ऋणी
आत्या गेल्याची बातमी ऐकून भार्गवी एकदम सुन्न झाली. आपल्या आत्याचे जीवन कायम कष्टातचं गेले आणि आता तर रत्नाच्या दुःखामुळे ती आणखीनचं खचली होती त्यातचं तिचा मृ*त्यू झाला. आत्या तर गेली पण तिच्यामागे रत्नाचे कसं होईल या विचाराने भार्गवीला रत्नाची काळजी वाटू लागली. शेवटी तिने एक गोष्ट मनात ठरवली आणि ती गोष्ट तिच्या पतीला म्हणजेचं शशांकरावांना सांगितली.
” अहो ! मी एक निर्णय घेतला आहे. तुम्ही जर कुठला आक्षेप घेणार नसाल तर सांगते.”
” हो ! सांग ना. तुझ्या विरोधात मी कधीतरी जाऊ शकतो का ?” शशांकराव मिश्किलपणाने बोलले.
” मस्करी नको. खूप अवघड निर्णय घेतला आहे मी. माझी आतेबहीण रत्ना आहे ना ? तिच्यावर लहान वयात नको नको ते प्रसंग आले आहेत. माझी आत्या रत्नाच्या दुःखाने गेली. आता रत्ना अगदी पोरकी झाली आहे. तिला जर आपण आपल्या घरी आणलं तर तिला आपला आधारचं मिळेल आणि मलाही तिची सोबत होईल.” भार्गवी म्हणाली.
” हो ! रत्नाच्या आयुष्यात खूपचं वाईट प्रसंग आले आहेत ठाऊक आहे मला. तू रत्नाला घेऊन ये आपल्या घरी. तसंही मी ऑफिसमध्ये असतो आणि तुझी कौस्तुभमुळे खूप धावपळ होत असते. रत्ना आली की तुला तिची सोबत होईल.” शशांकराव म्हणाले.
शशांकरावांनी तिच्या निर्णयाला दुजोरा दिल्यावर भार्गवीच्या डोळ्यांपुढे रत्नाचा जीवनपट उभा राहिला. रत्ना नावाप्रमाणेचं अगदी रत्नासारखी होती. रत्नाचे वडील तिच्या लहानपणीचं निधन पावले होते. तिच्या आईने कष्ट करून तिचा सांभाळ केला होता. सातारा जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात मुलींना बारावीपर्यंत शिक्षणाची सोय असल्याने रत्नाचे बारावीपर्यंत शिक्षण झाले होते. रत्नाला पुढे शिकण्याची खूप हौस होती; पण आईला एकटीला सोडून शहरात शिक्षण घेण्यासाठी जायला लागेल ह्यासाठी तिने आपल्या मनाला मुरड घातली.

रत्नाच्या सौन्दर्यावर भाळून गावातील मोठी आसामी असलेल्या सरदेशमुख घराण्यातील धाकट्या मुलाने अशोक याने रत्नाच्या आईकडे रत्नासाठी लग्नाची मागणी घातली. रत्नाची आई आणि रत्ना असे तालेवार स्थळ स्वतः चालून आल्याने दोघी हरखून गेल्या होत्या. अशोकरावांच्या आईला गरीब घराण्यातली रत्ना सून म्हणून पसंत नव्हती; पण लेकाच्या हट्टापुढे त्यांचे काही चालले नाही.
सरदेशमुखांच्या मोठ्या वाड्यात अशोक, त्यांची आई, त्यांचा मोठा भाऊ, वहिनी, भावाची दोन लहान मुले आणि काही नोकरमाणसे राहत असत. अशोकरावांच्या घरात साक्षात लक्ष्मी पाणी भरत होती.
