संक्रांत विशेष मराठी कथा
आज जोशी वाड्यात धावपळ सुरू होती. अपर्णा जोशी. वय वर्ष सत्तरीच्या जवळपास. नामांकित पदवीधर कॉलेजमधून निवृत्त झालेल्या सगळ्यांचा आवडत्या प्रोफेसर. विषय ही तसाच आवडता मराठी साहित्य. प्रगत विचारांच्या. मनमोकळ्या आणि हसमुख. नेहमी प्रींटेड कॉटन कडक इस्त्रीची चापून नेसलेली साडी. एका हातात बांगड्या आणि एका हातात आवडीचं गोल्ड प्लेटेड वॉच. वयानुसार थोडीशी पांढरट चकाकी आलेल्या लांबसडक केसांची वेणी आणि दोन लाल गुलाब वेणीच्या एका बाजूला केसात माळलेले नेहमीच. रूंद कपाळावर लाल छोटसं कुंकू आणि गळ्यात नुसत्या काळ्या मण्यांचं लांब मंगळसुत्र. साध्या , खूपच मोकळ्या स्वभावाच्या जोशी मॅडम.
शरयू ही जोशी मॅडम यांची सून. कॉर्पोरेट क्षेत्रातील नामवंत कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर. एफिशियंट ,स्मार्ट, कॉन्फीडंट. सासू सुन नातच नव्हत त्या घरात. मैत्रीणी राहत आहेत असंच वाटतं होतं. जोशी मॅडम नी देव कुळाचार ह्याचा कधी स्तोम माजवला नव्हता. मनशांती करता आणि जे आपल्याकडे आहे त्याचे धन्यवाद मानण्यासाठी मनोभावे देवाची भक्ती करावी असे त्यांचे मत. त्या नास्तिक खचितच नव्हत्या. सकाळी देवाची पुजा अगदी साधेपणाने, शांतपणे त्या करत. पण देवाच्या नावखाली असलेल्या जाचक, अर्थहीन रूढी त्यांना मान्य नव्हत्या. त्या मानत आपण जे काही चांगले कर्म करू तेच कुळाचार. गरजूंना मदत करणे, माणुसकी जपणे, प्रत्येकाचा आदर करणे अशा सवयींनाच त्या कुळाचार मानत आणि तेच त्यांनी शरयू ला सांगितले. ती सुद्धा तिला जमेल तसे हे कुळाचार शिकण्याचा प्रयत्न करत होती. त्याचाच भाग म्हणून आजची तिची धावपळ.
“अग शरयू नक्की तुझ काय सुरू आहे हे. कसली एवढी धावपळ सुरू आहे.” जोशी मॅडम नी हाथ धरून शरयू ला बसवून विचारलं.

“अग आई, आज संक्रांत आहे ना. म्हणून हळदीकुंकू करते आहे त्या निमित्ताने. तसही नंतर मला वेळ मिळेल असं नाही ना. आज आयती सुट्टी मिळाली आहे तर त्याचा सदुपयोग करून घेते. आता हळदीकुंकू म्हटलं की सुवासिक फुल, तीळाचे लाडू, अत्तर, आणि पाहुण्यांना द्यायला वाण पाहिजे ना. त्याचीच धावपळ सुरू आहे. थोडी सजावट सुद्धा करून घेते. संध्याकाळपर्यंत सगळंच आवरून घेतलं पाहिजे ना म्हणून. ” शरयू ने मॅडम ना समारंभाची पुसट कल्पना दिली.
“अगं पण आपण कधीच करत नाही हळदीकुंकू. माहित आहे ना. म्हणजे केलं तरी हरकत नाही . पण मी हे असं घरी बोलवून हळदीकुंकू नाही करत त्याऐवजी एखाद्या संस्थेला भेट देऊन तेथील गरजूंना त्यांच्या ऊपयोगी वस्तू देते. एखाद्या वर्षी विद्यार्थ्यांना शालेय ऊपयोगी वस्तू देते… असं काही तरी ऊपयोगी वाण दरवर्षीच देते. पण तू.. म्हणजे नक्की काय करणार आहेस.” जोशी मॅडम म्हणाल्या.
