विजेच्या वेगाने थिरकणारी पावलं..अप्रतिम मुद्राविष्कार..लयबद्ध घुंगरांचा आवाज. शेवटी, संपूर्ण प्रेक्षागृहात घुमत राहिलेला टाळ्यांचा कडकडाट..वसुधाला एकदम जाग आली. याच स्वप्नाची पुनरावृत्ती होण्याची ही पाचवी वेळ होती.
तसं तर तिचं भरतनाट्यम् शिकण्याचं स्वप्न फार लहानपणापासून होतं; पण तिच्या वडिलांना ते मान्य नव्हतं. ‘शिकायचंच असेल तर गाणं शिक’ असा एक पर्याय त्यांनी उदारपणे दिला होता. हा असा पर्याय कसा काय असू शकतो? वसुधाच्या बालमनाला हा प्रश्न नेहमी सतावायचा. भरतनाट्यम्ऐवजी कथक शिक, हिप-हॉप शिक, जॅझ शिक, अगदी गेला बाजार कोळीडान्स शिक, इतपत ठीक होतं.
हे म्हणजे, बास्केटबॉल नको.बॅडमिंटन शिक, गिटार नको..सिन्थेसाईझर शिक असंच म्हणण्यासारखं होतं. ज्याची आवड आहे, जे शिकावसं वाटतंय ते न शिकता नगाला नग असावा तशी या कलेच्या ऐवजी ती कला असं कसं होऊ शकतं? वडिलांसमोर बोलण्याची शामत नव्हती. त्यामुळे बिचाऱ्या वसुधाला शाळेच्या गॅदरिंगमधल्या डान्सवर समाधान मानावं लागलं होतं.
लग्नानंतर, आता आपलं अधुरं स्वप्न पूर्ण होईल अशी अंधुकशी आशा तिला होती. ती, तिचा नवरा राजीव आणि सासूबाई, असं छोटंसं छान कुटुंब होतं तिचं; पण पहिल्या आठ-दहा दिवसांतच तिच्या लक्षात आलं, एकट्या सासूबाई पंधरा माणसांना पुरुन उरतील अश्या खमक्या होत्या. दणदणीत आवाज, मी सांगेन ती पूर्व दिशा, जगातल्या तमाम गोष्टी आपल्याच मर्जीवर चालल्या आहेत असा सदा आविर्भाव, त्यामुळे वसुधा महिन्याभरातच एकेक पाकळी मिटून फूल कोमेजून जावं तशी कोमेजली.
एक दिवस मात्र धाडस करुन ती त्यांना म्हणाली, “आई, माझी लहानपणापासून भरतनाट्यम् शिकायची खूप इच्छा होती. आपल्या घराजवळच एक क्लास आहे. आठवड्यातून दोनच दिवस आहे. मी जाऊ का तिथे शिकायला?”
“घ्या, आता पायात चाळ बांधून नाचणार का? आणि शिकून ते करणार कोणासमोर? तुझ्या नवऱ्याला चालत असेल तर माझी काही हरकत नाही हो. आता काय! नवीन पिढीच्या ताब्यात घराची सूत्रं दिली आहेत. ‘जे जे होईल, ते ते बघत रहावे’ ह्याशिवाय पर्याय आहे कुठे माझ्याकडे?
काय रे राजू? तुला चालेल का तुझी बायको नाचायला गेली तर?” वसुधाला खरंतर प्रचंड राग आला होता त्यांच्या बोलण्याचा, त्याहून त्यांच्या शब्दांचा, त्यामागच्या सुराचा.
