” गण्याने एम बी ए काय केलं हे s s s मुलींची लाईन लागलं दारा पुढं ! ” असं बापु म्हणत असतात बरं !आणि गण्याने एम बी ए केलं ..म्हणजे झालं एकदाचं आणि त्याला नोकरीही लागली मुंबईला. आता नोकरीवर रुजू होण्याआधी गण्याचे हात पिवळे करावे अस बापूला वाटू लागलं. एकटं पोरगं मुमई सारख्या शेरात कसं राहिलं? असा एक भाबडा प्रश्न बिचाऱ्यांना पडायचा. पण हाय रे नशीब गण्याचं! पण,पत्रिकाच जुळेना ! तसा गण्याला विशेष फरक पडत नव्हताच! कारण गण्याची वस्ती घरापेक्षा रस्त्यावर जास्त होती !
एक दिवशी आपला गण्या त्याच्या नेहमीच्या कार्यक्रमाला म्हणजे मुली पाहायला (रस्त्यावर हो ! ) गेला, चालता चालता मधेच गण्या न विसरता कबुतरासरखी मान वाकडी करून बघायचा आणि कोणी आपल्या ओळखीतील आजुबाजुला नाही ना ह्याची खात्री करून घ्यायचा. गण्यासाठी पोरी पटवणं आणि त्यांचा मार खाणं नेहमीचचं होतं, पण घरात मात्र गण्या म्हणजे सभ्य ह्या शब्दाला लाजवेल इतका सभ्य मुलगा बनून राहत होता.!
अजून तरी बापुचा शब्द त्याने खाली पडू दिला नव्हता, कारण.. बापूचा आदर! नाही नाही नाही! बापुचं ऐकलं नाही तर बापुची पायतान आणि गण्याची पाठ यांची भेट होण्याची शक्यता दाट होती. त्या दिवशीचा मुलींना दुरुन दुरून बघण्याचा कार्यक्रम उरकून गणोबा घरी आले. आणि..
” आलात चिरंजीव रस्त्यांचे माप घेऊन?” बापूचा खणखणीत आवाज आला .

” ते आईने अप्पाची कचोरी आणि काका हलवाईचा पेढा सांगितला होता.. आता मला जायचं तर तिची तीच सांगतेय, करतेय, मी नाही मागितलं, शप्पत!” गणू गरीब गाय !
हातपाय धुवून गण्या खाण्याच्या टेबलवर आला, बापुतर केंव्हाच हातपाय धुवून तयार होते गाण्याच्या मागे लागायला.
” ते तुमच्यासाठी एक स्थळ आलंय, पत्रिका ३६ गुण जुळलेली आहे, आम्ही होकार कळवला, तुम्हाला पोरगी पहायची असेल तर रविवारी वेळ काढा ” ” बापू कशाला इतकी घाई ? लग्न होईलच की ! पण त्या आधी थोड लाईफ ” गण्याच्या प्रश्नाला मधेच तोडत बापू गरजले !!!!
” कसलं लाईफ एंजॉय करायचं ते लग्नानंतर ! आता असेच लग्नाला डायरेक्ट उभे राहणार का मुलगी बघायची? हे ठरवा!”
बघितलं कसे टेरर आहे बापू! रस्ते मोजणे आणि दूरच्या नाक्यावर पोरींना बघत बसणे ह्यात दोन चार दिवस निघून गेले. रविवारी ठरल्याप्रमाणे गणू आणि बापू मुलीच्या घरी गेले.तिथे गेल्यावर कळलं जिला पाहायला आलो तिचं घरात नाही!
” ते पोरांच्या परीक्षा जवळ आल्या म्हणून जास्तीचे क्लास घ्यायला जावं लागलं मंजुला, येईलच इतक्यात” मंजुचे पप्पा जरा नरमाईने बोलले.
” बापू कशाला थांबायचं इथे? पोरगी फारच शहाणी दिसतेय ! बापू अपमान आहे तुमचा हा!” गण्या जरा बापूला कानात सांगुन निघून जायच्या प्रयत्नात होता.
बापूचे डोळे पाहून तोंड बंद करून बसला बिचारा. आता तर आपल्या सगळ्या मित्रांचा त्याला भयंकर राग येत होता. “एक कॉल, मिस्कॉल करायला सांगितला होता.निघालो असतो काम आहे सांगून पण नाही हे माझीच वाट लावणार” मनातल्या मनात गण्याची धुसफूस सुरूच होती.
