आज शाळेचा माजी विद्यार्थी संमेलन सोहळा होता. सगळे आजी आजोबा बसलेले होते. अतिशय प्रसन्न वातावरण होते. जुन्या आठवणींना उजाळा देत सर्व जण किती प्रसन्न दिसत होते.
औपचारिकता म्हणून स्टेजवर प्रमुख पाहुणे, भाषणे, सत्कार वगैरे आटोपून सर्व जण जेवणाचा आस्वाद घेत खूप वर्षांनंतर आपल्या मित्रांसमवेत एकत्र आल्याचा आनंद अनुभवत होते. शाळेतल्या डब्बा पार्टीच्या आठवणी काढत होते. मधल्या सुट्टीतल्या गमती आठवत एकमेकांची टिंगल करत होते. आपल्या जुनियर सिन्सियर ना शोधून त्यात आपलं कुणी हळवी आठवण, पहिल प्रेम यांच्या भेटीचे कार्यक्रम सुरु होते.
त्यानंतर मग सगळे आपआपल्या वर्गात गेले. छाया, नामदेव, छगन, बबन, सुमन, पांडुरंग सगळेच थोडेफार भावुक झाले होते. चेहर्यावर आनंद आणि भावुकता असे संमिश्र भाव होते.
मैत्रिणी तर भावनावेगाने एकमेकींच्या गळ्यात पडून चक्क रडल्या. बबनला आज पाटील मास्तरांची फार आठवण येत होती. त्याच्या मते मास्तरांचं वय आता बरंच असेल आपणच तर साठी ओलांडून आलोय. ते आज भेटतील अशी आशा होती त्याला. त्यांच काही बरं वाईट ? असा विचार करून तो गप्प बसला. कोणाला तरी त्यांच्याबद्दल विचाराव अशा विचारात असतानाच मागून एक जोरदार धपाटा त्याच्या पाठीत बसला.
” काय रे माकडा ? अजून पण तसाच आहेस का खोडील ? की अक्कल आली आहे केस पिकता पिकता ? हा हा हा ! मास्तर मोठ्याने हसले. ‘माकड’ हे मास्तरांचा त्याच्या मते उत्क्रांत न झालेल्या मानवासाठी योग्य शब्द होता. बबन आतून खुश झाला. आज इतक्या वर्षानी का होइना त्याला स्वतःची बाजू मांडायची होती. त्याला काही गोष्टीं स्पष्ट करायच्या होत्या. तो काही बोलणार इतक्यात ते पुढे निघून गेले.
‘ माझ जे कानफाट्या नाव पडलं आणि मी कसा अगदी वाईट मुलगा म्हणून तुमच्या मनातून उतरलो; पण खरं तर हे होतं की मला कधी स्पष्टीकरण देऊन हे नीट तुमच्यापर्यंत पोहचवता आलं नाही. ही संधी मला आता गमवून चालणार नाही.’
बबन आतून सगळं सांगण्यासाठी धडपडत होता; पण त्याला संधीच मिळत नव्हती.
सर्व विद्यार्थी मास्तरांना भेटत होते. सध्या कोणाच काय चालू आहे हे अभिमानाने सांगत होते.
बबनचे काही सगळ्यांसमोर जाण्यास धाडस होत नव्हतं. नाही म्हणता म्हणता अजून सुद्धा गुरुजींचा मुलांना म्हणजे आजी आजोबा झालेल्या मुलांना चांगलाच धाक वाटत होता.
बबन जणू भूतकाळातच पोहचला. त्याला मास्तरांचा शाळेतला पहिला दिवस आठवला. मास्तर वर्गावर येण्यापूर्वीच त्यांची ख्याती विद्यार्थ्यांच्या कानावर येऊन आदळली होती. आज पहिलाच तास पाटील मास्तरांचा होता. मास्तर वर्गात आले आणि टाचणी पडली तरी आवाज होईल एवढी घनघोर शांतता वर्गात पसरली. बबन तिसऱ्या बाकावर बसला होता आणि चौथ्या बाकावर पांडुरंग हा अतिशय आगाऊ असलेला फक्त नाव देवाचे आणि गुण मात्र राक्षसाचे असा अवगुणी विद्यार्थी बरोबर बबनच्यामागे बसला होता. बबन बिचारा चेहऱ्यावर अगदी साळसूदपणाचे आव आणून सिन्सियर मुलाप्रमाणे अभ्यास करत होता. पांडुरंगातला राक्षस जागे झाला आणि त्याने हळूच पाठीला बाकाखालून हात घालून जोरदार चिमटा घेतला आणि जणू काही झालंच नाही अशा अविर्भावात तो बसून राहिला.
झालं ! इथेच बबनच नशीब फुटलं. तो जोरात किंचाळला मास्तरांनी चष्म्यातून त्याच्यावर असा काही कटाक्ष टाकला की बबनचे हातपाय लटपटू लागले. बिचार्याच काहीच ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत ते नव्हते. तोंडाने अपशब्दांचा मार आणि हाताने छडीचा मार मिळाल्यावर बबन आतून बाहेरून सुजून निघाला. मुलांनी त्यांच बारसं करून मारकुटे मास्तर असं ठेवलं.
