचा निरामय संगतीचा भाव असावा अशी त्यांना वारंवार इच्छा होत होती..कदाचित सर्व कर्तव्यांची पुरती झाल्यावर पैलतीरा चे वेध लागल्यानंतर अशी भावना सतत आपल्याला येत असावी अशी स्वतःची समजूत घालत होते.थोडा वेळ  रिकाम्या लॉनवर फिरून एका अनामिक उत्सुकतेपोटी ते जनरल वॉर्डमध्ये शिरले.

वेगवेगळ्या आजाराने  त्रस्त आणि पुन्हा सुरळीत आयुष्य जगण्यच्या आशेने अनेक सामान्य माणसे या बोर्ड मध्ये असतात.पण सध्या फारशी गर्दी नव्हती.एखाद-दोन पेशंट असतील.त्यात ही सर्वात कडेच्या  एका पेशंटने त्यांचे लक्ष वेधून घेतले. साधारण त्यांच्याच वयाचे एक गृहस्थ बेडवर झोपले पडले होते.त्यांच्यासोबत एक महिला ही होती.कदाचित ती त्यांची पत्नी असावी.कारण पत्नी हे एकच नातं असं असू शकतं तिथे कोणत्याही परिस्थितीत परिस्थितीत जोडीदाराशी समर्पित भावाने जगू शकते ..नाही तर माणूस म्हणून काय कमी स्वैरपणा असतो का माणसांत….! कदाचित हि नियतीचीच सोय असावी.  या स्वैरपणाला तिचे प्रेमाचे बांध पुरेसे ठरतात. 

              “नमस्कार काका साहेब..! असे म्हणत तो पेशंट आदबीने उठून बसला तशी ती पत्नीही सावरून बसली. अगदी साधारण परिस्थितीतील ते जोडपं होतं. काकासाहेब या सर्व नावाने सर्वत्र परिचित असणारे आपल्याला हे जोडपे ही ओळखत याचं त्यांना आश्चर्य वाटलं.  तब्येतीची आणि कुटुंबाची प्राथमिक चौकशी झाल्यानंतर ते निघाले.

पण निघताना” काकासाहेब ,पुन्हा भेटूया “या वाक्याने ते आश्वस्त झाले . कारण उद्या भेटण्यासाठी ते त्यांना आमंत्रण अस वाटलं . ते पुन्हा दुसऱ्या दिवशी गेले .आता त्या पेशंटला बरीच तरतरी आली होती .समवयस्क असल्याने त्यांच्या चांगल्या गप्पा रंगल्या .मध्ये मध्ये त्यांची पत्नी सहभागी होत होती .थोडा वेळ झाल्या नंतर तिने विचारले, काका साहेब, तुम्हाला चालत असेल तर एक विचारू का?”

” विचारा की”

” तुम्हाला आवडत असेल तर नारळाची बर्फी खाणार का?”

काकासाहेब अगदी मनमोकळेपणाने हसले आणि म्हणाले,

“अहो द्या की मग..!”

त्या तिघांनीही मग बर्फीचा आस्वाद घेतला..शुभ्र ताज्या नारळाचा चव,बेतास साखर, आणि वेलची, जायफळाचा मंद सुगंध,…. वा!! अगदी जिभेवर विरघळणारी ती बर्फी अप्रतिम चवीची होती. “अगदी सुंदर..!”काकासाहेबांनी मनापासून दाद दिली तेव्हा तेव्हा ते जोडी चांगलीच खुलून आली आणि त्यांच्या सैलसर गप्पा चालू झाल्या.

“काकासाहेब मी सदानंद भोळे.इथेच शेजारच्या रविवार पेठेत राहतो .आयुष्यभर एका संस्थेत कारकुनी केली . पोटापुरतं मिळवलं .मुलगाही उच्चशिक्षित आहे  ,सध्या सरकारी नोकरी करतो . आता आणखीन काय हवे आपल्याला? थोडासा अशक्तपणा आला म्हणून सरळ दवाखान्यात..अहो, जरा घरच खाल्ले की होईन बरा. पण हे दोघे ऐकतच नाहीत . आता काय? पडून आहे दवाखान्यात…”

“हो,  सगळं  खरं  आहे.. पण म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण.. नको का काळजी घ्यायला.? आयुष्यभर काढलंच की निगुतीनं.  आता थोडा  विसावा घ्यावा आणि कौतुकही …” त्यांची पत्नी.