” आली बघा आमची मंजु ” शांततेला भंग करत गण्याच्या मनसुब्यांवर पाणी टाकत पप्पा बोलले.गण्याची पाठ दाराकडे असल्याने त्याला मंजु दिसली नाही. दहा मिनिटांनी मंजु समोर आली.तिला पाहून गण्याचा आपसूक एक हात गालावर गेला. डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली. घसा कोरडा पडू लागला. पण त्याच्या ह्या अवस्थेकडे कोणाचेही लक्ष नव्हते.पप्पांनी मंजूच्या कौतुकाच्या दोन बादल्या ओतल्या तर बापूंनी गण्याच्या कौतुकाचा समुद्रच आणला. गण्या तोंड शिवून बसला आता ! प्रश्न उत्तराचा बापू आणि मंजु असा खेळ रंगला !
पप्पा शेवटी बोलले ” मुलाला एकट्यात भेटायचं तर भेटू द्या !”
गण्याला तर त्यांचे पाय धरावे वाटले. ” काय करायचं ? झालं की विचारून इथेच !” बापू
” बापू ते नाराज होतील ना! ” गण्या मोठ्याने बोलला म्हणजे पचकला! नाईलाजाने डोळे मोठे करत बापूने दिली परवानगी.
“हं, लवकर यायचं बघा” गण्याला जाताजाता बापूने चिमटा काढलाच ! रूम मध्ये आल्यावर समोरचा नजारा असा होता..मंजु कंबरेवर हात ठेवून उभी आहे..तिच्या समोर गण्या लोटांगण घालून हात जोडून पडलेला!
” हे बघा तुम्ही माझ्या बापूला काही सांगु नका! मी नकार देतो तुम्हाला म्हणजे तुमच्यावर काही येणार नाही! फक्त आता काहीच बोलू नका बापू समोर ! “
परवाच मंजूने ह्या मजनुच्या गालावर हाताची निशाणी दिली होती. बापू समोर साळसूद असणारा गणू आता मंजुने सांगितलं तर बापू कुठे कुठे सुजवतील ह्या विचाराने गर्भगळीत झाला होता. म्हणून मंजुसमोर हे लोटांगण !
” काही गरज नाही नकार देण्याची ! फक्त मी सांगेन तस वागायचं ” मंजु
” तुम्ही म्हणत असाल तर गावातील सगळ्या मुलींकडून राखीही बांधून घेईल हो ! फक्त ही वेळ तेवढी सांभाळा” गण्याच्या बोलण्यावर मंजु फक्त गूढ हसत होती.
लग्न ठरल्यातच जमा होते. मंजुने एक दिवस गण्याला फोन करून भेटायचं सांगितलं. बाप रे! गण्या तर धक्क्यातच गेला की! असं काही होईल ही कल्पना ही केली नव्हती त्याने. अगदी मस्त तयार होऊन गण्या ठरलेल्या वेळी तिला घ्यायला तिच्या घरी पोचला. गाडीवर गण्या मनातल्या मनात भयंकर खुश होत होता. ‘मी एक फुल मागितलं तर पूर्ण गुलाबाच झाडच मिळालं ‘ मनातले मनात मांडे खात मजेत ठरलेल्या ठिकाणी पोचले दोघे. मंजु गाडीवरून उतरून पळत थेट त्या गावाबाहेरच्या मंदिराच्या मागच्या बाजूला गेली. गण्या ही तिच्या मागे आनंदात उड्या मारत गेला. समोरच दृश्य पाहून क्षणात गण्याच्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले.
मंजु दुसऱ्या मुलाच्या मिठीत होती.
तो जो कोणी होता त्याने मंजुला दूर करत गण्याकडे इशारा केला. ” गणू हा माझा बॉयफ्रेंड मण्या! तु मला आता ह्याला भेटायला घेऊन यायचं म्हणजे एक्स्ट्रा क्लासच खोटं बोलण्याची मला गरज नाही पडणार !” मंजु
” अगं मग घरी सांग ना ह्याच्या बद्दल ” कसबस स्वतःला सावरत गण्या इतकंच बोलू शकला. ” पत्रिका जुळत नाही! तुझ्या बरोबर छत्तीस गुण जुळले ना!” मंजु.
” अगं पण हा ?”
” मग माझं काय?” गण्याला आता बापूचा चेहेरा आठवूनच घाम यायला लागला.
” पुढचं पुढे बघु!” मंजु.
” असं कसं पुढचं पुढे? ए मन्या फण्या बोल की काय तरी?” गण्याचे पेशंस संपत आले.
” हे बघा गण्या भाऊ!” मन्या
” भाऊ ? कोण मी?!” तोंडाचा आ करत गण्या
” हे बघा गण्या भाऊ थोडं सबुरीने घ्या!” हा मन्या इतका गोड का बोलतोय हेच गण्याला कळत नव्हतं.
