विभा विचारांमध्ये गढुन गेली होती. पंधरा-सोळा वर्षांपूर्वीचे दिवस ती आठवत होती. आताशा भूतकाळात ती रमून जात होती. जणू तिला हा नवीन छंदच जडला होता.
छोटा विहान व विभा सकाळी उठल्यावर चिऊताईंना तांदूळ टाकायचे.तिच्या स्वयंपाक घराच्या खिडकीत सकाळी चिवचीवाट सुरू झाला की विभाला व विहानला खूपच गंमत वाटायची. हळूहळू विहान मोठा होत गेला. त्याच्या शाळेच्या व विभाच्या ऑफिसच्या व्यापात चिऊताईंचे खिडकीत येणे कधी बंदच झाले ते तिला कळलेच नाही.
आज अनेक वर्षांनी स्वयंपाक घराच्या खिडकीत विभा रेंगाळली व जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.विहान पण शिक्षणासाठी परदेशात निघून गेला. नवऱ्याची सततची टूर त्यामुळे आताशा घरात ती एकटीच असायची.
पूर्वी विहान, त्याचे मित्र, त्यांची बडबड , दंगा. ते सर्व हळूहळू कमी होत गेले व घर शांत झाले.चिऊकाऊच्या गोष्टी ऐकत अनेक पिढ्या मोठ्या झाल्या. विभा लहान असताना या गोष्टी सांगणारी तिची आई आता काळाच्या पडद्याआड गेली आणि ती ज्याला चिऊकाऊच्या गोष्टी सांगत होती, तो विहान आता दूर देशात आपले नशीब आजमावण्यासाठी निघून गेला …. आणि.. आणि चिऊताई.. ती कुठे गेली असेल बरं?
कोणीतरी जोरजोरात बेल वाजवत होते.विभा गडबडीने उठली दाराकडे धावतच गेली मनातुन ती खूपच ओशाळली ,”कोण असेल? आणि किती वेळ झाला असेल दारात ताटकळत उभे ? दुपारी एवढी कशी गाढ झोप लागली मला?” तिने दार उघडले व पाहते तर काय तिच्यासमोर चक्क चिऊताई उभी होती.
काहीशा गोंधळलेल्या अवस्थेत तिने दार उघडले. चिऊताई भुरकन आत येऊन सोफ्यावर बसली.
विभाकडे हसून बघत ती म्हणाली,”खूप वर्षांनी भेटतोय ना आपण? आज कशी माझी आठवण आली तुला?”
विभा नुसतीच हसली. आता चिऊताईच बोलू लागली ,”. तुला आठवते बऱ्याच वेळा तुझा मोबाईल फोन लागायचा नाही आणि तू कंप्लेंट करायची. कुठले नेटवर्क येते? कोणाची सर्विस चांगली आहे? या सगळ्याचा शोध घेत असताना एक दिवस तुला एका कंपनीचा फोन आला व त्यांनी सांगितले तुझ्या घराच्या जवळच त्यांचा मोठा टॉवर आहे व आता तुमचे संभाषण कधीही थांबणार नाही . तुमचे छान जागतिकरण झाले . टेलीफोन मुळे मोबाईल मुळे जग जवळ आले. 2G,3G,4G आणि आता तर 5G नेटवर्क आले. दूर देशातले नातेवाईक, मुलेबाळे, मित्रमंडळी अगदी सहज एकमेकांशी संपर्कात येऊ लागले. तू विहानला दररोज भेटतेस त्याला जवळून पाहतेस,बोलतेस ते सुद्धा एका बटनावर.. मला तर खूपच आनंद होतो, पण जसजशी तू बाहेरच्या जगाशी बोलू लागली तुला वेळ पुरेनासा झाला आणि तुझ्या आयुष्यातून.. तुझ्या घरातून… नव्हे नव्हे… तुझ्या शहरातूनच मी कधी निघून गेले हे तुझ्या लक्षात आले नाही.
