मराठी कथा – सुविख्यात  वस्ताद मनोरंजक वळण

WhatsApp Group Join Now

कोकणातलं एक टुमदार गाव, गर्द हिरवी आमराई, नारळ पोफळीच्या बागा, अगदी चित्रात शोभावं असं प्रसन्न वातावरण होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक सुंदर स्वच्छ पांढऱ्या शुभ्र रेतीचा खळाळता समुद्रकिनारा गावाची शोभा वाढवत होता.

 निसर्गाचं वरदान असलेल्या या गावात छान छान फुलझाडे आणि भाजी असलेली परसबाग, प्रशस्त अंगण, गोठ्यात बांधलेली गोमाता आणि तिचं वासरु, टुमदार कौलारू घर असं राणे मास्तरांच छोटसं जग होत.

घरात मात्र फक्त दोनच माणसं. राणे मास्तर आणि त्यांची लाडकी कन्या. राणे मास्तर त्यांच्या कडक आणि शिस्तीच्या स्वभावासाठी प्रसिद्ध होते. पन्नाशीच्या जवळपास त्यांचं वय असेल. पण त्यांच व्यायामाने कसलेलं पिळदार शरीर तरुणालाही लाजवेल असं होतं. उंच धिप्पाड शरीरयष्टीमुळे ते चारचौघात उठून दिसत असत. त्यांच्या तत्वनिष्ठ आणि प्रामाणिकपणाची ख्याती पंचक्रोशीत पसरली होती. छोटीमोठी भांडणे घरातले वाद घेऊन लोक त्यांच्या घरी येत असत. राणे मास्तरांकडेच वादाचं समाधानकारक उत्तर सापडेल असा लोकांना विश्वास वाटत असे. ते सगळ्यांनाच जमेल तशी मदत करत असत. लोकांची त्यांच्यावर श्रद्धा होती.

गावाबाहेर समुद्राकाठी एक पुरातन दगडी मंदिर होतं. महादेवाची मोठी प्राचीन पिंड गाभाऱ्यात विराजमान होती. सकाळी सूर्याची कोवळी किरणे पिंडीवर पडत आणि एक विलक्षण अनुभूती देत. सभामंडपाची तर  गोष्टच निराळी. मंदिरात कोणत्याही दिशेने प्रवेश करता येत होता. तेथील कोरीव खांबांवर नजर खिळून राहत असे. गावातील कीर्तन प्रवचनाचे कार्यक्रम तिथेच होत असत. कितीही लोक आले तरी निवांत बसता येईल एवढी मोकळी जागा सभागृहात होती. मंदिराचा सुंदर कळस प्राचीन शिल्पांचा अप्रतिम नमुना होता. अनेक देवादिकांची चित्रे त्यावर कोरलेली होती. भक्कम दगडी बांधकाम  मंदिराच्या इतिहासाची साक्ष देत होतं. 

 शालिनीची ही सगळ्यात आवडती जागा होती. आध्यात्मिक वातावरणाची ओढ  तिला उपजतच होती. तासन् तास ती मंदिराच्या शांत प्रसन्न वातावरणात रमून जात असे. एकटक महादेवाच्या पिंडीकडे बघत ध्यानधारणा करत असे. 

सोबत आलेल्या मैत्रिणीं कंटाळल्या तर ती त्यांना सांगे तुम्ही घरी जा मी येते. दिवस दिवसभर देवाशी गप्पा मारायला तिला खूप आवडायचं जे जे आयुष्यात घडेल ते सगळं देवाला अर्पण करायचं आपण निवांत रहायचं, एवढं तिच सरळ साधं सोपं शास्त्र होतं आणि त्यामुळे ती नेहमी आनंदी असायची. त्यासाठीच  मंदिरात जाणं हा तिच्या आवडीचा कार्यक्रम होता.