अजून एके दिवशी अचानक सुमन नावाच्या मुलीला कुणी तरी प्रेमपत्र लिहिलं. बबनचे नशीब एवढं वाईट की ते प्रेम पत्रातले अक्षर त्याच्या अक्षराशी अतिशय मिळतेजुळते होते. इथे सुमन कोण त्याला माहीत सुद्धा नव्हतं. नेमके पाटील मास्तर शाळेच्या व्हरांड्यात जात होते त्यांनी तिला का रडतेस त्याचे कारण विचारले. प्रेमपत्रातला अक्षर बबनच्या अक्षराशी जुळलं. मग काय सांगता ? बबनची जी धुलाई झाली की विचारता सोय नाही. अशा प्रकारे बबनने कितीही शांत राहायचे ठरवले तरी तो अशा प्रकारे मास्तरांच्या समोर येई की त्याने काही तरी भयंकर गुन्हा केला आहे असेच मास्तरांना वाटे.
बाकाखाली कागद ठेऊन चिटिंग करून परीक्षेत पास होणाऱ्या मुलांचा कागदही कसा कोण जाणे अचानक बबनच्याच समोर पडे आणि नेमकेच मारकुटे मास्तर तिथे हजर होत. जणू काही त्याच्या मागे साडेसातीच लागली होती मास्तरांच्या रूपाने.
एकदा बबनने ठरवले मास्तरांकडे जाऊन त्यांना सगळं खरं सांगूया ते आपल्याला समजून घेतील. मी असा मुलगा नाही. खरोखर तुमचा गैरसमजावर गैरसमज होत आहे.
दिवाळीच्या दिवशी सुट्टी असूनही शुभेच्छा द्यायला त्याच्या एका मित्राला घेऊन तो मास्तरांच्या घरी पोहोचला. दिवाळसण असून पण घरी आकाशकंदील नाही, रांगोळी नाही सणासुदीचे वातावरण नाही. बबन शेजारी त्याचा मित्र उभा होता. त्याच्या कानात बबन म्हणाला,” अरे मी मास्तरांबद्दल तर ऐकलं आहे त्यापेक्षा जास्तच कंजूष दिसतो. बघितलस का ? अशा मास्तरबद्दल मला आदरच वाटत नाही. माफी मागावी इच्छा नाही. हम्म !” एवढे बोलून बाजूला बबन बघतो तो काय तिथे मित्र नव्हता तिथे उभे होते मारकुटे मास्तर. हो ! पापणी लावायच्या आत बबनने जी धूम ठोकली ती शाळा संपेपर्यंत मास्तरांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला नाही.
हळूहळू बबन मोठा झाला. नगरपालिकेत वडिलांनी ओळखीने क्लर्क म्हणून चिकटवला. त्याने प्रेमपत्र न लिहिलेल्या सुमनशी त्याचे लग्न ठरले. सुमन ही कधीतरी त्या प्रेमपत्राची आठवण त्याला करून देत असे आणि चिडवत असे.
” प्रिय सुमन, तू मला खुप आवडतेस. तुला पण मी आवडत असेल तर मला इंग्रजीच्या पेपर मधे मदत कर. तू खूप छान दिसते पण अजून थोडी गोरी हो. मी तुला फेअर अँड लव्हली घेऊन देईन. तुझ्या मागे बसणारी सुधा तुझ्यापेक्षा गोरी दिसते म्हणून सांगितलं. प्रेमपत्र नाही आवडलं तर मला दे. मास्तरांना देऊ नकोस.’
तुझाच
प्रेमवीर.
हजेरी क्रमांक – 143.
पत्ता – तुझे मन.
दोघांच्या मनात एक गोष्ट मात्र नेहमी राहिली की आपण मास्तरांना हे पटवून देऊ शकलो नाही की तुमच्या मनात जशी माझी प्रतिमा तयार झाली तितका वाईट मुलगा मी नव्हतो.
आज किती तरी वर्षांनी बबनला ही संधी मिळाली होती. आज तर सुमनही त्याच्या सोबत होती. एक प्रकारे एक पुरावाच त्याच्याजवळ होता. दिवसभर सगळ्या विद्यार्थ्यांच त्यांना भेटून झालं कसं चाललंय काय चाललय वगैरे बोलून सगळे स्थिरस्थावर झाले. अखेरीस पाटील मास्तरांना पुढे काही फारसं उभं राहवत नव्हतं म्हणून एका जागी खुर्चीत बसण्यास गेले. बबनने संधी साधली. धावतपळत सुमनला घेऊन तो मास्तरांपाशी गेला आणि त्यांच्यासमोर त्याने आपले पुराण सांगायला सुरुवात केली. सुमनही त्याला दुजोरा देत देत होती. सगळे काही नीट मनासारख सांगून झाल्यावर बबन आशेने मास्तरांकडे बघत होता. आता मास्तर काय म्हणतील ? त्यांना वाईट वाटेल की एवढ्या चांगल्या मुलाला मी उगाच वाईट समजलो.
तो मास्तर तर फक्त एवढंच सांगून उठले “बरं वाटलं तुझ्याशी बोलून. तू या मुलीशी लग्न केलंस म्हणजे ते पत्र तूच लिहिलं होतस. स्मरणशक्ती अजूनही शाबूत आहे माझी.” ते म्हणाले. “ आज मात्र मी माझं श्रवणयंत्र घाईत घरीच विसरलो आहे; पण आता तरी नीट वाग आणि इथून पुढे तरी स्वतःला सुधार बाबा. तिला नीट सांभाळ.” बबनला हात जोडून मास्तर निघून गेले.
बबन आणि सुमन एकमेकांकडे बघतच राहिले!
लेखिका- सौ. माधुरी शेलार, नवी मुंबई
तुम्हाला ही कथा कशी वाटली, ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.
धन्यवाद !
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
मस्तच 👌👌
Khup Chan lihile ahe Madhuri.Asech lihit ja. Keep it up.
धमाल👌👌
मस्तच 👌👌
Mastch
Khup chan.. interesting 😊👏👍👌