लोकलमध्ये सकाळी सकाळी चढताना ती आपोआप गर्दीत ट्रेनच्या आतमध्ये ढकलली गेली. थोड्या वेळात सगळ्या बायका हळूहळू आपआपल्या जागी स्थिरावल्या. अधूनमधून प्रत्येक स्टेशनवर प्रवाशांची चढउतार चालू होती. किरकोळ विक्रेते येत जात होते.अचानक कुठूनतरी मंद वाऱ्याची झुळूक मोगऱ्याचा सुगंध घेऊन आली आणि वातावरण प्रसन्न करून गेली. एक चिमुरडी ‘ गजरे घ्या गजरे ताजे ताजे गजरे ‘ असं म्हणत ट्रेनमध्ये चढली. तिच्या वयाच्या आणि वजनाच्या मानाने ते फुलांचं टोपलंही जडच वाटत होतं.
कुठे आपली छान छान सोसायटीमध्ये राहणारी मुलं शाळेत जायला वेळेत उठली तरी आईला कोण कौतुक वाटतं आणि इथे ही चिमणी सकाळीच आवरून चापून चोपून दोन वेण्या घालून पोटापाण्यासाठी कष्ट करत होती.किडकिडीत शरीर आणि थोडे मळकट कपडे. दोन वेण्या आणि काळ्या गंधाची छोटी टिकली असा तिचा वेष होता. चेहऱ्यावर आत्मविश्वास मात्र मावत नव्हता. पैशाचा हिशेब पटापट करून राहिलेले पैसे परत करण्यात ती कुठेच कमी पडत नव्हती. मिळेल तेवढी गिहाईक एका डब्यात जमवून ती पुढच्या स्टेशनला दुसऱ्या डब्यात चढली देखील. रचना अगदी डोळ्यांची पापणी न लवता तिच्याकडे बघतच बसली. कोण कुठली एवढीशी चिमणी तिला खुपच प्रभावित करुन गेली.
रचना खरेदी करण्यासाठी मार्केटमधे गेली होती. ती मार्केट मधून जाऊन तर आली; पण घरी पोहचल्यावरही तिचं मन थाऱ्यावर नव्हतं. तिने रोजच्यासारखं सगळं घर आवरलं. स्वयंपाक केला. सगळी काम अगदी रोजसारखी पण यंत्रवत. तिचं मन कुठेतरी दुसरीकडेच होतं.
ती सकाळची गजरेवाली मुलगी तिच्या डोक्यातून काही केल्या जात नव्हती. तिला तिची दया पण येत होती, कौतुक पण वाटत होतं आणि अशा लोकांसाठी काहीतरी करण्याची सुप्त इच्छा मनात घर करत होती.
रचना एक चाळिशी ओलांडलेली मध्यमवयीन गृहिणी होती. मुलीचे लग्न झालं होतं. लहान मुलगा कॉलेज संपवून नुकताच नोकरीला लागला होता. त्यामुळे घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडून ती आता जिवनाच्या अशा टप्प्यावर होती जिथे तिला थोडा एकटेपणा जाणवत होता. पतीच्या आणि मुलांच्या मागे फिरण्यात आयुष्य गेलं; पण आता मुलं स्वावलंबी होती आणि नवरा त्याच्या कामात बिझी. मैत्रीणीसुद्धा आता फारशा संपर्कात राहिल्या नव्हत्या कारण मधल्या काळात मैत्रिणींशी बोलायला, भेटायला तिच्याकडे वेळच नव्हता. एक वेगळच रितेपण तिला आतून टोचणी देत होतं. घर कितीही सुखवस्तू असलं तरी माणसाला जेव्हा खूप जास्त एकांत मिळतो तेव्हा तो एकांतही घर खायला उठल्यासारखा वाटतो. म्हणूनच हल्ली तिच्या मनाने काहीतरी नवीन उद्योग शोधायचा ठरवला होता आणि बहुतेक याच विचाराचा धागा कुठे तरी सकाळच्या मुलीसारख्या लोकांना मदत करण्यात करण्याच्या विचाराशी जोडला होता.
दुसरा दिवस उजाडला तोही असाच. यंत्रवत तिची कामे चालू होती पण मन शांत नव्हतं. मंदिरात जाऊन तिथल्या शांत पवित्र वातावरणात आपली घालमेल कमी होते का ते बघावं म्हणून ती मंदिरात गेली.
तिथे पण देवाचं दर्शन घेऊन बाहेर आल्यावर छोटी छोटी मुलं येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांकडे भीक मागत मंदिराच्या पायऱ्यांवर बसली होती. तिच्या विचारांची पुन्हा तंद्री लागली आणि गणपती बाप्पाच्या कृपेने तिला तिच्या जीवनाचा नवीन उद्देश सापडला. ती पुन्हा घाईघाईने देवळात गेली घंटा वाजवली आणि गणपती बाप्पाला साष्टांग दंडवत घातला. त्यांचे आभार मानले आणि ती बाहेर निघाली आता रचनाच्या चालीत एक वेगळाच आत्मविश्वास होता. तिला तिची दिशा सापडली होती. तिला काय करायचय हे तिने मनाशी पक्क केल होतं.
तिने गरीब आणि गरजू मुलांसाठी एक सेवाभावी संस्था चालू करायच ठरवलं होतं. तिथून घरी येऊन तिने नाश्ताच्या वेळी डायनिंग टेबलवर पती आणि मुलांसोबत हे सगळं बोलायच ठरवलं. सगळ्यांच्या आवडीचा नाश्ता तयार करुन तिने बोलता बोलता हळूच हे सगळं सांगितलं आणि अपेक्षेप्रमाणे व्हायचं तेच झालं पतीदेवांनी नाराजीचा सूर लावला. मुलांनी तोंडे वाकडी केली. एखाद्या सामान्य घरात एखाद्या गृहिणीने अचानक असं काही तरी सामाजिक बदल घडवणारा कार्यक्रम वगैरे करावा ही सहजासहजी पचनी पडणारी गोष्ट नव्हती आणि झालंही तसंच.
