हृदयस्पर्शी कथा – मौनांतर l Marathi Emotional Story

WhatsApp Group Join Now

संपूर्ण चेहऱ्यावर लावलेला पांढरा पेंट..मुद्दाम लावलेली भडक लिपस्टिक..चेहऱ्यावर चितारलेल्या गोलाकार, डार्क भुवया. सगळंच दिखाऊ, बेगडी. मात्र त्या बाह्यरुपामागचा सच्चा कलाकार, सच्चा माणूस, समीर, आत्ता सादर होत असलेल्या मूकनाट्याचा नायक.

मौनांतर..शब्दांविना सादर होणारं नाटक; पण संवाद असण्याची गरजच काय होती? समीरच्या चेहऱ्यावरची प्रत्येक रेषन् रेष बोलत होती. चेहरा पूर्ण रंगवलेला असूनही त्याचा मुद्राभिनय, त्यातल्या छोट्यात-छोट्या आविष्कारासकट प्रेक्षकांपर्यंत अचूक पोहोचत होता. प्रेक्षक त्याच्या मूकाभिनयाशी इतके समरस झाले होते की, ते त्याच्या हसण्यामुळे आनंदी होत होते, त्याच्या दुःखाने पिळवटून निघत होते, त्याच्या संतापाची धग त्यांना जाणवत होती. तो संपूर्ण एक तास, समीर आणि प्रेक्षागृह तादाम्य पावलं होतं.

Marathi Emotional Story

विंगेत उभी असलेली त्याची सहकलाकार, स्वरा कौतुकभरल्या नजरेने समीरकडे पहात होती. खरंतर समीरला या ‘सुयश’ नाट्यसंस्थेत येऊन फक्त पाच-सहा महिने झाले होते; पण पहिल्या प्रयोगापासूनच्या त्याच्या बहारदार अभिनयामुळे त्याला कायमच लीड रोल मिळत होता. बाकीच्या सहकलाकारांना विशेष काही रोल नसायचाच. समीरपुढे सगळेच निष्प्रभ वाटायचे. त्यामुळे अर्थातच, समीरच्या आधीपासून त्या नाट्यसंस्थेत असलेली काही मंडळी त्याच्यावर अगदी खार खाऊन असायची; पण दिग्दर्शक आणि निर्माते मात्र समीरलाच पहिली पसंती देत असल्यामुळे बाकीच्या लोकांचे आवाज बंद व्हायचे.

‘सुयश’ या नाट्यसंस्थेचा सध्याचा जो तरुण दिग्दर्शक सुयश होता, त्याच्या वडिलांनी, ‘जयराज सरदेसाई’ यांनी या नाट्यसंस्थेची स्थापना केली होती. थोड्याच वर्षांत, दर्जेदार नाट्यप्रयोगांमुळे ही संस्था चांगलीच नावारुपास आली होती. समीर हा जयराज यांच्या मित्राचा मुलगा. कामाची दगदग झेपेनाशी झाल्यावर जयराजांनी सगळी सूत्रं सुयशच्या हातात सोपवली होती आणि तोसुध्दा आपल्या वडिलांइतकाच कर्तबगार होता. सुयश नाट्यसंस्था यशाची एक-एक शिखरं पादाक्रांत करत निघाली होती.

पाच-सहा महिन्यांपूर्वी सुयशच्या वडिलांनी, समीरला त्यांच्या संस्थेत काम देण्याची सूचना, सुयशला केली होती. ‘ही इज अ रिअल जेम. त्याच्या लहरीपणाकडे दुर्लक्ष कर.’ असं त्यांनी सुयशला बजावलं होतं.

समीर प्रचंड ताकदीचा कलाकार होता यात शंका नव्हतीच. थोड्याच दिवसांत, केवळ समीरच्या नावावर सगळे शोज् हाऊसफुल्ल जायला लागले होते. समीरच्या बाबतीत, फक्त एक खटकणारी गोष्ट म्हणजे त्याचा खरा चेहरा कधीच कोणी पाहिला नव्हता. तो कायम घरुनच फेसपेंट लावून यायचा. बाकीचा मेकअप इथे करायचा. सगळे त्याला यावरुन चिडवायचे; पण त्याने आपलं वागणं कधीच बदललं नाही. शेवटी, कलाकारांचा विक्षिप्तपणा म्हणून या गोष्टीकडे लोकं दुर्लक्ष करायला लागली होती. वडिलांच्या मित्राचा मुलगा असल्यामुळे सुयश त्याला ओळखत होता. क्वचित एखाद्या प्रसंगी भेट झाल्यावर बोलणंही झालं होतं; पण या संस्थेत आल्यापासून त्याच्यासमोरसुध्दा समीर चेहरा न रंगवता कधीच आला नाही.

