स्वातीने नवीन गुलाबी रंगाचं स्वेटर विणायला घेतलं होतं. खुर्चीत बसतांना तिने हळूच पोटावर हात फिरवला आणि मनोमन सुखावून गेली. किती दिवस राहिले हा विचार करत तिने डोळे मिटले. तेवढ्यात लेकराने पोटात लाथ मारली.
” आह ! बराच खोडकर दिसतो हं.” तसं तिने पून्हा डोळे मिटले. ती बसलेल्या खिडकीतून मंद वाऱ्याची झुळूक मोगऱ्याचा हवाहवासा सुगंध सोबत घेवून येत होता. आईने टेपवर छान जूनी गाणी लावली होती. या मोगऱ्याच्या मोहापायी तिने त्या खोलीची निवड केली होती कारण त्या खिडकीबाहेर बागकाम करण्यासाठी छान जागा होती. तिने देखील बागकाम केले होते. बाग फुलवली होती. मोगरा तिच्या आवडीचा. त्याच्या सुवासाने तिला जगाचा विसरच पडे.
या छान वातावरणात क्षण – दोन क्षण गोड जाणिवेत गेले नसतील तोच खोलीतला गारठा वाढू लागला .सुगंधी झुळके ऐवजी आता दुर्गंधी पसरू लागली. इतका दुर्गंध की स्वातीने नाकावर हात ठेवला. तिने डोळे उघडले तर हे काय ? ती तिच्या खोलीतच नव्हती. तिने पटकन पोटावर हात ठेवला तर तिला दुसरा धक्का बसला. तिचं पोट अगदी सपाट वाटलं. असं कसं झालं ? मनामध्ये भयाच्या वादळाने वेग घेतला. ‘ माझं बाळ, माझं बाळ.”
खूप मोठ्यांदा ओरडूनही तिचा आवाज कसा कुणाला जात नव्हता. ” आई ! आईईईईईई,मावशी. कुठे गेले सगळे. या सगळ्या गोंधळात तिचा हात सतत पोटावर फिरतच होता. चाचपडत होता असं कसं झालं ?काही मिनीटांपूर्वी तर इथेच होतं माझं बाळ. तिच्या डोळ्यांत अश्रुंची गर्दी जमा झाली, सैरभैर होऊन ती पळू लागली. अंधार अगदी गहिरा अंधार एका अजस्त्र वृक्षाप्रमाणे आपले हातपाय पसरवत होता. भीती वाटत होती तिला. तिने दोन्ही हात पोटावर गच्च दाबून धरले, ओढणी तर कशात तरी अडकून मागेच पडली. पाडसाच्या विरहात असलेल्या भेदरलेल्या हरिणीच्या वेगानं तिची पाऊले धावू लागली.
” ट्याहहहहहहहह ट्याहहहहह “आवाज घुमला. .अगदी अखंड घुमतच राहिला.
“हो हो येतोय, येतोय. कुठूनतरी आवाज येतोय. माझं बाळ, माझ बाळ, इथेच इथेच आहे कुठेतरी.” ती स्वत:शीच बडबडत होती. धावत होती. वेगाने सुटलेला वारा पालापाचोळ्यासोबत तिचे रेशमी, मुलायम घनदाट कमरेपर्यंतचा केशसंभार घेवून उडत होता.
त्या दरवाज्याआड, त्या खोलीत असलेल्या कपाटाच्या बाजूच्या खिडक्या का वाजत आहेत ? कोणी उघडल्या त्या ? त्या तिथेच आईच्या विरहात टाहो फोडून रडणारं ते बाळ.
” त्या कपाटाच्या शेजारच्या खिडकीच्या बाजूनेच तिथूनच येतोय आवाज. बाळा, आले मी आले. तिच्या पावलात विजेची गती संचारली होती. तिने खोलीची दारं उघडली. कपाटाच्या अगदी बाजूलाच खिडकीच्या खाली एका कपड्यात गुंडाळलेले बाळ दिसत होतं. तिने त्याला अलगद उचलून आपल्या कवेत घेतलं होतं.
” किती निर्दयी आणि उलट्या काळजाची म्हणावी ती व्यक्ती. एवढुंस बाळ कोण ठेवतं का कपाटाच्या शेजारी ? ” तिच्या तळपायाची आग अगदी मस्तकात जात होती. त्या रागानं ती थरथरत लालबुंद झाली होती. तिने ते बाळ जेव्हा हातात घेतलं त्याला निरखून पाहू लागली. त्याचे टपोरे डोळे, इवलसं नाक, पातळ गुलाबी सायीसारखेओठ, इवलीशी रडून रडून धडधड उडणारी छाती. तिने त्या बाळाला पटकन छातीशी धरलं. त्या खोलीतून ती पळत सुटली. क्षणभरसुद्धा तिथे थांबायची इच्छा नव्हती तिची. आता ती दिवाणखाण्यात आली होती. एका हातात बाळ आणि अंधार दाटल्यामुळे कंदील लावण्याची तिची निरर्थक धडपड चालू होती. कंदील लागत नव्हता म्हणून मनाशीच त्या अंधाराला दोष देत होती.