शालिनी नावासारखीच शालिन मुलगी होती. ती सुद्धा वडिलांसारखीच तत्वनिष्ठ आणि प्रामाणिक होती. आई शिवाय वाढलेली लेक म्हणून गावातील बायाबापड्या तिला जीव लावत असत. घरी येणार्‍या स्वयंपाकीण मावशींकडून तिने  स्वयंपाकाचे अगदी मनापासून धडे घेतले होते. ती मुळातच तिच्या आईसारखी सुगरण होती. घावणे, खांटोळी, सांदण, मोदकं, सोलकढी, माशाचे कालवण, नारळी भात, येथपासून तर रोजच्या फोडणीच्या डाळभातापर्यंत ती सुग्रास जेवण बनवत असे. तिच्या या सुगरणपणाचं तिच्या बाबांना खूप कौतुक होतं.

कधी कधी मास्तर त्यांच्या लाडक्या कन्येला घेऊन समुद्रकिनारी फिरायला जात. तिथे ते तिच्यासोबत रेतीचे किल्ले बनवत तर कधी ते तिला शास्त्र पुराणातल्या गोष्टी सांगत तर कधी जगण्याचे तत्वज्ञान सांगत. एकूणच आपली मुलगी ज्ञानाच्या बाबतीत कुठेच कमी पडू नये म्हणून त्यांची धडपड असे. त्यामुळेच एवढ्या कमी वयात तिचं वागणं तिच्या वयाच्या इतर मुलींपेक्षा प्रगल्भ वाटत असे.

एके दिवस अचानक  रोजच्या वेळेस ती घरात आली नाही. मास्तर काळजीत पडले. सगळीकडे शोधाशोध सुरु झाली. मास्तरांना काय करावे सुचत नव्हते. एकुलती एक लेक. आई आणि वडील दोन्ही बनून त्यांनी तिला सांभाळले होते.

गावाबाहेरच्या समुद्राकाठच्या मंदिरात जिथे नेहमी मैत्रिणींसोबत दर्शनाला जायची तिथे सगळे बघून आले. मैत्रिणींसोबत संपर्क साधला. शाळेत बघितले. गावात सगळीकडे पोलिस पाटलाने शोध घेतला. सगळे गावकरी तिला शोधायला मदत करत होते. लेकीचा कुठेच तपास लागत नव्हता. मास्तरांचे प्राण कंठाशी आले होते. रात्रभर त्यांच्या डोळ्याला डोळा लागला नाही. दुसर्‍या दिवशी सकाळी टेबलावरचा टेलिफोन खणखणला. एरवी गावातले बर्‍याच लोकांचे फोन मास्तरांच्या घरी  येत असत कारण तेव्हा ठराविकच घरी क्वचितच घरी फोन असायचे.

रात्रभर जागून मास्तरांच्या डोळ्यांवर ग्लानी आली होती. फोनच्या आवाजाने त्यांची तंद्री भंगली आणि थरथरत्या हातांनी त्यांनी फोन उचलला.

एक राकट आवाज तिकडून आला, ” शालिनी आमच्या ताब्यात आहे आणि आम्हाला अमुक एक रक्कम त्या बदल्यात हवी आहे आहे तरच तुझी मुलगी जिवंत राहिल.” असं म्हणाला आणि त्याने जोरात फोन ठेवून दिला.

मास्तर घाबरले. त्यांना पैशाची कमी नव्हती आणि लेकीसाठी कितीही पैसा ओतायला ते तयार होते पण ती कोणाच्या ताब्यात आहे आणि तिच्या जीवाला धोका आहे हा विचार करूनच त्यांचे पाय गारठले होते. 

त्यांच्या डोळ्यासमोर जणू भूतकाळ पुन्हा उभा राहिला. शालिनीची आई देखील अशाच एका हल्ल्यात स्वतःचा जीव गमावून बसली होती. त्याची झळ अजून मास्तरांचा संसार भोगत होता आणि आज हे नवीन संकट त्यांच्या लाडक्या शालिनीचा जिवावर बेतलं होतं.

मास्तरांनी हवा तेवढा पैसा देण्याचं कबूल केलं आणि मंदिराच्या बाहेर ठरलेल्या रकमेचे गाठोडे नेऊन ठेवलं. 

तोंडाला काळ फडक गुंडाळून एक माणूस शालिनीला तिथे सोडून गेला आणि ते पैसे घेऊन गेला. हे सगळं  शिताफीने घडवून आणलं होत. तो पकडला जाऊ नये म्हणून त्याने ऐनवेळी शालिनीला पोचत करण्याची जागा बदलली आणि पोलिसांना हुल देऊन तो पळून गेला. 