“अग आई कळेलच तुला. आणि तू दिलेला संस्कारांचा वारसा जपला जाईल असंच वाण देणार आहे. बडेजाव किंवा मोठेपणा साठी नाही करत आहे हे हळदीकुंकू. फक्त संध्याकाळपर्यंत थांब. आणि हे वाण तूच देणार आहेस. म्हणजे तूच देऊ शकशील. मी फक्त मदत करेन तुला. चल माझी अजून बरीच तयारी बाकी आहे. ” असं म्हणत शरयू ऊठली आणि पुढच्या तयारीला लागली. आणि संध्याकाळी सगळ्यांनी तयार राहण्याचे सुद्धा आठवणीने सांगून गेली.
आता मात्र जोशी मॅडम ना ऊत्सुकता होती ती संध्याकाळची. संध्याकाळी सगळेच सुंदर तयार होऊन वाट बघत होते पाहुण्यांची. टेबलावर तीळगूळ, फुलं, हळदीकुंकू, अत्तर आणि वाण टेबलावर ठेवले. काही पाकिटं होती वाण म्हणून. शरयू सुद्धा वाट बघत असते. बराच वेळ जातो तरी पाहुणे येत नाहीत त्यावेळेस मात्र शरयूला सुद्धा टेंशन येऊ लागलं. ती विचार करू लागली की तीने जे योजलं आहे ते कार्ये सिद्धीस जाईल ना. तिची बैचेनी मॅडम च्या लक्षात आली. त्यांनी शरयू च्या हातावर हाथ ठेवून थोपटून तिला धीर दिला.
बर्याच वेळानंतर एक महिला घाबरत बिचकत घराच्या अंगणात घुटमळताना शरयू ने पाहिले. तिने बाहेर जाऊन त्या महिलेला हाथ धरून आतमध्ये आणले. ती महिला थोडी बावरलेली होती. जोशी मॅडम नी त्या महिलेला न्याहाळले. खूप साधी साडी नेसलेली अतिशय कृश अशी ती महिला होती. सगळ्यांच्या चेहर्यावरचे प्रश्न बघून शरयू ने स्वतःच त्या महिलेची ओळख सगळ्यांना करून दिली.
शरयू सांगू लागते, ” आई मी ओळख करून देते. ह्या आहेत भारतीताई. ह्या इथेच जवळच्या रस्त्यावर भाजी आणि फळं विकतात. सकाळी बसतात ते रात्री पर्यंत ह्या त्या रस्त्यावर बसलेल्या असतात. रोजची जी कमाई होते त्यातून त्या आपला संसारगाडा चालवतात. त्यांना दोन मुली आहेत. भारतीताई कधीही आपल्या मुलींना रस्त्यावर फळं विकण्यासाठी बसू देत नाही. कारण कळेलच तुम्हाला. पण मी त्यांची ही धडपड बघून रोज त्यांच्याकडून माझ्या आणि माझ्या ग्रुपसाठी फळं घेत असते. त्याच दरम्यान त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यातून मला त्यांच्या आयुष्यात त्यांची झालेली परवड समजली. ”
इतकं बोलून शरयू थांबली. जोशी मॅडम ऊठल्या आणि हळदीकुंकू लाऊ लागल्या. भारतीजींच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या. त्या ऊठून जोशी मॅडम आणि शरयू च्या पाया पडू लागल्या.
आणखी नवनवीन कथा वाचण्यासाठी लिंक वर क्लीच्क करा.