देखणेपणात जमा होणारं व्यक्तिमत्व होतं समीरचं. त्याचे केस तर फारच लक्षवेधी होते. नुसतं पाहताना सुध्दा जाणवण्याएवढे मुलायम, दाट, किंचित पिंगट छटा असलेले केस तो वरचेवर विंचरुन त्याच्या वेगवेगळ्या स्टाईल्स करायचा. त्याचे केस आणि सहा फूट उंची, हीच त्याची ओळख बनली होती.स्वरा मनोमन समीरवर बेहद्द प्रेम करत होती.तिने ते कधी व्यक्त मात्र केलं नव्हतं.

आत्ता नाटक संपलं, पडदा पडला. समीर विंगेत आल्यावर स्वराने त्याच्या आजच्या कामाचं अगदी मनापासून कौतुक केलं. दोघंही बोलत-बोलत ग्रीनरुममध्ये आली. स्वरा त्याला म्हणाली, “समीर, आज परत खात्री पटली, तुला अभिनयाची खरंच दैवी देणगी मिळाली आहे. अभिनय करतो आहेस असं वाटतंच नाही रे, इतका उत्स्फूर्त आणि जिवंत अनुभव असतो तो.मी किती दिवस म्हणते आहे तुला, मलाही थोडे अभिनयाचे धडे दे.”

“स्वरा, तुला खरं सांगू का? असा शिकवून वगैरे अभिनय नाही येत. आपल्या अगदी मनाच्या गाभ्यापासून त्या भावना उमलून आल्या की आपोआप चेहऱ्यावर उमटतात. मग संवादांची पण गरज उरत नाही.”

“वा! तू बोलतोस पण किती सुंदर. समीर, का माहीत नाही; पण मला तुझ्याकडे बघून नेहमी असं वाटतं की, तुला कोणतीतरी वेदना, एखादं शल्य मनात सलतंय. जेव्हा अशी मनाला खुपणारी जखम असते ना, तेव्हाच असा महान कलाकार घडू शकतो. मला सांगण्यासारखं असेल तर सांग. बघ, हलकं वाटेल तुलाच.”

क्षणभर समीरच्या रंगवलेल्या चेहऱ्यावर फेरफार झाले. तो म्हणाला, “स्वरा, या आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये मी फक्त तुझ्याबरोबर मनमोकळेपणाने बोलतो. बाकीचे आहेत चांगले; पण जशी गरज पडेल तसा मुखवटा बदलणाऱ्यातले वाटतात. त्यामुळे मी सगळ्यांबरोबर कायम एक अंतर राखूनच असतो. काही असे अनुभव आलेत की, मन मोकळं करायलाच मन कचरतं. हळूहळू यातूनही बाहेर पडेन मी.”

“अजून एक सुचवायचं होतं, तुझं अभिनयक्षेत्र मूकनाट्यापुरतं सीमित का ठेवलं आहेस तू? अगदी सिनेमातसुध्दा तुला सहज संधी मिळेल. तुझं टॅलेंट वाया का घालवतो आहेस? अजून खूप पुढे जायचंय तुला, आणि माझी खात्री आहे, एक दिवस सर्वोच्च स्थानी तू नक्कीच असशील.”

समीर हसत म्हणाला, “तू माझी खूप चांगली आणि जवळची मैत्रीण आहेस म्हणून तुला तसं वाटतंय; पण या क्षेत्रात अजून कितीतरी गुणी आणि समर्थ कलाकार आहेत जे माझ्यापेक्षा सगळ्याच बाबतीत सरस आहेत.”