तिने एक क्षीण आशा म्हणून आपल्या नवऱ्याकडे पाहिलं. कदाचित आपला राजुडा, आईला काहीतरी सुनवेल म्हणून तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याचं पेपरमध्ये खुपसलेलं डोकं फक्त थोडंसं हललं असावं असा तिला भास झाला. कोणाला काय अर्थ घ्यायचाय तो घ्या, ह्या त्याच्या नेहमीच्या पवित्र्याची आता तिला चीड यायला लागली होती. नक्की तो बँकेत नोकरी करतो, का कोणत्या देशाचा शांतिदूत आहे, अशी शंका यावी इतका तो निर्विकार असायचा. आई आणि बायको, दोघींपैकी एकीचीही बाजूही घ्यायची नाही आणि कोणाला दुखवायचंही नाही हा त्याचा, स्वतःपुरतं समाधानी रहाण्याचा फंडा होता. भरीत भर म्हणून अरसिकतेचं वरदान लाभलं होतं. क्वचित एखादया हळव्या क्षणी एकाच्या ऐवजी तीन-चार वाक्यं त्याच्या तोंडून यायची. वसुधा मग त्यातंच धन्यता मानायची.
आज जेव्हा सासूबाईंची मुक्ताफळं ऐकून ती तरातरा खोलीत निघून गेली तेव्हा राजीवने कष्टाने पेपरमधलं डोकं वर काढलं. बायकोची समजूत घालण्याचं कठीण काम आता त्याला नाईलाजाने करावं लागणार होतं. तो खोलीत गेला तेव्हा वसुधा तिची नेहमीची आवराआवर करत होती. फ़ुरंगटून वगैरे बसलेली नाही हे बघून तो परत त्याच्या लाडक्या पेपरमध्ये डोकं खुपसायला निघणारच होता; पण मग काय वाटलं कोणास ठाऊक, तिच्याजवळ आला. तिचे हात हातात घेऊन शक्य तितक्या मृदू आवाजात म्हणाला, “वसू, तू आईच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. लहानपणी, बाबा गेल्यानंतर तिने खूप कष्ट करुन मला वाढवलंय. सगळा एकहाती तिचाच कारभार असायचा, त्यामुळे थोडी हेकेखोर झाली आहे. माझ्यासाठी तिने घेतलेले कष्ट मी जवळून बघितले आहेत, त्यामुळे तिला नाही गं मी दुखवू शकत. प्लीज मला समजून घेशील ना?”
आपला नवरा, सलग इतकी वाक्यं आपली समजूत घालण्यासाठी बोलला त्यामुळे तिला अगदी गहिवरुन आलं होतं. शिवाय हे बोलताना त्याचा चेहरा इतका लहान बाळासारखा निरागस दिसत होता की ती तिचा डान्स शिकायचा हट्ट विसरुनच गेली.
अश्या प्रसंगांची पुनरावृत्ती पुढच्या सत्तावीस वर्षांत अनेकदा झाली. प्रत्येक वेळी,राजीवच्या समजूत घालणाऱ्या वाक्यांची संख्या कमीकमी होत शेवटी संपली.तोपर्यंत वसुधा कधीच समजून चुकली होती, हा आपल्या सासूचा संसार आहे. तो फक्त आपण सांभाळायचा आहे, आपल्या दोन आणि सासूच्या एक, अश्या तीन नाठाळ मुलांसकट.
बघता-बघता तिची पन्नाशी आली होती आणि सासू ‘एटी प्लस’ होती. ती आत्ताच थकली होती, मानसिकदृष्ट्या जास्तच. सासू अजून टवटवीत, चिरतरुण. वयानुसार काही शारीरिक मर्यादा आल्या असतीलही; पण अजूनही खणखणीत असलेल्या आवाजात, पूर्ण घराला धाकात ठेवण्याची धमक होती.मुलं आता मोठी झाली होती. तिच्या चिरंजीवाने, नीलने एका मुलीशी सूत जमवलंय अशी आतल्या गोटातली बातमी तिच्या मुलीने, निकिताने तिला नुकतीच दिली होती. ती मुलगी म्हणे नीलच्याच ऑफिसमध्ये कामाला होती. तरीच आताशा नीलचं वर्कलोड वाढलं होतं.