बाहेर पावसाचे थैमान सुरू होते. जोरात कडाडणाऱ्या विजांच्या आवाजामुळे तिच्या उरात धडकी भरली होती. कडडडडड भला मोठा आवाज झाला. आकाश काही क्षणासाठी तेजाळून निघालं आणि त्या काही क्षणांच्या उजेडात तिने जे पाहिलं त्यानंं तिचा श्वास फक्त बंद होण्याचा बाकी राहिला होता. तिच्या हातातलं बाळ अगदी पांढरंफटंक पडले होते. त्याच्या बुबुळांच्या गारगोट्या झाल्या होत्या. काड्यांसारखे बारीक बारीक हात तिच्या दिशेने वर येत होते. त्यानं ते काळेकुट्ट तोंड उघडलं तोच दुर्गंधीचा एक भला मोठा भपका आला. त्याची नखं आता तिच्या गळ्यात रूतली होती. “मला मुक्ती नाही तर तुलाही नाही आईईईईईई.” अगदी चवताळून तो त्याची नखं तिच्या गळ्यात रुतवू लागला. श्वास नाकांतून गळ्यापर्यंत पोहोचण्याचे सगळे मार्गच बंद झाले होते. तिचे ते विस्फारलेले डोळे कायमचे तसेच राहणार होते. प्राण बाहेर पडल्यानंतर.
” ताई ओ ताई ! उठा ना काय झालं ? असं का रडता ? स्वत:कडे असणाऱ्या चावीने दार उघडून मोलकरीण सुरेखा आत आली होती. स्वातीच्या चेहऱ्यावर असीम भीती दाटली होती. ती रडत होती. किंचाळत होती म्हणून सुरेखाने तिला हलवून उठवलं.
काही क्षण स्वातीला कळेना की ती नेमकी कुठे आहे ? सुरेखाला बघून ती भानावर आली. ती तिच्या पुण्याच्या फ्लॅटमध्ये होती. ती सुरेखाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागली. ” काय करू मी ? तो वाडा सोडून जवळपास बारा वर्ष झाली. तरीपण तो वाडा माझी पाठ सोडत नाही. मी मेल्यावरच हे सगळ थांबेल.”
सुरेखाने आपल्या पदराने तिचे तोंड पुसले आणि तिला ग्लासभर पाणी दिले. ते पाणी तिने एका दमात पिऊन टाकलं. ” ताई परत स्वप्न पडलं का ?” सुरेखाने विचारलं.
” हो गं हे स्वप्न काही माझी पाठ सोडत नाही.”
स्वातीने त्या वाड्यात आधीच आपलं पहिलं मूल गमावलं होतं. तो शापित वाडा आजही माझ्या पायथ्यावर आहे. आता कसेतरी दहाबारा वर्षांनी मला पुन्हा दिवस गेले होते. तर ती त्या वाड्यातली स्त्री काही मला सोडत नाही. खरंतर तिचा मृत्यू आगीत होरपळून झाला होता. सुरेखा मला वाटत तिला मरण आलं का ? की तिला मुद्दाम मारलं होत गं ?”
असं बोलून स्वातीने निर्धाराने ठरवलं आपण पुन्हा गावाकडे जायचं जे होईल ते होईल; पण सगळी माहिती काढूनच परत फिरायचं. सुरेखाच म्हणण होतं की या अवस्थेत नको. एकतर साहेब बाहेर देशात आणि आपण दोघींनी नको जायला पण तिने पक्का निश्चय केला होता.
दुसऱ्या दिवशी तिने ड्रायव्हरला बोलावून घेतलं आणि दोघीपण सावरगावकडे निघाल्या. जातांना स्वाती मनोमन थोडी घाबरली होती. गाडी वाड्यासमोर येवून थांबली. वाड्याकडे पाहत तिने पुढच्या बाजूला गाडी घे असं ड्रायव्हरला सांगितलं. कामतकाकूनी स्वातीला पाहिले. त्या खूपच आनंदी झाल्या. इतक्या वर्षांनंतर तिला पाहून त्या खूश झाल्या. ती गाडीतून खाली उतरल्यावर काकूंनी तिच्यावरून भाकरतुकडा ओवाळून टाकला आणि स्वातीला घरात नेले. अगदी शांत वातावरण मन प्रसन्न करत होतं. स्वाती सोफ्यावर बसली. कामत काकूंना तिला पाहून आनंदाश्रु अनावर झाले. डोळ्यातल पाणी टिपतच त्यांनी गड्याला हाक मारून चहा आणायला सांगितला. काकू आणि स्वातीने गप्पा मारायला सुरूवात केली. तेवढ्यात गडी चहा घेवून आला. चहा देवून तो मागे वळला पण त्याच्या कानावर वाड्याची गोष्ट पडली आणि तो दाराआड उभा राहिला. त्याची चुळबुळ पाहून सुरेखाला थोड अजब वाटलं.