रत्ना सरदेशमुखांच्या घराचा उंबरठा ओलांडून वाड्यात आली. एवढं मोठं वैभव पाहून तिला स्वतःच्याचं नशिबाचा हेवा वाटला. लग्नानंतर आठ – दहा दिवस सत्यनारायणपूजा, जागरण गोंधळ आणि देव देव करण्यात गेले. पाचपरतावण्यासाठी ती दोन दिवस माहेरी राहून आली त्यामुळे अशोकरावांचा सहवास तिला जास्त लाभला नव्हता. अशातचं लग्नानंतर कामासाठी म्हणून शेजारच्या गावात जाताना अशोकरावांच्या गाडीचा भीषण अ*पघात झाला आणि तिथल्या तिथे त्यांचा मृ*त्यू झाला.
रत्नाच्या हातावरची मेहंदी देखील उतरली नव्हती आणि एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. लग्नानंतर पंधरा दिवसांतच केवळ वयाच्या विसाव्या वर्षी रत्नाला वैधव्य आले आणि तिला सासरच्यांनी अपशकुनी ठरवले. घरातली धाकटी सून असूनदेखील रत्नाला मोलकरणीचा दर्जा मिळाला. नशिबाने रत्नापुढे हा प्रसंग आणून ठेवला होता. रत्नाची रवानगी वाड्यातील एका अडगळीच्या खोलीत करण्यात आली.
एके दिवशी रात्री तिच्या खोलीचे दार उघडून कोणीतरी शिरले आणि तिचे तोंड घट्ट दाबून ठेऊन तिच्यावर अ*ति प्रसंग केला. ती समजली होती की ते तिचे मोठे दीर दादासाहेब होते. तिने त्यांना प्रचंड विरोध केला; पण दादासाहेबांच्या आडदांड शरीरयष्टीपुढे तिचे काहीचं चालले नाही. तिचा पूर्णपणे उपभोग घेऊन दादासाहेब तिच्या खोलीबाहेर पडले. रात्रभर रत्ना वेदनेने आणि शील गमावल्याच्या दुःखाने आसवे गाळत राहिली होती.
सकाळी मोठ्या जावेने तिची अवस्था पाहून लागलीच ताडले. तिने रत्नाच्या कानफटात लगावली आणि बोलली की, ” आताच्या आता ताबडतोब इथून निघून जा. तू रोजचं तोंडीलावणं होशील आणि तुलाही तुझी शारी*रिक भूक मिटवण्याची सवय लागेल.”
मोठ्या जावेच्या त्या वाक्याचा अर्थ तेव्हा रत्नाला समजला नाही परंतु लाज, भीती, वेदना, काळजी, दडपण, दुःख, प्रतारणा यांचा कडेलोट झाला आणि तिने तिच्या माहेरचा रस्ता धरला. आत्याने रत्नाची अवस्था पाहून अंथरूण धरले आणि काही महिन्यांतच तिने जगाचा निरोप घेतला. आता रत्ना एकदमचं पोरकी झाली होती. भार्गवीला रत्नाची काळजी वाटल्याने तिने रत्नाला आपल्या घरी आणले. भार्गवीचा पुण्यात बंगला होता. भार्गवीचे पती शशांकराव हे स्वभावाला अतिशय चांगले होते. त्यांचे त्यांच्या पत्नीवर अतोनात प्रेम होते. त्या दोघांच्या संसारवेलीवर नुकतेचं कौस्तुभरुपी फूल उमलले होते.
दिवसांमागे दिवस भरभर जात होते. रत्ना भार्गवीताईला घरकामात मदत करत असे. छोट्या कौस्तुभची देखभाल देखील मोठ्या मायेने करत असे. रत्नाचा दिवस कौस्तुभशी खेळण्यात, त्याचा अभ्यास घेण्यात, घरकामात निघून जायचा; पण रात्र ?