शरयू ने आणि जोशी मॅडम नी त्याना असं करण्यासाठी थांबवलं. त्यावेळेस भारतीताई बोलू लागल्या. “अहो मॅडम ह्या शरयू मॅडम नी आमच्या सारख्यांचा विचार केला हेच खूप आहे. त्या नेहमीच माझ्याकडून फळं विकत घेतात. ऊपकाराच्या भावनेने नव्हे तर आमच्या कष्टांचा मोबदला म्हणून. माझे पती एका गाडीवर चालक म्हणून काम करत होते. त्यांचा एक दिवशी अ*पघात झाला आणि कायमचे विकलांग झाले. हाताला काम नाही. दारिद्र्य होतं घरी. पोटाला अन्न हवं होतं. आपण आपल्या कुटुंबाची जबाबदारी पेलण्यास आता असमर्थ आहोत ह्या विचाराने माझे पती मनातून खचत गेले. आणि एक दिवस नैराश्यातून त्यांनी आतम्हत्या केली. मी मात्र खचले नाही. मी ठरवलं आपण काम करू. त्यानंतर ऊदरनिर्वाहासाठी मी घरोघरी जाऊन धुणीभांडी करू लागले . अश्याच एका ठिकाणी काम करत असताना एका नराधमाने माझ्यावर अत्याचार…..किती वेदना होत आहेत हे उच्चारताना सुद्धा . पण त्या वेदना सहन केल्या मी. शारिरीक, मानसिक, आणि सामाजिक सुद्धा. त्या घटनेनंतर मला कित्येकदा आत्म*ह*त्या करावीशी वाटली पण मुलींच्या विचाराने परत जिद्दीने ऊभी राहिले. पण समाजाने मात्र आम्हाला कधीच आपलंसं केलं नाही. नातेवाईकांनी सुद्धा पाठ फिरवली. मी ज्या संस्थेत राहून माझे ऊपचार पूर्ण केले, त्याच संस्थेने मला ह्या भाजी आणि फळविक्री साठी सुरवातीचे भांडवल दिले. त्यामुळेच मी माझा रोजचा उदरनिर्वाह करू शकते. संस्थेमधल्याच एका सरांनी एक झोपडी बघून दिली आहे आम्हाला राहण्यासाठी. दोन्ही मुलींना घेऊन मी तिथे राहते. माझ्यावर जो प्रसंग आला तो माझ्या मुलींवर येऊ नये. म्हणून मी मुलींना रस्त्यावर भाजी आणि फळं विकण्यासाठी बसू देत नाही. सगळेच चांगल्या मनाचे नसतात ना. त्या मुलींना मी वाईट नजरेपासून वाचवण्याचा प्रयत्न करते. कारण मुलींना बघून मदतीचं नाटक करून त्यांचा फायदा घेणारे कित्येक लांडगे आजूबाजूला वावरताना पाहते आहे मी. परिस्थितीने मला माणसं ओळखायला शिकवली आहेत. पण अजूनही अशा बर्याच जणी आहेत ज्यांना समाजातील चो*र, लांडगे कळतं नाही. फसतात बिचार्या. म्हणून मी मुलींना खूप सांभाळते. आता माझं एकच स्वप्न आहे. माझ्या दोन्ही मुलींना शिकवून चांगलं मोठं करायचं आहे. “
भारतीताईंचे बोलणे ऐकून सगळेच सुन्न झाले होते. शांतता मोडत मॅडम म्हणाल्या, ” खरंतर आमच्या सारखी ऊच्च भ्रू, एज्युकेटेड माणसं शहाणपणाचा मुखवटा घालून फिरत असतात. अत्या*चार करणारा नंतर सुसंस्कृत पणाचा मुखवटा ओढून वावरतो. आणि अत्या*चार झालेला आहे हे माहित असून त्या विरूद्ध बंड पुकारण्या ऐवजी अत्या*चार झालेल्यांनाच समाजबाह्य करतो. तुमच्यासारख्यांना समाजात मान्यता देताना मात्र सुशिक्षित सुसंस्कृत पणाचा मुखवटा गळून पडतो. ती मान्यता देण्याची हिंमत आमच्यात नसते. म्हणून तुमची परवड होते. आणि त्यासाठी आम्हीच तुमची माफी मागितली पाहिजे. पण आज शरयूमुळे आम्हाला एक संधी मिळत आहे. एक पाऊल टाकून आम्ही सामाजिक विचारशैलीत बदल आणण्याचा प्रयत्न करत आहोत इतकचं. आमचे आभार मानू नका भारतीताई. ”