बोलता-बोलता तो आरशात बघून त्याचे केस विंचरु लागला. क्षणभर स्वराला मोह झाला, पुढे होऊन त्याचे केस विस्कटून टाकावेत, त्याच्या मिठीत शिरावं..पण त्याच्या मनाचा कल अजून तिला समजला नव्हता. शिवाय आत्ताच तो तिला चांगली मैत्रीण म्हणाला होता. त्यामुळे इतक्यात अशी घाई करणं योग्य ठरलं नसतं.

एक सुस्कारा सोडून स्वरा ग्रीनरुमच्या बाहेर पडली. ती आपल्याच विचारांत गर्क असल्याने तिला दुसऱ्या टोकाला उभा असलेला त्यांच्याच ग्रुपमधला राकेश, आणि त्याच्या चेहऱ्यावरचे विखारी भाव दिसले नाहीत. राकेशने या दोघांचं संभाषण ऐकलं होतं. स्वरा समीरवर प्रेम करते आहे हे त्याला अजिबात मान्य नव्हतं, कारण त्याचं स्वरावर खूप प्रेम होतं. त्याने ते कित्येकवेळा तिच्यासमोर व्यक्तही केलं होतं.

सुरुवातीला स्वराने त्याला होकार दिलेला नसला तरी स्पष्ट नकारही दिलेला नव्हता. त्यामुळे राकेश तिचा होकार गृहित धरुनच त्याप्रमाणे तिच्याशी वागायचा; पण समीर आल्यापासून सगळं चित्र बदललं होतं. आता स्वरा राकेशशी नीट बोलत नव्हती. तिचं त्याच्याशी वागणं एकदम तुटक झालं होतं. समीरबरोबर बोलताना, तिच्या नजरेत समीरविषयी असणारं प्रेम त्याला जाणवून त्याचा अगदी संताप व्हायचा. त्यातून समीर आल्यापासून पूर्वी त्याला बऱ्यापैकी मिळणारे लीड रोल आता बंद झाले होते; म्हणून तर समीरवर त्याचा दुप्पट राग होता.

आत्ता ग्रीनरुममध्ये दोघांना पाहून त्याचा पारा चढला होता. दिवसांगणिक स्वरा त्याच्यापासून दुरावत होती. या समीरचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा होता, त्याच्या मनात आलं.

पुढच्याच आठवड्यात मौनांतरचा पाचशेंवा प्रयोग होता. त्यासाठी अभिनयक्षेत्रातल्या अनेक दिग्गजांना आमंत्रण दिलं होतं. एकदम महत्त्वाकांक्षी नाट्यप्रवेश असणार होता तो. सगळेच खूप उत्सुक होते यासाठी. या प्रयोगानंतर, समीरबरोबरच बाकीच्यांनाही मोठा ब्रेक मिळण्याची दाट शक्यता होती. सगळे कसून तयारी करत होते. नाटकात काही अजून छान बदल केले होते, त्याचा सराव चालू होता. प्रयोग चार दिवसांवर आला असताना स्वरा तालमीसाठी सकाळी जरा लवकरच आली होती. तेव्हा तिने चढ्या आवाजात दोघांना बोलताना ऐकलं. त्यातला एक आवाज समीरचा होता. तिला जरा आश्चर्यच वाटलं. एवढया उच्च स्वरात तो कधीच बोलत नसे.

तिने ऑफिसमध्ये डोकावून पाहिलं तेव्हा समीर आणि या संस्थेचे निर्माते सोमण, दोघांच्यात काहीतरी वाद चालला होता. स्वराने जरा नीट कान देऊन ऐकल्यावर तिला समजलं की समीर, कलाकारांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा, त्यांची गैरसोय याविषयी बोलत होता. सोमणना वाटत होतं, तो मानधन कमी मिळतं त्याबद्दल तक्रार करतोय.

हळूहळू राकेश आणि बाकीची कलाकार मंडळी पण तिथे जमली. तेवढ्यात सुयश आला आणि त्याने समीरला काय झालं ते विचारलं.

समीर सांगायला लागला, “मी यांना कलाकार या भूमिकेतून मला इथे जाणवणारे, सहन करावे लागणारे प्रॉब्लेम्स सांगत होतो. यांना वाटलं, मी माझं मानधन वाढवून मागतोय.”