रात्रीच्या वेळी ताई आणि भाऊजींच्या बंद खोलीकडे पाहून रत्ना उसासे सोडायची. कित्येक रात्री शरीरात वणवा पेटायचा. तो वणवा शांत करण्यासाठी रत्ना रात्री अपरात्री डोक्यावरून थंडगार पाणी घेत असे. शरीर आक्रंदायचं पण मन मात्र ताब्यात होतं. मोठ्या जावेच्या त्या वाक्याचा अर्थ रत्नाला आता उमजला होता.भार्गवीला रत्नाची मानसिकता समजत होती म्हणूनचं रत्नाच्या पुनर्विवाहासाठी तिने खूप धडपड केली; पण रत्ना लग्नानंतर केवळ पंधरा दिवसांत विधवा झाली आहे असे समजल्यावर कोणीही तिच्याशी विवाह करण्यास धजत नव्हते. शेवटी एके दिवशी रत्ना तिच्या ताईला म्हणाली की, ” ताई ! नको माझ्या लग्नासाठी इतकी खटपट करुस. माझ्या नशिबात विवाहसुखचं नाही असे मी समजेन. तुम्ही दोघांनी मला आश्रय दिलात त्याबद्दल मी सदैव तुमची ऋणी राहीन. मी तुमच्यातली चटणीभाकरी खाईन, तुला घरकामात मदत करेन; पण फक्त एक गोष्ट माझ्यासाठी करा ती म्हणजे मला कधीचं अंतर देऊ नका.”
रत्नाने भार्गवीच्या उपकाराची फेड म्हणून ताईसाठी तिचे जीवन अर्पण केले आणि स्वतःला आणि मनाला बंदिस्त केले. भार्गवीने वयाची अवघी पंचेचाळीशी गाठल्यावर तिला ब्लड कॅन्सरचे निदान झाले. दोन वर्षे रत्नाने ताईची मनोभावे सेवा केली. भार्गवी काही त्या आजारपणात वाचू शकली नाही आणि वीस वर्षाच्या कौस्तुभला पोरके करून ती जग सोडून गेली. ताईच्या निपचित पडलेल्या देहाकडे पाहून रत्नाला आपले पुढचे भविष्य काय याची चिंता निर्माण झाली. ताई होती तोवर ह्या घराचा आश्रय होता आता पुन्हा ती पोरकी झाली होती. ताईचे मरणोत्तर कार्य झाल्यावर एक महिन्याने रत्नाने गावी जाण्याचा निर्णय घेतला. खरंतर गावाला आईचे पडीक घर तेवढाचं काय तो आता आधार होता. तब्बल वीस वर्षे ताईच्या घरी एखाद्या व्रत घेतलेल्या संन्याश्याप्रमाणे रत्ना राहिली.
रत्ना गावी जायला निघाल्यावर शशांकरावांनी तिला अडवले आणि तिला लग्नाची मागणी घातली. भाऊजींच्या प्रस्तावाने रत्ना एकदम गडबडून गेली असता शशांकराव तिला म्हणाले, ” रत्ना ! भार्गवीला तिचा काळ जवळ आलेला समजला होता तिने जाण्याआधी तुझ्याशी लग्न करण्याचे माझ्याकडून वचन घेतले. रत्ना ! माझं खूप प्रेम होतं भार्गवीवर. मी दुसऱ्या लग्नाचा विचारही करणार नव्हतो; पण भार्गवी मला म्हणाली की रत्नाला आपल्याशिवाय ह्या जगात कोणीही नाही. लहान वयात तिला किती यातना सहन कराव्या लागल्या आहेत याची मला जाणीव आहे. तिला नशिबाने विवाहसुखचं नाही मिळाले; पण तिला ह्यापुढे भविष्यात सगळी सुखं मिळावी ह्यासाठी मी तुम्हाला तिच्याशी लग्न करायला सांगत आहे. तिच्याशी लग्न करून तिला पत्नीचा दर्जा द्या.”
” पण कौस्तुभ ? त्याचं काय ? तो तयार होईल ह्या गोष्टीसाठी ?” रत्नाने विचारले.
” हो ! कारण भार्गवीने त्याच्याकडून देखील तसचं वचन घेतले आहे त्यामुळे त्याचा कुठलाही आक्षेप नसेल.”
