Marathi Katha – वाण  ..अंतरीच्या भावनांचे..!! 

WhatsApp Group Join Now

मानवी नात्यांचा पदर उलगडणारी हृद्यस्पर्शी कथा

“काय काकू ,झाली की नाही तयारी..आली का तुमची सुनबाई .?” असे म्हणून कॉलनीतल्या साऱ्या बायका नमा काकूंच्या घरात शिरल्या. “हो, हो ..काल रात्रीच आली आहे,  रजनी..! तुम्ही बसल्या बसा मी बोलवते तिला. “

                  कॉलनीत सगळीकडे संक्रांतीच्या हळदी कुंकवाचा आणि वाण लुटण्याचा रोज एकीच्या घरी कार्यक्रम चालू होता ..नमाकूंच्या घरी मात्र तो अगदी साग्र संगीत व्हायचा ..दोघी सासु सुना एकमेकांना साजेशाच होत्या …मुलगा श्रीकांत परदेशात आणि सून मुंबईत..!!सूनच मुलाकडे ठराविक काळाने ये जा करायची .श्रीकांत क्वचितच यायचा, मुंबईत किंवा गावी.!पण नमाकाकू जशा कॉलनीत राहायला आल्या तशा त्यांच्या साग्रसंगीत हळदी कुंकवाच्या  कार्यक्रमाचा शिरस्ता कधीही चुकला नाही.. सगळी कॉलनी त्या दिवशी  त्यांच्या घरी आवतरायची . . अर्थात त्या राहायला आल्याच तीन वर्षापूर्वी..!! 

               बायका जरा सैलसर  बसल्या आणि गप्पा मारू लागल्या ..इतक्यात रजनी..नमा काकूंची सून आली. गव्हाळ रंगाची   शिडशिडीत, मध्यम  उंचीच्या रजनीने आज कपाळाच्या मधोमध लाल रंगाची चंद्र कोर रेखली होती..लाल मंदिर नक्षीच्या काठाची काळीभोर साडी आणि पांढरा शुभ्र गजरा तिला खूपच खुलून दिसत होता .अगदी  छोटसं मंगळसूत्र, ठुशी ,मोत्याची नथ, हिरव्या सोनेरी बांगड्या आणि कुड्या..सगळं जागच्या जागी आणि सगळ्यात मोहून टाकणारे तिचं आपलंसं करणारे शांत समंजस हसू..!!!  एकाच बघण्यात आपलंसं करणारी रजनी कोणालाही आवडणारी होतीच…पण संक्रातीच्या एकाच दिवशी तिचं दर्शन होत असे ..संक्रातीच्या आदल्या रात्री येऊन ती संक्रांतीच्या दिवशीच परत जात असे..! परत पुन्हा येणार ते पुढच्या संक्रांतीला..तिची ख्याली  खुशाली..नवं जुनं ..सगळं कळणार त्यांना नमाकाकूंकडूनच..!!! 

                इतक्यात नमकाकूही रजनीच्या पाठोपाठ आल्या ..हलक्या निळसर रंगाची,  बारीक काठाची साडी, केसात  फिकट रंगाचे एक   गुलाबाचे फुल आणि हातात नेहमी दिसणारे दोन सोन्याचे गोठ…एखाद्या विरक्त देवीची  सात्विकताच जणू नमू काकूंच्या रूपाने उभी असावी.,असे नितळ त्यांचे अस्तित्व ।।!!  बायकांची सायंकाळची  गडबड लक्षात घेऊन त्यांनी रजनीला आता आवरायला सांगितले..रजनीने अत्तर लावण्यास सुरुवात केली ..रजनीने  नमा काकूंच्या सांगण्याकडे लक्ष देत  कार्यक्रमाचा ताबा घेतला. ..वर्षातून एकदाच गावी येत असून सुद्धा तिच्यातील समज  ,,चटपटीत पणा लक्षात येण्यासारखा  होता …आधी अत्तर लावले, मग हळदीकुंकू, गजरा, नंतर वाण लुटायची वस्तू ,,यंदाच्या वर्षी त्यांनी छोटे पितळी करंडे आणले होते आणि नंतर ओटी  आणि मग तोंड भरून हसून तिळगुळ देणारा तिचा आवाज..!!!”तिळगुळ घ्या गोड बोला “असे  रजनीने  म्हटले की कानाला अगदी मंजुळणारा, हवाहवासा वाटणारा आवाज..!!!नंतर मसाले दूध घेऊन समोरची सवाष्ण अगदी तृप्त होत असे आणि मग हसून निरोप घेत असे..!!! 

