कथेचे नाव – सावर रे
” वेलकम मॅडम ! ही तुमच्या रूमची चावी. रूम नंबर 201. अरे रमेश, मॅडमच्या बॅगा त्यांच्या रूममध्ये नेऊन ठेव. मॅडम, रमेश तुमच्या बॅगा रूममध्ये ठेवेल. आपला दिवस शुभ जावो.” हॉटेलच्या मॅनेजरने चारुलताच्या हातात रूमच्या चाव्या देत म्हटले.
” ओके थँक्स.” असे म्हणून चारुलता लिफ्टकडे जाण्यास वळली. आता आपल्या आयुष्यात कुठला दिवस शुभ असणार ह्याचा विचार करून तिला मनातल्या मनात हसू आले. त्याच विचारात ती तिच्या रूममध्ये पोहोचली.
त्या हॉटेलमधली रूम काही साधीसुधी नव्हती. गोव्यातील फाईव्ह स्टार हॉटेलमधील रूम तिच्या लेकीने तिच्यासाठी बुक करून ठेवली होती. रुहीला ती म्हणाली की, ” अग मी तिथे एकटी जाऊन काय करू बापडी ? आपण केव्हातरी एकत्र जाऊया.” त्यावर रुही म्हणाली, ” अग आई ! मी मुद्दाम तुला एकटीला पाठवते आहे. संपूर्ण आयुष्य एखाद्या कोषात गुंफलंस. आजपर्यंत स्वतःचं मन मारून राहिली होतीस तर थोडं स्वतःसाठी जग.”
चारूलता फ्रेश झाली आणि तिने स्वतःसाठी रूममध्ये सँडविच मागवले. सँडविच खाऊन तिने बिछान्यावर अंग टाकले. सकाळपासूनच्या प्रवासाने तिला झोप लागली. जागी झाली तेव्हा संध्याकाळ झाली होती. तिच्या रूममधील खिडकीतून अथांग समुद्र दिसत होता. रूममध्येच कॉफी मागवून कॉफीचा घोट घेत घेत ती टक लावून सूर्यास्त पाहत होती. आज कितीतरी दिवसांनी निसर्गाच्या निकट ती आली होती. इतक्यात रूममधील फोन वाजला, ” मॅम ! आज रात्री हॉटेलमध्ये लाईव्ह ऑर्केस्ट्रा आहे. लतादीदी, आशादीदी, रफी साहेब यांच्या हिंदी, मराठी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. तर प्लिज डिनरसाठी ठीक आठ वाजता आपल्या डायनिंग हॉलमध्ये जरूर या.” हॉटेलचा मॅनेजर म्हणाला.
‘ गाणी ? नृत्य आणि संगीत म्हणजे माझा जिव्हाळ्याचा विषय. कित्येक वर्षे झाली ह्या गोष्टींना आपण आपल्या जीवनातून हद्दपार केले होते. सगळ्या आवडीनिवडी मनाच्या कोपऱ्यात बंदिस्त करून ठेवल्या. आता पुन्हा त्यात जीव गुंतवावा की नाही समजत नाही. तसंही आता कुठलीही बंधने उरली नाहीत आणि तिथे जाऊन मी केवळ गाणी ऐकणार आहे. थोडीच गाणार आहे ? लेकीने तर सांगितले आहे आता स्वतःसाठी जग. इतक्या वर्षांनी गाणी ऐकायला मला नक्कीच आवडतील.’ चारुलताच्या मनात द्वंद्व सुरू होते.
साडेसात वाजता लताने आवरायला घेतले. प्लेन निळी साडी, मोत्यांची माळ आणि मोत्यांचे कानातले तिने बॅगमधून काढले. रुहीने आपल्या आईसाठी कपडे आणि त्याला साजेसे दागिने खरेदी केले होते. मनात असंख्य वेळा लेकीचे आभार मानत लता तयार झाली. हलकासा मेकअप करून स्वतःचं रूप आरशात पाहून मनोमन सुखावली. आज जवळपास तीस वर्षांनी इतकी छान ती तयार झाली होती.