आज अनेक वर्षानंतर तुला माझी आठवण झाली, मला पण खूपच आनंद झाला व मी पण मनोमन ठरवले की तुला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मी नाही तर अजून कोण देणार? “मोठाले टॉवर बिल्डिंगचे असो अथवा मोबाईलचे त्यामुळे आमची जन्माला यायच्या आधीच पिल्ले मरू लागली. आमच्यातले काही जण जीव वाचवून स्थलांतर करू लागले, पण दुर्दैवाने कुठेच आम्हाला जागा मिळेनाशी झाली.
तुझीच तीन मजली बिल्डिंग आता अकरा मजली झाली. प्रत्येक जण स्पर्धा करू लागले कोणाची बिल्डिंग मोठी कोण कुठल्या मजल्यावर राहणार २०, २२ का २६ .
माणसांची वाढती संख्या त्यामुळे प्रत्येकाकडे मोबाईल आले. काँक्रीटच्या जंगलामध्ये आमचा श्वास मात्र गुदमरू लागला.ॲमिनीटी एरिया म्हणत छोटेसे गार्डन तिथेच नानानानी पार्क, चिल्ड्रन्स प्लेएरिया, छोटेसे देऊळ, व्यायामासाठी जिम व छोटासा इन्फिनिटी पुल. एकंदर काय तर झाडे कमी वावरायला मोकळी जागाच नाही नुसतं काँक्रीटचे साम्राज्य वाढले. मग आमच्यासाठी जागाच उरली नाही” चिऊताई भडाभडा बोलत होती विभा अपराधी भावनेने सर्व निमूटपणे नुसते ऐकत होती.
नवीन घरात बाल्कनी, टेरेस नको त्याऐवजी एखादी रूम चालेल असं म्हणत तुम्हा लोकांनी फक्त आपली सोय पाहिली.नवीन घरात कचरा नको, माती नको म्हणत तू पण होत्या त्या छान, कुंड्या झाडे सगळे देऊन टाकलेस.आजकालच्या नवीन घरात माळा नको अडचण नको म्हणत सोयीस्करित्या आमची घरटी घालायच्या जागा पण तुम्ही बळकावल्या व लॉफ्ट क्लोज करून तुमच्या घरातले अडगळीचे सामान तुम्ही वर टाकले.
काही लोकांनी हौसेने चार कुंड्या घरात ठेवल्या,पण कीटकनाशक फवारे मारून त्यांनी त्यांची बाग फुलवली. बिल्डिंगच्या खालचे गार्डन माळी बुवा छान राखतो पण भरमसाठ कीटकनाशकांचे फवारे मारतो.
जे छोटे किडे आमचे अन्न होते ते त्यांनी मारून टाकले, आमचा मात्र भूकबळी गेला.नवीन बिल्डिंगमध्ये नवीन मंडळी आली व भिशी पार्ट्या, एकत्र सण उत्सवात तुझ्यासारखी मंडळी ज्या मला तांदूळ, ज्वारी, बाजरी टाकत होती ती पण स्वतःच्या रहाटगाडग्यात अडकली व आम्हाला मात्र पूर्णपणे विसरली.
विभा सुन्न होऊन सर्व ऐकत होती. एकएक बदल, एकएक स्थित्यंतर ती आठवायचा प्रयत्न करत होती. परिस्थिती एवढी हाताबाहेर गेली आहे याची तिला कल्पनाच नव्हती.खरंच तर बोलत होती चिऊताई.हल्ली विभा व तिचा नवरा निसर्गाच्या सानिध्यात भटकंतीसाठी जात होते, जिथे मोबाइलला रेंज येणार नाही अशा शांत निवांत ठिकाणाचा ती शोध घेत असे.मग अशा एखाद्या गावात तिला हमखास चिऊताई दिसायची. परत चिऊताईच्या आठवणी ताज्या व्हायच्या आणि परत घराकडे आले की सर्व विसरून जायची.
