धमाल मराठी विनोदी कथा-इंटरनेटची ऐशी की तैशीl Marathi Funny Story 2024

WhatsApp Group Join Now

  निका आज जाम वैतागली होती. आधीच दोन दिवसांपासून इंटरनेट बंद होते आणि आता सुरू झाले आहे तर सगळ्या घरादाराच्या नजरा जणू तिच्यावरच रोखलेल्या.वैतागेल नाहीतर काय करेल बिचारी!!

     त्याचं झालं असं….की परवा दिवशी कोणीतरी काहीतरी आक्षेपार्ह मजकूर आणि फोटो स्टेटसला लावला आणि धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने दोन भिन्नधर्मीय समाजामध्ये तेढ निर्माण झाली. काही संघटनांनी एकत्र येत बंद पुकारला आणि आंदोलन देखील केले. त्यावेळी पोलीस प्रशासन आणि आंदोलक यामध्ये वाद होऊन आंदोलनाला हिंसक वळण लागले.समाज माध्यमांमधून आणखी काही अफवा पसरू नयेत तसेच परिस्थिती लवकर नियंत्रणात यावी यासाठी संपूर्ण शहारातील इंटरनेट जवळपास तीस तासांसाठी पूर्वसूचना देऊन बंद ठेवण्यात आले. स्मार्ट फोन आणि सोशल मिडिया यांना सरावलेल्या सगळ्यांसाठी एवढा वेळ नेट बंद हा फार मोठा मानसिक धक्का होता.

      त्यादिवशी संध्याकाळी नेट बंद झाले. नेमकी त्याच दिवशी सानिकाच्या घरची रात्रीची जेवणं लवकर आवरली. कदाचित नेट बंद असल्याने एका हाकेत मुलं आणि त्यांचे बाबा जेवणासाठी टेबलवर हजर झाल्याने जेवणाचा सोहळा वेळेत पार पडला असावा.असो….

मात्र खरी गंमत तर जेवणानंतरच होती. जेवण झाल्यानंतर झोप येईपर्यंत फक्त यु ट्यूब बघण्याची आणि उगाच व्हाट्सएपवर वेळ घालवण्याची सवय असणाऱ्या सानिकाच्या नवऱ्याला आता करायचे तरी काय असा गहन प्रश्न पडला. त्यात आज जेवणही लवकर झाले होते. हल्ली या स्मार्ट फोनमुळे झोपेची वेळ बऱ्यापैकी पुढे गेली आहे मग इतक्या लवकर झोप तरी कशी येणार?

      खरे तर घरात सगळ्यांचीच परिस्थिती सारखीच झाली होती. सारखी खाली मान घालून फोनमध्ये रमलेली सगळी मंडळी नक्की काय करावे हे न कळून अस्वस्थ झाली होती. बघू लवकर झोप लागते का असा विचार करत सानिका झोपायला गेली. संध्याकाळपासून मोबाइलचे ब्लु रेज डोळ्यावर न पडल्याने असेल पण तिला लवकर झोप लागली. अर्थातच त्यामुळे सकाळी लवकर जाग आली. सकाळी डोळे उघडले की सर्वप्रथम हातात फोन घेऊन गुड मॉर्निंगचे मेसेज बघण्याची इतक्या वर्षांची सवय त्यामुळे नकळत हात फोनकडे गेला आणि आठवले…..अरे आज इंटरनेट बंद आहे.

      ती अंथरुणातून उठली आणि आवरून मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडून घराजवळच्या  गार्डनमध्ये आली. सकाळची प्रसन्न हवा,बागेत अनेक लोक काहीना काही व्यायाम करताना तिला दिसले. कोणी वॉकिंग ट्रॅकवर चालत होते तर कोणी पळत होते. प्रत्येकाची चालण्याची पद्धत वेगळी आणि गती देखील. हे सगळे  बघताना तिला गंमत वाटली. तिचा वॉकिंगचा पहिलाच दिवस असल्याने तिचा चालण्याचा स्पीड इतरांपेक्षा फारच कमी होता. बागेच्या एका कोपऱ्यात काही जेष्ठ नागरिकांचा हास्य क्लब भरला होता. त्यांचे ते हास्य प्रकार बघताना सानिकालाच प्रचंड हसू येत होते. तिला वाटले काय गरज आहे त्या ग्रुपमध्ये सामील होण्याची? लांबून बघताना सुद्धा किती हसायला येतंय.

       एका बाजूला काही स्त्रिया एकत्र येऊन योगा करत होत्या तर कोणी प्राणायाम. स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या मंडळींची मांदियाळीच जणू बागेत जमली होती. आपण मात्र या सगळ्यात अगदीच नवखे आहोत असे तिला वाटले. ट्रॅकवर दोन चार राउंड मारून झाल्यावर ती बागेतल्या बाकावर बसली. समोरच ओपन जिमवर काही लोक व्यायाम करत होते. शेजारी वाळूत लहान मुलं खेळत होती. खरंच आज दिवसाची सुरुवात प्रसन्न झाली असे तिला वाटले. पण याचे सगळे श्रेय त्या इंटरनेट बंदला द्यायला ती विसरली नाही. ते बंद पडले नसते तर ती रात्री उशिरापर्यंत काहीबाही बघत जागत राहिली असती आणि सकाळी उशिरा उठून लगेच कामाला लागली असती.