काकासाहेबांच्या मनात कालवाकालव झाली .ते कसनुसं हसले आणि म्हणाले,”अहो ,एवढी कौतुकाची माणसं आहेत… घ्यावं नशीबाच सुख भोगून… नाहीतर आमचं बघा सगळे सगळं करायला आहेत पण पगारावर… मनापासून घटकाभर जवळ बसून बोलायला कुणी नाही..अगदी पैशाचा ,व्यवहाराचा ,पैशांचा ,चुकांचा ,वागण्याचा हिशेब नाही….पण मनाच्या काही गाठीत अशाच असतात.. हो.. अगदी तळाशी दडवून ठेवलेल्या… त्या अशा आदबीने, तोऱ्याने नाही सुटत.. त्यासाठी.

या मनाचा त्या मनाला त्या  सूर लागावा लागतो …मग त्यात थोडे अपराधी भाव ,वैषम्य असले तरी सहज स्वीकारता येते.. तुमच्या घर नात्यांनी भरलं आहे ..त्याला अव्हेरू नका.. त्यांची मनं सांभाळा”. बोलताना काकासाहेब भावविवश झाले ..

ते पाहून सदानंद बावरले. म्हणाले,”काका साहेब, तुमच्या मनाला लागेल अशी मला शंका ही आली नाही .मी तुमच्या इतका उच्चभ्रू ,उच्चशिक्षित नाही ..पण केव्हा हे मन मोकळं करावसं वाटलं तर आमच्याकडे या . तुमच्या भावनांची गैर अदब होणार नाही याची हमी मी देतो..क सं आहे काकासाहेब पैसा, कीर्ती या सगळ्या गोष्टी ,त्यांची किंमत आयुष्य सुकर समृद्ध करण्यासाठी …पण मनाला, विचारांना समृद्ध करण्यासाठी जिव्हाळाच पेरावा लागतो . रुजवावा लागतो आणि वाढवावा सुद्धा लागतो. आयुष्यात ठराविक मर्यादेनंतर हजाराने मिळवले काय आणि लाखाने मिळेल काय .! सारख्या किमतीचे वाटतात.. पण आपल्यासाठी एखाद्या व्यक्तीचा  जीव फुलून यावा.. दोन अश्रू हक्काचे असावेत ,हीच कमाई आयुष्यभराच्या जगण्याची खोली ठरवते. त्याचा अर्थ जोपासते . तेव्हा मनात काहीही न ठेवता निःशंक पणे बोलत जा ..या भेटी अशाच होत नाहीत.. त्यासाठी काहीतरी दैवाची योजना असेलच की..!”

          काकासाहेब काही बोलले नाहीत पण त्यांचं मन शांत झालं होतं .त्या रात्री ते बरेच सावरले होते.. त्या रात्री ते बरेच सावरले होते .. समाधानी होते .. किती साधा माणूस पण आयुष्याचं सार कळलेला.. आपण नेहमी मध्यमवर्गीयांना नावं ठेवतो … मोठ्या प्रगतीची उर्मी नाही की पूर्वापार भावनांना सोडण्याचा व्यावहारिकपणा नाही.. पण त्याच मूल्यांवर जगताना किती कसोटी लागत असावी हे आज त्यांना उमगले होते… त्या क्षणी त्यांना त्यांच्या पत्नीची प्रकर्षाने जाणीव झाली . तिला जमलं हे सर्व जगायला.. कुठे कसं वागाव … रूबाब कुठे दाखवावा… आपला तोरा कुठे बाहेर ठेवावा… हे सारं तिने शिकून घेतलं तिच्या आयुष्यात… आपण मात्र आपलं सरंजामी वैभव सतत कुरवाळत बसलो..