निकिताचं ग्रॅज्युएशनचं शेवटचं वर्षं होतं. पुढचे प्लॅन्स काय आहेत याचा पत्ताही लागू देत नव्हती पठ्ठी. एके दिवशी धाडकन येऊन काहीतरी अनाऊन्स करणार याची वसुधाला खात्री होती. राजीवने आता वेगवेगळे चार न्यूजपेपर्स घ्यायला सुरुवात केली होती. शक्य असतं तर त्या दशाननासारखी त्याने एकाच वेळी सगळ्या पेपर्समध्ये मुंडकी खुपसली असती. आता तर तो आणखीनच स्वतःच्या कोषात रहायला लागला होता. सासूबाईंचं ‘माझं घर, माझा संसार’ वसुधा इमानेइतबारे सांभाळत होती. फक्त आता तिने, तीन-चार वेगवेगळे ग्रुप्स जॉईन केले होते. त्यामुळे काहीना-काही प्रोग्रॅम्समध्ये ती बिझी रहायला लागली होती. समवयस्क मैत्रिणींच्या सहवासात तिच्या मनाचा एकेक पीळ हळुवार उलगडायला लागला होता.
एक दिवस वसुधाला तिच्या एका मैत्रिणीने,एका डान्स कॉम्पिटिशनबद्दल सांगितलं. त्यासाठी वयोमर्यादा चाळीस ते पंच्चावन वर्षं अशी होती. अजून दोन महिने होते स्पर्धेला. ती मैत्रीण, स्पर्धेत भाग घेण्यासाठी वसुधाला खूप आग्रह करत होती. शेवटी वसुधाच्या मनाने उचल खाल्ली. डान्स जमेल का हा वेगळा मुद्दा होता, आधी घरी सांगणं हा तिच्या दृष्टीने महायुद्धाचा प्रसंग होता.
राजीवने फक्त भुवया उंचावून, “बघ बुवा, तुझं तू. तुला जमत असेल तर घे भाग स्पर्धेत.” असं बोलून विषय संपवला.
निकिता म्हणाली, “आई, आता या वयात कशाला या नसत्या फंदात पडतेस? एरवी तर सारखी कंबर दुखते, पाय दुखतात म्हणत असतेस, मग डान्स कसा करशील?”
“अगं, मी काय मायकेल जॅक्सनसारखा ब्रेकडान्स नाही करणार आहे. साध्या, सोप्या; पण उठावदार स्टेप्स मी करु शकेन गं. आता मंगळागौरीचे खेळ नाही का खेळत मी? आणि पाय दुखण्याचं म्हणशील तर सुधा चंद्रन जयपूर फूट लावून किती वर्षं इतकं अप्रतिम नृत्य करतीये. एकदा मनाचे पंख लावून उडायचं ठरवलं की शरीराच्या मर्यादा आड येत नाहीत.”
“कुठे पंख लावायचे आहेत ते लाव. माझ्याकडून काय मदत हवी आहे ते सांग.” ती एवढं बोलली याचंच वसुधाला अप्रूप वाटलं.
ती म्हणाली, “तुमच्या नव्या पिढीची दोन-तीन गाणी जरा एडिट वगैरे करुन एकत्र जोडून दे ना मला. हल्ली अश्या गाण्यांना म्हणे जास्ती पसंती असते लोकांची.”
“बरं, देते.”
एवढं बोलून निकिता आपल्या खोलीत गेली. नीलचे सध्या इंटरेस्ट वेगळे होते. त्याच्याकडे असल्या फालतू गोष्टींसाठी अजिबात वेळ नव्हता. त्यामुळे त्याने वसुधाला ‘थंब्ज अप’ ची खूण केली आणि बाईकची किल्ली बोटावर फिरवत तो घराबाहेर पडला. तो कुठे गेला असावा हे त्याच्या बॉडी-स्प्रेच्या घमघमाटावरुन वसुधाला समजलं. एकूणच तिच्या प्रस्तावाचं अगदीच थंडं स्वागत झालं होतं.अजून मुख्य बालेकिल्ला लढवायचाच होता.
