दिवस गेला.सगळीकडे काळाकुट्ट अंधार पसरला. एक काळी पिवळी जीप धुराळा उडवत आदळत आपटत घराच्या दिशेने आली. घरापाशी येऊन गाडी थांबली. गाडीने उडालेली धूळ आता हळूहळू खाली बसू लागली. गाडीमधून शंकर आणि त्याची बायको शांता खाली उतरले. शंकर डोक्यावरची टोपी काढून धूळ झटकू लागला.
“आवं काका… आधी पैसं द्या .मग झटका धूळ मला लई उशीर झालाय. जीपचा ड्रायव्हर रुबाबात बोलला.
“आरं बाबा देतो की म्या काय पळून चाललोय का? तुझ्या जिबड्यानी पार कापडं धुळीनं गिरबडवली.किती झालं सांग? ” शंकर वैतागत बोलला.
“तीस रुपये द्या.”चेहऱ्यावरचा घाम रुमालानं पुसत ड्रायव्हर बोलला.
“तीस रुपय ? आरं यष्टी बी इस रुपय घिती आनं तुझं कुठनं आलं रं तीस रुपय.” शंकरचा राग आता जास्तच चढला होता.
“यष्टीनीच यायचं ना मंग ? “ड्रायव्हरही आवाज चढवून बोलला.
“यष्टी यत नाय इकडं.”शंकर म्हणाला.
” एव्हढ त कळतंय मग का वाकड्यात शिरताय.या आडवाटला कोण बी यायला मागत न्हाय .रस्ता कमी आनं खड्डचं मोकार हाय.त्यात या गोणपाटात काय कोंबड हाय वाटतं त्यांनी पार आख्या रस्त्यात रंजीस आणलं हाय . या खड्ड्यांनी घरी गेल्यावं आंग पार फुनफुन करतय . दरदिसच्या माणसांना नाय सांगाव लागत. तुमी नवं हाय वाटतं.जाऊंद्या मला लई यळ झालाय .म्या निघतो. ” असं म्हणून गाडी गरकन वळून धुरळा उडवत परत माघारी फिरली.
“शांते या पिश्या घे तू म्या गोणपाट घेतू. आनं काय रं बाबा गप बसवत नव्हत का तुला? नुस्ता आपला खुडबुड खुडबुड . त्यो भंगार रस्ता एकपट आनं तू दुप्पट . ” गोणपाटातल्या कोंबड्याशी बोलत शंकर आणि शांता घराकडं निघाले.
“आक्का ss ए गोदाआक्का sss” दारापाशी उभे राहून शंकर आवाज देऊ लागला.
गोदाआक्काने दरवाजा उघडला . आणि आश्चर्याने ती म्हणाली . “शंकर! शांता ! या या .लई अचानक येणं केलं.काय निरोप नाय …काय नाय. आनं लई अंधार पाडला यायला .” मोठ्या कौतुकाने गोदाआक्का विचारपूस करू लागल्या.
“आगं आक्के तुझ्याकं यायला हाय का काय सोय ? कवा धरण उभं होतो ठेस्नावं तवा कुढं ही लटमाळी जीब भेटली.”शंकर थकल्यावानी बोलत होता.
“शांता कशी हाय गं? “शांताकडे पाहत गोदाने विचारले.
“बरी व्हते पण तुमच्या रस्त्यांनी कंबालडं मोडलं .”शांता मस्करीत बोलतच गोदाच्या पायाला वाकली.
“बरं हात पाय धून घ्या म्या चा… टाकते.” अंघोळीच्या मोरिकडे हात करत गोदा म्हणाली.
” काय ओ वन्स … भाऊजी आनं संतू दिसत नाय.” छोट्याशा घराव नजर फिरवत शांता बोलली.
“हे गेलत वाण्याकं थोडा किराणा आणाया. आनं संतू बी लागला माग त्यांच्या .येईलच एव्हढ्यात .” घरातील पसारा आवरत गोदा म्हणाली.
हात पाय धून शंकर आला.मागोमाग शांताही आली.तेवढ्यात म्हादबा आणि संतू आले.
“मामा sss ” म्हणून संतू मामाला जाऊन बिलगला.
सगळ्यांनी एकमेकांची विचारपूस केली.आणि शंकर म्हणाला.”बरं हया कोंबड्याला कुढं ठेवायचं . त्याचं काये आक्का… आमच्याकं महामारी आली आनं त्यात सगळ्या कोंबड्या गेल्या.फकस्त एव्हढा कोंबडा त्याव्हडा उरलाय.बारीक हाय थोडा मोठा व्हसतवोर तुमच्याकं ठेवावं म्हणलं.जमलं का?”डोकं खाजवत शंकर बोलला.
“आरं शंकर त्यात काय एवढं राहुंदे दे की.घेऊ काळजी आमी .”गोदा प्रेमाने म्हणाली.