डायनिंग हॉलमध्ये पोहचली तेव्हा सगले लोक उत्साहाने आपापल्या टेबलवर बसले होते. तेवढ्यात एक अनाऊन्समेंट झाली, ” वेलकम लेडीज अँड जंटलमन. मी देवदत्त पिंगळे. ‘ आनंदघन ‘ ऑर्केस्ट्राचा होस्ट. आशा करतो की आपणा सर्वांना आमचा कार्यक्रम निश्चितच आवडेल. आज आम्ही आमच्या कार्यक्रमात मोठा बदल करणार आहोत तो म्हणजे आम्ही प्रेक्षकांच्या पसंतीचे गाणी सादर करणार आहोत. आपल्या टेबलजवळ कागद आणि पेन घेऊन मुले येतील. आपण फक्त त्यावर आपल्या आवडीच्या गाण्याची ओळ, आपले नाव आणि आपल्या शहराचे नाव लिहायचे. आम्ही तुमच्या चिठ्ठयांनुसार गाणी सादर करू. केवळ लताताई, आशाताई आणि रफी साहेब यांची मराठी, हिंदी गाणी असावीत. आमचे गायक कायम ठरलेली गाणी गातात. आज त्यांची देखील परीक्षाच आहे नाही का ? पाहूया आमचे गायक आपणा श्रोत्यांच्या पसंतीस उतरतात का ? चला तर मग, तयारीत राहा. आपल्या डिनरसोबत बहारदार कार्यक्रमाचा आस्वाद घ्या आणि प्रत्येक गाण्याला तुम्हा श्रोत्यांकडून टाळ्यांचा वर्षाव झालाच पाहिजे ही विनंती करतो आणि गणेशवंदनाने आपला कार्यक्रम सुरू करतो.’
लताच्या टेबलजवळ एक मुलगा कागद आणि पेन घेऊन आला. लताला समजेना कुठल्या गाण्याची फर्माईश करू ? शेवटी तिने त्या मुलाला ‘ नो थँक्स ‘ असे म्हटले. गणेशवंदना झाल्यावर सुरू झाली एकापेक्षा एक सुरेल गाणी. जमलेला प्रेक्षकवर्ग देखील रसिक आणि चोखंदळ होता. अनेक हिंदी, मराठी दर्जेदार गाण्यांनी वातावरण भारावून गेले होते. प्रत्येक गाणे संपल्यावर टाळ्यांचा कडकडाट होत होता. गायकांना प्रेक्षक भरभरून दाद देत होते. लता देखील प्रत्येक गाण्यामध्ये समरस झाली होती.
” आता ह्या कार्यक्रमातील शेवटचे गाणे. लतादिदींचा आवाज लाभलेले हे सुमधुर मराठी गीत ऐका. ह्या गाण्याची फर्माईश केली आहे ‘ बंगलोर येथे स्थायिक असलेले श्री. अनिकेत राणे यांनी.’
अनिकेत राणे हे नाव ऐकूनच लताचे मन चरकले. ती मनात म्हणाली की, एकाच नावाच्या आणि आडनावाच्या कितीतरी व्यक्ती असतात. तिच्या मनात हा विचार चालू असताना गाणे सुरू झाले, ‘ सावर रे, सावर रे, सावर रे, उंच उंच झुला, उंच उंच झुला, सुख मला भिवविते सांगू कसे तुला ‘ हे गाणे सुरू झाल्यापासून लताचे मन आता ताब्यात राहिले नव्हते. मनाची चलबिचल झाली होती. तिचे डोळे अनिकेतला शोधत होते. आता मात्र तिला खात्री पटली होती की हा माझाच अनिकेत आहे ज्याच्यावर मी जिवापाड प्रेम केले होते.