आता सोमण मध्येच बोलले, “सुयश, माझा इतक्या वर्षांचा अनुभव आहे, हे कलाकार, जेव्हा एखादा मोठा प्रयोग होणार असतो ना तेव्हाच बरोब्बर कुठलातरी प्रॉब्लेम घेऊन येतात. त्याच्याआड लपून स्वतःचं मानधन वाढवून मागतात. आपले हात त्यावेळेस दगडाखाली अडकलेले असतात. आपल्याला त्यांची मागणी मान्य करण्याशिवाय गत्यंतरच नसतं. त्याचा अचूक फायदा ही लोकं घेतात.”

“हे बघा, मला मानधन वाढवून घेण्यासाठी कुठल्याही गोष्टीच्या आड लपण्याची गरज नाही. मी जयराजकाकांना डायरेक्ट सांगू शकतो. सध्या आपल्या तालमी जास्त वेळ चालू आहेत. अश्यावेळी आम्हाला पुरेश्या सुविधा मिळाव्यात, इतकंच माझं म्हणणं आहे. रात्री उशिरापर्यंत तालमीसाठी थांबल्यावर लेडीजसाठी एखाद्या वाहनाची सोय करावी ही माझी मागणी होती. यात गैर काय आहे?”

आता राकेशला बोलायची संधीच चालून होती. तो म्हणाला, “अरे पण बाकी कोणालाच काही प्रॉब्लेम नाहीये. तू कशाला इतरांची वकिली करतोस? आत्ता प्रयोगावर फोकस करणं जास्त महत्त्वाचं आहे. ते सोडून तू भलत्याच विषयावर कसले वाद घालतो आहेस?”

आता मात्र स्वराला रहावेना. ती म्हणाली, “अगदी बरोबर बोलतोय समीर. आपल्या सर्वांना काम करताना, कुठलीही अडचण आली नाही की कामावरचा आपला फोकस आपोआपच वाढणार नाही का? सगळ्यांचं हित पहाणं हाच फक्त हेतू आहे त्याचा.”

सुयश सगळ्यांना थांबवत म्हणाला, “मला समीरचा मुद्दा समजला आणि पटलाही. मी माझ्या वडिलांचाच आदर्श कायम डोळ्यांपुढे ठेवलेला आहे. त्यामुळे आमच्या संस्थेत काम करणारे कलाकार आमच्यासाठी घरच्यासारखेच असतात. त्यांच्या कम्फर्टला प्राधान्य देणं ही आमची जबाबदारी आहे. खरंतर मी इकडे लक्ष द्यायला हवं होतं. समीर, थँक्यू यार! माझ्या जबाबदारीची जाणीव या आजच्या प्रसंगामुळे एकप्रकारे करुन दिलीस. नाट्यसंस्था चालवणं सोपी गोष्ट नाहीये. ओके! चला, आता तालीम सुरु करु. तुमच्या सुविधांकडे मी जातीने लक्ष देईन. त्वरित त्याची अंमलबजावणी पण होईल हा माझा शब्द.”

“थँक्यू सुयश! तुझ्यासारखे मालक असतील तर आम्ही सगळे जीव ओतून काम करुच आणि हा प्रयोग कमालीचा यशस्वी करु, हा आता माझा शब्द.”

पाचशेंवा प्रयोग तुफान यशस्वी झाला. समीरला तर लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. बऱ्याच दिग्गजांनी त्याची अगदी वारेमाप स्तुती केली. त्याला आणि इतर काही कलाकारांना वेगवेगळ्या ऑफर्स पण आल्या. सुयश नाट्यसंस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला.

अपेक्षेपेक्षा खूपच जास्ती प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला होता, त्यामुळे कलेक्शन पण मजबूत झालं होतं. ऑफिसमध्ये ती सगळी कॅश कपाटात बंद करुन ठेवत असताना सुयशच्या मनात आलं की, आता सगळ्यांचं मानधन वाढवलं पाहिजे.

उद्या सकाळी लवकर येऊन बँकेत ही कॅश ठेवायला तो स्वतः जाणार होता, कारण कॅश नेहमीपेक्षा फारच जास्ती होती. उद्या अर्थातच सगळ्यांना त्याने सुट्टी जाहीर केली होती.