दोघांचे बोलणे चालू असता एवढ्यात कौस्तुभ तिथे आला आणि म्हणाला, ” हो मावशी, तू माझी आई झालेली चालेल मला. तसेही मी लहान असल्यापासून तू मला पोटच्या मुलाप्रमाणे मोठ्या मायेने वाढवलेस. मावशी असून आईसारखे जपलेस. मग तू माझी आई का होऊ शकत नाहीस ?”
कौस्तुभचे शब्द ऐकून रत्नाला भरून आले आणि ती बोलली की,” ताईमुळे मला ह्या घरात आश्रय मिळाला. ताईने आणि तुम्ही दोघांनी मला कधीचं परकेपणा जाणवू दिला नाही. तुमच्या सगळ्यांचे माझ्यावर किती उपकार आहेत. तुमचे उपकार ह्या जन्मात तरी माझ्याकडून फेडले जाणार नाही. जन्मभर तुमची ऋणी राहीन मी.”
” उपकाराची भाषा नको मावशी. तू देखील आईच्या बरोबरीने मला आणि ह्या घराला घडवले आहेस त्यामुळे तू स्वतःला कमी समजू नकोस. आईच्या अंतिम इच्छेनुसार तू माझी आई बनून ह्या घराला पुन्हा सावर. आम्हाला दोघांना तुझी, तुझ्या प्रेमाची गरज आहे.”
कौस्तुभचे बोलणे ऐकून रत्नाचा बांध फुटला. तिने कौस्तुभला घट्ट मिठी मारली. रत्नाच्या डोळ्यांतील अश्रू अनावर झाले होते. कौस्तुभ तिला मायेने थोपटत राहिला. एकवार त्याने त्याच्या आईच्या फोटोकडे पाहिले असता त्याच्या आईच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य झळकत असल्याचा त्याला भास झाला. Marathi Katha2024
समाप्त
तुम्हाला कि कथा कशी वाटली अश्या नवनवीन कथांसाठी आमच्या चानेल ला फोल्लो करा आणि website ला भेट द्या.
लेखिका – सौ. नेहा उजाळे,ठाणे
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. लेखिकेने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखिकेच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
नेहा,अगं कसं सुचतं तुला!!अगदी धन्य आहेस👌👌 सर्व प्रसंग अगदी आटोपशीर पण मुद्दे ठसठशीत मांडले आहेस💐मस्त ,अशीच लिहीत रहा आणि आनंद वाट☺️
खूप आभार 😊🙏
खूप छान कथा लिहिली आहे. मला आवडली. कथेचे नावही समर्पक.
खूप आभार 😊🙏
खुप सुंदर लिहिली आहे. वाचताना प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर राहतो.
खूप आभार 😊🙏
वाचताना प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर राहतो. खुप छान.
खूप आभार 😊🙏
खूपच छान अगदी ओघवत्या शैलीत गोष्ट लिहिली आहे. खूप आवडली.👌👌👌
खूप आभार 😊🙏
नेहा खरं तु खूपच सुंदर मांडणी केली आहे.मनाला एकदम बांधुन गेली तुझी कथा.
खूप आभार 😊🙏
खूप छान👌👌
खूप आभार 😊🙏
कथा छान आहे. खरोखरच कौटुंबिक
नात्यांना न्याय देणारी. शीर्षक योग्यच
आहे.
खूप आभार 😊🙏
आपल्याला सुख मिळत असतं पण जिला ते मिळत नाही आशा स्त्री ची व्यथा मांडणारी कथा मांडलीस, खूप छान मांडणी
खूप आभार 😊🙏
खूप छान लिहिलेस.. कथा संपल्यावर समाधान असा शेवट केला आहेस
खूप आभार 😊🙏
नेहा खूपच सुंदर कथा लिहिली आहेस. रत्नाला शेवटी तरी सुखाचे दिवस आले
खूप आभार 😊🙏
खूप सुंदर.. कल्पनेला असेच बहरू द्या.
मनःपूर्वक आभार 😊🙏