“संतू जा त्या कोंबड्यास्नी पाटीखाली डालून ठीव. सकाळच्याला करू त्याची राण्याची सोय.” चुलीवर चहाचं आधण ठेवत गोदा म्हणाली.
संतूचा आनंद गगनात मावेना.लगबगीनं त्याने गोणपाट सोडले.त्यातून तो लहान कोंबडा भुरकन उडाला.आणि भांड्यांचा फळीवर जाऊन बसला.
“चांगलाच आत्रंगी दिसतोय.”संतूचा बा बोलला.संतूने कोंबड्याला पकडून टोपल्याखाली ठेवले.
संतूचे मामा ,मामी दोन दिवस राहिले .पाहुणचार झाला.आणि ते निघून गेले. संतूने कोंबड्यांचे नाव ‘भैरु ‘ ठेवले.संतूला भैरूचा लळा लागला आणि भैरू ला संतूचा. भैरूच्या रूपात संतूला नवा सवंगडी भेटला. भैरु आल्यापासून त्याने दुसऱ्या मित्रांकडे जाणे कमी केले. शाळेत जाण्याआधी आणि शाळेतून आल्यावर संतू भैरू बरोबर वेळ घालू लागला.
दरोरोज त्याला पाणी, दाने खायला द्यायची काळजी संतू घेई. आता भैरू मोठा होऊ लागला. संतू घरी आला की भैरु लगेच त्याच्या मागेपुढे करी.त्याच्या डौलदार तुऱ्याने आणि रंगीबेरंगी पिसांनी भैरु अगदी मोहक दिसत होता.त्याला खाऊपिऊ घातल्याशिवाय संतू कधीच जेवला नाही.आता भैरू बांग देऊ लागला.दारोरोज सकाळी भैरुच्या आरवण्याने सगळ्यांना जाग येई.
एके दिवशी सकाळी भैरु आरवलाच नाही. गोदा सकाळी उठली .आणि भैरूकडे गेली.तर तो शांत पडला होता.फक्त डोळ्यांनी भिरभिर पाहत होता.”संतू ss ए संतू ss आरं भैरूला काय झालं बघ की रं” काळजीनं गोदा आवाज देत होती.
संतूने अंगावरची गोधडी बाजूला केली आणि ताडकन उठून तो पळत भैरूपाशी आला. त्याच्यापाठोपाठ म्हादबा ही आला.संतूनं भैरू ची मान आपल्या हातात घेतली. आणि प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरू लागला. त्यादिवशी संतू शाळेत गेला नाही.दिवसभर भैरूची काळजी घेऊन त्याला बरे केले.तेव्हा कुठे त्याच्या जीवात जीव आला.
” गोदा मला सकाळच्याला जरा लवकर ऊठीव शेतावं जरा जास्तीच काम हाय.”म्हादबा गोदाला म्हणाला.
“आवं मी तर उठवलचं तुम्हासनी पण मला नाय जाग आली तर आपला भैरू हाय की देवाचा दिवा टळलं पण त्याचं आरावनं नाय टळायचं .”गोदा भैरु बद्दल अगदी विश्वासान सांगत होती.
दिवसामागून दिवस गेले. भैरू चांगलाच मोठा दिसू लागला.शंकरचा निरोप आला की “कोंबडं मोठं झालं आसलं त्याला घेऊन तूमी सगळी या आमच्याकडं देवाची जत्रा हाय .”
संतू नाराज झाला.तो गोदाला म्हणाला.”आय आता भैरू मामाकंच राहिल काय?का आपुन पुन्हा घिऊन यायचं त्याला?”काळजीनं संतूचा चेहरा ओशाळला होता.
” काय माहित रं लेकरा आता त्यो मामाचा कोंबडा हाय .त्याची मर्जी .घेऊन बोलीवलंय म्हणल्यावं कोणास ठाव काय करतूय ?” गोदाही काळजीनेच बोलत होती.
जत्रेच्या आदल्या दिवशी गोदा, म्हादबा आनं संतू शंकरच्या गावाला गेले.शंकरने भैरूची तब्बेत बघून संतूच भरभरून कौतुक केले. आणि म्हणाला “आरं संतू आपल्या भैरूला उद्या जत्रत मान हाय. तव्हा त्याची उंद्या चांगली पूजा कर,हळद कुकू लाव बरं का?”शंकर आनंदाने बोलत होता.
संतू लहान असल्यामुळे त्याला काही याचा अर्थ उमगला नाही. त्याला वाटले की उद्या भैरूसाठी खास दिवस आहे म्हणून तो ही खूप खुश झाला.भैरूची जत्रा झाली की मामा पुन्हा त्याला माझ्या सोबत पाठवील . जत्रसाठीचं मामाने भैरूला बोलावून घेतलं आसल . असा संतूचा समज झाला. त्या रात्री संतूने भैरूला लाडाने अंजारले गोंजारले.