दुसरा दिवस उजाडला होता. सुयशच्या सांगण्यावरुन, सुट्टी असूनही सगळे संस्थेच्या ऑफिसमध्ये जमले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता. कपाट उघडं होतं, आणि सगळी कॅश, कालच्या कलेक्शनसकट, गायब झाली होती. सुयश पुन्हा-पुन्हा सीसीटीव्हीचं फुटेज सर्वांसमोर प्ले करत होता. कोणाचाही विश्वास बसत नव्हता.

शेवटी सुयशने विचारलं, “समीर, याविषयी तुला काही सांगायचं आहे का? ती व्यक्ती मी नाही, हे मात्र कृपा करुन सांगू नकोस. तुझे केस आणि उंची या दोन्ही गोष्टी अगदी ओरडून सांगत आहेत की, तो फुटेजमधला तूच आहेस.”

“खरंच मी नाहीये तो. सुयश, मी अशी चो*री करीन असं वाटतं तुला?”

“वाटत नाही; पण डोळ्यांना जे दिसतंय ते कसं नाकारु मी? मुखवट्यामागचा चेहरा कितीही भयानक असू शकतो, याचा अनुभव आहे मला.”

राकेश मध्येच म्हणाला, “समीर, त्या दिवशी तुझा सोमणांबरोबर वाद झाला होता. त्याचा राग तुझ्या डोक्यात असणार आणि त्याच रागाच्या भरात तू हे कृत्य केलं असण्याची दाट शक्यता आहे.”

“हे बघ, उगाच वडाची साल पिंपळाला लावू नकोस. तो वाद तेव्हाच संपला होता. ते डोक्यात ठेवून चो*री करण्याएवढा मी पोरकट अजिबात नाही.

ज्या नाट्यसंस्थेचा मी आजन्म ऋणी राहीन, तिथेच असं निंदनीय वर्तन माझ्याकडून कधीच होणार नाही. फुटेजमध्ये, कपाट उघडून मी आतले पैसे घेतोय असं दिसत असलं तरी ते बिलकुल सत्य नाही. काल प्रयोग संपल्यावर मी स्वराला घरी सोडून माझ्या घरी गेलो आणि लगेचच झोपलो. गेले काही दिवस बऱ्याच उशीरापर्यंत आपली प्रॅक्टिस चालू होती. नीट झोप होत नव्हती, त्यामुळे काल अगदी निश्चिन्त झोप लागली होती. आमच्या गेटवरच्या गार्डला विचारुन तुम्ही वेळेची खात्री करुन घेऊ शकता.”

सुयश म्हणाला, “अरे, पण चेहरा पूर्ण दिसत नसला तरी केस, उंची, एकूण शरीरयष्टी या गोष्टींमुळे संशयाची सुई तुझ्याकडेच वळते आहे.”

तेवढ्यात स्वरा एकदम ओरडली, “थांबा, थांबा! सुयश सर, ते फुटेज परत प्ले करा प्लीज.”

पुन्हा एकदा सर्वांनी ती क्लिप पाहिली. स्वराने एका ठिकाणी ती क्लिप पॉझ करायला सांगितली, आणि ती अगदी उत्तेजित स्वरात म्हणाली, “समीर, तुझ्या निर्दोषत्त्वाचा पुरावा मिळाला. आता मी जे काही करणार आहे त्याबद्दल मला माफ कर, माझा नाईलाज आहे.”

असं म्हणून तिने तिचा रुमाल तिथल्या पाण्याच्या ग्लासमध्ये बुडवला, आणि कोणाला काही समजायच्या आत समीरजवळ जाऊन त्याच्या उजव्या गालावरचा पेंट पुसला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर संमिश्र भावना उमटल्या. समीरचा उजवा गाल पूर्णपणे होरपळलेला होता. सुयशला आश्चर्याचा धक्काच बसला होता.

“समीर.” एवढंच तो कसंबसं बोलू शकला.