वसुधाच्या अपेक्षेप्रमाणेच सासूबाईंनी पूर्ण घर डोक्यावर घेतलं. अगदी स्पष्ट नकार देत त्या म्हणाल्या, “आमच्यावेळी नव्हती हो असली थेरं. माझ्या सासूबाईंनी नुसते डोळे वटारुन जरी बघितलं तरी मी चळाचळा कापत असे. असं वागायची हिम्मतच नव्हती.”
यावेळेस मात्र वसुधा बधली नाही. ‘मी भाग घेणार आहे.’ असं अगदी निक्षून सांगितलं तिने. निकिताने तिच्यासाठी चार मिनिटांची, अरिजित सिंग आणि हनी सिंग या गायकांची एक मेडले तयार केली होती. तिला त्यावर साधे हातपाय पण हलवता येईनात. तिच्या मनात आलं, या सिंग्जच्या गाण्यावर नाच करण्यापेक्षा मीच एकीकडे सिंग केलेलं आणि दुसरीकडे नाच केलेला परवडला.
तिने निकिताला मग दुसरी मराठी गाणी सिलेक्ट करायला सांगितली. तोपर्यंत प्रॅक्टिस सुरु करावी म्हणून तिने ‘बहरला हा मधुमास’ या गाण्याची हुक स्टेप करुन बघायची ठरवलं. करायला अगदीच सोपी होती. मग आरशात बघून तिने पहिले मान हलवण्याची प्रॅक्टिस केली. ते मनासारखं जमल्यावर गाण्याचं जे पहिलं म्युझिक वाजतं त्यावेळेस, बेडरुमच्या दारातून पळत येऊन एन्ट्री घ्यायचा तिचा प्लॅन होता. गाणं सुरु झाल्यावर पळण्यासाठी तिने सुरुवात केली, आणि ‘हाय रे दैवा’, दुसऱ्याच क्षणी स्वतःच्याच पायात पाय अडकून तिने जमिनीवर सपशेल लोटांगण घातलं. पटकन उठता येईना. घरात सासूबाई सोडल्या तर कोणीही नव्हतं. त्यामुळे बिचारी कशीबशी उठली. उजव्या पायाला चांगलाच मुका मार लागला होता. घरात कोणाला सांगायची पण सोय नाही, कारण लगेच सगळे म्हणाले असते, “बघ, आम्ही सांगत होतो ना.”
पुढचे आठ दिवस वेदनाशामक गोळ्या घेऊन आणि मलम लावून तशीच सगळी कामं तिला करावी लागत होती. मधुमास कुठला, वनवास नशिबी आला होता. तरीही तिची जिद्द कायम होती. आता तर दुप्पट उत्साह तिच्या अंगात संचारला होता. ते आठ दिवस तिने कव्वाली वगैरे सादर करताना जसं एका जागेवर बसून मुद्राभिनय आणि हातांच्या हालचाली, यावर फक्त भर देतात तशी प्रॅक्टिस केली.
बघता-बघता स्पर्धेचा दिवस उजाडला. तिने नृत्याला साजेसा पेहराव घातला. लेकीने छानसा मेकअप पण करुन दिला. सासूबाई आणि राजीव दोघंही, स्पर्धा बघण्यासाठी आली होती आणि तिसऱ्या रांगेत बसली होती. जसजसे एकेका स्पर्धकाचे परफॉर्मन्सेस होत होते तसतशी वसुधाच्या मनाची धाकधूक वाढत होती. मनावर प्रचंड ताण आलेला जाणवत होता. तेवढ्यात तिचं नाव पुकारलं गेलं. ती लटपटत्या पावलांनी स्टेजवर आली. समोरचा एवढा जनसमुदाय तिच्याचकडे बघतोय हे बघून तिचं उरलंसुरलं धैर्यही पार खलास झालं. सहज सासूबाईंकडे तिचं लक्ष गेलं तेव्हा त्या कुत्सितपणे हसत असलेल्या तिला दिसल्या. राजीव मोबाईलमध्ये काहीतरी बघण्यात मग्न होता. तिला नजरेतून धीर देणं वगैरे गोष्टी त्याच्या आवाक्याच्या बाहेरच्या होत्या.