  ” मग काय .रजनी,यंदा तरी काही नवं आहे का.. “”

   “नमा काकू ,,पुरे झाली सुनेचे पळापळ..पुढच्या वर्षी दोघांनाही इकडेच आणा आता.. “

     “हो ना ..रजनीचे  अगदी उंबराच्या फुलासारखे झाले आहे …यावर्षी बघायचं ते सरळ पुढच्या वर्षी … ज्या दिवशी बघायला मिळेल तो भाग्याचा दिवस. . !! 

आणखी कथा वाचण्यासाठी इथे क्लीक करा

             अशा बायकांच्या गप्पा व संवाद सुरू झाला..एक एक जण  येऊन जात होत्या. .रजनीच्या आणि  नमाकाकूंच्या हाताला दम नव्हता. ..दोघी अगदी तीन-चारतास  व्यग्र होत्या..घरभर अत्तर ,गजरा ,,मसाले दूध यांचा सुवास  अगदी भरून राहिला होता …बायकांच्या येण्याबरोबर संवादाचा प्रवाह चालू राहिला…काहींच्या मनाला मोकळीक मिळत होती ….काही नमाकाकूंचे  चे घर मनात साठवत होत्या…काही जणी हसून खोडी काढून रजनीला बोलते करत होत्या तर काही दोघी सासू सुनांचे होण्याचे तोंडभरून कौतुक करत होत्या …असे करता करता सारी मंडळी पांगली  गेली…शेवटी एकदा  साठेंची कमला येऊन गेली आणि कार्यक्रम संपल्यातच  जमा झाला.. 

           नमाकाकूंनी  ” हुश्श… आटपलं बाई..” असं म्हणून दीर्घ श्वास घेतला आणि त्या सोफ्यावर बसल्या. .तर काकू बसलेल्या पाहून रजनी आतल्या खोलीत गेली..एकेक दागिने उतरवून डब्यात ठेवू लागली …अगदी काळजीपूर्वक तिने सगळ्या दागिन्यांकडे पुन्हा एकदा पाहिले ..गजरे काढले ..बांगड्या उतरवून कपाटात अडकवल्या….अगदी साधी प्रिंटेड साठी नेसून तोंड धुवून आली …अगदी लंकेची पार्वती .!! मघाची  रजनी  आणि आत्ताची रजनी …यात जमीन अस्मानाचा फरक होता… नमाकाकूंच्या शेजारी पण थोडे अंतर ठेवून रजनी ही बसली..दोन मिनिटे दोघीही स्तब्ध होत्या …शेवटी दोघींचेही डोळे पाणावले…दोघी एकमेकांचा हात हातात घेऊन नकळत उगाचच बसल्या…अगदी एकमेकीचे सांत्वन करत असल्यासारखे.!!! 

                “नमा काकू..एक विचारू”?  “अगं विचार की रजनी”…”काकू ..मी गेल्या तीन वर्षापासून तुमच्याकडे येते…तुमच्या घरी तुम्ही एकट्याच …घरचं कुणीही नाही…अगदी मुलगाही नाही..मग माझ्यासारख्या, शहरातल्या एका महिला श्रमातील अनाथ बाईला बोलवून हा हळदी कुंकवाचा आणि वाण लुटण्याच्या कार्यक्रमाचा घाट का घालता …. का म्हणून  हा  सगळा उसना सोस..?? 