स्वरा त्याला म्हणाली, “सर, हे पॉझ केलेलं रेकॉर्डिंग परत एकदा बघा. यातली जी व्यक्ती आहे, तिच्या चेहऱ्याची उजवी बाजू किंचित दिसते आहे. त्यावर असे भाज*ल्याचे किंवा जळ*ल्याचे डाग अजिबात नाहीयेत. म्हणजेच ती व्यक्ती समीर असूच शकत नाही.”

“येस! स्वरा, अगदी अचूक निरीक्षण आहे तुझं. ज्या कोणी हे केलंय त्याला समीरच्या भाजलेल्या चेहऱ्याविषयी काहीच माहिती नाही हे नक्की. समीरचे केस आणि उंची या त्याच्या आयकॉनिक गोष्टींचा उपयोग करुन कोणीतरी त्याला अडकवलंय; पण कोणी आणि का?”

समीर एकूणच या सगळया प्रकारामुळे भांबावला होता. आपण इतके दिवस जपलेलं गुपित अश्याप्रकारे लोकांसमोर येईल, ही त्याला अपेक्षाच नव्हती. स्वराला हे कसं आणि कधी समजलं? तरीही ती आपल्यावर प्रेम करते आहे? तिच्या नजरेतून ओसंडून वहाणारं प्रेम त्याच्या कधीच लक्षात आलं होतं; पण आधीची जखम इतकी ताजी असताना नव्याने पुन्हा त्याला गुंतायचं नव्हतं.

समीरच्या मनात विचारांचं काहूर माजलेलं असताना इकडे राकेश अगदी तावातावाने सुयशला विचारात होता, “असं कोणी कशाला समीरला अडकवेल? सगळी कॅश गायब आहे. समीरचा आणि सोमणांचा वाद झालेला आपण सगळ्यांनीच पाहिला आहे. तो राग त्याच्या मनात खदखदत नसेल कशावरुन? विद्रूप चेहरा जसा त्याने इतके महिने लपवला, तसा त्यामागचा खरा चेहरा पण लपवला. कदाचित तो योग्य संधीची वाट पहात असेल, आणि काल ती त्याला मिळाली.”

त्याला मध्येच थोपवत सुयशने समीरला विचारलं, “समीर, ही तुझ्या चेहऱ्याची अशी होरपळलेली बाजू.. कशामुळे आणि कधी झालं हे सगळं? मला अजिबातच कल्पना नव्हती याबद्दल.”

राकेश मध्येच बोलला, “बघ, किती महिने तू आम्हाला अंधारात ठेवलं आहेस ते. आता या चो*रीच्या बाबतीत कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावर?”

यावर समीर म्हणाला, “तुझ्यावर जसा विश्वास ठेवला आहे तसाच.”

“काय म्हणायचं आहे तुला? माझा काय संबंध?”

“माझा हा जळलेला चेहरा तुझीच तर मेहेरबानी आहे.”

“काय वेड-बिड लागलंय का तुला? मी तर याआधी तुला ओळखतंही नव्हतो.”

“प्रियाला तर ओळखत होतास.”

प्रियाचं नाव ऐकताच राकेशचा चेहरा पांढराफटक पडला. तरी वरकरणी तो उसळून म्हणाला, “कोण प्रिया? तू काय बोलतो आहेस ते तुला तरी कळतंय का?”

“प्रिया सबनीस. तुझ्याच कॉलेजमध्ये शिकणारी. जवळजवळ वर्षभर तू तिच्या मागे-मागे फिरत होतास. तिने स्पष्ट नकार देऊनही तू तिचा पिच्छा सोडत नव्हतास. तिचं लग्न ठरलं आहे हे कळल्यावरसुध्दा ती जिथे जाईल तिथे तिचा पाठलाग करतच होतास. सहा महिन्यांपूर्वी, रात्री आठच्या सुमारास ती तिच्या मित्राबरोबर बाहेरुन येत असताना, तू अचानक समोरुन आलास. तिचा मित्र गाडी स्टँडला लावेपर्यंत तुमची दोघांची काहीतरी बोलाचाली झाली, आणि काही कळायच्या आत तू ऍसिडची बाटली काढून तिच्या चेहऱ्यावर फेकणार एवढ्यात त्या मित्राने तुझा हात वरच्यावर पकडून ती बाटली खेचून घेतली आणि लगेच फोडली. त्या झटापटीत त्याच्या चेहऱ्यावर थोडंसं ऍसिड पडून त्याच्या चेहऱ्याची उजवी बाजू होरपळून गेली. ते बघून तू घाबरुन पळ काढलास.”