       ती घरी आली तर नवरा चक्क प्राणायाम करताना दिसला.तिने मनात त्या बंद असलेल्या इंटरनेटचे आभार मानले. थोडा वेळ बसून मग कामाला लागू असा विचार करत तिने सवयीने फोन हातात घेतला आणि आठवला तो ‘बंद’.कामात असू दे नाहीतर निवांत….वरचेवर उगाच व्हाट्सएप,फेसबुक बघायची एवढी सवय झालीये त्यामुळे आज काहीतरी चुकतंय असे वाटून ती उठली आणि कामाला लागली. आज स्वयंपाक करताना तिचे जराही लक्ष विचलित झाले नाही. ना कोणाचा मेसेज ना कसले स्टेटस.रोज ब्रेकफास्ट करताना व्हाट्सएपवरचे मेसेज तोंडी लावणारा नवरा आज मन लावून पोहे खाताना बघून तिला छान वाटले. कितीतरी दिवसांनी गप्पा मारत नाश्ता झाला. सकाळपासून फोनचा व्यत्यय नसल्याने काम जरा लवकरच आवरले. नवऱ्याला डबा भरून दिला तर ऑफिसला जाताना विचारतो कसा,”मग आता तू दिवसभर काय करणार?”……”म्हणजे?”…इति सानिका. तर म्हणतो कसा,”अगं, म्हणजे आज मध्यरात्रीपर्यंत इंटरनेट बंद आहे ना.”

तिने न बोलता एक जळजळीत कटाक्ष त्याच्याकडे टाकला तसा तो हसत हसत निघून गेला.

          मुलगी तिचे आवरून ऑफिसचे काम सुरू करता करता सहज म्हणाली,”मग काय मातोश्री,आज काय करणार?” सानिकाच्या मनात आले,अरेच्या आज काय विशेष आहे की सगळे मला असे विचारतायेत.ती लेकीला म्हणाली,”का ग? आज काही आहे का?” तर लेक म्हणते कशी,”आई,अगं आज इंटरनेट बंद आहे ना,मग तू तुझी काम अवरल्यावर करणार तरी काय?”  आपली ही आयटीत काम करणारी लेक आईशी जरा जास्तच ऐटीत बोलतीये असं सानिकाला वाटलं.

      कोविडनंतर गेली दोन वर्षे वर्क फ्रॉम होम करणाऱ्या या कार्टीला आपण चहा,नाश्ता पासून दिवसभर सगळं आयत हातात देतो,स्वयंपाक कसा करतात हे तिला माहिती नाही आणि आपली आई काम झाल्यावर व्हाट्सएप,फेसबुक बघत बसते हे मात्र तिला पक्के माहिती आहे, या विचाराने ती लेकीवर मनातल्या मनात प्रचंड चिडली. तरीही बोलण्यावर जमेल तेवढा संयम ठेवत ती म्हणाली,”एक दिवस फक्त सोशल मीडियावरच वेळ घालवते म्हणजे घरात किती काम असतं ते कळेल तुम्हा सगळ्यांना.”

       ही घरची मंडळी बघेल तेव्हा हातात फोन घेऊन बसतात तेव्हा ते काम करत असतात म्हणे आणि आपण जरा थोडा वेळ फोनला हात लावला तर आपल्याकडे असे काही बघतात की मनात अपराधी भाव आल्याशिवाय रहात नाही हा तिचा नेहमीचा अनुभव.