गाणे संपले तरी देखील लता भिरभिरत्या डोळ्यांनी अनिकेतला शोधत राहिली होती. ” अनिकेत सर ! तुमची गाण्याची चॉईस माईंड ब्लोइंग आहे. हे गाणे गाताना आमच्या गायिकेचा कस लागला.” देवदत्त म्हणाला त्यावर अनिकेतने उभे राहून त्याचे आभार व्यक्त केले. अनिकेत समोर दिसल्यामुळे लताच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. नेमका अनिकेत तिच्या बाजूला तिला येताना दिसला. तिला त्यावेळी काय करावे हे सुचेना. अक्षरशः एका पुतळ्याप्रमाणे ती तिथेच थिजून उभी राहिली.
” भक्ती ! तू इथे कशी ? कशी आहेस तू ? किती वर्षांनी भेटतो आहोत आपण.” अनिकेतने आश्चर्याने विचारले.
” मी ठीक आहे. माझ्या लेकीने मला गोवा फिरायला पाठवले आहे. तू कसा आहेस आणि इथे कशाला आला आहेस अनिकेत ?” लताने विचारले.
” मी सुद्धा ठीक आहे. पाच दिवसांनी एक महत्त्वाची मिटींग आहे त्यासाठी आलो आहे. लेक म्हणाला पप्पा चार दिवस गोवा फिरून घ्या. त्यानेच हॉटेलमध्ये रूम बुक केली म्हणून मी इथे आलो आहे. पण किती योगायोग आहे बघ ना ? आपल्या मुलांनी आपल्याला फिरायला पाठवले. सो ! तुझे मिस्टर आले आहेत का तुझ्याबरोबर ?” अनिकेतने विचारले.
” ते दीड वर्षांपूर्वी गेले. मी एकटी आले आहे. तुझी मिसेस आहे का तुझ्याबरोबर ?” लताने विचारले.
” नाही. तिने माझ्या आदित्यला जन्म दिला आणि मला सोडचिठ्ठी. बरं ते जाऊदे. गोवा एकटी फिरणार आहेस की माझी कंपनी चालेल तुला ?” अनिकेतने विचारले.
” हो अनिकेत नक्कीच आवडेल.” लता म्हणाली. दोघे बोलत बोलत आपल्या रूमकडे जाण्यास निघाले. योगायोगाने दोघांची रूम बाजूबाजूला होती. लताने कपडे बदलून बिछान्यावर अंग टाकले; पण आता तिला जरादेखील झोप येत नव्हती. अनिकेत असा अचानक समोर आल्याने नकळत ती भूतकाळात शिरली.
चारुलता नायक म्हणजेच पूर्वाश्रमीची भक्ती कामत. भक्तीच्या वडिलांचा हॉटेलचा व्यवसाय होता त्यामुळे लक्ष्मी त्यांच्या घरात पाणी भरत होती. भक्तीला गाण्यांची प्रचंड आवड. तिचा गळा देखील गोड असल्याने ती एका ख्यातनाम गुरुजींकडे गाणे शिकावयास जायची. कॉलेजमध्ये असताना स्पर्धेमध्ये तिने ‘ सावर रे, सावर रे, उंच उंच झुला ‘ हे गाणे म्हटले होते. तर अनिकेतने ‘ रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा, संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा ‘ हे गाणे गायले होते. अर्थातच दोघांनाही पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले होते. दोघेही एकमेकांच्या आवाजाचे चाहते झाले. गाण्याच्या निमित्ताने दोघांची वारंवार भेट घडू लागली. त्या भेटींचे प्रेमात कधी रूपांतर झाले हे दोघांनाही समजले नाही. दोघांच्या आवडीनिवडी सारख्या असल्याने दोघांच्या मनाच्या तारा जुळल्या होत्या.