“म्हणजे प्रियाचा तो मित्र तू होतास?” आणि हे बोलल्यावर राकेशला एकदम जाणीव झाली, आपण असं बोलून एकप्रकारे आपला गु*न्हा कबूल केलाय; पण आता उपयोग नव्हता.

आता मात्र समीरने सगळं सांगायचं ठरवलं. आज इथे आल्यापासून पहिल्यांदाच त्याने चेहऱ्यावरचा पेंट पुसला. एकदम हलकं वाटलं त्याला. तो बोलायला लागला,

” प्रिया आणि मी आम्ही एकाच कॉलनीत रहात होतो. घरच्यांच्या संमतीने आमचं लग्नही ठरलं होतं. तिनेच मला राकेशबद्दल सांगितलं होतं. कॉलेजच्या शेवटच्या वर्षापासून तो तिला सतत प्रपोज करत होता. प्रियाला वाचवताना माझ्या चेहऱ्यावर ऍसिड पडून पूर्ण उजवी बाजू भाजून निघाली. डोळा थोडक्यात वाचला. त्या ऍसिडपेक्षा दाहक मला वाटलं ते प्रियाचं वागणं. तिने माझी दखल पण न घेता घाबरुन तिथून पळ काढला. ती दुसऱ्या कोणाला मदतीसाठी बोलवायला गेली असेल या आशेवर मी जरा वेळ वाट बघितली, मग सरळ हॉस्पिटलच्या नंबरवर मदत मागितली. तीन दिवस मी हॉस्पिटलमध्ये होतो; पण एकदाही प्रिया मला भेटायला आली नाही. आम्ही एकाच कॉलनीत रहात असल्यामुळे मी घरी आल्यावर त्याच संध्याकाळी तिच्या घरी गेलो. प्रिया घरात नव्हती, म्हणजे तसं मला तिच्या आईने सांगितलं. त्यांनी अगदी नाटकी हसून मग माझं स्वागत केलं. खूप काळजी वाटत असल्यासारखं भासवून माझी विचारपूस केली, प्रियाला वाचवल्याबद्दल आभार मानले. शेवटी, वरवर अगदी साखरपेरणी करत; पण मला स्वच्छ मेसेज दिला की, अश्या विद्रूप चेहऱ्याच्या माणसाबरोबर प्रिया आपलं पूर्ण आयुष्य नाही काढू शकणार. मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की, आता कॉस्मॅटिक सर्जरीच्या सहाय्याने चेहरा बराचसा पूर्ववत होऊ शकतो; पण त्या त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याचं माझ्या लक्षात आलं. डोक्यात एक सणक गेली. अश्या माणसांशी संबंध जोडला जाण्याअगोदरच तुटला याचं उलट खूप समाधानच वाटलं.

दोन दिवसांत माझ्या कामावर रुजू झालो. मार्केटिंग हेड म्हणून नुकतीच माझी नियुक्ती झाली होती. वेळेच्या आत टार्गेट पूर्ण करत असल्यामुळे आमचे डिपार्टमेंट हेड, राजाध्यक्ष माझ्यावर एकदम खूष होते. मी जॉईन झाल्या-झाल्या त्यांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं. अगदी आस्थेने चौकशी केली, कौतुक केलं. मग अगदी गोड शब्दांत सांगितलं, “सध्या तुला उगाच फिरतीचं काम देण्यापेक्षा, डेस्क जॉब कर. मग थोडे दिवसांनी बघू. उगाच तुला बघून लोकांच्या चांभारचौकश्या सुरु होणार, कंपनीच्या सेलवर त्याचा परिणाम होणार. त्यापेक्षा सध्या तू कस्टमरच्या नजरेस पडूच नकोस.”

हा घाव मात्र माझ्या अगदी वर्मी लागला. त्या एका प्रसंगामुळे, माझी कणभरही चूक नसताना इतकी उलथापालथ झाली होती की चांगुलपणावरचा विश्वास डळमळीत झाला.