शरयू म्हणाली, ” आई आज ह्यांना बोलावण्याचे हेच कारण आहे. समाजप्रवाहात ह्यांना आणण्यासाठी, ह्या विषयावर समाजप्रबोधन करण्यासाठी मी आज ह्यांना बोलावले आहे. आई हळदीकुंकू चं वाण देतेस ना त्यांना.” मॅडमनी टेबलावर बघितले. पण वाण दिसत नव्हतं. त्यांच्या चेहर्यावरचे भाव ओळखून शरयू ने एक पाकीट त्यांच्या हातात दिले. आणि म्हणाली. ” आई मी ह्यांच्या दोन्ही मुलींचे ॲडमिशन चांगल्या शाळेत केले आहे. हे पाकीट तू तुझ्या हाताने दे. आणि त्याच बरोबर त्यांना शाळे साठी लागणारे सर्व साहित्य दे . आता त्यांची जबाबदारी आपण घेत आहोत. ह्या पाकिटातून शाळेच्या प्रवेशाची पावती, पुस्तकांची पावती आणि गणवेषाची पावती आहे.
काय आहे की नाही समाजप्रबोधन वाण. आणि आई फक्त ह्यांनाच नाही बोलावले आहे हळदीकुंकू साठी. अहो रस्त्यावर झाडू मारणाऱ्या , कचरा गोळा करणाऱ्या काही महिलांना बोलावले आहे. आपल्याच एरिया मधल्या आहेत. रोज आपण त्यांना पाहतो. ऊरलेले शिळे अन्न देतो. जुने फाटलेले कपडे देतो. पण कधीही घरात बोलवून खायला ताजं अन्न देत नाही.
नाही सगळाच दोष आपला नाही. कारण काही जण गरीब असल्याचा दावा करून मुलांच्या शिक्षणाचे कारण सांगून किंवा दवाखाना, हॉस्पिटल वगैरे कारण सांगून पैसे घेतात आणि मग ते पैसे कुठेतरी अनावश्यक आणि चुकीच्या ठिकाणी खर्च करतात. घरात घेतल्यावर काही बायका चो*री करतात. त्यामुळेच आपण सुद्धा अंतर ठेवून राहतो. मनातून त्यांच्यासाठी करण्याची इच्छा असते. पण ह्या अश्या प्रकारांना घाबरून आपण मदत करत नाही. त्यासाठीच मी आज अशाच महिलांना बोलावले आहे ज्यांना खरंच गरज आहे. त्यापेक्षा ही ज्या प्रामाणिक आहेत. त्या सर्व महिला येतील आता. भारती ताई तुम्ही जाऊन सांगा त्यांना निर्धास्त होऊन या म्हणावं हळदीकुंकू साठी. निसंकोच मनाने. आम्ही वाट बघत आहोत त्यांची. “
भारती ताई नी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानले आणि त्या निघाल्या. त्या गेल्यानंतर इतका वेळ गप्प बसलेला अनिकेत शरयू ला म्हणाला. “अगं शरयू तुझा ऊपक्रम स्तुत्यच आहे. आणि मला तुझा अभिमान सुद्धा आहे. पण ही जी तू मदत त्यांना करत आहेस ती पैशांच्या स्वरूपात नको करूस. कारण त्यांना सहज फसवून ते पैसे लुबाडणारे सुद्धा बरेच त्यांच्या आजूबाजूला आहेत हे विसरू नकोस. कारण ही माणसं प्रामाणिक असतात तसंच ती निरागस, भोळी सुद्धा असतात. त्यांना ह्या जगाने नेहमीच फसवलेले असते. त्यामुळेच आपली जबाबदारी जास्त आहे की त्यांना जे द्यायचे आहे त्याचा ऊपयोग त्यांना पूर्णपणे व्हावा. ह्याचाही विचार कर.”