त्यांची पत्नी शालिनीताई या नावाप्रमाणेच होत्या .त्या काळातील सामाजिक ,सांस्कृतिक परिस्थितीपेक्षा खूप शिकलेल्या. पदव्युत्तर पदवी धारण करणाऱ्या , पण घराच्या पारंपारिक वातावरणात अगदी चपखलपणे त्यांनी स्वतःला सामावून घेतलं होतं . नोकरांशी जशा आपुलकीने बोलायच्या तशाच घरातील मातब्बर मंडळींचे आदबीने वागणाऱ्या.! शिवाय स्वतःला नेहमी बदलणाऱ्या जगाशी अद्ययावत ठेवणाऱ्या.! 

        काका साहेबांचा आब  आयुष्यभर त्यांनी तसाच राखला . त्यांना कधी चुकूनही दुखावलं नाही . तरीही त्या ‘आपल्या ताटाखालचा मांजर आहेत’  असं कधीही काकासाहेब म्हणायला धजावले नाहीत. कारण त्यांच्या कामाचं वर्तुळच आणि जगणचं असं होतं की साऱ्यात असूनही  स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व त्या राखून होत्या. एवढा मोठा सरंजाम, गोतावळा  पण शालिनीताईंसारखी अदब त्यांच्या घरात क्वचितच एखाद्या स्त्रीला मिळाली असेल. आणि विशेष म्हणजे काका साहेबांना ही त्याचा सार्थ अभिमान आणि कौतुक होते. काका साहेबांचे वडील नानासाहेब यांच्या पथ्याच्या आहारात आणि आपल्या मुलांच्या हट्टी जेवणात त्यांची कधीही सरमिसळ झाली नाही. इतकं सारं काही जिथल्या तिथं. एवढे आखीव रेखीव आणि समृद्ध जीवन त्या जगल्या शालिनीताई !   शालिनीताई आणि त्यांच्यासोबत काकासाहेब..! 

            पण गेल्या दहा वर्षापासून काकासाहेब एकटेपणा सोसत जगत होते . आयुष्यभर शिस्तीत आणि उत्तम प्रकारे जीवन जगलेल्या काकासाहेबांच्या भौतिक आयुष्यात फारसा फरक पडला नाही. पण आत्मिक ,मानसिक सौख्य कुठेतरी दुरावले होते . कुटुंबाच्या आणि विशेषतः कामाच्या पलीकडेही एक निर्व्याज, साधे जग आहे हे त्यांच्या कल्पनेतही नव्हते . आयुष्याची ही बाजू कधीही त्यांच्यासमोर आले नव्हती. किंबहुना जाणीवपूर्वक शालिनीताईंनी ती त्यांच्या कानावर घातली नव्हती.

असं एकसुरी  आयुष्य पत्नीच्या पाठिंबावर तरुन  गेलं. पण आता एकाकी पण त्यावर मात करीत होते .यातून बाहेर कसं पडायचं, हे त्यांना कळत नव्हतं.  केवळ कुतूहला पोटी भेटलेल्या सदानंदांच्या  सहवासाने त्यांना बरीच तरतरी आली होती . आपणच यथार्थ, लौकिक आयुष्य  जगलो ,या भ्रमाला कुठेतरी धक्का लागला होता आणि त्या नवीन ओळख झालेला कुटुंबाला भेटण्याची त्यांना उत्सुकता लागली होती . सारे नियम, चौकटी, प्रतिष्ठा बाजूला ठेवून साधेपणाने जगू या असा विचार त्यांच्या मनाने केला.  आपण आयुष्यभर एक चौकट स्वतः भोवती आणि कुटुंबाभोवती आखून घेतली होती

. त्या चौकोनी जगापलीकडे कधी पाहीलचं नाही .. आता तरी ही नजर बदलायला हवी .. जड जाईल पण अशक्य मात्र नाही..   दुसऱ्या दिवशी अगदी. सहज जावे तसे ते जनरल वार्डात गेले… सदानंद त्यांची वाटच बघत बसले होते… त्यांनी काकासाहेबांचं अगदी मोकळेपणाने स्वागत केलं म्हणाले,” काकासाहेब, आम्ही तुमच्यासाठी एक भेट आणली आहे. आण गं इकड़े..”