प्रियाने पूर्वी मला सांगितलं होतं की, राकेश इथेच काम करतो. मग मी जयराजकाकांना येऊन भेटलो. ते राकेशला लगेच काढून टाकायला निघाले होते. त्यांनी पोलि*सांत जाण्याचा पण सल्ला दिला; पण मलाच ते करायचं नव्हतं. एकतर ते पु*रावा मागणार, म्हणजे प्रियाने येऊन तशी साक्ष द्यायला हवी. तिची कोणतीही मेहरबानी आता मला नको होती. राकेशला हळूहळू; पण पूर्णपणे नेस्तनाबूत करायचं हेच आता माझं ध्येय बनलं होतं. त्याचे लीड रोल्स मला मिळायला लागले होते. इथे तो स्वराच्या मागे लागला होता हे पाहून मी धास्तावलो होतो. त्याची तक्रार न करुन मी चूक तर केली नाही ना, अशी शंका मला यायला लागली.सुदैवाने अघटित काही झालं नाही; पण मी यावेळेस एकदम सतर्क होतो. या संपूर्ण प्रकाराबद्दल, गुप्तता पाळण्याचं वचन मी काकांकडून घेतलं होतं. आज मी जो उभा आहे तो केवळ आणि केवळ त्यांच्याचमुळे.”

हे सगळं बोलून झाल्यावर आता समीरचा चेहरा अगदी निवळलेला दिसत होता. या खुलाश्यानंतर सुयश राकेशवर इतका बरसला की घाबरुन त्याने, समीरला अडकवण्यासाठी चो*रीसुध्दा आपण केल्याचं कबूल केलं. समीरच्या केसांसारखा विग त्यासाठी त्याने वापरला होता, आणि पैसे एका मित्राकडे नेऊन ठेवले होते. आता त्याचं पुढचं भविष्य सांगायला ज्योतिषाची आवश्यकता नव्हती.

इकडे समीरने स्वराला विचारलं, “तुला हे कधी आणि कसं कळलं?”

“चार महिन्यांपूर्वी, एका प्रयोगानंतर ग्रीनरुममध्ये आल्यावर तू फेसपेंट थोडासा पुसला होतास. तेव्हा मी नेमकी तुला निरोप सांगायला आले होते. हे बघून तशीच उलटपावली निघून गेले. त्यानंतर मी बरेचदा तुला सांगितलं होतं की, काही शल्य असेल तर बोलून टाक; पण तू कधीच मन मोकळं केलं नाहीस.”

“इतके दिवस नाही केलं; पण आज मात्र मला खूप हलकं वाटतंय. मी ठरवलं होतं, माझ्या विद्रूप चेहऱ्यावर प्रेम करणारी कोणीतरी भेटेपर्यंत मी कॉस्मॅटिक सर्जरी नाही करुन घेणार; पण लवकरच ती करावी लागणार असं दिसतंय, हो ना स्वरा?”

सगळ्यांसमोर असं विचारल्यावर स्वरा काहीच बोलू शकली नाही, तिने फक्त लाजून मान खाली घातली. ही मौनाची भाषा समीरला कळणार नव्हती, तर कोणाला?

-समाप्त

तुम्हाला ही कथा Marathi Emotional Story कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरु नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WatsApp ग्रुपसुद्धा जॉईन करा.

धन्यवाद !

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)  

3 thoughts on “ हृदयस्पर्शी कथा – मौनांतर l Marathi Emotional Story”

  1. फारच छान हृदयस्पर्शी अशी ही कथा आहे. लेखिकेने अतिशय तन्मयतेने लिहिले असल्याचे जाणवते!! कथा जसं जशी पुढे सरकते तस् तशी आधिकाधिक् रंगत जाते, हेच तर त्यांचे श्रेय आहे!!!वाचकाला शेवटाची उत्कंठा लावून ठेवणं, कथा वाचनात गुंगवून ठेवणं ह्यातच त्यांचे यश आहे. अप्रतिम लेखन.🙏🙏 धन्यवाद.

  2. खूप सुरेख. तुमच्या विविध विषयावरच्या कथा वाचायला नक्कीच आवडतील.
    पुढच्या कथेच्या प्रतीक्षेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top