पण रचना पण काही अशीच हार मानणार नव्हती. ती पूर्णपणे तिच्या कुटुंबाचे मन वळवण्याच्या तयारीनिशी आली होती. तिने त्यांना समजावले कशा प्रकारे तिला लहान मुले भेटली आणि कसे तिच्या मनात हे विचार आले की त्यांच्यासाठी काहीतरी करावं. शिवाय तिच्याकडे आता घरातले सगळे काम झाल्यावर बराच वेळ शिल्लक असतो तोही सत्कारणी लागेल. तिचा पण वेळ जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांच मनगट फक्त बांगडय़ानी शोभून दिसत नाहीत तर कर्तृत्वानेही शोभून दिसत. आणि आता तिला हे करायला संधी होती. तिच्यात उमेद होती फक्त हवा होता घरच्यांचा पाठिंबा जो काहीही करून ती मिळवणारच होती. शेवटी ती पण हट्टी मुलांची हट्टी आई होती. शेवटी घरातल्यांनी बघ जमतय का असं म्हणत सुरुवात करायला तरी तिला परवानगी दिली.
झालं ! घरच्यांची परवानगी मिळाली आणि रचना पदर खोचून कामाला लागली. ‘ हे तुझ्यासारख्याच काम नव्हे.’ ‘ झेपणार नाही ते करू नये माणसाने.’ अशा आजूबाजूच्या विचारांना अजिबात भीक न घालता रचना तिच्या वाटेवर ठामपणे चालत राहिली.
आजूबाजूच्या भजनी मंडळातील मैत्रिणी आणि जवळपासचे उत्साही कार्यकर्ते घेऊन रचना हळूहळू एकेक पाऊल पुढे टाकत गेली. संस्थेचे रजिस्ट्रेशन, कागदपत्रांची जमवाजमाव, संस्थेच्या उभारणीसाठी जागा, सर्व प्रकारच्या कायदेशीर औपचारिकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यासाठी लागणारा खर्च देणगीतून जमवणे. यासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली.
तिने आश्रमाला अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या ‘ सिंधुताई सपकाळ ’ यांच नाव दिलं.
एकदा यश मिळाल्यावर मात्र राजकीय पुढारी, नगरसेवक आणि तिचे पाय मागे ओढणारे लोकं हे सगळे जणू आम्ही तुझ्या आधीपासूनच पाठीशी उभे होतो या अविर्भावात तिच्या पुढे पुढे करू लागले.
तिने आश्रमात येणाऱ्या बालकांची फक्त शिक्षणच नाही तर नोकरी आणि त्यांच्या लग्नापर्यंत सगळी जबाबदारी घेतली. पुढे जाऊन त्यातली काही मुले आश्रम सांभाळू लागली. रचनाची मुलेदेखील तिला जमेल तशी मदत करत असत.
आज आश्रमात दहावा वर्धापनदिन साजरा होत होता. सगळीकडेच उत्साह ओसंडून वाहत होता. बघता बघता दोन मुलांसह सुरु झालेलं हे कुटुंब आज दिडशे लोकांचं झालं होतं.
आश्रमाच्या अंगणात छान मंडप उभारण्यात आला होता. स्टेजवर सुंदर सजावट करण्यात आली होती. पताका आणि इतर सजावट आश्रमातील मुलांच्या अंगी असलेल्या हस्तकौशल्याची साक्ष देत होतं.
आज रचनाला जुन्या आठवणींनी भरून येत होत. तिचा हा प्रवास खुपच खडतर होता.
छोटी म्हणता म्हणता आज तिची मानसमुले शिक्षण घेऊन मोठ्या पदांवर कार्यरत होती. आज सगळे समारंभास उपस्थित राहणार होते. काहीजण तर खुप काळानंतर तिला भेटणार होते.
कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्व मान्यवर स्टेजवर बसले होते आणि कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाने विशेष अतिथीचे नाव घोषित केले. टाळ्यांच्या गजरात ती स्थानापन्न झाली. ती होती मिस जाई. जाईसारखा प्रसन्नतेचा सुगंध पसरवत आश्रमातच मोठी झालेली आपली गोड गजरेवाली मुलगी. ती या आश्रमाच्या स्थापनेची प्रेरणा होती. तिने कष्टाने आणि अर्थातच रचना ताईच्या भक्कम आधाराने जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पद मिळवून दाखवल होतं. रचनाला पण जाईचा आणि आश्रमाचे नाव मोठं करणार्या सगळ्याच मुलांचा सार्थ अभिमान वाटत होता. जाईसाठी तिच्या रचना ताईने जिल्हा रुग्णालयातील दुसरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय यांचं स्थळ बघून ठेवलं होतं. आज ती जाईशी बोलणार होती.
जाई आज प्रमुख अतिथी म्हणून पहिल्यांदाच सगळ्यांसमोर बोलत होती. ती अतिशय भावूक होऊन बोलत होती. रचनाताईचं कौतुक करताना ती थकत नव्हती. भरभरुन ती तिचे सगळे अनुभव सांगत होती. जे आता नव्या पिढीतील मुलांना प्रेरक ठरणार होते.
आज खऱ्या अर्थाने रचनाताई भरून पावली होती. तिच्या कष्टांचे चीज झाले होते!
लेखिका- सौ. माधुरी शेलार, नवी मुंबई
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
मोगरा फुलला👌👌
छान कथानक
अप्रतिम