इथे भक्तीच्या वडिलांना तिच्या प्रेमाची कुणकुण लागली असल्याने त्यांना अनिकेतसारखा मध्यमवर्गीय मुलगा जावई म्हणून पसंत नव्हता. त्यांनी लगेच भक्तीचे लग्न त्यांच्याच क्षेत्रातील मित्राच्या मुलाशी म्हणजेच चारुहास नायकसोबत लावून दिले. कु. भक्ती कामत सौ. चारुलता नायक झाली. नायक घराणं म्हणजे अतिशय कर्मठ होते. घरातील स्त्रियांनी कामाशिवाय बाहेर पडायचे नाही, घरात मोठ्यांदा बोलायचे नाही, मोठ्यांदा हसायचे नाही, गाणी गायची नाहीत, सुनांनी ड्रेस घालायचे नाहीत, मासिकधर्मात चार दिवस बाजूला बसायचे अशी अनेक जाचक बंधने होती. नायक घराण्याचं फिरायला जाणे म्हणजे फक्त नातेवाईकांच्या लग्नाला किंवा इतर कार्यक्रमांना जाणे. बाकी कुठे दुसरीकडे त्यांना फिरणे सुद्धा माहीत नव्हते. लताने आपल्या गाण्याची, नृत्याची, निसर्गाच्या सानिध्यात फिरण्याची आवड मनातल्या कोपऱ्यात बंदिस्त केली. सगळ्या इच्छा, आशा, अपेक्षा आणि आवड यांना मुरड घालून नायकांच्या बंधनात तिने स्वतःला गुरफटून घेतले. चारुहासला केवळ पैसे कमावण्याचा ध्यास होता. आपल्या बायकोविषयी कधीच त्याला प्रेम वाटले नाही. पत्नी म्हणजे आपली शारीरिक भूक मिटवण्याची स्त्री असेच तो समजायचा. त्यामुळे चारुहास सोबत फक्त ती शरीराने जवळ आली होती, मनाने कधीच नाही.
लताला मुलगी झाली. आता तिचं विश्व फक्त मुलीभोवती फिरू लागले. दरम्यान तिचे सासू – सासरे गेले; पण कर्मठ शिकवणीत वाढलेल्या तिच्या नवऱ्याने आपला कर्मठपणा शेवटपर्यंत सोडला नाही. तिची लेक रुहीने घरातील वातावरणाला कंटाळून तिच्याच क्षेत्रातल्या हरीश परबसोबत लग्नगाठ बांधली. लेकीच्या वागणुकीचा धक्का मात्र चारुहास पचवू शकला नाही. लेकीने हिरा शोधला होता; पण त्याची कदर मात्र चारुहासला करता आली नाही.
इथे अनिकेतने सुद्धा बिछान्यावर अंग जरी टाकले असले तरी भूतकाळ आठवून तो तळमळत होता. किती प्रेम होते त्याचे भक्तीवर. भक्तीचे लग्न झाले आणि अनिकेत नाशिक सोडून बंगलोरला निघून गेला. त्याची मेहनत, त्याचा कामाविषयी असणारा प्रामाणिकपणा यावर खुश होऊन कंपनीच्या मालकांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलीचे आरुषीचे लग्न अनिकेतसोबत लावून दिले.