जत्रेचा दिवस उजाडला. सगळ्यांची लगबग चालू झाली. दिवसभर संतू भैरूला घेऊन जत्रेत फिरत होता.दुपार झाली.दोन माणसे संतूजवळ आली.त्यांच्या बरोबर मामाही होता. त्यांनी संतू कडून भैरूला घेतले.संतूला वाटले देवाच्या पाया पडण्यासाठी घेऊन चालले आहेत.म्हणून संतूही त्यांच्या मागोमाग गेला.त्या माणसांनी भैरुला देवाच्या पाया पाडले.त्याला थोडी बाजरीचे दाणे खाऊ घातले,पाणी पाजले.आणि तिथेच आडवे करून त्यांनी खिशातून मोठी सुरी काढली. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी भैरूच्या मानेवर सरासर सुरी चालवली.संतू मोठ्याने किंचाळला.त्याने त्या माणसांना शि*व्या द्यायला सुरुवात केली .त्याला काही सुचेना .सुरी चालू होती भैरूने एकदाच डोळे भरून संतूकडे पाहिले .आणि त्याची मान धडावेगळी झाली. भैरूचे रक्त संतूच्या अंगावर उडले .संतूला मामाने आणि दुसऱ्या एका माणसाने धरून ठेवले होते .तो हात पाय झाडू लागला. गरबड्या लोळू लागला.परंतु त्याचे कोणी विशेष मनावर घेतले नाही.संतू घराच्या एका कोपऱ्यात मुसमसून रडू लागला.
“आक्का आसा काय गं तुव्हा संतू ?आख्या गावात चव घालवली त्यानं माझी .त्या कोंबड्यासाठी लईचं यड्यावाणी करत व्हता.मला काय ठाव आसं व्हईल नायतर तुमच्याकं कोंबडं सांभाळायला दिलच नसत. एकतर आख्या गावात कोणाचं कोंबडं राहिलं नव्हतं.आपल्याला त्यो मान मिळाला त या कार्ट्याचं हे असं ” शंकर रागाने बोलत होता.
” बरं आता जाऊद्या . ल्हान हाय त्यो .चला जेवाया माणसं खोळंबली हाईत.” संतूच्या मामीनं पाण्याचा तांब्या शंकरच्या हातात दिला .
माणसं जेवण्यासाठी बसली.बऱ्यापैकी लोकांचं जेवून झालं.संतूची अशी अवस्था बघून गोदा म्हादबा पण जेवले नाही.
” लई जीव लावलं माह्या संतून भैरूला .त्याला खाऊ पिऊ घातल्या शिवाय कवा जेवला नाय.पण….लेकराला काय ठाव का पुढं आसं व्हईल. आसं माहित आसतं त खरंच नस्त ठून घेतलं सांभाळायला भैरूला. ” तोंडाला पदर लावत गोदा ही रडू लागली. म्हादबा पण तोंड सुकवून बसला होता.
“आवं वन्स तुमी बी आसं काय करून राहिले.तुमचं भाव लई तामसी हाय उगं नको ते बुलतीन. चला दोन घास खाऊन घ्या आनं संतूलाबी भरवा. ” शांता गोदाला समजावून निघून गेली.
संतूच डोळं रडून रडून सुजले होते.मामी हातात एक ताट घेऊन आली.
“संतू बाळा आसं करू नगं. चल दोन घास खाऊन घे. आसं म्हणुन शांता ने ताटावरचा रुमाल बाजूला केला.घे बरं खाऊन . “असे म्हणून ताट संतूपाशी ठेवले.
संतूने ताटाकडे पाहिले.त्यात भाकर आणि कालवनात काळीज होते. संतू ताटाकडे एकटक पाहत राहिला.ते काळीज त्याचे होते का भैरूचे होते.हे त्यालाच कळत नव्हते.त्याला जोराचा हुंदका फुटला.त्याने ताट पुढे सरकून दिले आणि गोदाला जाऊन मिठी मारली.आता संतू मात्र ओक्साबोक्शी रडू लागला.
थोडाही वेळ न घालवता गोदा, म्हादबा आणि संतू आपल्या घरी निघून आले.घरी आल्यावर संतूने भैरूला केलेल्या खुराड्यावर नजर फिरवली.गोदाने त्याला जवळ घेतले.
“आय आता मी कोणाशी खेळू गं ? दाना,पाणी कोणाला देऊ गं ? माझ्या अंगावं कोण उड्या मारलं ? माझा भैरू आता मला कधीच दिसणार नाय.कधीच दिसणार नाय……..”
समाप्त !
तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा.आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.अशाच नवनवीन कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या “लेखक मित्र “या वेबसाईटला नक्की भेट द्या.तसेच आमचा “WhatsApp” ग्रुपही जॉईन करा.
धन्यवाद !
लेखिका – शितल औटी, जुन्नर