      “रजनी ,तू दरवर्षी मला हाच प्रश्न विचारतेस ..मी बोलते का काही …आजही तुला उत्तर मिळणार नाही …जा बाई  चार घास घेऊन ये आणि समाधानाने जा …तेवढाच माझ्या मनाला दिलासा..!! “”

        “काकू .आज मी उत्तर दिल्याशिवाय मी जेवणार नाही, आपल्या लेकीचा हट्ट समजा हवं तर… “

          नमा काकू कुठेतरी अज्ञात  ठिकाणी नजर हरवत बोलू लागल्या,..””रजनी  ,, अगं भरलं गोकुळ होतं माझं सासर ..माझ्या आजे सासू पासून चार जणांच्या पिढ्या एकाच घरात नांदत होत्या. ..अगदी एकमेकांना जपून सावरून राहायचे  सगळे….समाधानी होते …पण काय झालं काय माहित ..कोणा एकाच्या मनात आलं आणि सारे विभक्त झाले …पण आजे सासूबाई आणि माझे सासू-सासरे आमच्या घरी राहायला आले …तेव्हा सुद्धा आम्ही  खूप आनंदी होतो…समाधानाने राहत होतो …आमच्या घरी माझ्या आजे सासूबाई  दीर्घायुषी होत्या …त्यांनी खूप वर्ष अहेवपण मिरवलं …माझ्या सासूबाई तर भरल्या हातानेच गेल्या …आमच्या घरात आजे सासूबाई आणि माझ्या सासूबाई दोघीही फार हळव्या … भाबड्या .. कुलाचार, रितीभाती,,परंपरा असोशीने  पाळणाऱ्या…घरात हळदीकुंकू कुलाचार सवाष्ण भोजन निरंतर अखंड चालावं अशी त्यांची भाबडी इच्छा …पण काळापुढे   माणसाचं काय चालतं…पण या सत्त्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. की  मुद्दाम डोळे झाक केली ,,हे मला कळत नाही …पण अखेरच्या क्षणी मात्र त्या दोघींनीही माझ्याकडून हाच शब्द घेतला की आपल्या घरात हे सगळे  कुलाचार काहीही झालं तरी निरंतर चालतील. .!! “

               “पण काकू ,या कार्यक्रमाला काय अर्थ आहे…  तरीही तुमच्या   मनासाठी तुमच्या गोतावळ्यातील नात्यातील कोणीही बाई हे आनंदाने करेल ..माझ्यासारखी अनाथ ..तीही एका आयुष्य फसलेली बाई …महिलाश्रमातील  आश्रयाने आपलाे आयुष्य कंठत आहे…मग मलाच का निवडलं…? “

                “रजनी बेटा .. अग जन्मांतरीचे बंध असतात बघ …कुणा जीवांना दिलेल्या शब्दांसाठी आयुष्य अडकून राहतं पण तोच बंध आपल्याला आयुष्याचा ठेवा  सांगून जातो. …त्या सुटल्या …पण माझं काय …दहा वर्षापासून एकाकी आयुष्याची वाट चालत आहे….मुलगा आणि सून परदेशात …येतील की नाही याची खात्री नाही …कधी सगळं सोडून द्यावंसं वाटतं पण त्या दोघींच्या शब्दात गुंतून राहते … तुझ्या आयुष्याचे आडाखे चुकले म्हणून काय झालं …भावना तुझ्या संपून गेल्या का ..स्वप्न दूर गेली का….सापडलेलच  की तुलाही तुझ्या आयुष्याची वाट ….सर्व प्रकारच्या सुखाने भरलेल्या बाईला बोलावण्यापेक्षा या  सुखाची जिला आस आहे त्या बाईला हे सुख दिलं तर काय बिघडलं …तिच्या आयुष्यात आलेले चार आनंदाचे क्षण हाच माझ्या जिवाला ओलावा…आता पुढच्या वर्षी माहित नाही मी असेल की नाही ।पण तुला जर संधी मिळाली तर हाच  वसा पुढे ने…पण त्यामध्ये काहीतरी नवीन शोधून काढ ….नवीन विचार आण… सर्व सुखं आणि आनंद मिळवणाऱ्या स्त्रीपेक्षा खरोखर कुणाला काही गरज असेल किंवा गरजवंताला हात दिला तर त्या आयुष्यातील चार आनंदाच्या क्षणांनी  तिच्या आयुष्याला उभारी मिळेल. ..असं काहीतरी तू  कर…असा काहीतरी तू विचार कर…तू शिकलेली आहेस.. अनाथ असलीस तरी  जाणीवा प्रगल्भ आहेत …एखादा चांगला निर्णय घेऊन तू माझी हीच  वाट चालू शकतेस …त्यामुळे माझा हा वारसा   तू चालू  ठेवावास अशी माझी फार इच्छा आहे. .. “”! 