आरुषी अतिशय हट्टी आणि घमेंडी होती. तिला अनिकेत मनापासून आवडला नसल्याने ती रोज त्याचा पाणउतारा करायची. अनिकेत मात्र बायको म्हणून तिच्यावर प्रेम करायचा, तिची काळजी घ्यायचा. आदित्यच्या वेळी तिच्या गरोदरपणात अनिकेतने तिची खूप काळजी घेतली होती. खरं पाहायला गेलं तर आरुषीला मुलांची जबाबदारी नको होती. ती गर्भ*पात करणार होती; पण अनिकेतला वाटलं की मूल झाल्यावर आरुषीमध्ये बदल होईल म्हणून त्याने तिला मूल होऊ देण्याची विनंती केली. आरुषीने मूल होऊ दिलं पण मुलाला जन्म देऊन तिने अनिकेतला सोडचिठ्ठी दिली. आरुषीच्या वडिलांनी अनिकेतची मनापासून माफी मागितली. आता मात्र अनिकेत पूर्णपणे खचला होता. त्याचे आईवडील आणि इतर हितचिंतकांनी त्याला मुलासाठी दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला; पण त्याने कोणाचेही ऐकले नाही. त्याच्या आईवडिलांना त्याने बंगलोरला बोलावून घेतले. आजीआजोबांच्या छत्रछायेखाली आदित्य वाढला. अनिकेतने त्याचा जॉब सोडला आणि त्याने व्यवसायात उडी घेतली. त्याचा व्यवसाय देखील आता भरभराटीला आला होता. अनिकेतने स्वतःच्या हिमतीवर बंगला बांधला होता. दोन आलिशान गाड्या त्याच्या दारात उभ्या होत्या. त्याच्या लेकाने त्याच्या पसंतीने लग्न ठरवले होते. त्याची होणारी बायको नित्या खूप छान आणि सुस्वभावी होती. आता अनिकेतच्या पायाशी सगळी सुखे होती फक्त त्याच्या जीवनात सहचारिणी नव्हती. आता अचानक भक्तीला पाहून त्याचे मन भरकटले गेले खरे.
दुसऱ्या दिवशी सकाळी लता आणि अनिकेत लवकर उठले. छानपैकी तयार होऊन दोघे गोवा फिरायला एकत्र बाहेर पडले. दोघांनी आपल्या आयुष्यातील घटना एकमेकांना सांगितल्या. एकमेकांपाशी आपापले मन मोकळे केले. एकमेकांच्या सानिध्यात चार दिवस कसे उडून गेले हे दोघांना समजले नाही. लताचे रात्रीचे फ्लाईट होते परतीचे आणि दुसऱ्या दिवशी मिटींग आटपून अनिकेत निघणार होता बंगलोरला. लंचला मुद्दामहून अनिकेतने एका बीचवर व्यवस्था केली होती. समुद्राच्या लाटा पाहत, त्याची गाज ऐकत ते दोघे जेवत होते. दोघेही निःशब्द झाले होते. चार दिवसांत दोघांचे जग बदलले होते;पण आता ह्या वयात पुन्हा एकत्र येणे शक्य नव्हते. समाज काय म्हणेल ? मुले काय म्हणतील ? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित झाले होते. दोघे पुन्हा कधी भेटतील हे देखील त्या दोघांना माहीत नव्हते. दोघांचं अंतःकरण जड झाले होते.
अचानक अनिकेतने लताच्या हातावर त्याचा हात ठेवला. लता एकदम चपापली. ” भक्ती ! तुझ्यासोबत हे चार दिवस कसे गेले समजले नाही. खरंतर आयुष्यभरासाठी मी तुला निवडले होते; पण नशिबाने आपल्याला एकत्र येऊ दिले नाही. आज आपण जीवनाच्या अशा वळणावर येऊन एकमेकांना भेटलो आहोत की मी तुला विचारू शकत नाही की आता पुन्हा नव्याने आपण आपले आयुष्य सुरू करूया का ? देव देखील कुठली परीक्षा पाहतो आहे माहीत नाही.” बोलताना अनिकेतचे मन भरून आले होते.
” हो अनिकेत, नशिबाने कुठल्या वळणावर आपली भेट घडवली आणि ती का घडवली ? आहे ते जीवन आपण ह्यापुढेही असेच जगणार होतो मग आपल्या भेटीचे प्रारब्धाने का आमिष दाखवले ? ह्यापुढे आपली भेट होईल नाही होईल पण ह्या चार दिवसांच्या भेटीच्या आठवणींवर आपण आपले जीवन पुढे नेऊया. आता आपल्या हातात अजून काही नाही.” लताचे डोळे पाण्याने भरले होते.
” त्याची काही एक गरज नाही. आतासुद्धा तुम्ही दोघे एकत्र येऊ शकता.” अनिकेत आणि लताने चमकून वर पाहिले असता रुही, हरीश, आदित्य आणि नित्या उभे होते.
” तुम्ही सगळे इथे कसे ?” दोघांनी त्या चौघांना विचारले.