शरयू ने मान डोलावत त्याला संमती दर्शविली आणि म्हणाली, ” ह्याचा विचार मी केला आहे. ज्यांना शिक्षण घ्यायचे आहे, शाळेत जायचे आहे त्यांचे ॲडमिशन फी आणि पूर्ण वर्षाची फी थेट शाळेच्या अकांऊड मध्ये जमा होईल. शालेपयोगी वस्तू त्यांना पुरवल्या जातील. शाळेचे गणवेष त्यांना महिला गटातून शिवून मिळतील. ह्या टेबलावर असलेल्या पाकिटात फीची, गणवेषाची, पुस्तकांची पावती आहेत. कुठेही पैसे त्याच्या हातात देण्याचा प्रश्नच येत नाही. मी सगळं व्यवस्थापन
केले आहे. मला फक्त तुमची सोबत आणि आईबाबांचा आशिर्वाद आणि मार्गदर्शन हवे आहे.”
जोशी मॅडम नी तिला जवळ घेत कौतुकाने तिला थोपटले. आणि म्हणाल्या ” बापरे मला माहितच नव्हत आमच्या सूनबाई आमच्या एक पाऊल पुढे आहेत. खूप छान योजले आहेस तू. खरंच खऱ्या अर्थाने हळदीकुंकू चा उद्देश्य साध्य झाला. अशा स्त्रीयांना तू बोलावलेस ज्यांना घरात घ्यायला समाज कचरतो. पण तुझ्यामुळे आज नवीन पायंडा पडेल. एकमेकांना मान देण्याचे , भेटण्याचे उद्दीष्ट असते ह्या हळदीकुंकू ने साध्य झाले. मला तुझा खूप अभिमान आहे. माझ्या संस्कारांचा वारसा तू नक्कीच पुढे नेशील ह्याची आज खात्री झाली मला. “
त्यानंतर सर्व घर हसतखेळत हळदीकुंकूच्या समारंभात आलेल्या त्या महिलांच्या आगतस्वागत मध्ये गढून गेले. एक वेगळे हळदीकुंकू…..
हि कथा कशी वाटली आम्हाला जरूर कमेंट करून कळवा आणि अश्याच नवनवीन कथा वाचण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
लेखिका – पुजा सारंग, मुंबई.
(या मराठी कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. लेखिकेने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईट ला दिली आहे )
असे उपक्रम करून समाज प्रबोधन होणे गरजेचे आहे…जरा वेगळा विचार करू…नवीन प्रथा रुजवू….
हो नक्कीच. धन्यवाद तुमच्या अभिप्रायाबद्दल. 🙏🏻
हो नक्कीच. अभिप्रायाबद्दल धन्यवाद मॅडम 🙏🏻
साधी…सरळ ..प्रवाही ..छान आहे कथा..!!
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..!
धन्यवाद मॅडम तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल आणि अभिप्रायाबद्दल 🙏🏻
अतिशय सुंदर कथा. एक नवा स्तुत्य उपक्रम समजला
हो असे ऊपक्रम होणे आणि ते सुरू ठेवणे गरजेचे आहे. धन्यवाद मॅडम अभिप्रायाबद्दल 🙏🏻
अतिशय सुंदर कथा, असे परिवर्तन समाजात झालेच पाहिजे.
हो. नक्कीच. अभिप्रायाबद्दल धन्यवाद मॅडम 🙏🏻
खूप छान प्रबोधनपर कथा👌👌
हो. नक्कीच. अभिप्रायाबद्दल धन्यवाद मॅडम 🙏🏻
ekdum sundar story lihili aahe👌🏻
धन्यवाद 🙏🏻
chhan katha