काकासाहेब चमकले.  सदानंदांच्या पत्नीने एक डबा काढला.  म्हणाल्या,” प्रसादाचा शिरा करून आणलाय .  तुम्हांला आवडेल म्हणून.”

काकासाहेबांनी डबा घेतला.  अगदी सहजच त्यांनी एक चमचा शिरा तोंडात टाकला.  वा ! काय मस्त चव होती .  ! शांत तृप्त मनाने चव घेताना मुद्दाम कौतुक करणं त्यांना अरसिक पणाच वाटलं. अगदी लहान मुलासारखा त्यांनी  शिरा संपवला. त्यांच्या डोळ्यात एक तृप्त शांतता दाटून आली. 

” वा ! वहिनी ! अगदी अमृताची चव आहे तुमच्या हाताला..!”

सदानंद आणि त्यांच्या पत्नीला अगदी भरून आले . डबा ठेवण्याच्या निमित्ताने त्यांच्या पत्नीने लावलेला डोळ्यांना लावलेला पदर काकासाहेबांच्या डोळ्यांतून सुटला नाही.  सदानंदांच्या डोळ्यात दाटलेला सहृदयतेचा भाव त्यांना बरंच काही सांगून गेला. काही मोकळ्या गप्पानंतर सदानंद म्हणाले,

” काकासाहेब आज आम्ही जाणार पण कधी भेटावसं वाटलं तर अगदी हक्काने हाक मारा… आमच्या घरी ही तुमचं मनापासून स्वागत आहे…”

  काकासाहेबांना बोलणं जड़ .झालं . कसंबसं निरोपाच संभाषण संपवून ते निघाले. पण त्यांना एक अनामिक दिलासा मिळाला होता. कर्तबगारीच्या बेगडी दुनियेत, प्रतिष्ठेच्या खोटया जोखडापायी, आपल्या समोर नाही , पण माघारी तरी कुणाच्या डोळ्यात आपल्यासाठी दोन अश्रू असतील का..?ही शंका त्यांना अलीकडे सतत पोखरत असे.. पण आज़ सदानंद आणि त्यांच्या पत्नीच्या भरून आलेल्या डोळ्यांत त्यांनी आज ती अगम्य आपुलकी पाहिली. 

त्यांच्या मनात समाधानाची एक लकेर उमटली. फक्त त्यासाठी , त्या दोन थेंब अश्रूंसाठी ,त्यांना आपल्या  प्रतिष्ठेचं जोखड बाजूला ठेवून, श्रीमंतीचा आब दूर सारून, एका सामान्य कुटुंबात मिसळावं लागलं.  त्यांच्या प्रेमळ शिदोरीत आपला वाटा मिळवावा लागला. औपचारिकतेची सारी बंधनं झुगारून त्या जोडप्याकडे ओढीनं पावलं वळवावी लागली.  आणि अचानक त्यांच्या मनात एक विचार चमकून गेला….. दोन आपुलकीच्या अश्रुं पायी आपल्याला आयुष्यभराच्या रूबाबाचा नकळतपणे सौदा करावा  लागला. नियतीचा .. दैवाचा . व्यवहार ,व्यवहार म्हणतात… तो हाच का….???

नमस्कार..वाचक हो, कशी  वाटली तुम्हाला ही मराठी कथा .?अशाच नवनवीन कथा आणि लेखांसाठी आमच्या लेखक मित्र या वेबसाईटला भेट द्या आणि आपल्या अभिप्राय आवर्जून कळवा.!! 

 कृपया भेट द्या, शेअर करा, कमेंट करा.! 

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top