” आई ! तू डायरीमध्ये रोजच्या रोज तुझ्या मनातले भाव लिहायचीस. बाबा गेल्यावर कपाटात काहीतरी शोधताना ती डायरी माझ्या हाती लागली. त्या डायरीमधलं तुझं मन मी वाचलं. त्या डायरीत अनिकेत ह्यांच्याविषयी देखील तू लिहिले आहेस. आयुष्यभर जतन केलेलं तुझं गुपित तू डायरीमध्ये मांडलं होतंस. सॉरी आई मी तुझी खाजगी डायरी वाचल्याबद्दल; पण मी हरीशच्या मदतीने एक निर्णय घेतला तो म्हणजे कधीतरी तुझी आणि अनिकेत सरांची भेट घडवण्याचा. त्यासाठी मी पहिल्यांदा फेसबुकवर अनिकेत राणे यांना शोधले. तिथे त्यांचा मुलगा आदित्य मला सापडला. त्याच्याशी मेसेंजरवर संपर्क साधून मी सगळी स्टोरी त्याला सांगितली. त्याने पण त्याच्या पप्पांविषयी मला सगळे काही सांगितले मग आम्ही ठरवले ज्या नियतीने तुम्हाला एकत्र आणले नाही तर आता आपण सगळे मिळून तुम्हा दोघांना एकत्र आणू. त्यासाठी आम्ही प्लॅन केला. आमच्या प्लॅनप्रमाणे सगळे घडत होते. तुम्ही दोघे भेटलात हा काही योगायोग नाही.” रुही म्हणाली.
” अरे पण मुलांनो ! ह्या वयात आम्ही कसे एकत्र येऊ शकतो ? समाज काय म्हणेल ?” अनिकेतने विचारले.
” पप्पा ! जे तुम्ही दोघांनी आयुष्यभर सोसले तेव्हा समाज आला होता का तुम्हाला आधार द्यायला नाही ना ? मग समाजाची आता पर्वा करू नका. आता उर्वरित आयुष्य तुम्ही दोघांनी एकमेकांच्या साथीने घालवायचे. चला पॅकिंग करा. रात्रीच्या फ्लाईटने आपण सगळे बंगलोरला जाणार आहोत.” आदित्य म्हणाला.
” अरे पण उद्याची मिटींग ?” अनिकेतने आदित्यला विचारले.
” पप्पा ! मिटींग बिटिंग कुछ भी नहीं है. हा देखील एक प्लॅन होता. ते सगळं जाऊदे, तुम्ही माझ्या मम्माला प्रपोज करा पप्पा.” आदित्य खट्याळपणे बोलला.
” भक्ती ! माझ्याशी लग्न करशील ?” अनिकेतने विचारल्यावर लताने लाजून मानेनेच होकार दिला.
अनिकेत आणि भक्ती आपल्या मुलांचे कर्ज ह्याजन्मी तरी फेडू शकणार नव्हते. दोघेही अतिशय समाधानी झाले होते. अनिकेतच्या सांगण्यावरून भक्तीने गाणे गायला सुरुवात केली, ‘ सावर रे, सावर रे, सावर रे, उंच उंच झुला, उंच उंच झुला, सुख मला भिवविते सांगू कसे तुला ?’
( समाप्त )
लेखिकेचे नाव – सौ. नेहा उजाळे,ठाणे
तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.
धन्यवाद !
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
छान कथा
मनःपूर्वक आभार 😊🙏
छान फुलवली आहे कथा मॅडम
मनःपूर्वक आभार 😊🙏
खूप छान मांडणी👌👌
मनःपूर्वक आभार 😊🙏
किती छान लिहिली आहेस.. कुठेतरी भिडली आत.. मनाच्या तळाशी असलेले काहितरी ढवळले गेले.. अशीच छान लिहीत रहा
सुंदर प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार अनुपमा 😊🙏
Khup Sundar katha
मनःपूर्वक आभार 😊🙏