” ए गण्या, हे बघ तु रस्त्यावर उभा राहून पोरींना छेडत असतो हे तुझ्या बापूंना कळलं तर तुला बिना कपड्यांचा घराबाहेर काढतील, तेंव्हा गपगुमान चाललं तसं चालू दे, काय? समजलं नं?” मंजु न तर गण्याची बोलतीच बंद केली. आता ह्या प्रेमाच्या त्रिकोणातील एक बिनकामाचा कोण गुलमोहराच्या झाडा खाली बसून पडणारी फुलं बघत बाहेर लक्ष ठेऊन होता तर आतमध्ये दोघं प्रेमी गुजगोष्टी करत होते. आता मंजु ने भेटायला बोलवलं की गण्याला समजून जायचं की तिला मन्याला भेटायचं आहे.
आता गण्याचे बापू आणि मंजुचे पप्पा यांना ह्या भेटीगाठीचा राग येऊ लागला..शेवटी प्रश्न समाजाचा होता! काय म्हणतील चार लोकं असा विचार करून पुन्हा एकदा बैठक ठरली पण ह्या वेळेस गण्याच्या घरी! आता सुपारी फोडून तारीख आणि मुहूर्त काढायचा बाकी होता फक्त! इतक्यात दारात एक भगवी वस्त्रे परिधान केलेला पांढऱ्या दाढीचा बाबा अचानक हजर झाला. ” अहाहा! काय थोर भाग्य घराचे! ह्या संत्याचे म्हणजे संताचे पाय आपल्या घराला लागले” गण्याने पुढे होत त्या बाबाचे पाय धरले.
” या बसा ना बाबा! कोण आपण कुठून आलात” बापुही पुढे आले.
” आम्ही हिमालयातून तप करून आलो आहोत..इथे आज शुभघटिका आहे ह्या बालकाचं लग्न ठरल्याचे आम्हाला ज्ञात होत आहे ” बाबा हिमालय!
” हो बाबा, ही तर कमालच आहे, आत या बसा!” बापू बोलले आणि आत वळत “जरा च्या पाण्याची व्यवस्था बघा”
ज्याला हा निरोप कळायचं त्यांना बरोबर कळला!इकडे हिमालय बाबांनी मुलाची आणि मुलीची म्हणजेच गण्या आणि मंजुची पत्रिका हातात घेतली..बघता बघता बाबा अती गंभीर झाले, हातावर आकडे मोड सुरू होती..बसलेल्या सगळ्यांच्या चेहेऱ्यावर वाचता येणारी भिती होती!शांतता, स्तब्धता तोडत बाबा गरजले,” हे लग्न झालं तर मोठा अनर्थ होईल..नवरीचा नवरदेव लग्न झाल्या नंतर मृत्यू पावेल. बेटा गणेश तुमचे काही इच्छापत्र असेल तर सांगून ठेवा सगळ्यांना!..सध्या इतकंच!” म्हणत ते उठले आणि थेट गावा बाहेरच्या मंदिरात आडोश्याला जाऊन थांबले.
” अहो मी ह्या लग्नाला तयार नाही!” आतून एक मुसमुसत आवाज आला.
” आम्हाला माफ करा पण गण्याच लग्न आम्ही तुमच्या मुली सोबत करू शकत नाही” बापू बोलले शेवटी.
” बापू एक मिनिट ! मी काही बोलू?” गण्याने मधेच तोंड घातलं…
” मी काय म्हणतो आपण ना एक सुवर्ण मध्य काढुया!” गण्या
” म्हणजे?” पप्पा.
” मला मंजुसोबत लग्न करायचं आहे पण तिच्या सोबत जगायचं देखील आहे! त्या साठी आपण एक काम करूया..मंजुच लग्न हे दुसऱ्या कोणासोबत लावून देऊ आणि त्याच्या मृत्यू नंतर मी मंजुसोबत लग्न करेल!” गण्या.
” पण हे माहीत झाल्यावर कोण करणार तिच्या सोबत लग्न ?” चिडून पप्पा चिडून बोलले !
” पप्पा मन्या करेल! तसाही तो नास्तिक आहे आणि काही मन्याला झालंच तर गण्या कराल ना तुम्ही माझ्याशी लग्न?” भोळी भाबडी मंजु.
हो, नाही करता करता सगळे मंजु आणि मन्या उर्फ मनोजच्या लग्नाला तयार झाले.. दुःखी मनाने गण्या घराबाहेर पडला. मागे पुढे पाहत गण्या पडक्या वाड्यात घुसला.काही वेळात खांद्यावर शबनम सांभाळत लगबगीने एक इसम एस टी ने दूरच्या प्रवासाला निघाला!तर गण्याने येताना मुंबईची तिकीट काढून आणली!
अश्या प्रकारे एका प्रेमाच्या त्रिकोणाच्या कथेचा द एंड झाला.
लेखिका – रश्मी शशांक बंगाळे (अश्मी)
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. लेखिकेने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखिकेच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
छान👌👌