रात्री सगळेजण गप्पा मारत बसले होते तेवढ्यात गडी तिथे आला. गडी सांगू लागला, ” बाईसाहेब मला समदं ठाव हाय. फकस्त मी गबगुमान हाय माझ्या सरूचा यात कायबी गुना नाय. आमी लय गरीब पण माय सुरू लय हुशार हुती. दिसायाबी नक्षत्रावानी हुती. महेशसायब लय शिकलेल त्यासनी मायी सुरू लय आवडली. ते लगीन करायला तयार झाले पर त्याचीं आई नग म्हणत हुती पर सायबांनी आईला समजून सांगितल आन लगीन करून घेतलं. मायी सरू सुखात हाय म्हणून आमीबी लय खूश पर एक दिस घर गड्याकडून ठाव झालं की बाईसाहेब लय तरास देतात. मला रावल नाय मी लेकीसाठी तिथपस्तुर गेलो पण दारातून जे पायलं त्यान मायाजीव रायना. महेश सायब लय जीव लावायचे पण त्यांची आई नीट बघत नवती. माया लेकीला दीस गेले आमी लय खुश हुतो पण बाईसाहेबांनी तिला आमच्याकडे नाय धाडली. समद आम्ही करू म्हनल्या पर जवा बाळ झालं तवा महेश साहेब बायरगावी होते. बाईसायबांनी आपला डाव साधला आणि माया लेकीला त्या लहानग्या सकट मारून टाकली. सायब आले तर त्यास्नी खोट सांगितल शेक देताना बाजेन पेट घेतला. नंतर ते समदे शेतात ऱ्हायला गेले.
नंतर तुमच्यासंग सायबाच लगीन झालं. म्या भेटाया आलू हूतो पर तुमचा संसार पावून मला माझी सरु आठवली मी माघारी फिरलो. जवा तुमचं बाळ गेल तवा भी म्या भेटाया निघलो पर तुमी निघून गेले हूते. असं सांगून गडी ढसाढसा रडू लागला. कामत काकूंनी त्याला पाणी दिलं. बाईसाहेबांना त्याची शिक्षा भेटाया पायजे होती पर आमी गरीब माणसं आमच कोण कैवारी नाय.”
गडी काकांचे शब्द ऐकून स्वाती विचार करू लागली महेशला हे काहीच माहीत नव्हतं. त्याच्या आईने एक नाही तर दोन निष्पाप जीव घेतले होते. ते काही नाही महेशला सगळं समजलच पाहिजे. त्याच्या आईने काय केलं होतं. आजपर्यंत आपण आईवडील का नाही होऊ शकलो ? आपलं बाळ का गेलं हे सगळ महेशला सांगावच लागणार. तिने महेशला ताबडतोब बोलावून घेतलं. महेश गावाकडे आला. वाड्यात स्वाती आणि महेश उभे होते. स्वातीने झालेला सगळा प्रकार महेशला सांगितला. महेशने आणि स्वातीने तिथे एक साडी,चोळी, गजरा, एक लहान बाहुली ठेवली आणि प्रार्थना केली की सरू तुझ्याबाबतीत घडू नये ते घडलं पण मी दरवर्षी इथे येवून सवाष्ण जेवू घालेल पण मला मातृत्व उपभोगू दे. अशी कळकळीची विनंती करून स्वाती तिथून निघून गेली.
त्यानंतर मात्रं महेश आपल्या आईकडे कधीच गेला नाही. दरवर्षी गावात येऊन वाड्यात दोन दिवस राहू लागला. त्याच्या सोबत स्वाती असायची आणि त्या दोघांची मुलगी तिचे नाव त्यांनी सरस्वती ठेवले होते.
लेखिका – सौ.कविता कुलकर्णी पांडे
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे. लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
सदर कथा काल्पनीक असून याचा कोणत्याही घटनेशी काही संबंध नाही. वाचकांना कथा कशी वाटली .अभिप्राय नक्की कळवणे.
छानच लिहिले आहे 👌