लेक जिवानिशी धडधाकट घरी पोहचली यातच मास्तरांनी समाधान मानले देवाचे शतशः आभार मानले.  ते शालिनीला घेऊन ते घरी पोहोचले.

 त्या दिवसानंतर मास्तरांची राहणीमान विचार सगळ्यातच बदल  झाला. शालिनी आणि गावातल्या सगळ्यांनाच मास्तरांमधील हा बदल प्रकर्षांने जाणवत होता. गावात जरी सामान्य माणसांना वाईट प्रवृत्तीच्या माणसांकडून त्रास होत नसला तरी माजलेले सावकार, जमीनदार ह्यांच्या घरातील मात्र तिजोरी रिकामी होत होती. एक अज्ञात व्यक्ती हे काम करत होती त्यामुळे त्या व्यक्तीबद्दल आदर आणि दबदबा गावात निर्माण झाला होता.

 त्यानंतर मात्र गावात कुठे चोर हल्ला, दरोडेखोरी झाली नाही. भांडणतंटे देखील झाले नाही. सरकारकडून यासाठी तंटामुक्त गाव म्हणून बक्षीसही गावाला जाहीर करण्यात आलं.शालिनी आता बाजूच्या तालुक्याच्या गावी कॉलेजात शिकायला जाऊ लागली. एके दिवशी कॉलेजच्या एका आगाऊ मुलाने तिला छेडण्याचा प्रयत्न केला आणि नेमके मास्तर तिला घ्यायला गेले होते. 

मास्तर त्याला समजवायला गेले तर तो उद्धटपणे मास्तरांशी बोलत होता आणि काही केल्या ऐकेना आता मात्र मास्तर चिडले. त्याच्या दोन उलट कानाखाली लगावून त्याला मास्तरांनी फरफटत घरी आणला आणि एक फोन फिरवला त्या सरशी त्याची सारी माहिती त्यांना कळली.

शालिनी आश्चर्याने बघतच राहिली की बाबांना कोण एवढी मदत करते ? त्यांच्या एका फोनवर अशा अनोळखी माणसाची माहिती त्यांना कळू शकते. ती कशी काय ?

तिच्या प्रश्नावर त्यांनी दिलेल्या उत्तराने शालिनीच्या अंगावर सरकन काटा आला. कधीतरी तुला हे सांगायलाच हवं म्हणून मास्तरांनी तिला सगळं सांगितलं. गावागावात ज्या अज्ञात व्यक्तीची दहशत होती तो कुख्यात नव्हे तर सुविख्यात वस्ताद दुसरा तिसरा कोणी नसून तिचे बाबाच होते हे तिला कळलं.

 तिला हसावं की रडावं कळत नव्हतं. हा सुविख्यात वस्ताद मात्र पंचक्रोशीत सगळ्यांचा लाडका झाला होता कारण तो फक्त लोकांना त्रास देणारे सावकार, जमिनी  बळकावून घेणारे मोठमोठे जमीनदार आणि हो लोकांना विशेषतः स्त्रियांना त्रास देणाऱ्या गुं*डांना तो लुटत असे आणि तो पैसा गोरगरीबांना देत असे एवढच नाही तर वृद्धाश्रमात आणि अनाथाश्रमात दान देखील करत असे. तेव्हा या हादऱ्याने शालिनी घाबरली जरी असली तरी ती आतून कुठेतरी सुखावली होती आणि हे गुपित या दोघा बापलेकीने मनाच्या तिजोरीत दडवून ठेवून दिलं.

वर्षानुवर्ष नंतर पंचक्रोशीत कुठेही गैरवर्तन करण्याचे कुणाचंही धाडस झालं नाही. परिस्थितीने माणूस कितपत बदलू शकतो याच हे समर्पक उदाहरण आहे.

तुम्हाला ही कथा कशी वाटली, ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhtsApp ग्रुप हि जॉईन करा.

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)  

     धन्यवाद !

3 thoughts on “मराठी कथा – सुविख्यात  वस्ताद मनोरंजक वळण”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top