          रजनीच्या डोळ्यात अश्रू आले … कसेबसे तिने   घोटभर दूध घेतले …तिला एक शब्दही बोलायची इच्छा झाली नाही ..कारण असा काही धक्काच बसला होता …अक्षरशः रिकामं आयुष्य नमा काकू जगत होत्या…पती नाही …मुलगा  परदेशात असून कोणीही जवळचे नाही. ..तरीही केवळ त्या दोन भाबड्या जीवांना  दिलेल्या शब्दासाठी नमाकाकू हा सोस करत होत्या …अक्षरशः नि:शब्द झाली रजनी…आणि जड पावलाने निघू लागली…तितक्यात  नमाकाकूंनी  तिला बोलावले आणि तिच्या हातात पाकीट ठेवले … ‘अगदी निवांत बसून वाच हं..!!””   असे सांगितले …दुसऱ्याच दिवशी रजनी आश्रमात आली आणि आपल्या कामाला लागली …पाकिटाचे ते विसरूनही गेली…इतक्यात दोन दिवसांनी रजनी च्या नावाने आश्रमामध्ये फोन आला आणि फोनवर   नमा काकू गेल्या म्हणून असं निरोप मिळाला. ..कानातील धक्का डोळ्यात केव्हा उतरला ही रजनीला सुद्धा कळले नाही…ती खोलीत आली आणि धडधडत्या मनाने बसली ..इतक्यात तिला त्या पाकिटाची आठवण झाली…  निराश मनाने  पाकीट उघडले तर नमाकाकूंचे ते इच्छा पत्र होते ..घर रजनी च्या नावे केले होते आणि संपत्ती महिला श्रमाच्या संस्थेच्या नावाने केली होती ….रजनीला अक्षरशः  कोसळून गेली. .!! 

               रक्ताच्या नात्याला ही  स्वार्थाचा आणि आतड्याचा पीळ सुटला नाही…पण नमाकाकूंसारख्या संवेदनशील स्त्रीला मात्र रजनीच्या आयुष्यातील ओलावा आणि काळजाचा ठाव कळला  होता …आणि त्यांच्या परिने तो उलगडला सुद्धा होता …

  रजनीला आता एका नव्या आयुष्याची चाहूल लागली होती आणि नमाकाकूंना दिलेल्या शब्दांनी तिच्या आयुष्याची दिशा सुद्धा ठरली होती. ..!! 

(वरील कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. लेखिकेने सदर कथा स्वतः वेबसाइटसाठी दिलेल्या आहेत )

36 thoughts on “Marathi Katha – वाण  ..अंतरीच्या भावनांचे..!! ”

  1. अप्रतिम कथा, मनाचा ठाव घेणारी आणि नकळत डोळे आले करणारी

  2. Santosh Sadashiv Tambvekar

    खूपच छान! अतिशय श्रवणीय आणि वाचनीय असा लेख आहे.

  3. खूप सुंदर लेख.नमाकाकूनी परिस्थिती बदलता येत नसली तरी आहे त्या परिस्थितीतही खरा आनंद शोधला

  4. स्नेहल भिसे

    हृदयस्पर्शी आणि शेवटपर्यंत वाचकला गुंतवून ठेवणारी… भावनिक कथा. खूप छान लिहिले आहे. 👌

  5. शिवलीला शिवपुजे

    खुप छान कथा . एक वेगळा विचार . पुढील वाटचालीस शुभेच्छा .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top