अचानक लतादीदींच्या गाण्याच्या ओळी तिच्या मनात घुमायला लागल्या, ‘मी सोडून सारी लाज, अशी बेभान नाचले आज की, घुंगरु तुटले रे.’
ती स्वतःशीच पुटपुटली, “दीदी, तुमच्या गाण्याची लाज राखण्याएवढं तरी नृत्य माझ्याकडून होऊ दे, आणि मनोमन त्यांनाच वंदन करुन तिने पहिली गिरकी घेतली, मग दुसरी.. नंतर तिला स्वतःची अशी जाणीव राहिलीच नाही. खरंच बेभान होऊन नृत्य करताना बाकी सगळं-सगळं ती विसरली. इतकी वर्षं, मनाच्या तळाशी दाबून ठेवलेलं स्वप्न आज पूर्ण होत होतं.
पूर्ण प्रेक्षागृह स्तब्ध होऊन तिचा अप्रतिम नृत्याविष्कार पहात होतं. तिचं नृत्य थांबलं तरी टाळ्या वाजवायचंही भान कोणाला राहिलं नव्हतं. एवढ्यात अचानक एक टाळी वाजली आणि वाजतच राहिली. तिने आवाजाच्या रोखाने बघितलं तर तिच्या सासूबाई उभं राहून तिच्यासाठी टाळ्या वाजवत होत्या. तिच्याविषयीचा अभिमान आणि कौतुक, एवढया लांबूनही, त्यांच्या चेहऱ्यावर झळकत असलेलं तिला दिसलं. मग मात्र तिच्या पाणावलेल्या डोळ्यांत पुढचं सगळं धूसर होऊन गेलं.
-समाप्त
तुम्हाला ही कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरु नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुपसुद्धा जॉईन करा.
-सौ. राधिका जोशी, पुणे
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
‘तिच्या जिद्दीला कोणतंही मोजमाप नसतं. तिची जिद्द, मग ती एका नृत्याची असू दे नाहीतर आभाळाला गवसणी घालणारी, त्यापुढे नतमस्तक व्हायला लावण्याची ताकद असतेच.
धन्यवाद !
खूप सुंदर. प्रत्येकीच्या मनात अशी एक तरी इच्छा असते अपूर्ण राहिलेली. ही कथा वाचताना स्वतःचीच इच्छापूर्ती करत आहोत असं वाटलं.
खूप खूप धन्यवाद!
फारच छान प्रेरणादायी कथा
खूप खूप धन्यवाद!
फारच छान! !! कथा सुंदर आणि सादरीकरण सुद्धा उत्तम. अगदी सुन सासू ह्यांच्या मनाचे विचार हुबेहूब जमलेत. नवरे पण जरा बायकोला जगासमोर तिची कला सादर करायला कचरतात.,पण सध्या नवरा बायको समान न्यायाने ही परिस्थिती थोडी बदलली असेल असं वाटतं. नसेल तर बदल व्हावा.
धन्यवाद!!
हल्लीच्या पिढीतल्या मुलींना हा प्रॉब्लेम येत नाही. सध्याच्या सासूबाई पण तितक्याच ‘कूल’ असतात. कथेची नायिका आता पन्नाशीची दाखवली आहे. त्या वेळेस बहुतेक जणींना आपल्या इच्छा पूर्ण करण्याएवढी संपूर्ण मोकळीक मिळत नव्हती, असं माझं निरीक्षण आहे.
खूप सुरेख .नेहमीसारखा वेगळा विषय
नात्यांमधली सकारात्मकता दाखवताना एक सुदृढ समाज घडवण्यासाठी आपण लेखन करूयात