या खेपेला चिऊताईंचा विचार करता करता
कधी तिला डोळा लागला हे समजले नाही. या विचार चक्रातून ती खडबडून जागी झाली.बापरे! हे माझ्या मनातले खोलवरचे विचार आज एकदमच दूध जसे उतू जावे तसेच वाहून आले …
विभा उठली, तिने तोंडावर पाण्याचा हबका मारला. मनात उडालेला गोंधळ एकेक करून बाजूला सरला. चहाच्या आधणाला उकळी आली चहा मुरे पर्यंत तो तिने झाकून ठेवला.चहाच्या घोटाबरोबर परत ती विचार करू लागली.काय चुकले? कुठे चुकले? हे सर्व परत पूर्वीसारखे करता येईल का?
आता मोर्चा वही व पेनाकडे वळाला.प्रगती व पर्यावरणाचे संवर्धन हे हातात हात घालूनच पुढे जायला पाहिजे.आता वाढवलेल्या गरजा, आरामात राहायच्या लागलेल्या सवयी हे सर्व तर आपण बदलू शकत नाही पण आपण पर्यावरणाचे संवर्धन कसे करू शकतो याविषयी ती विचार करू लागली.
काही प्रयोग स्वतः करून बघायचे तिने ठरवले. घरातल्या छोट्याशा बाल्कनीत पूर्वीसारख्या पाच-सहा कुंड्या आणून छानशी झाडे लावायचा बेत तिने मनात आखला.या खेपेला घरच्या घरीच देवाचे निर्माल्य, भाज्यांचे देठ यांचा वापर करून व्हर्मीकल्चर करून तेच खत झाडांना वापरायचे ठरवले.बाल्कनी मध्ये पक्षांसाठी छोटी छोटी घरटी टांगायची. तिथेच दररोज पाणी व तांदूळ, ज्वारी, बाजरी ठेवायचे.
गौरी ,गणपती, सत्यनारायणाच्या पूजेत वाहिलेले गेजा वस्त्रांचा कापूस पक्षांच्या घरट्यात सांभाळून ठेवायचा.एक प्रकारे नदीत किंवा ओढ्यात विसर्जन करायला मनाई असल्यामुळे पर्यावरणाला हानी होणार नाही व पर्यावरणाचे संवर्धन पण होईल.
हा प्रयोग यशस्वी झाला तर सोसायटीमध्ये सगळ्यांना सांगून परत चिमण्यांची घर वापसी करायची.विभाला आता खूप बरे वाटत होते.विचारांच्या तंद्रीत संध्याकाळ कधी झाली हे तिला समजलेच नाही.तिन्हीसांजेला देवापुढे दिवा लावायच्या तयारी असताना परत एकदा बेल वाजली.
दार उघडून तिने पाहिले व तिला दारात अचानक विहानचे सगळे मित्र आलेला पाहून तिला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. “Surprise” म्हणत मित्रांच्या मागे लपून बसलेल्या विहाननी विभाला कडकडून मिठी मारली.
पूर्णपणे गोंधळून तिने त्याच्याकडे पाहिले.अग असे काय करतेस? उद्या तुझा पन्नासावा वाढदिवस म्हणून मी व बाबांनी तुला surprise द्यायचे ठरवले होते.
विभाच्या घरात परत एकदा चिवचिवाट सुरू झाला.
वृषाली पुराणिक,पुणे
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
खूप सुंदर व अप्रतिम कथा…विचारात पाडणारी…सुखद शेवट…👌👌💐💐
खूप खूप धन्यवाद. आपल्या प्रतिक्रियेमुळे नवीन लिखाणासाठी ऊर्जा मिळाली.
विचार चक्राला चालना देणारे अतिशय उत्तम सादरीकरण .keep it up
खूप खूप धन्यवाद. नवीन नवीन विषय लिखाणासाठी ऊर्जा मिळाली.
थोडक्यात पण स्तुत्य विचार मांडले आहेत. पर्यावरणाचा विचार वाचकांच्या मनात सोडून सुखांत साधल्याने गोष्ट भावली.
खूप खूप धन्यवाद. आपल्या कौतुका मुळे नवीन नवीन विषय लिहिण्यासाठी प्रेरणा मिळते.
कथेचा वेगळा विषय खुप छान मांडलाय , सरप्राईज पण छान आहे😀 ..👌🏼👌🏼