      शेवटी वैतागून तिने पेपर वाचायला घेतला कारण टीव्हीवरच्या त्या सासू सुनांच्या मालिका बघण्यात तिला कधीच काडीचाही रस नव्हता. रिकाम्या वेळात जे काही बघायचे ते यु ट्यूबवर असेच हल्ली सुरू होते. पेपर वाचत असतानाच बेल वाजली. “आलं वादळ”…असे म्हणत तिने दार उघडले. अपेक्षेप्रमाणे घरकामाला येणारी मुलगी आली होती. सानिकाला पेपर वाचताना बघून सरळ म्हणाली,”अरे वा…वहिनी,आज पेपर वाचताय वाटतं.” आधीच सकाळपासून सगळ्यांचे ऐकून वैतागलेली ती चिडून म्हणाली,”मग….मी काय करावं असं तुझं म्हणणं आहे?” सानिकाचा हा पवित्रा तिला अनपेक्षित होता त्यामुळे ती थोडी गडबडली आणि म्हणाली,”नाही… म्हणजे रोज मी येते तेव्हा तुम्ही फोनवर सारखं काहीतरी बघत बसलेल्या असता ना….आज ते इंटरनेट बंद आहे ना,म्हणून विचारले.”आता मात्र हद्द झाली, काय पण लोकांचे एक एक समज असतात. तरीही शक्य तेवढ्या शांतपणे सानिका तिला म्हणाली,”अगं राणी,तू रोज कामाला आमच्याकडे येईपर्यंत बारा वाजत आलेले असतात. तोपर्यंत माझी सकाळपासून सुरु असलेली कामाची गडबड संपून मी थोडी निवांत झालेली असते गं. त्यामुळे तुला तसे वाटत असेल. आणि काय गं,तू बेल वाजवल्यावर मी जेव्हा दार उघडते तेव्हा कायम तू खाली मान घालून त्या तुझ्या फोनमध्ये बघतच तर घरात प्रवेश करतेस ना. नक्की दार कोण उघडते….दादा की वहिनी की आणखी कोणी हे देखील तुला कळत नसेल आणि तू मला इंटरनेट बद्दल विचारतेस?” एका दमात तिला फैलावर घेतल्यावर सानिकाला जरा बरे वाटले. वहिनींचा मूड बघून बिचारीने रोजच्यापेक्षा आणखी वेगात काम आवरले आणि वादळ गेलं देखील.

          दुपारी जेवण झाल्यावर कितीतरी दिवसांनी सानिकाने कपाटातून पुस्तकं बाहेर काढली. हल्ली या मोबाईलमुळे वाचन फारच कमी झालंय हे तिलादेखील मान्य होतेच. थोडंफार वाचन,थोडी झोप झाली तरी अजून चहाची वेळ झालीच नाही. रोज दुपारी यु ट्युबवरचे व्हिडीओ बघण्यात दुपार कधी संपून जाते कळत देखील नाही. आज सानिकाचा चहा जरा लवकरच झाला. आहेच वेळ तर काही जादाची कामं करून घेऊ असा विचार करत तिने  लहान मोठी कितीतरी कामं केली. मोबाईल नाही निदान टीव्हीवर बातम्या तरी बघू असा विचार करत रिमोट हातात घेतला तर नवऱ्याचा फोन आला आणि विचारतो कसा,”काय मग,करमतय ना…काय केलं दुपारभर?” सानिकाच्या बाजूने फक्त शांतता.’समझनेवाले को इशारा काफी है’…..पलीकडून फोन ठेवला गेला.

         संध्याकाळचे आठ वाजत आले होते. रात्री बारानंतर नेट सुरू होणार होते. दिवसभर घराबाहेर असणारी कामकरी मंडळी घरी परतली होती. गेल्या चोवीस तासात बंद असणाऱ्या नेटला आता सगळे थोडे सरावले होते. सानिकाने न राहवून नवऱ्याला बोलून घेतलेच…..”मी नेटवर करते तो टाईमपास आणि तुम्ही सगळे करता ते काम…हे बरंय. आज अगदी कामवालीपर्यंत सगळ्यांनी मला बोलून घेतलं. दिवसभर मी केलेलं काम तुम्हाला दिसतं नाही पण मी फोन हातात घेतलेला तेवढा दिसतो.” तिला आणखी खूप काही बोलायचे होते पण तेवढ्यात तिचा फोन वाजला. भावाचा फोन आला होता. आंदोलन,मोर्चा,परिस्थिती नियंत्रणात आली का? असं बरंच काही विचारत होता. भाऊजींशी पण बोलतो म्हणाला म्हणून सानिकाने स्पीकर फोन सुरू केला. बाकी सगळे बोलून झाल्यावर शेवटी फोन ठेवताना म्हणाला,’काय मग तायडे,इंटरनेट बंद होतं तर दिवसभर काय केलंस?”

     त्याचं बोलणं नवरा आणि तिची लेक ऐकत होते. याच विषयावरून मघाशी तावातावाने बोलणारी आपली बायको भावाच्या प्रश्नाने गप्पगार झालीये हे ओळखून नवरा मनातल्या मनात जास्तीच खुश झाला असणार. कारण लेकीबरोबर त्याने केलेल्या नेत्रपल्लवीतूनच सानिकाला ते समजले होते. शेवटी न राहवून तो लेकीला म्हणालाच,”बरं झालं,आपण बोललो की काही लोकांच्या मनाला लागतं पण माहेरच्या माणसांनी बोललेलं गोड वाटतं”.

      सानिका शांतपणे ऐकत राहिली आणि मनात म्हणाली….”इंटरनेटची ऐशी की तैशी”.

तुम्हाला ही Marathi Funny Story कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.
      धन्यवाद !

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)

8 thoughts on “धमाल मराठी विनोदी कथा-इंटरनेटची ऐशी की तैशीl Marathi Funny Story 2024”

  1. छान कथा. योग्य विषय घेतलात. आजच्या काळात नकळतपणे आपण सर्वात जास्ती वेळ हा फोनलाच देतो; हे एक वैश्विक सत्य आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top